Skip to main content

दाय गंडोरी-पद्धत१(मिरचीची भाजी)(थोडं झणझणीत...)

 दाय गंडोरी-पद्धत१(मिरचीची भाजी) 
(थोडं झणझणीत...)


                         दाय गंडोरी! खास खानदेशी शब्द आणि खास खानदेशी भाजी! अवघ्या खानदेश वासीयांची अतिशय लाडकी, आवडती भाजी.
                         दाय गंडोरी यातील दाय शब्दाचा अर्थ आहे डाळ आणि गंडोरी म्हणजे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. थोडक्यात मिरचीची डाळ घालून केलेली भाजी. दाय गंडोरी खास 'लेवा गणबोली'तील शब्द!
                         यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, आंबटचुका, वांग, कच्चे टमाटे, आलं, लसूण, हळद, शेंगदाणा कुट, सुक्या खोबऱ्याचा कीस, भरपूर, खूप सारी कोथिंबीर, तेल मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मीठ.
उपरोक्त उल्लेखाप्रमाणेच ही भाजी अतिशय झणझणीत असते. परंतु आता सगळेच तिखट थोड्या कमी प्रमाणात खातात त्यामुळे फार तिखट नसते. पण आवड असलेले, पट्टीचे खाणारे असलेल्या घरांतून अजूनही चांगली झणझणीत भाजी केली जाते. या भाजी सोबत ज्वारीची भाकरी छान लागते आणि तिच खाल्ली जाते. तथापि पोळी आणि भातासोबत सुद्धा खाता येते. 
                         साहित्य आधी सांगितलेच आहे. आता कृती आणि साहित्याचे प्रमाण एकत्रच सांगते. तुरीची डाळ एका व्यक्ती साठी एक मुठ, याप्रमाणे जितक्या व्यक्ती असतील तितक्या मुठ तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यावी. त्यात एक वांग फोडी करून टाकावे. वांग्याचे मापं आणि किती व्यक्ती याचे प्रमाण बघून, जास्त व्यक्ती असतील, वांग छोटे असेल तर जास्त घालावे. त्यातच एक कच्चे टमाटे चिरून त्यात घालावे. आंबटचुका सुद्धा स्वच्छ धुवून त्याचे दांडी सकट पाने चिरून घालावी. भरपूर कोथिंबीर धुवून घालावी. सर्वात महत्वाचे म्हणजे हिरवी मिरची. तिखट किती आवडते किंवा खाऊ शकता, तसेच मिरची किती तिखट आहे, या सर्वाचा अंदाज घेऊन, तितक्या मिरच्या घ्याव्या. त्याचे तुकडे करून ते सुद्धा या डाळीत घालावे. आवडत असल्यास यात अख्खे शेंगदाणे सुद्धा घालावे. सक्तीचे नाही. पुरेसे पाणी घालून हे सर्व जिन्नस कूकर मध्ये घालून शिजायला ठेवावे.
मग फोडणीची तयारी करावी. त्यासाठी लसूण-आलं एकत्र कुटून घ्यावे. शेंगदाणे भाजून घ्यावे. गार झाल्यावर त्याचे कुट करून घ्यावे. सुके खोबरे किसून घ्यावे. शेंगदाण्याचा कुट आणि खोबऱ्याचा कीस अगदी थोडे थोडे घ्यावे. म्हणजे साधारण ३-४ व्यक्तींकरिता दोन दोन चमचे पुरेसे होते. कांदा छान बारीक चिरून घ्यावा. कोथिंबीर, भरपूर प्रमाणात घेऊन, बारीक चिरून घ्यावी.
                         आता प्रत्यक्ष फोडणी. नेहमी प्रमाणे तेल कढाईत/भांड्यात घालावे. अगदी मागच्या पिढी पर्यंत तेलाचे प्रमाण भरपूर असे म्हणजे भाजी तयार झाल्यावर, त्या भाजीवर १-२ इंचाचा थर असणार. आता सगळेच तेल कमी खाऊ लागलेत आहेत. त्यामुळे आपल्याला आवडेल आणि झेपेल इतकेच तेल घालावे. त्यात मस्त जिरे, मोहरीची फोडणी करावी, त्यात मोकळ्या हाताने हिंग घालावा, तो छान फुटला की, कढीपत्ता, हळद आणि नंतर  त्यात कुटून ठेवलेले आलं-लसूण घालून छान परतून घ्यावे. मग त्यात कांदा घालावा, परतावा. कांदा परतत असतांना त्यात दाण्याचे कुट आणि खोबऱ्याचा कीस सुद्धा घालावा. नंतर चिरलेली भरपूर कोथिंबीर सुद्धा घालावी. तेल सुटे पर्यत हे सगळं परतावे. 
                          फोडणी करे पर्यंत कूकर मधील जिन्नस शिजून तयार असतात. ते सगळे बाहेर काढून लाकडी किंवा विजेरी रवीने छान घुसळून घ्यावे. फोडणीला छान तेल सुटले की हे घुसळून घेतलेले मिश्रण त्यात टाकावे. काला कुसकरून खाता येईल इतकी पातळ करण्यासाठी, त्याप्रमाणात पाणी घालावे. उकळी आली की मीठ घालून एक उकळी आली की गॅस बंद करावा. वरून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी.
                        भाजीला उकळी येईपर्यत एका बाजूला गरमा-गरम ज्वारीच्या भाकरी कराव्या. मग जेवायला बसण्याआधी, कच्चा कांदा, भाजलेला उडदाचा, ज्वारीचा पापड किंवा बिबडे, कैरीचे लोणचे अशी सर्व तयारी करून बसावे. मस्त वाफाळती, झणझणीत दाय गंडोरीची भाजी, ज्वारीच्या भाकरी, कांदा, मुळा, मुळ्याचा पाला, आंबटचुका, मेथीचा पाला, लोणचं, पापड असे गरम-गरम आणि हरे-भरे भरगच्च ताट आणि सोबतीला भाजीचा मस्त झणझणीत वास असे सगळे बघून तोंडाला पाणी सुटल्या वाचून राहात नाही.  मस्त पैकी काला कुस्कारायाचा आणि आडवा हात! जेवण झाल्यावर मस्तपैकी वाटी भरून भाजी पिवून मगच उठायचे! 
                         पोट तुडुंब भरून जेवण केले तरी, परत भाजीच्या भांड्याकडे नजर गेल्या शिवाय राहणार नाही. कारण पोट भरलेले असते पण मन भारत नाही एकदा खाऊन. मग आपल्याला ती भाजी दुसऱ्या सांजेला किंवा दुसऱ्या दिवशीही हवी असतेच. शिळ्या भाजीच्या चवीला तर तोड नसते. साधारणपणे अशा भाज्या करतांना थोडया जास्तच केल्या जातात आणि होतातही. त्यामुळे दुसऱ्या सांजेची सोय झालेलीच असते. परंतु कधीतरी संपूनही जाते भाजी, मग फार वाईट वाटल्यावाचून राहात नाही...
II मिरची अर्पण मस्तु II

वांगे 

डाळ 
मला पित्ताचा त्रास असल्याने 
थोडी तुरीची, थोडी मुगाची आणि थोडी मसुरीची 
डाळ घेतलेली आहे.

मिरच्या 



आंबट चुका 


दाण्याचे कूट 

वाटणं - आले लसुण कांदा सुके खोबरे 

कूकर मध्ये शिजलेले मिश्रण

कलसवलेले वाटणं

उकळी फुटलेली भाजी 

ज्वारीची टम्म फुगलेली गरमागरम भाकरी 

©️®️आनंदी पाऊस 
(थोडं झणझणीत...)
१५ जुलै २०२६ 

Comments

  1. आर्कि अविनाश भावेAugust 07, 2026 8:32 am

    रेसीपी शब्द संस्कृत मराठी असावा
    षड्रस सहा रसापासून होणारे पदार्थ
    शेवटी द्रव स्वरूपात
    पिण्यासारखे
    रसपी अपभ्रंश रेसीपी

    ReplyDelete
  2. डॉ सुनील पुरीAugust 07, 2026 8:34 am

    वर्णन पाहून एकदा तरी तुमच्या हाताचे जेवण करण्याची इच्छा होते.सुरेख

    ReplyDelete
  3. मिलिंद दीक्षितAugust 07, 2026 8:39 am

    खूपच छान 👌
    इकडेही भरपूर पाऊस झाला, धरण भरली.
    सर्व कुशल आहे ,तुम्हीही आनंदी राहा.🙏👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

थोडं (खूप सारं😉😆) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)

थोडं (खूप सारं) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)                        दराबा! तर या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द कुठून आला? तर हा पदार्थ बऱ्हाणपूर येथील दरबारातील खास पदार्थ. हा पदार्थ रोबुन रोबुन करावा लागतो म्हणून हा दराबा!                                                           घरात सगळेच खाण्याचे शौकीन, मुख्य म्हणजे आमचे बाबा सुद्धा! त्यामुळे सारखं काही ना काही करणं आणि खाणं अखंडपणे चालूच असे. खाण्याच्या बाबतीत तर सगळ्यांचा भरपूर उत्साह होताच, पण करणाऱ्यांचा (सगळ्या मम्मी लोकांचा) सुद्धा उत्साह तेव्हढाच किंवा काकणभर जरा जास्तच मी तर म्हणेन. सगळं अगदी उत्साहाने करत. त्यांच्या या उत्साहाला आणि मेहनतीला तर कायमच आणि वारंवार सलाम करावासा वाटतो. कारण कुठलीही गोष्ट करायची असो, कधीही थोडी थोडकी करून भागतच नसे. त्यामुळे खूप बांधीलकी आणि वचनबद्धता असणे आवश्यक असे. बरं त्यां...