Skip to main content

रागी रोटी(कानडी अन्न संस्कृती)

 रागी रोटी
(कानडी अन्न संस्कृती)


                      आधी या मालिकेला दक्षिण भारतीय अन्न संस्कृती नाव द्यावे असे वाटले. तथापि दक्षिण भारतीय नक्की काय आहे, हे सुद्धा मला बऱ्याच दिवसांपासून स्पष्ट करायचे होते. वाटले हे निमित्त उत्तम आहे. तर आपण म्हणजे साधारण महाराष्ट्र आणि तेथून उत्तरेकडील संपूर्ण भाग दक्षिण भारतीय म्हणजे मद्रासी असा उल्लेख करतात आणि तसाच समजही आहे. तथापि ते तसे नाही. दक्षिण भारतात चार राज्य आहे हे सर्वज्ञात आहेच. पैकी कर्नाटकात कानडी लोक राहतात आणि ह्याची भाषा कन्नड किंवा कानडी. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात तेलगु भाषा बोलली जाते. तर तामिळनाडू राज्यात तमिळ लोक तमिळ भाषा बोलतात आणि केरळ, अगदी पिटुकले राज्य, परंतु येथील साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे. हे लोक मल्याळी भाषेत संवाद साधतात. थोडक्यात दक्षिण भारतात पाच राज्य असून चार भाषिक लोक राहतात. अर्थातच आपल्या मराठी प्रमाणे येथे सुद्धा दर बारा मैलावर भाषा बदलते. असा हा दक्षिण भारत! या मालिकेत कानडी अन्न संस्कृतीची ओळख आणि माहिती.
                     काही वर्षांपासून दक्षिण भारतात रहिवास असल्याने, बऱ्याच दक्षिण भारतीय अन्न-पदार्थांची ओळख झाली आहे, इतकेच नाही तर त्यातील काही अगदी मनापासून आवडूही लागले आहेत. ओघाने ते पदार्थ करता सुद्धा येतात. त्यातील एक-एक पदार्थाची ओळख, त्याच्या साठी लागणारे साहित्य, कृती सारेच आनंदी पावसात समविष्ट करण्याचा मानस आहे.
                    सुरुवात माझ्या अतिशय लाडक्या, आवडीच्या पदार्थापासून करते! रागी रोटी! असाच उल्लेख केला जातो या पदार्थाचा. रागी हा शब्द कानडी, रागी म्हणजे नाचणी/नागली आणि रोटी, खरतरं हा हिंदी शब्द, परंतु कानडी जन तो तसाच वापरतात. तर असा हा पदार्थ रागी रोटी. करायला अतिशय सोपा, फसण्याचा वगैरे प्रश्नच उद्भवत नाही. अतिशय पोष्टीक! रागी मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर, लोह आणि प्रथिने असतात. हाडे मजबूत राहणे, वजन कमी करणे हे आणि असे बरेच फायदे असतात रागी खाण्याचे. सर्वत्र सहज उपलब्ध असते, धान्य, पीठ आणि सत्त्व स्वरूपात मिळते. तान्ह्या बाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत साऱ्यांनाच उपयुक्त.
                हा पदार्थ साधारणपणे आपल्या थालीपीठ या प्रकारासारखा आहे. रागी रोटी करण्यासाठी रागीचे पीठ हा मुख्य घटक. यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर हे मुख्य घटक. पुढे आवडीप्रमाणे, आपण थालीपीठात घालतो तसे, टमाटे, गाजर सुद्धा घातलात. एक आगळा प्रकार म्हणजे यात शेपूची भाजी सुद्धा बारीक चिरून घालती जाते. त्यामुळे त्याची एक छान चव येते. मला शेपू तसाही खूप प्यारा. परंतु बऱ्याच लोकांना नाही आवडतं. अजिबात आवडतं नसेल तर नाही घातला तरी चालतो. बारीक चिरलेली किंवा ठेचलेली हिरवी मिरची. माझ्या सारखी ज्यांना हिरवी मिरचीचे पथ्य आहे, अशांनी लाल मिरचीचे तिखट घालावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मीठ, चवीनुसार.
                 वरील सर्व जिन्नस, म्हणजे रागी पीठ, तिखट, मीठ, कांदा, कोथिंबीर, गाजर, टमाटे, शेपू  एकत्र करावे आणि गरजेनुसार त्यात पाणी घालून थालीपीठाला भिजवतो त्याप्रमाणे भिजवावे. पुढील सर्व कृती थालीपिठाप्रमाणेच. म्हणजे पोळीपाटावर एक ओले कापड ठेवून, भिजविलेल्या पिठाचा एक गोळा ठेवावा. थापून त्याची रोटी तयार करावी आणि गरम तव्यावर टाकावी. आवडीप्रमाणे त्यावर, तेल, तूप किंवा लोणी घालून थालीपिठाप्रमाणे खमंग, खरपूस भाजून घ्यावे. गरमागरम रागी रोटी खाण्यासाठी तयार आहे! 
                  रागी रोटी सोबत, लोण्याचा गोळा, नारळाची चटणी, पुदिन्याची चटणी, लोणचे, आवडीप्रमाणे इतर कुठलीही चटणी ओली किंवा सुकी खाऊ शकता! अतिशय साधी, सोपी, पटकन होणारी, चविष्ट, रुचकर आणि अत्यंत पौष्टिक. घरात फक्त रागीपीठ असले की झाले. कितीही गडबड असो, पटकन एक-दोन केली आणि खाल्ली की अगदी पोट तुडुंब भरते, भरपूर वेळ पोटाला आधार राहतो आणि संपूर्ण आरोग्यदायी!
II कन्नड भूमी अर्पण मस्तु II
II कर्म भूमी अर्पण मस्तु II
©️®️आनंदी पाऊस
(कानडी अन्न संस्कृती)
३० ऑगस्ट २०२६














Comments

  1. मिलिंद ढेरेOctober 23, 2026 6:36 am

    👌

    ReplyDelete
  2. डॉ दीपक शिरसाठOctober 23, 2026 6:56 am

    छान

    ReplyDelete
  3. उषा पाटीलOctober 23, 2026 8:26 am

    पूर्वी नाचणी आम्ही जास्त खात नव्हतो, तसं माहित पण नव्हतं, आता मात्र नाचणीचे डोसे तू म्हणते तसे थालीपीठ, इडली वगैरे करून खातो, भाकरी पण छान लागते, नाचणी खरच खूप पौष्टिक आहे, कॅल्शियम पण त्यात भरपूर आहे, चांगला विषय घेतला,

    ReplyDelete
  4. भारती फेगडेOctober 23, 2026 9:42 am

    😋😋 मला आवडते.

    ReplyDelete
  5. पल्लवी इंगळेOctober 23, 2026 9:43 am

    मस्त.. करून बघते 👍🏻👍🏻

    ReplyDelete
  6. Dr Manish ChaudharyOctober 23, 2026 9:43 am

    Chchan lagate Raagi roti

    ReplyDelete
  7. गुलाबराव पाथरकरOctober 23, 2026 9:44 am

    छान आहेत आपले कानडी पदार्थ .

    ReplyDelete
  8. I salute you ..How ever l have seen .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

दाय गंडोरी-पद्धत१(मिरचीची भाजी)(थोडं झणझणीत...)

  दा य गंडोरी-पद्धत१ (मिरचीची भाजी)   (थोडं झणझणीत...)                           दाय गंडोरी ! खास खानदेशी शब्द आणि खास खानदेशी भाजी! अवघ्या खानदेश वासीयांची अतिशय लाडकी, आवडती भाजी.                          दाय गंडोरी यातील दाय शब्दाचा अर्थ आहे डाळ आणि गंडोरी म्हणजे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. थोडक्यात मिरचीची डाळ घालून केलेली भाजी. दाय गंडोरी खास 'लेवा गणबोली' तील शब्द!                          यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, आंबटचुका, वांग, कच्चे टमाटे, आलं, लसूण, हळद, शेंगदाणा कुट, सुक्या खोबऱ्याचा कीस, भरपूर, खूप सारी कोथिंबीर, तेल मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मीठ. उपरोक्त उल्लेखाप्रमाणेच ही भाजी अतिशय झणझणीत असते. परंतु आता सगळेच तिखट थोड्या कमी प्रमाणात खातात त्यामुळे फार तिखट नसते. पण आवड असलेले, पट्टीचे खाणारे असलेल्या घरांतून अजूनही चांगली झणझणी...

भरीत रविवार सकाळ (घरातील गमती जमती)

भरीत रविवार सकाळ   (घरातील गमती जमती)                                                                                                                                     हिवाळ्यात खूप महत्वाची आणि सगळ्यांचीच आवडती म्हणजे भरीत सकाळ!  ही सकाळ म्हणजे फक्त हिवाळ्यातच शक्य असते. आणि हो, हे भरीत म्हणजे तेच प्रसिद्ध खान्देशी  वांग्याचे भरीत! हे  जे खास भरीताचे वांगे असतात ते फक्त हिवाळ्यातच मिळत तेव्हा तरी. आता मिळतात जवळ जवळ वर्षभर, पण मग या वांग्यांना आणि भरताला छान चव नसते. खरी चव चाखायची तर ती फक्त आणि फक्त हिवाळ्यातच! या भरीतासाठी लागणारे दोन फार महत्वाचे घटक म्हणजे कांद्याची पाथ आणि भरीताच्या खास जाड मिरच्या! या दोन्ही घटक...