दाय गंडोरी-पद्धत१(मिरचीची भाजी)
(थोडं झणझणीत...)
दाय गंडोरी! खास खानदेशी शब्द आणि खास खानदेशी भाजी! अवघ्या खानदेश वासीयांची अतिशय लाडकी, आवडती भाजी.
दाय गंडोरी यातील दाय शब्दाचा अर्थ आहे डाळ आणि गंडोरी म्हणजे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. थोडक्यात मिरचीची डाळ घालून केलेली भाजी. दाय गंडोरी खास 'लेवा गणबोली'तील शब्द!
यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, आंबटचुका, वांग, कच्चे टमाटे, आलं, लसूण, हळद, शेंगदाणा कुट, सुक्या खोबऱ्याचा कीस, भरपूर, खूप सारी कोथिंबीर, तेल मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मीठ.
उपरोक्त उल्लेखाप्रमाणेच ही भाजी अतिशय झणझणीत असते. परंतु आता सगळेच तिखट थोड्या कमी प्रमाणात खातात त्यामुळे फार तिखट नसते. पण आवड असलेले, पट्टीचे खाणारे असलेल्या घरांतून अजूनही चांगली झणझणीत भाजी केली जाते. या भाजी सोबत ज्वारीची भाकरी छान लागते आणि तिच खाल्ली जाते. तथापि पोळी आणि भातासोबत सुद्धा खाता येते.
साहित्य आधी सांगितलेच आहे. आता कृती आणि साहित्याचे प्रमाण एकत्रच सांगते. तुरीची डाळ एका व्यक्ती साठी एक मुठ, याप्रमाणे जितक्या व्यक्ती असतील तितक्या मुठ तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यावी. त्यात एक वांग फोडी करून टाकावे. वांग्याचे मापं आणि किती व्यक्ती याचे प्रमाण बघून, जास्त व्यक्ती असतील, वांग छोटे असेल तर जास्त घालावे. त्यातच एक कच्चे टमाटे चिरून त्यात घालावे. आंबटचुका सुद्धा स्वच्छ धुवून त्याचे दांडी सकट पाने चिरून घालावी. भरपूर कोथिंबीर धुवून घालावी. सर्वात महत्वाचे म्हणजे हिरवी मिरची. तिखट किती आवडते किंवा खाऊ शकता, तसेच मिरची किती तिखट आहे, या सर्वाचा अंदाज घेऊन, तितक्या मिरच्या घ्याव्या. त्याचे तुकडे करून ते सुद्धा या डाळीत घालावे. आवडत असल्यास यात अख्खे शेंगदाणे सुद्धा घालावे. सक्तीचे नाही. पुरेसे पाणी घालून हे सर्व जिन्नस कूकर मध्ये घालून शिजायला ठेवावे.
मग फोडणीची तयारी करावी. त्यासाठी लसूण-आलं एकत्र कुटून घ्यावे. शेंगदाणे भाजून घ्यावे. गार झाल्यावर त्याचे कुट करून घ्यावे. सुके खोबरे किसून घ्यावे. शेंगदाण्याचा कुट आणि खोबऱ्याचा कीस अगदी थोडे थोडे घ्यावे. म्हणजे साधारण ३-४ व्यक्तींकरिता दोन दोन चमचे पुरेसे होते. कांदा छान बारीक चिरून घ्यावा. कोथिंबीर, भरपूर प्रमाणात घेऊन, बारीक चिरून घ्यावी.
आता प्रत्यक्ष फोडणी. नेहमी प्रमाणे तेल कढाईत/भांड्यात घालावे. अगदी मागच्या पिढी पर्यंत तेलाचे प्रमाण भरपूर असे म्हणजे भाजी तयार झाल्यावर, त्या भाजीवर १-२ इंचाचा थर असणार. आता सगळेच तेल कमी खाऊ लागलेत आहेत. त्यामुळे आपल्याला आवडेल आणि झेपेल इतकेच तेल घालावे. त्यात मस्त जिरे, मोहरीची फोडणी करावी, त्यात मोकळ्या हाताने हिंग घालावा, तो छान फुटला की, कढीपत्ता, हळद आणि नंतर त्यात कुटून ठेवलेले आलं-लसूण घालून छान परतून घ्यावे. मग त्यात कांदा घालावा, परतावा. कांदा परतत असतांना त्यात दाण्याचे कुट आणि खोबऱ्याचा कीस सुद्धा घालावा. नंतर चिरलेली भरपूर कोथिंबीर सुद्धा घालावी. तेल सुटे पर्यत हे सगळं परतावे.
फोडणी करे पर्यंत कूकर मधील जिन्नस शिजून तयार असतात. ते सगळे बाहेर काढून लाकडी किंवा विजेरी रवीने छान घुसळून घ्यावे. फोडणीला छान तेल सुटले की हे घुसळून घेतलेले मिश्रण त्यात टाकावे. काला कुसकरून खाता येईल इतकी पातळ करण्यासाठी, त्याप्रमाणात पाणी घालावे. उकळी आली की मीठ घालून एक उकळी आली की गॅस बंद करावा. वरून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी.
भाजीला उकळी येईपर्यत एका बाजूला गरमा-गरम ज्वारीच्या भाकरी कराव्या. मग जेवायला बसण्याआधी, कच्चा कांदा, भाजलेला उडदाचा, ज्वारीचा पापड किंवा बिबडे, कैरीचे लोणचे अशी सर्व तयारी करून बसावे. मस्त वाफाळती, झणझणीत दाय गंडोरीची भाजी, ज्वारीच्या भाकरी, कांदा, मुळा, मुळ्याचा पाला, आंबटचुका, मेथीचा पाला, लोणचं, पापड असे गरम-गरम आणि हरे-भरे भरगच्च ताट आणि सोबतीला भाजीचा मस्त झणझणीत वास असे सगळे बघून तोंडाला पाणी सुटल्या वाचून राहात नाही. मस्त पैकी काला कुस्कारायाचा आणि आडवा हात! जेवण झाल्यावर मस्तपैकी वाटी भरून भाजी पिवून मगच उठायचे!
पोट तुडुंब भरून जेवण केले तरी, परत भाजीच्या भांड्याकडे नजर गेल्या शिवाय राहणार नाही. कारण पोट भरलेले असते पण मन भारत नाही एकदा खाऊन. मग आपल्याला ती भाजी दुसऱ्या सांजेला किंवा दुसऱ्या दिवशीही हवी असतेच. शिळ्या भाजीच्या चवीला तर तोड नसते. साधारणपणे अशा भाज्या करतांना थोडया जास्तच केल्या जातात आणि होतातही. त्यामुळे दुसऱ्या सांजेची सोय झालेलीच असते. परंतु कधीतरी संपूनही जाते भाजी, मग फार वाईट वाटल्यावाचून राहात नाही...
II मिरची अर्पण मस्तु II
वांगे
डाळ
मला पित्ताचा त्रास असल्याने
थोडी तुरीची, थोडी मुगाची आणि थोडी मसुरीची
डाळ घेतलेली आहे.
मिरच्या
आंबट चुका
दाण्याचे कूट
वाटणं - आले लसुण कांदा सुके खोबरे
कूकर मध्ये शिजलेले मिश्रण
कलसवलेले वाटणं
उकळी फुटलेली भाजी
ज्वारीची टम्म फुगलेली गरमागरम भाकरी
©️®️आनंदी पाऊस
(थोडं झणझणीत...)
१५ जुलै २०२६












रेसीपी शब्द संस्कृत मराठी असावा
ReplyDeleteषड्रस सहा रसापासून होणारे पदार्थ
शेवटी द्रव स्वरूपात
पिण्यासारखे
रसपी अपभ्रंश रेसीपी
वर्णन पाहून एकदा तरी तुमच्या हाताचे जेवण करण्याची इच्छा होते.सुरेख
ReplyDeleteखूपच छान 👌
ReplyDeleteइकडेही भरपूर पाऊस झाला, धरण भरली.
सर्व कुशल आहे ,तुम्हीही आनंदी राहा.🙏👍
छान आहे. विदर्भात सुध्दा करतात ही भाजी...
ReplyDeleteKhup chchan daigandori.
ReplyDeleteTyat bibde modun khaun paha
वा वा,! ही तर आमच्या वराडातली भाजी, खरंच ही भाजी खाल्ली की मन अगदी तृप्त होते, आमच्याकडे दगड तळी म्हणजे दगडाचा खलबत्ता आहे त्यात आम्ही कांदा खोबरं लसूण ठेचून ते भाजीत घालतो, तेलात परतवतो कोथिंबीर मात्र या भाजीला भरपूर लागते, खरंच ही भाजी खूप चवदार लागते, आमच्याकडे अगदी सगळ्यांना आवडते, आमच्या वऱ्हाडातल्या भाजीचे रेसिपी वाचून खूप आनंद वाटला,😋😌
ReplyDeleteछान आणि चवदार आहे बरे हा पदार्थ धन्यवाद
ReplyDeleteतोंडाला पाणी सुटले 😋😃
ReplyDelete