गोपाळकाला (काही अनुभवलेलं...) जन्माष्टमी! दहीहंडी! गोपाळकाला! यापैकी कुठल्याही एका शब्दाचा उल्लेख आला, की बाकीचे शब्दही आपोआपच डोळ्यासमोर येतात. त्याच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी, आठवणी सुद्धा मनात गर्दी करतात. कारण हे सर्व शब्द निगडीत आहेत, ते आपल्या लाडक्या कान्ह्याशी, म्हणजेच बाळ कृष्णाशी. अगदी आपल्या नकळत्या वयापासूनच आपल्याला याची ओळख झालेली असते आणि त्या ओळखीतूनच तो आपला सर्वांचा लाडका झालेला असतो, अगदी कायमचा! अर्थातच माझाही अत्यंत लाडका आहेच! तसेच त्याच्याशी निगडीत वरील सर्व शब्द सुद्धा आवडते, त्यांच्या आठवणी सुद्धा अतिशय सुंदर. निरागस, एक स्वर्गीय आनंद देणाऱ्या वगैरे वगैरे. आजची या शब्दांची व्याख्या, त्यांचे स्वरूप, साजरे करण्याच्या पद्धती सारेच अत्यंत क्लेशकारक. त्याबद्दल न बोललेलेच बरे. अर्थातच या सर्व शब्दांची, कान्ह्याची, ह्या सणांची ओळख झाली ती 'चौधरी सदना'तच. चौधरी सदनाच्या जवळ दोन मंदिरे होती, ती म्हणजे महादेव मंदिर आणि मार...