Skip to main content

तीन तारांकित मंदिर (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

 तीन तारांकित मंदिर 
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)



भारतीय कला प्रसारणी सभेचे वास्तुविद्या महाविद्यालय, पुणे
व तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयपुणे
आयोजित,

पाचवे राज्य स्तरीय वास्तुकला मराठी परिषद, २०२६ 

 

देवकोष्ठांचे माहेरघर - होयसाळेश्वर मंदिर,
हाळेबिडूहसनकर्नाटकभारत 

 

 संशोधक - वर्षा जनार्दन चौधरी 

उपरोक्त उल्लेखित परिषदेत तीन तारांकित मंदिर(संदर्भ-चन्न केशव मंदिर, सोमनाथपूर) या विषयावर शोध निबंध सादर केला. बऱ्याच वाचकांची इच्छा असते हे वाचण्याची. तथापि शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठीचे काही नियम असल्या कारणाने, ते प्रकाशित करणे थोडे जबाबदारीचे आणि काहीसे अवघड होऊन बसते. तरीही वाचकांची जिज्ञासा, कुतूहल, उत्सुकता विचारत घेता, त्यातील काही चित्तवेधक भाग येथे प्रकाशित करत आहे. तसेच हे ठिकाण माझ्या पर्यटनाचे आणि अभ्यासाचे विशेष ठिकाण आहे. त्यामुळे आनंदी पावसात त्याला स्थान असायलाच हवे.


भौगोलिक स्थान -

अक्षांश - १२ ३१' १३" उत्तर

रेखांश - ७६ ५३' ३५" पूर्व 

 

चन्न केशव मंदिर, सोमनाथपूर, हे मंदिर कर्नाटक राज्यातील मैसुरू जिल्ह्यात सोमनाथपूर या गावात असून, कावेरी नदीच्या काठावर स्थित आहे. मंदिर मैसुरू पासून ३५ किलोमीटर पश्चिमेला आहे. श्रीरंगापट्टना पासून सुद्धा साधारण सारख्याच अंतरावर आहे. तर कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या बंगळूरू पासून १३६ किलोमीटर अंतरावर आहे.  

 

स्थापत्य रचना -

मंदिराच्या नामातूनच प्रतीत होते, हे मंदिर केशवाला समर्पित आहे. केशव म्हणजे कृष्ण, विष्णूचा आठवा आणि पूर्णावतार. या मंदिराला तीन गाभारे आहेत. म्हणजेच हे मंदिर त्रिदल किंवा त्रिकुट पद्धतीचे आहे. होयसळ राजवट काळात अशा प्रकारच्या मंदिर शैलीची निर्मिती झाली. त्यामुळे या वास्तू प्रकाराला होयसळ शैली म्हणूनही संबोधिले जाते. 

 

गरुड-स्तंभ आणि प्रवेशद्वार -

हे मंदिर चौरस आकाराच्या  प्राकारात(भिंतीत) बंदिस्त आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून या प्राकारच्या पूर्वेकडील भिंतीच्या मध्यभागी मंदिराचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्यासमोर बाहेरील बाजूस एक पाषाण स्तंभ म्हणजेच गरुड-स्तंभ आहे. १० मीटर उंच असलेला हा स्तंभ ग्रानाईट या पाषाणापासून बनविलेला आहे. याचा खालचा भाग चौरस असून त्यावरील भाग १६ बाजू असलेला आहे. त्यावर स्तंभ-शीर्ष आहे, ज्यावर गरुड-मूर्ती होती. आजमितीस मात्र ती अस्तित्वात नाही. 

 

मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस प्राकारच्या मध्यभागी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार एका मंडपसदृश्य स्वरुपात असून, पाषाण स्तंभावर आधारित आहे. हे प्रवेशद्वार पुनर्निर्मित आहे.* साधारणपणे दक्षिण भारतात मंदिराचे प्रवेशद्वार म्हणजे गोपूर असते, त्याप्रमाणेच ही रचना आहे, तथापि वरच्या बाजूला असलेला शिखारासारखा भाग आज मितीस अस्तित्वात नाही. 

 

शिलालेख - 

याच जागेत एक भलामोठा म्हणजे २.८ मी उंचीचा शिलालेख आहे. हा शिलालेख प्राचीन कन्नड लिपीतील असून कन्नड आणि संस्कृत भाषेतील आहे. या शिलालेखात ह्या मंदिराचा निर्माता, त्याच्या बांधकामाचा काळ, पूजा-मंदिरविधी साठी तसेच मंदिराच्या कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेसाठी केलेली तरतूद याबद्दल माहिती दिलेली आहे. सोबतच होयसळ राजवटीचा इतिहास सुद्धा आहे. या गावाच्या नावाबद्दल एक महत्वाची माहिती या शिलालेखातून मिळते. ती अशी, होयसळ राजा नरसिंह (तिसरा) याच्या दरबारात एक सेनापती होता, सोमनाथ दंडनायक. याच्या जहागिरीत कावेरी नदीकाठच्या या प्रदेशाचा समावेश होता आणि त्याच्या नावावरूनच या भागाला सोमनाथपुर असे नाव मिळाले होते. या सेनापतीने सोमनाथपूर येथे वैष्णव मंदिर उभारण्यासाठी निधीची विनंती दरबारात केल्याचाही उल्लेख आहे. या शिलालेखा प्रमाणे या मंदिराचा काळ साधारणपणे १२६८ असा आहे. 

याखेरीज इतरही काही शिलालेख या भागात आहेत.

 

प्राकार -

 मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पाच-सहा पायऱ्या खाली उतरून गेल्यावर एका भव्य प्रांगण दृष्टीस पडते. मंदिराच्या चारही बाजूंनी मंदिराला वेढणारा प्राकार आहे. या प्राकारात पश्चिम, उत्तर आणि दक्षिण बाजूला संपूर्ण लांबीत काही एक गर्भी तर काही द्वि-गर्भी गाभारे आहेत. पैकी ४६ एकगर्भी, तर ४ द्विगार्भी गाभारे आहेत. ह्या सर्व गाभाऱ्यातील मूळ मूर्ती अस्तित्वात नाहीत. या तीनही बाजूंना या गाभाऱ्याच्या समोर एक सलग म्हणजेच इंग्रजी अक्षर सी आकाराचा व्हरांडा आहे. हा व्हरांडा चौरस पाषाण स्तंभांवर पेललेला असून त्यावरील छत सपाट आहे.

मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला याच भागातील काही मूर्तींचे आणि मंदिर-घटकांचे अवशेष संग्रहित करून ठेवलेले आहेत. 

 

मुख्य मंदिर -

प्रवेश द्वारातून आत गेल्यावर काही पायऱ्या उतरून गेल्यावर मंदिराचे प्रांगण आहे. या प्रांगणाच्या मधोमध मुख्य मंदिर अशी रचना आहे. प्रांगणातून पाच पायऱ्या चढून गेल्यावर संपूर्ण मंदिराला वेधणारा प्रदक्षिणा पथ म्हणजेच जगती आहे. जगती तीन फुट उंच आहे. या पायऱ्यांच्या दोनही बाजूंना प्रत्येकी एक याप्रमाणे दोन देवकोष्ठ आहेत. ही देवकोष्ठ मंदिर-प्रतिकृती स्वरुपात आहेत. तथापि ही दोनही देवकोष्ठ भग्न अवस्थेत आहेत. त्यांच्या शिखराचा भाग संपूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. या जगती वरून मुख्य मंदिरात जाण्यासाठी अजून पाच-सहा पायऱ्या चढून जावे लागते.  मंदिर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपाल आहेत. होयसळ मंदिर शैलीचे हे एक व्यवच्छेदक लक्षण आहे. आज अस्तित्वात असलेल्या सर्व होयसळ मंदिरांत अशी रचना बघायला मिळते.

 

 

मुख मंडप - 

या पायऱ्या चढून गेल्यावर मुख मंडप आहे. या मुख मंडपांत डाव्या आणि उजव्या बाजूला कक्षासन आहे. म्हणजे पाषाणात तयार केलेली सोफ्यासारखी रचना. जेणे करून भक्तांना यावर बसता येईल. मुख मंडपांत एकूण सहा पाषाण स्तंभ आहेत तर अठरा वामनस्तंभ बाहेरच्या सीमेवर असून सहा वामनस्तंभ कक्षासनात आहेत. आतल्या बाजूला असलेले स्तंभ वर्तुळाकार कांगोऱ्यानी सुशोभित वामन स्तंभ आहेत. मुख मंडपावर समतल छत आहे.

 


रंग मंडप -

पुढे मुख्य मंडप आहे. यात चौरस आकाराची रंगशिळा आहे. ह्या रंगशिळेच्या चार कोपऱ्यावर प्रत्येकी एक याप्रमाणे चार स्तंभ आहेत. हे स्तंभ खास होयसळ शैलीतील वर्तुळाकार, कांगोऱ्यानी अलंकृत आहेत.  त्यामुळे या मंडपाला रंग मंडप सुद्धा म्हटले जाते. हा रंग मंडप गूढ प्रकारचा असून याच्या तीन दिशांना म्हणजे पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रत्येकी एक असे एकूण तीन गाभारे आहेत. रंग मंडपातही होयसळ शैलीचे खांब असून यावरील वितान नवरंग पद्धतीचे आहे.  

मंदिराच्या मुख्य मंडपात पश्चिमेच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक या प्रमाणे दोन देवकोष्ठ आहेत. या दोन्ही देवकोष्ठातील मूळ देवतांच्या मूर्ती अस्तित्वात नाहीत. तथापि आज मितीस उत्तरेकडील देवकोष्ठ रिक्त आहे, तर दक्षिणेकडील देवकोष्ठात अन्य एक मूर्ती ठेवलेली आहे. 

गाभारा १ -

मंदिरात प्रवेश केल्यावर रंग मंडपाच्या डावीकडे म्हणजेच दक्षिण दिशेला एक गाभारा आहे. ह्या गाभाऱ्याची रचना म्हणजे मंडपातून अंतराळ आणि पुढे मुख्य गर्भगृह. अंतराळ आणि गर्भगृह दोन्हीही प्रवेशद्वारावर द्वारपाल आहेत. भद्र आणि सुभद्र. दोन्ही प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा अतिशय सुंदर आणि बारीक कोरीव कामाने सजविलेल्या आहेत. अंतराळाच्या ललाटबिंबावर वेणुगोपाल शिल्पं आहे. गर्भगृह ८'X' मापाचे असून त्याच्या भिंती अर्धस्तंभ आणि कोरीव कामाने मंडित आहेत.

मूर्ती - या गर्भगृहात साडे चार फुट उंचीची वेणू गोपालाची मूर्ती आहे. यातील कृष्ण बासरी वाजवत असून देहुडा चरणी, स्थानक मूर्ती आहे. ही मूर्ती ज्या पीठावर प्रतिष्ठित आहे, ते पीठ दीड फुट उंचीचे असून त्यावर पंख असलेली मानवी रूपातील पंख असलेले गरुड शिल्पं कोरलेले आहे.  

 

गाभारा २ -

रंग मंडपाच्या पश्चिम दिशेला, पूर्वाभिमुख असलेला हा गाभारा सुद्धा रचनेच्या दृष्टीकोनातून पहिल्या गाभाऱ्याप्रमाणेच आहे. म्हणजे अंतराळ आणि गर्भगृह. ललाटबिंबावर केशवाचे शिल्पं असून, द्वार द्वारपाल आणि द्वारशाखांनी अलंकृत आहे.

मूर्ती - हा गाभारा आज मितीस रिक्त आहे, त्यात कुठल्याही मूर्ती नाही.

 

               

 दामोदर – प्रत्यक्ष क्षेत्र भेटीत पशंगच(पशंगच)                  जनार्दन – लिखित पुराव्यातील मूर्ती(पचशंग)

                          

गाभारा ३ -

तिसरा गाभारा उत्तर दिशेला, दक्षिणाभिमुख आहे. याही गाभाऱ्याची रचना पहिल्या दोन गाभाऱ्यासारखीच आहे. अंतराळ आणि गर्भगृह. या ठिकाणी ललाटबिंबावर जनार्दनाचे शिल्पं कोरलेले आहे.

प्रवेशद्वार अतिशय रेखीव अशा कोरीव कामाने मंडित आहे. 

मूर्ती - दीड फुट उंचीच्या पीठावर मानव रुपात, परंतु पंख असलेले गरुड शिल्पं आहे, जे विष्णूचे वाहन आहे. या पीठावर विष्णूची जनार्दन रूपातील साडे चार फुट उंचीची मूर्ती आहे. अगदी नखशिखांत अलंकार परिधान केलेली मूर्ती आहे. स्थानक, समपद, समभंग, चतुर्हस्त असलेल्या मूर्तीच्या हातात क्रमाने पद्म(कमळ), चक्र(सुदर्शन), शंख(पांचजन्य) आणि गदा(कौमोदकी) ही आयुधं आहेत, असा उल्लेख येतो. तथापि संशोधकाने दोन वेळा या स्थळाला भेट दिली असता, त्यात उपरोक्त छायाचित्रात असलेली मूर्ती आढळून आली. ही मूर्ती, विष्णूची दामोदर रूपातील मूर्ती आहे.

तीन गाभारे असलेले हे मंदिर असल्याने याला त्रिकुट किंवा त्रिदल मंदिर म्हटले जाते. 

 

 

बाह्य भिंती -

मुख मंडपाची बाह्य बाजू वगळता, मंदिराची संपूर्ण बाह्य भिंत स्वर्गीय सुंदर अशा शिल्पांनी अलंकृत आहे. यात विष्णूचे दशावतार शिल्पं आहेत, तसेच क्रमाने रामायण, भागवत आणि महाभारत, तसेच कृष्णलीला अशा विविध विषयांवरील शिल्पं आहेत.

 

 

 

शिखर -

हाळेबिडू आणि बेलूर या दोन्ही ठिकाणी असलेल्या होयसळ मंदिरांना आत मितीस शिखर नाही. तथापि याला अपवाद मात्र सोमनाथपूर येथील केशव मंदिर आहे. या मंदिराच्या तीनही गाभाऱ्यावरील तिनही शिखरे आजही सुस्थितीत आहेत. नागर आणि द्रविड शैलीचे मिश्रण असलेली वेसर शैली. या मंदिराचे शिखर वेसर शैलीचे असून, अगदी संपूर्णपणे पाषाणातील कोरीव कामाने अलंकृत आहे. या प्रत्येक शिखराला शुकनासिका असून, त्यावर त्या-त्या गाभाऱ्यातील सबंधित देवतेचे शिल्पं अंकित केलेले आहे. गाभाऱ्यातील मूर्ती अस्तित्वात नसेल तर, ती मूर्ती कुठली होती हे ठरविण्यासाठी ही शिल्पं अतिशय महत्वाची असतात.  

तीन तारांकित मंदिर - 

मंदिर त्रिदल म्हणजेच त्रिकुट म्हणजेच तीन गाभारे असलेले आहे. या प्रत्येक गाभाऱ्याच्या विधानाचा म्हणजेच तलविन्यासाचा विचार करता असे लक्षात येते की, या प्रत्येक गाभाऱ्याचे विधान तारकाकृती आहे. या प्रत्येक ताराकाकृतीला १६ कोन आहेत. तसेच या भोवती असलेला प्रदक्षिणा पथ म्हणजेच मंदिराची जगती सुद्धा १६ कोन असलेल्या ताराच्या आकाराची आहे. यातील एका आड एका कोनाच्या खालच्या बाजूला सुद्धा प्रत्येकी एक शिल्पं आहे. थोड्या अंतरावरून किंवा आकाशातून पाहिले असते स्पष्ट तीन तारे म्हणजेच तीन ताराकाकृती गाभारे आणि जगती स्पष्ट दिसते. तीन तारांकित मंदिर!

              💫 जगभरात अनेक तारांकित हॉटेल्स आहेत. तथापि त्यातील तारे दिवसा तर सोडाच, रात्री सुद्धा कधी कुणी बघितल्याचे ऐकिवात नाही. आमच्याकडे मात्र तीन तारांकिंत मंदिर आहेत. ज्यातील तारे रात्रीच नाही तर दिवसाही दिसतात आणि अखंडपणे दिमाखात चमकत असतात!💫

💫💫💫🛕🛕🛕💫💫💫


©️®️आनंदी पाऊस 

(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
२७ फेब्रु २०२६
मराठी भाषा गौरव दिवस

Comments

  1. Ar Shrikant BhateMay 15, 2026 11:08 am

    Very good initiative. Hope your efforts reach millions of people. All the best and God bless. 💐💐

    ReplyDelete
  2. Ar Shrikant BhateMay 15, 2026 11:27 am

    I like these words सप्रेम , आनंदी पाऊस. They fill you with joy, vigour, enthusiasm etc . It must also keeping you very cheerful all the time. This is great.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...