Skip to main content

साधू-ऋषीकेश (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

 साधू - ऋषीकेश
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) 


मुद मंगलमय संत समाजू I
जो जग जंगम तीरथराजू II 
-श्रीरामचरीतमानस
अर्थ - साधूंचा(संतांचा) समुदाय हा आनंद आणि कल्याणाचा स्रोत आहे. हा समुदाय म्हणजे या जगात एक फिरते तीर्थक्षेत्र (प्रयागराज) आहे.


                           साधू! साधू म्हटले की आपल्या प्रत्येकाच्या मनात एक प्रतिमा तयार होते, सोबतच मनात विविध भावनांचे तरंग उठतात. माझेही थोड्या फार प्रमाणात तसेच आहे. सर्वात पहिली भावना म्हणजे भीती. अगदी लहानपणापासून मला या साधुंची प्रचंड भीती वाटे. यासोबतच त्यांच्या बद्दल खूप जिज्ञासा सुद्धा वाटे, अजूनही आहे. पण भीती इतकी, की जवळ जाऊन त्यांच्याशी बोलणे, संवाद साधणे फारच दूरची गोष्ट. लहानपणी वाटे ते आपल्याला पळवून नेतील आणि तशा प्रकारच्या घटना सुद्धा ऐकण्यात येत असतं. त्यातील सत्यता मात्र माहिती नसे. दुसरे म्हणजे ते आपल्याला शाप देतील. लहानपणी आपण प्रत्येक जण घरातील थोरल्या व्यक्तींकडून अनेक कथा ऐकत असतो. त्यात देवादिकांच्या गोष्टीत नेहमीच शाप आणि वरदान दिल्याचे उल्लेख येत. पैकी वर मिळावा असे प्रत्येकाला मनापासून वाटे. त्याविरुद्ध शाप या प्रकाराची अत्यंत भीती. या साधूंकडे पाहिल्यावर साधारण नकारत्मक भावना येत असे, माझ्या मनात तरी. त्यामुळे ते शापच देतील असे वाटे. 
                         शाळेत जाता-येता किंवा इतर कुठे गेले, तर कुठे नी कुठे हे साधू दृष्टीस पडत. तथापि सगळ्यांत ठळकपणे आठवणी असलेले साधू म्हणजे, चौधरी सदनच्या मागच्या बाजूला असलेले महादेवाचे मंदिर. याचा उल्लेख आणि सविस्तर वर्णन "हरतालिका" या लेखात आलेलेच आहे. तसेच या साधू बुवांचा उल्लेख सुद्धा आलेला आहे. तर आमच्या शेजारच्या इमारतीत एक कुटुंब होते, त्यात आमच्या वयाची एक मुलगी आणि एक मुलगा होते. हा मुलगा अतिशय खोडकर. त्यांच्या गच्चीवरून हे मंदिर सरळ सरळ समोरच दिसत असे. एका दुपारी याच्या मनात काही खोडकर विचार आले. त्याने घरातील एक छोटा आरसा आणला. त्या आरश्यात सूर्य प्रतिबिंब एका विशिष्ट कोनात येईल असा धरला आणि हा सूर्यप्रकाश परवर्तीत होऊन बरोबर, त्या मंदिरात बसलेल्या साधू बुवांच्या चेहऱ्यावर पडू लागला. सुरवातीला त्यांनी दुर्लक्ष केले. तथापि सारखाच त्यांच्या डोळ्या-चेहऱ्यावर तो प्रखर सूर्य प्रकाश येऊ लागला, तसे ते वैतागले. कारण त्याचा त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला. शोध घ्यायचा प्रयत्न केल्यावर त्यांच्या लक्षात आले, या समोरच्या इमारतीतून कुणीतरी खोड्या करत आहे. हा मुलगा काही केल्या, त्यांना त्रास देणे थांबवेना. मग सरळ ते मंदिरातून बाहेर आले आणि त्यांच्या इमारतीचा जिना चढून वर आले. तथापि यांच्या मजल्याच्या एक दादरा खाली एक दार होते आणि ते कायम आतून बंद असे. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष आत काही येता आले नाही. मग त्यांनी दारा आडूनच रागवायला सुरवात केली. बराच वेळ रागावले आणि मग निघून गेले. तेव्हा आम्ही त्यांच्या घरी होती की आमच्या घरातून बघत होतो, हे नक्कीचे आठवत नाही. परंतु तेव्हा मात्र अतिशय भीती वाटली हे सांगायलाच नको. असो.
                           काही वर्षांपूर्वी, थोर चित्रकार आदरणीय चंद्रमोहन कुलकर्णी सरांनी नर्मदे काठच्या काही साधुंची चित्रं काढली. सोबतच त्यांच्या बरोबर केलेल्या संवाद आणि काही माहिती सुद्धा लिहिली. तेव्हा हे साधू नीट निरखून पाहिले. त्यांचा एकूण वेश म्हणजे गडद झळाळते रंग, अतिशय आकर्षक. एरव्ही भीती पोटी त्यांच्याकडे कधी नीटपणे पाहिलेही नव्हते. सरांच्या चित्रं आणि लेखन माध्यमातून मात्र हे सारे नीट न्याहाळता आले. थोडीफार भीतीही कमी झाली. तथापि मोठ झाल्यावर इतरही अनेक भावना समजतात, त्यात हल्ली हे साधुच नाही, तर बाकीही बरेच लोक सरळ आपल्या शरीराला स्पर्श करतात. त्यामुळे अजूनच नकारात्मक भावना मनात आल्यावाचून राहात नाही. नुकताच हरिद्वार येथे याचा अनुभव घेतला.
                          तर या सगळ्या कारणांनी त्यांच्याशी बोलणे तर शक्यच होत नाही. तथापि त्यांचे लक्ष असतेच, त्यामुळे त्यांची छायाचित्रं घेणे सुद्धा कठीण होऊन बसते. कारण त्यांना काही न देता, त्यांची छायाचित्रं काढली की ते काही अपशब्द बोलायला लागतात. त्यांची बाजू पाहिली तर ते बरोबरच असतात, आपण चुकीचे. मी एरव्ही कशाचीही छायाचित्रं काढायची असली, की परवानगी घेते, मगच काढते. परंतु इथे नेमकी तीच अडचण. तथापि यावेळी यात मी बरीच यशस्वी झालेय. ती सगळी छायाचित्रं सोबत जोडत आहेच. 
                           ही सगळी छायाचित्रं घेत असतांना, याबद्दल लिहिण्याचा विचार करत असतांना आणि आता प्रत्यक्ष लिहितांना, एक विचार मनात येत होताच, तो म्हणजे, साधू म्हणजे नेमके काय? खरे साधू कोण? आणि भोंदू कोण? तर साधू म्हणजे सज्जन, पवित्र माणूस किंवा स्त्री(साध्वी). हा तसा अभ्यासाचा अतिशय सविस्तर आणि मोठा विषय आहे. त्याबाबत माझा फारसा अभ्यास नाही. परंतु आपण जनसामान्य, साधारण अंगावर भगवे-लाल वस्त्र, केशांच्या जटा, अंगावर विभूती लावलेली, हातात कमंडलू, खांद्याला झोळी अडकवलेली अशा भौतिक गोष्टी वरून त्या व्यक्तीला साधू म्हणतो. तथापि साधू हा शब्द एका विशिष्ट मानसिक गोष्टीशी निगडीत आहे. त्याचा उपरोक्त उल्लेखित भौतिक गोष्टींशी फारसा संबंध नाही. अर्थातच मी काढलेली छायाचित्रं त्यांचे भौतिक रूप पाहूनच काढलेली आहेत.
                            कधीतरी मला या साधुंची भीती वाटणे, संपूर्णपणे बंद होईल आणि मी त्यांच्याशी मोकळेपणे संवाद साधू शकेल अशी आशा करते. या बद्दल काही प्रमाणात वाचन केलेले आहे. परंतु हे वाचन साधू विषय केंद्रित ठेवून नव्हते, त्या-त्या विषयाच्या अनुषंगाने आलेले लेखन होते. त्यामुळे मी काही ठोसपणे लिहिण्याचे धाडस करू शकत नाही, आज मितीस तरी. असो. खाली मला भेटलेल्या?, दिसलेल्या साधुंची छायाचित्रं जोडत आहे. आनंदी वाचकांचे या विषयावरील अनुभव ऐकण्यास उत्सुक आहे.

गंगा संग्रहालयातून बाहेर पडताना दिसलेले हे साधू 

त्रिवेणी घाट, ऋषिकेश येथे साधूंचा हा गट 
झाडाच्या सावलीत विश्रांती घेत होता 

हे साधू विश्रांती घेण्याच्या तयारीत होते 

ह्यांनी छान ताणून दिली होती 

अगदी गंगा काठावर येऊन बसले, पुढे 
काही पूजा पाठ करण्याचा मानस असावा. 

यांची काही तरी आवरा आवर चालली होती 



ह्यांनी ही अशी काही पूजा केली होती आणि पाण्याच्या काठावर 
जाऊन बसले होते, काय करत होते माहिती नाही 

हे पायर्‍यांवर निवांतपणे बसले होते 

हे असेच होते संपूर्ण वेळ 
कसले तरी वाचन करीत होते 

हे शांतपणे बसून परिसर न्याहाळत होते 

हे नुकतेच येऊन नदी काठी बसले होते 

ह्यांची काही तरी शोधाशोध सुरू होती 

आवरा आवर चालू होती 

रस्त्यावर उभे होते 


II गंगार्पणमस्तु II
©️®️ आनंदी पाऊस 
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) 
२४जून२०२६








Comments

  1. उदय बोरगावेJune 26, 2026 12:04 pm

    ​"जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।
    तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा॥" — संत तुकाराम

    ​तुकोबांच्या मते, जो दुःखी आणि पीडित लोकांना आपले मानतो, त्यांच्याबद्दल ज्याच्या मनात दया असते, तोच खरा साधू असतो.

    केवळ वेशभूषा बदलून कोणी साधू होत नाही.

    त्यामुळे सावधान...!!!😀

    ReplyDelete
    Replies
    1. साधुंबद्दल लिखाण वरवरचे वाटते. आणखी अभ्यास करून त्यांच्या त्याग व साधना याबद्दल लिहिणे गंमतशीर होईल.

      Delete
  2. डॉ अर्चना महाजनJune 26, 2026 12:15 pm

    एकदम छान लिहिते तु .. साधू म्हटले कि मला पन भीती वाटायची लहान पनी.. पूर्वी खूप वर्ष अधी साधू ह्या शब्दा चा अर्थ होता कि खूप छान.. आता आपन ज्याचे केस वाढलेले आहेत, वस्त्र केशेरी आहेत ते चित्र येते डोळ्यासमोर ..

    ReplyDelete
  3. खूप सुंदर ! छानच !👌👌

    ReplyDelete
  4. रघुदास गर्गेJuly 02, 2026 5:37 pm

    आपली सर्व सदरे, माहितीपूर्ण व वाचनीय तसेच ज्ञान वर्धक असतात.

    ReplyDelete
  5. गुलाबराव पाथरकरJuly 02, 2026 9:20 pm

    जत्रा , यात्रा आणि पर्यटन या मधून आनंदाची पातळी अधीकाधिक वाढत असते फक्त आनंद घेता यायला पाहीजेत.

    ReplyDelete
  6. शशी आत्याJuly 04, 2026 9:43 pm

    Rishikesh goshti pahilya.
    Mazya आठवणीतलं ऋषिकेश खूपच वेगळं आहे शांत.पूर्ण विरागी, जोगी रंग असलेलं.40 वर्षापूर्वी आणि नंतरचे म्हणजे 20 वर्षा पूर्वीच.आता सगळीच तीर्थक्षेत्रे ही "बाजारपेठा" झाली. क्रमा क्रमाने.पर्यटक वाढले.सोयी सुविधा पण वाढल्या.हौस, संधी वाढल्या .पाप पुण्य,दान धर्माच्या कल्पना बदलल्या.
    पण प्रवासाला गेल्यावर तिथली आठवण म्हणून काहीतरी वैशिष्ट्य पूर्ण आणायचे, ही गोष्ट मात्र एकसारखीच आहे...तेव्हा आणि आजही.
    त्यावेळी गंगा आणायला फक्त तांब्याचे छोटे कलश.आणि ते टिन पत्र्याच्या झाकणीने सील करून देत.हरिद्वारचा मोतीबाजार मात्र खरेच खूप मोठा..
    कदाचित आम्ही पंढरीत लहानाचे मोठे झालो..हे सारं आमच्यासाठी नेहमीच होतं.
    पण खरेच हिमालय खूप काही वेगळे अनुभव देऊन जातो.
    "अवघी तीर्थे श्री विठ्ठलाच्या पायापाशी." असे जरी असले, तरी चार धाम यात्रा वेगळीच अनुभूती देणारी आहे आणि ती घडणे खरेच भाग्य.
    "जय गंगा मैंयां.🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

थोडं (खूप सारं😉😆) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)

थोडं (खूप सारं) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)                        दराबा! तर या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द कुठून आला? तर हा पदार्थ बऱ्हाणपूर येथील दरबारातील खास पदार्थ. हा पदार्थ रोबुन रोबुन करावा लागतो म्हणून हा दराबा!                                                           घरात सगळेच खाण्याचे शौकीन, मुख्य म्हणजे आमचे बाबा सुद्धा! त्यामुळे सारखं काही ना काही करणं आणि खाणं अखंडपणे चालूच असे. खाण्याच्या बाबतीत तर सगळ्यांचा भरपूर उत्साह होताच, पण करणाऱ्यांचा (सगळ्या मम्मी लोकांचा) सुद्धा उत्साह तेव्हढाच किंवा काकणभर जरा जास्तच मी तर म्हणेन. सगळं अगदी उत्साहाने करत. त्यांच्या या उत्साहाला आणि मेहनतीला तर कायमच आणि वारंवार सलाम करावासा वाटतो. कारण कुठलीही गोष्ट करायची असो, कधीही थोडी थोडकी करून भागतच नसे. त्यामुळे खूप बांधीलकी आणि वचनबद्धता असणे आवश्यक असे. बरं त्यां...