रूळानुबंध (पुस्तक परिचय) मुखपृष्ठ पुस्तकाचे शीर्षक - रूळानुबंध लेखक - गणेश मनोहर कुलकर्णी प्रकाशक - शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक तिसरी आवृत्ती - २७ फेब्रु २०२६ किंमत ३००/- पृष्ठ संख्या १४६ लेखाचे, पुस्तकाचे शीर्षक वाचल्यावर बऱ्याच जणांना वाटेल टंकीत करतांना चूक झाली असावी. तसे वाटणे साहजिकच आहे. कारण हा शब्दच परिचयाचा नाही. उलटपक्षी ऋणानुबंध हा शब्द सर्व परिचित आहे म्हणण्यापेक्षा, या शब्दच्या आपण सारेच प्रेमात आहोत, ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गांठी भेटींत रुष्टता मोठी... बाळ कोल्हटकरांचे गीत आणि पंडित कुमार गंधर्व- वाणी जयराम यांचे स्वर! मराठी मनात अगदी खोलवर रुतून बसलेले गीत. माझ्या तर फारच आवडीचे, खूप लहान असतांना पासून, म्हणजे अगदी त्यातील शब्दच काय आहे हे नीट कळत नसतं, त्याचे अर्थ समजणे वगैरे फार लांबची गोष्ट. असो. तर पुस्तकाचे आणि लेखाचे शीर्षक अगदी अचूक टंकीत झालेले आहे. रूळ + अनुबंध = रुळानुबंध! अशी फोड केल्यावर साधारण शब्दचा अर्थ लक्षात येऊ शकतो. रूळ म्हणजे आगगाडीशी स...