रागी रोटी
(कानडी अन्न संस्कृती)
आधी या मालिकेला दक्षिण भारतीय अन्न संस्कृती नाव द्यावे असे वाटले. तथापि दक्षिण भारतीय नक्की काय आहे, हे सुद्धा मला बऱ्याच दिवसांपासून स्पष्ट करायचे होते. वाटले हे निमित्त उत्तम आहे. तर आपण म्हणजे साधारण महाराष्ट्र आणि तेथून उत्तरेकडील संपूर्ण भाग दक्षिण भारतीय म्हणजे मद्रासी असा उल्लेख करतात आणि तसाच समजही आहे. तथापि ते तसे नाही. दक्षिण भारतात चार राज्य आहे हे सर्वज्ञात आहेच. पैकी कर्नाटकात कानडी लोक राहतात आणि ह्याची भाषा कन्नड किंवा कानडी. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात तेलगु भाषा बोलली जाते. तर तामिळनाडू राज्यात तमिळ लोक तमिळ भाषा बोलतात आणि केरळ, अगदी पिटुकले राज्य, परंतु येथील साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे. हे लोक मल्याळी भाषेत संवाद साधतात. थोडक्यात दक्षिण भारतात पाच राज्य असून चार भाषिक लोक राहतात. अर्थातच आपल्या मराठी प्रमाणे येथे सुद्धा दर बारा मैलावर भाषा बदलते. असा हा दक्षिण भारत! या मालिकेत कानडी अन्न संस्कृतीची ओळख आणि माहिती.
काही वर्षांपासून दक्षिण भारतात रहिवास असल्याने, बऱ्याच दक्षिण भारतीय अन्न-पदार्थांची ओळख झाली आहे, इतकेच नाही तर त्यातील काही अगदी मनापासून आवडूही लागले आहेत. ओघाने ते पदार्थ करता सुद्धा येतात. त्यातील एक-एक पदार्थाची ओळख, त्याच्या साठी लागणारे साहित्य, कृती सारेच आनंदी पावसात समविष्ट करण्याचा मानस आहे.
सुरुवात माझ्या अतिशय लाडक्या, आवडीच्या पदार्थापासून करते! रागी रोटी! असाच उल्लेख केला जातो या पदार्थाचा. रागी हा शब्द कानडी, रागी म्हणजे नाचणी/नागली आणि रोटी, खरतरं हा हिंदी शब्द, परंतु कानडी जन तो तसाच वापरतात. तर असा हा पदार्थ रागी रोटी. करायला अतिशय सोपा, फसण्याचा वगैरे प्रश्नच उद्भवत नाही. अतिशय पोष्टीक! रागी मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर, लोह आणि प्रथिने असतात. हाडे मजबूत राहणे, वजन कमी करणे हे आणि असे बरेच फायदे असतात रागी खाण्याचे. सर्वत्र सहज उपलब्ध असते, धान्य, पीठ आणि सत्त्व स्वरूपात मिळते. तान्ह्या बाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत साऱ्यांनाच उपयुक्त.
हा पदार्थ साधारणपणे आपल्या थालीपीठ या प्रकारासारखा आहे. रागी रोटी करण्यासाठी रागीचे पीठ हा मुख्य घटक. यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर हे मुख्य घटक. पुढे आवडीप्रमाणे, आपण थालीपीठात घालतो तसे, टमाटे, गाजर सुद्धा घातलात. एक आगळा प्रकार म्हणजे यात शेपूची भाजी सुद्धा बारीक चिरून घालती जाते. त्यामुळे त्याची एक छान चव येते. मला शेपू तसाही खूप प्यारा. परंतु बऱ्याच लोकांना नाही आवडतं. अजिबात आवडतं नसेल तर नाही घातला तरी चालतो. बारीक चिरलेली किंवा ठेचलेली हिरवी मिरची. माझ्या सारखी ज्यांना हिरवी मिरचीचे पथ्य आहे, अशांनी लाल मिरचीचे तिखट घालावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मीठ, चवीनुसार.
वरील सर्व जिन्नस, म्हणजे रागी पीठ, तिखट, मीठ, कांदा, कोथिंबीर, गाजर, टमाटे, शेपू एकत्र करावे आणि गरजेनुसार त्यात पाणी घालून थालीपीठाला भिजवतो त्याप्रमाणे भिजवावे. पुढील सर्व कृती थालीपिठाप्रमाणेच. म्हणजे पोळीपाटावर एक ओले कापड ठेवून, भिजविलेल्या पिठाचा एक गोळा ठेवावा. थापून त्याची रोटी तयार करावी आणि गरम तव्यावर टाकावी. आवडीप्रमाणे त्यावर, तेल, तूप किंवा लोणी घालून थालीपिठाप्रमाणे खमंग, खरपूस भाजून घ्यावे. गरमागरम रागी रोटी खाण्यासाठी तयार आहे!
रागी रोटी सोबत, लोण्याचा गोळा, नारळाची चटणी, पुदिन्याची चटणी, लोणचे, आवडीप्रमाणे इतर कुठलीही चटणी ओली किंवा सुकी खाऊ शकता! अतिशय साधी, सोपी, पटकन होणारी, चविष्ट, रुचकर आणि अत्यंत पौष्टिक. घरात फक्त रागीपीठ असले की झाले. कितीही गडबड असो, पटकन एक-दोन केली आणि खाल्ली की अगदी पोट तुडुंब भरते, भरपूर वेळ पोटाला आधार राहतो आणि संपूर्ण आरोग्यदायी!
II कन्नड भूमी अर्पण मस्तु II
II कर्म भूमी अर्पण मस्तु II
©️®️आनंदी पाऊस
(कानडी अन्न संस्कृती)
३० ऑगस्ट २०२६





👌
ReplyDeleteछान
ReplyDeleteपूर्वी नाचणी आम्ही जास्त खात नव्हतो, तसं माहित पण नव्हतं, आता मात्र नाचणीचे डोसे तू म्हणते तसे थालीपीठ, इडली वगैरे करून खातो, भाकरी पण छान लागते, नाचणी खरच खूप पौष्टिक आहे, कॅल्शियम पण त्यात भरपूर आहे, चांगला विषय घेतला,
ReplyDelete😋😋 मला आवडते.
ReplyDeleteमस्त.. करून बघते 👍🏻👍🏻
ReplyDeleteChchan lagate Raagi roti
ReplyDeleteछान आहेत आपले कानडी पदार्थ .
ReplyDeleteI salute you ..How ever l have seen .
ReplyDelete