Skip to main content

बालं दिनं विशेषं(काही अनुभवलेलं...)

 बालं दिनं विशेषं
(काही अनुभवलेलं...)

ही कल्पना फारच अफलातून आहे.
खूपच जास्त आवडली आहे मला!


                         बालदिन! एक शब्द. मात्र हा शब्द ऐकताच, सर्व आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर एक लोभस, निरागस हसू फुलते. या एका शब्दाच्या उच्चाराने प्रत्येकाचे मन भूतकाळात जाते. प्रत्येकाचा भूतकाळ डोळ्यासमोर साकारतो. काही आनंदी, काही खोडकर, काही गोड, काही कडू अशा सर्व भावनांच्या आठवणी मनात येतात. बालपण म्हणजे परमेश्वराकडून आपल्याला मिळालेले वरदानच आहे. त्या वयात आपल्याला फारसे कळत नसते, तथापि मोठे झाल्यावर मात्र त्या सर्व आठवणी एक आगळा आनंद देतात, कितीही वेळा आठवण झाली तरी.
                         तर पूर्वी काही लेखांत उल्लेख आलेलाच आहे, काही काळाकरिता मी एका विशेष शिक्षिकेचे काम केले होते. तर आज जो अनुभव सांगणार आहे, तो याच काळातील आहे. या शाळेत येणारी मुलं साधारण अडीच ते सहा वर्षाच्या वयोगटातील होती. म्हणजे अगदी लहानच. शाळेला गणवेश नव्हता. त्यामुळे सर्व विद्यार्थी निरनिराळ्या रंगांचे, छापील नक्षीचे, हवे ते, आवडतील ते कपडे परिधान करून शाळेत येत असतं. त्यांच्या कपड्यांचे रंग आणि त्यावरील नक्षी वगैरे माझे मन आकर्षित करत असे. त्यावर असलेली विविध चित्रं फारच सुंदर असतं, त्यातील कल्पना, रंग संगती, हावभाव साऱ्याच गोष्टी माझे लक्ष वेधून घेत असतं. 
                         माझी चित्रं काढण्याची आवड सर्व ज्ञात आहेच. या मुलांच्या कपड्यांवरील नक्षी-चित्रं बघून मला एकदा वाटले, असे चित्रं काढायला हवे. मग मी त्या चित्राचे माझ्या भ्रमणध्वनी मध्ये, छायाचित्रं टिपून घेतले. नंतर घरी आल्यावर वेळ मिळाला तेव्हा, ते चित्रं काढले आणि अगदी तंतोतंत तशीच रंगसंगती वापरून ते चित्रं रंगविले. दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन गेले आणि त्या विद्यार्थ्यास दाखविले. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद, आश्चर्य, थोडा गोंधळ असे मिश्र भाव बघून मलाच खूप आनंद झाला. इतर विद्यार्थ्यानाही दाखविले. त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंदाश्चार्याचे भाव उमटले. त्यांच्या लक्षात आले, हे चित्र म्हणजे त्याच्या कपड्यांवर असलेले चित्रं आहे.
                        मग दुसऱ्या दिवशी पासून, प्रत्येक जण शाळेत आल्यावर माझ्यासमोर उभे राहून आपापले कपडे आणि त्यावरील चित्रं दाखवू लागले. जेणेकरून मी ते पाहावे, त्याचे छायाचित्र काढावे आणि तंतोतंत तसेच चित्रं मी कागदावर काढावे. मग माझाही उत्साह वाढला, जे चित्रं आवडेल, त्याची छायाचित्रं मी टिपून घेऊ लागले. पुढे वेळ मिळेल त्याप्रमाणे एक-एक चित्र काढू लागले. पूर्ण झाल्यावर शाळेत नेऊन त्यांना दाखवू लागले. कोण आनंद होत असे त्या बाल-जीवांना! ते बघून माझा आनंद द्विगुणीत होत असे. 
                         अशी भरपूर छायाचित्रं मी टिपून घेतली होती. तथापि सर्वांची चित्रं काढणे शक्य झाले नाही. मात्र जी चित्रं काढली, त्या प्रत्येक चित्राला छानशी चौकट घालावी आणि तो-तो विद्यार्थी शाळा सोडून जाईल त्यादिवशी त्याला ती द्यावी असे मनात होते. परंतु, हे काम अनेक कारणांनी पूर्णत्वास गेले नाही, त्यामुळे ती चित्रं त्यांना देणेही शक्य झाले नाही. आता ही सर्व चित्रं माझ्या संकलानाचा एक भाग आहे. प्रत्येक चित्रं अतिशय गोड तर आहेच, पण त्यातील कल्पना सुद्धा अफलातून आहेत. पूर्ण केलेली सर्व चित्रं खाली जोडत आहे. तुम्हालाही ती नक्कीच आवडतील याची खात्री आहे. 
                         अशी ही माझी बाळ-गोपाळांंशी निगडीत एक सुंदर, गोड, निरागस, आनंदी आठवण! बालदिनाच्या निमित्ताने मनाच्या तळातील आठवण वर आली आणि आनंदी पावसात समाविष्ट केली!

©️®️आनंदी पाऊस
(काही अनुभवलेलं...)
२१ ऑक्टोंबर २०२६













Comments

  1. डॉ सुनील पुरीNovember 13, 2026 7:16 am

    मस्त आठवणीचा संग्रह,खूपच छान💐💐🙏

    ReplyDelete
  2. डॉ दीपक शिरसाठNovember 13, 2026 7:16 am

    छान🌹

    ReplyDelete
  3. सुंदर रेखाटन
    सुंदर रंगसंगती
    डोळ्याला भावणारी

    ReplyDelete
  4. उदय बोरगावेNovember 13, 2026 9:20 am

    चित्रांसाठी विषय शोधण्याची कल्पना छान आहे

    ReplyDelete
  5. कोकिळा ढाकेNovember 13, 2026 10:37 am

    सचित्र आठवणींसह बालदिनाची मजा काही औरच होती .

    ReplyDelete
  6. उषा पाटीलNovember 13, 2026 10:59 am

    वर्षा तू काढलेली सगळी चित्र खूप छान आहेत, लहान मुलांना अशी चित्र आवडणार नाहीत असे होणारच नाही, पहिली डॉल तर खूपच छान, एकदा तुझ्यात काय काय कला आहेत याचा एक सुंदर लेख तयार होईल, खूप छान,

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

चीकन मधील आंबा (घरातील गमती जमती)

चीकन मधील आंबा   (घरातील गमती जमती)                               लेखाचे नाव वाचून चमकलात ना? आता हा कुठला नवीन पदार्थ? नेमका चीकन पासून बनवलेला? की आंब्यापासून? की दोघंही वापरून? सांगते, सगळं सांगते या बद्दल. मला अगदी खात्री आहे, सगळे समजल्यावर तुम्ही सगळे सुद्धा प्रेमात पडाल, आमच्या सारखे, या चीकन मधील आंब्याच्या! खरतर मी सुद्धा अशीच चमकले होते काही वर्षांपूर्वी. माझ्या थोरल्या बहिणीचा संदेश आला होता मला. त्यात तिने लिहिले होते, चीकन मधील आंबा आठवतो का? मी आजच खाल्ला! कित्ती डोकेफोड केली, खूप आठवायचा प्रयत्न केला, ती नक्की काय सांगते आहे यावर. पण काही केल्या काही आठवेना आणि काहीच कळेना. शेवटी तिला फोन केला आणि तिलाच विचारले काय संदेश आहे हा? याचा नेमका अर्थ काय? मग तिने जे काही उत्तर दिले ते ऐकून, त्याक्षणी मी भूतकाळातील स्वर्गीय दिवसांमध्ये पोहोचले. ते दिवस, तो आनंद आठवला आणि आता ते दिवस नाहीत म्हणून खूप वाईटही वाटले...    ...

दाय गंडोरी-पद्धत१(मिरचीची भाजी)(थोडं झणझणीत...)

  दा य गंडोरी-पद्धत१ (मिरचीची भाजी)   (थोडं झणझणीत...)                           दाय गंडोरी ! खास खानदेशी शब्द आणि खास खानदेशी भाजी! अवघ्या खानदेश वासीयांची अतिशय लाडकी, आवडती भाजी.                          दाय गंडोरी यातील दाय शब्दाचा अर्थ आहे डाळ आणि गंडोरी म्हणजे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. थोडक्यात मिरचीची डाळ घालून केलेली भाजी. दाय गंडोरी खास 'लेवा गणबोली' तील शब्द!                          यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, आंबटचुका, वांग, कच्चे टमाटे, आलं, लसूण, हळद, शेंगदाणा कुट, सुक्या खोबऱ्याचा कीस, भरपूर, खूप सारी कोथिंबीर, तेल मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मीठ. उपरोक्त उल्लेखाप्रमाणेच ही भाजी अतिशय झणझणीत असते. परंतु आता सगळेच तिखट थोड्या कमी प्रमाणात खातात त्यामुळे फार तिखट नसते. पण आवड असलेले, पट्टीचे खाणारे असलेल्या घरांतून अजूनही चांगली झणझणी...