साधू - ऋषीकेश (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) मुद मंगलमय संत समाजू I जो जग जंगम तीरथराजू II -श्रीरामचरीतमानस अर्थ - साधूंचा(संतांचा) समुदाय हा आनंद आणि कल्याणाचा स्रोत आहे. हा समुदाय म्हणजे या जगात एक फिरते तीर्थक्षेत्र (प्रयागराज) आहे. साधू! साधू म्हटले की आपल्या प्रत्येकाच्या मनात एक प्रतिमा तयार होते, सोबतच मनात विविध भावनांचे तरंग उठतात. माझेही थोड्या फार प्रमाणात तसेच आहे. सर्वात पहिली भावना म्हणजे भीती. अगदी लहानपणापासून मला या साधुंची प्रचंड भीती वाटे. यासोबतच त्यांच्या बद्दल खूप जिज्ञासा सुद्धा वाटे, अजूनही आहे. पण भीती इतकी, की जवळ जाऊन त्यांच्याशी बोलणे, संवाद साधणे फारच दूरची गोष्ट. लहानपणी वाटे ते आपल्याला पळवून नेतील आणि तशा प्रकारच्या घटना सुद्धा ऐकण्यात येत असतं. त्यातील सत्यता मात्र माहिती नसे. दुसरे म्हणजे ते आपल्याला शाप देतील. लहानपणी आपण प्रत्येक जण घरातील थोरल्या व्यक्तींकडून अनेक कथा ऐकत असतो. त्यात देवादिकांच्या गोष्टीत नेहमीच शाप आणि वरदान दिल्याचे उ...