Skip to main content

Posts

Showing posts with the label वारसा स्पर्धा

वास्तू -आमचे घर (वारसा स्पर्धा २)

वास्तू -आमचे घर (वारसा स्पर्धा २)                         हे आमचे घर , मुळ गावी असलेले घर ! माझ्या पणजोबांनी बांधलेले आहे , साधारण एकोणीसशे पस्तीसच्या आधी . म्हणजे पंच्यायशी वर्षापेक्षा जास्त जुने . जवळ जवळ चार पिढया राहिल्या या घरात . अगदी लहान असतांना मी काही काळ राहिले आहे या घरात . नंतर मात्र निमित्तानेच जाणे होत असे .                          अर्धा भाग तळमजला आणि वर दोन मजले आहेत . या भागाचे छत उतरते (स्लोपींग sloping ) आहे . अर्ध्या भागात तळमजला आणि वर एक मजला आहे(हे अर्धे बांधकाम जरा नंतरच्या काळातील आहे . या भागावर मात्र गच्ची आहे . लोड बेअरिंग बांधकाम आहे . भिंती जवळ जवळ एक फूट जाड आहेत . त्याकाळी सुद्धा भिंतीमध्ये लोखंडी तिजोरी बसवलेली आहे . अजून अगदी जशीच्या तशी आहे .                           एक महत्वाची आणि अभिमानाची ग...

वस्तू - पेटी चरखा (वारसा स्पर्धा २)

  वस्तू - पेटी चरखा (वारसा स्पर्धा २)             गांधीजींनी २४ जुलै १९३० रोजी चरखा तयार करण्याची देशपातळीवर स्पर्धा घेतली होती . ३० ऑक्टोबर पर्यंत देशाच्या विविध कारागीरांनी यात भाग घेतला होता . या साठी अटीही बऱ्याच होत्या . जसे वजन , बजेट , वापरण्यासाठी सोप्पा वगैरे वगैरे आणि विजेत्याला त्याकाळी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते . तेव्हा देशाच्या वेगवेगळ्या भागातून जवळ जवळ २० वेगवेगळे चरखे आले होते . त्यापैकी काही म्हणजे अंबर चरखा , पेटी चरखा , सावली चरखा , किसान चरखा , बांबूचा चरखा , बांबूच्या पेटीचा चरखा ,राजस्थान चरखा , पंजाब चरखा , येरवड्याचा चरखा .               माझे आजोबा तेव्हा स्वातंत्र चळवळीत बरेच सक्रीय होते . तेव्हाच त्यांनी हा पेटी चरखा आणला होता . त्यांनी स्वतः अगदी आयुष्यभर खादीच वापरली .  काही काळानंतर एक खादीचे दुकान चालू केले आणि अगदी शेवट पर्यंत चालवले . हा चरखा आमच्या मुळच्या गावातल्या घरा...

कौशल्य - सुताचे गोळे आणि वाती (वारसा स्पर्धा २)

  कौशल्य - सुताचे गोळे आणि वाती (वारसा स्पर्धा २)                   हे कौशल्य माझ्या आजीचे , वडिलांच्या आईचे . आता ती नाही या जगात , पण या सुताच्या गोळ्यांच्या आणि वरातीच्या रूपात मात्र कायमची आहे माझ्यासोबत . शेतातुन मुळ स्थितीत असेल , तसा कापूस येत असे तिच्याकडे , घराचा किंवा कोणी ओळखीच्या लोकांकडून . ज्यांना वाती हव्या आहेत ते किंवा ज्यांच्याकडे कापूस आहे ते , असे सगळे लोक तिला कापूस आणून देत , पुण्य्याचे काम वाटे लोकांना .                     मग ती आधी हाताने वेचून वेचून त्या कापसावरील सगळा अगदी बारीक बारीक कचरा सुद्धा काढून टाके . नंतर त्यातील एक एक करून सगळी सरकी(कापसाचे बी) काढून घेत असे . कधी कधी आम्हा मुलींना पण म्हणे , बघा बर ,  यात एखादी सरकी राहिली आहे का? मग आम्ही सुद्धा बघत असू . काय छान वाटे त्या मऊ-मुलायम कापसातून हात फिरवायला ! एकदा का सगळ्या सरकी क...

आनंदाचा झरा (वारसा स्पर्धा २)

  आनंदाचा झरा  (वारसा स्पर्धा २)                                             आज मी माझ्या थोड्या वेगळ्या वारस्या बद्दल सांगणार आहे . या स्पर्धेतील कुठल्याही सदरात न मोडणारा . माझ्या सतत आनंदाने झिरपत असणाऱ्या झऱ्याबद्दल . हा वारसा भौतिक स्वरूपाचा नसल्याने अर्थातच याचा फोटो मी देऊ शकणार नाही .                                             एकदा मी माझ्या आईशी फोनवर बोलत होते . काही एक गोष्ट मला तिच्यासारखी जमत नव्हती , बहुतेक त्याबद्दल . आणि मी एकदम बोलून गेले , काय ग तुझ्यातले माझ्यात काही उतरले नाही . तू इतकं काय काय आणि उत्तमच करत असते आणि मला त्यातलं फारस काही जमत नाही . तर ती म्हणाली , उतरली आहे की एक महत्वाची गोष्ट , माझ्यातील उत्साह आणि कायम आनंदी रहाणे . काय खुश झाले खरंच मी त्या क्षणी ! आणि जसजसा ...

वस्तु - खल आणि शंख (वारसा स्पर्धा 2)

 वस्तु - खल आणि शंख  (वारसा स्पर्धा -2)                      माझे आजोबा (आईचे वडील) वैद्य होते . आयुर्वेदिक औषधांसाठी लागणारा सगळा कच्चा माल ते स्वतः जाऊन खरेदी करून आणत . त्यानंतर त्यापासून सगळ्या प्रकारचे चूर्ण , भस्म , ते स्वतः , स्वतः च्या हाताने , कुणाच्याही मदतीशिवाय तयार करत . हे चूर्ण तयार करण्यासाठी ह्या खलांचा वापर करत . अगदी छोट्या आकारापासुन ते अगदी मोठ्या आकारापर्यंत असे जवळ जवळ पाच सहा खल होते त्यांच्याकडे . सगळ्यात मोठ्ठे तर खूपच वजनी होते , पण ते स्वतः उचलत गरज लागली तर . ते गेल्यानंतर , आम्ही कुणीही त्या  खलांचा वापर करू शकत नव्हतो . म्हणून एक मोठ्ठे खल , एका वैद्यांना दिले . बाकी उरलेले माझी आई , मामे बहीण आणि मी घेऊन आलो आपापल्या घरी , त्यांची आठवण म्हणून . मी तर त्याचा काहीही वापर करत नाही . पण आजोबा त्या स्वरूपात कायम माझ्या सोबत आहे , ही जाणीव कायम असते . हे सगळे खल शंभर वर्षापेक्षाही...

वस्तु - शेवयांचा घडीचा (घोडीचा) पाट (वारसा स्पर्धा २)

 वस्तु  -  शेवयांचा घडीचा (घोडीचा) पाट  (वारसा स्पर्धा २)                                  अलीकडे आपल्या पारंपरिक भारतीय शेवया अगदी नामशेष झाल्या आहेत . पण परदेशी न्युडल्सनी मात्र चांगलाच धुमाकूळ घातलाय आणि अतिशय लोकप्रिय सुद्धा झाल्यात आपल्या भारतात . आपल्या आजच्या पिढीला शेवया माहितीच नाही म्हटले तरी त्यात काही वावगे होणार नाही .                                    आता शेवयाच नामशेष झाल्यात म्हटल्यावर , त्या करण्याच्या पद्धती आणि उपकरणे सुद्धा पूर्णपणे काळाच्या आड गेली आहेत . मधल्या काळात शेवया करायचे साचे(मशीन) आले होते , मी तेव्हा ते पाहिल्याचे स्पष्ट आठवते आहे . फार कमी वेळात भरपूर शेवया होत त्यात . पण खूप शक्ती लागे आणि शेवया एकदम जाड . त्या तुलनेत पाटावर केलेल्या शेवया फारच बारीक आणि नाजूक . डब्यात भरून ठेवतांनाही हळुवार भराव्या...

पुर्वजांचे छायाचित्र

 पुर्वजांचे छायाचित्र .                                                आजकाल उठता-बसता प्रत्येक क्षणी कित्तेक छायाचित्र काढली जातात . आणि कित्येक खोडुन टाकली जातात . याचा परिणाम , इतके छायाचित्र असतात , की त्यातील कित्येक लक्षात सुद्धा रहात नाहीत आणि ठळक कायमचे लक्षात तर एकही राहत नाही . अगदी थोड्या काळापूर्वी म्हणजे अगदी वीस वर्षांपूर्वी सुद्धा तसे नव्हते . मोजकीच छायाचित्र काढली जात , कारण तश्या सोयी सुविधा ही नव्हत्या आणि बरेच खर्चिक सुद्धा होते . भ्रमनध्वनीत ही सुविधा उपलब्ध झाली आणि छायाचित्रांच्या जगात एकदमच ऐतिहासिक क्रांतीच झाली !                                              आमच्या लहाणपणी सुद्धा असे नव्हते .  अगदी मोजकीच छायाचित्र काढली जात . काही वेळा घरात काही खास समारंभ असे तेव्हाच , घरात स्वतःच...

लाडक्या राजांची जोडी(वारसा स्पर्धा)

  लाडक्या राजांची जोडी. (वारसा स्पर्धा)                  तर ही जोडी कुणी मानवी राजांची नाही , तर ही जोडी आहे दोन झाडांची , फळांचा राजा आंब्याच्या झाडांची म्हणून राजांची  जोडी !                  आमची शेती आमचे मूळ गाव आणि त्याच्या आजूबाजूला विखुरलेली आहे . त्यापैकीच एका शेतात आहे ही जोडी . या फळांचा स्वाद माझ्या आजोबांनीही चाखला आहे म्हणजे उघडच आहे , ही झाड त्याच्या बऱ्याच आधीची असणार . आम्ही मुलं वरचेवर शेतात जात असू , कधी सगळे सोबतच तर कधी एकेकटे , आजी बरोबर किंवा अजून घरातील कोणाही मोठ्या व्यक्ती बरोबर . शेतात उन्हातान्हात भरपूर हुंदडून थकल्यावर छान शांत सावलीची ओढ लागे , तेव्हा ही झाडच आम्हाला त्याच्या विशाल , डेरेदार , थंडगार सावलीत सामावून घेत . असे उन्हातान्हात हुंदडल्यावर या थंडगार सावलीत विसावणे म्हणजे केवळ स्वर्गीय अनुभव , शब्दात वर्णनाच्या पलीकडला !               हे...

पदार्थ - काटेरी हलवा (वारसा स्पर्धा)

पदार्थ - काटेरी हलवा  (वारसा स्पर्धा)                         आपले सगळेच पारंपरिक पदार्थ खूप कष्टाचे आणि बऱ्याच क्रिये-प्रक्रियेतून तयार होणारे असतात . याच कारणाने आजकाल काहीतरी सोप्पा मार्ग शोधून पदार्थ केले जातात . पण मग त्या पदार्थांतील आरोग्य मूल्य कमी होतात किंवा नष्टच होऊन जातात . पारंपरिक पदार्थ शरीराला कुठलीही इजा पोहचवत नाहीतच पण उलट पक्षी ते जर वेळोवेळी त्या त्या मौसमात केले आणि खाल्ले तर  औषधपाण्याची पण गरज पडत नाही . कारण त्या सगळ्यातच तितके औषधी गुण असतात . आणि चवीचा तर प्रश्नच नाही , एकदम अप्रतिमच !                          हे झाले शारीरिक आरोग्य . पण हे मानसिक रित्या सुद्धा तुम्हाला निरोगी ठेवतात आणि जास्त बळकट करतात . कारण तो तो पदार्थ करायला वेगवेगळ्या प्रकारची चिकाटी , संयम , स्वच्छता , एकाग्रता गरजेची असते . ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला मानसिकरीत्या निरोगी राहण्यास गरजेच्या आहेत , ज्या आजकाल...

वस्तु - तुपाच्या वाढया (वारसा स्पर्धा)

वस्तु - तुपाच्या वाढया  (वारसा स्पर्धा)                                                 मानव अगदी सुरवातीपासूनच समुदायांनी, टोळ्याटोळ्यांनी राहत असे. नंतर एकत्र कुटुंब पद्धती . आता मात्र विभक्त कुटुंब पद्धती, त्यातही प्रत्येक वस्तू प्रत्येकाची वैयक्तिक. त्यामुळे घरातीलच सदस्यांचा एकमेकांशी संबंध फारच कमी, नगण्य. शिवाय आर्थिक सुबत्ता, नको वाटावी इतकी जास्त. त्यामुळे एकमेकांची गरजच नसल्यात जमा, रोजच्या दैनंदिन जीवनात आणि सण-समारंभात सुद्धा.                                                 पूर्वी तसे नव्हते. हे पूर्वी म्हणजे फार पूर्वीही नाही, अगदी दोन पिढ्या आधी. कुटुंब तर एकत्र होतीच आणि आजच्या इतकी आर्थिक सुबत्ताही नव्हती. त्यामुळे सगळेच सगळ्यांवर कुठल्या नी कुठल्या कारणाने अवलंबून असत. त्यामुळे सगळेच एकमेकांना धरून र...

वारसा स्पर्धेच्या निमित्ताने (वारसा स्पर्धा)

 वारसा स्पर्धेच्या निमित्ताने                                     या वर्षातील खुप जास्त आणि  वारंवार वापरले जाणारे शब्द म्हणजे 'कोव्हीड-१९' , 'करोना' , 'टाळेबंदी' . आणि यामुळे घरादारातच नाही तर संपुर्ण जगभरातच एक भयानक नकारात्मकता पसरली आहे . अगदी प्रत्येकाची दैनंदिनी पार बदलुन गेलीये . पण या सगळ्या वाईट परिस्थितीत आणि नकारात्मकते मध्ये सुद्धा खुप सकारात्मक गोष्टी घडत आहेत . या सगळ्या गोष्टीबद्दल नंतर सविस्तर लिहिनच . आत्ता फक्त या एका सकारात्मक गोष्टीबद्दल .                                     ती म्हणजे वारसा स्पर्धा ! इंटॅक संस्थेचे भारतभर वेगवेगळे विभाग आहेत . हे सगळे विभाग सतत काही ना काही कार्यक्रम राबवत असतात . या कठीण काळात सुद्धा अनेक कार्यक्रम राबविणे सुरूच आहे , या संस्थेचे . अगदी भरभरून माहिती , ज्ञान  मिळते आहे ....