पनीर पराठा
(काही पराठे/धपाटे)
पराठे, धपाटे! लहानपणी म्हणजे हे पदार्थ खाण्यापुरती संबंध होता तेव्हा, पराठे, धपाटे एकाच वाटे. खरतरं मला आधी धपाटे शब्द माहिती झाला, कधीपासून ते आठवत सुद्धा नाही आणि पराठे शब्द फार नंतर. या दोघातील फरक बऱ्याच उशिरा समजाला. तर पराठे म्हणजे मग ते कशाचेही असो त्यात फक्त गव्हाचे पीठ किंवा मैदा वापरला जातो. मात्र धपाटे म्हणजे आजच्या भाषेत, मल्टी ग्रेन! म्हणजेच यात गव्हाच्या पीठासोबत घरात असलेली सर्व प्रकारचे पीठ म्हणजे ज्वारी, बेसन असेल तर बाजरी वापरली जातात.असा हा दोघातील मुख्य फरक. आणि ते तिसऱ्या प्रकारचे धपाटे! त्यासाठी फक्त आईचा हात आणि खाणाऱ्याची पाठ आवश्यक असते. हे धपाटे खाण्याची वेळ माझ्यावर काही कधी आली नाही, त्यामुळे त्याची चव वगैरे मला काही माहिती नाही. माझं म्हणजे शहाण्याला शब्दाचा मार! असो.
तर आजचा विषय आहे 'पनीर पराठे'. मला पनीर अजिबात आवडतं नाही, कुठल्याही प्रकारचे नाही. काही वर्षांपूर्वी, वर्षभरासाठी स्वयंपाक करण्यासाठी लक्ष्मी येत असे. ती बऱ्याचदा म्हणत असे, दीदी, पनीर पराठे बनायेंगे. मला ती कल्पनाच पचनी पडत नव्हती. परंतु तिचा हट्ट कायम. मग घरात बाकी मंडळींना विचारले आणि हो नाही करत, एक दिवशी पनीर पराठे करायचे ठरले. त्याप्रमाणे मी 'नंदिनी'चे पनीर घेऊन आले. आणि तिने केले पनीर पराठे! सगळ्यांनीच दाबून खाल्ले. एकदम आवडले सर्वांना. मग काय आठवड्यातून एकदा म्हणजे शनिवारी किंवा रविवारी दुपारचे जेवण म्हणजे 'पनीर पराठे'! ती वर्षभरातच गेली काम सोडून, मग मी त्यात थोडे माझेही डोके घालून तो अजून चविष्ट केला. आज हीच साहित्य कृती सांगते पनीर पराठ्याची.
यासाठी लागणारे साहित्य म्हणजे पनीर, कांदा, कोथिंबीर, लसूण, लाल तिखट, मीठ, गव्हाचे पीठ आणि पराठे भाजण्यासाठी आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा लोणी. आता यात दोन भाग आहेत, एक म्हणजे सारण आणि दुसरे म्हणजे बाह्यावरण. तर बाह्यावरणासाठी लागणारे साहित्य म्हणजे गव्हाचे पीठ, मीठ, पाणी आणि तेल. किती पराठे करायचे आहेत, त्याप्रमाणात पीठ आणि मीठ घ्यावे. सर्वात आधी हे साहित्य वापरून, भिजवून कणकेचा गोळा तयार करून ठेवावे. हे साधारणपणे थोडे पातळ आणि मऊ भिजवावे. सारणाची तयार करेपर्यंत ही कणिक छान मुरते.
आता सारण. ह्यासाठी आधी लसूण सोलून ठेचून किंवा किसून घ्यावा. पनीर किसून घ्यावा, विकत आणलेले शंभर ग्राम पनीरचे साधारणपणे आठ पराठे होतात. पराठ्याचे मापं म्हणजे काळा लोखंडी तवा भरून मोठा पराठा. कोथिंबीर नीट धुवून अगदी बारीक कापून घ्यावी. कोथिंबीर अगदी मोकळ्या हाताने भरपूर घ्यावी. सोबतच कांदा सुद्धा अगदी बारीक कापून घ्यावा. मग एका वाडग्यात किसलेले पनीर, ठेचलेला लसूण, कोथिंबीर, कांदा, मीठ, लाल तिखट हे सगळे जिन्नस छान मिसळून घ्यावे. आता हे सारण तयार आहे.
पुढची पायरी म्हणजे पराठे करणे. त्यासाठीही थोडी तयार करून घेतली तर वेळ आणि इंधन सुद्धा वाचते. सर्वात आधी भिजवलेल्या कणकेचे सारख्या मापाचे उंडे/गोळे करून घ्यावे. मग या प्रत्येक उंड्याची पारी करून त्यात सारण भरून नीट बंद करावे. असे सगळ्या गोळ्यांचे करून ठेवावे. यामुळे इंधन/गॅस वाया जात नाही आणि कमी वेळात पराठे तयार होतात. आता तवा आचेवार ठेवावा आणि एकीकडे पराठे लाटायला घ्यावे. किंवा थापून केले तरी चालतात. लाटून झाल्यावर तव्यावर टाकून तेल/तूप/लोणी यापैकी कशानेही खरपूस भाजून घ्यावा. गोळा तयार करतांना तो नीट बंद केला आणि नीट लाटला तर पराठे मस्त टम्म फुगतात! आणि पराठा फुगला तरच मज्जा! असे करत सगळे पराठे लाटून, भाजून घ्यावे.
गरमागरम पराठे आणि सोबत दही, लोणचे, ओली किंवा कोरडी चटणी, सॉस आवडीप्रमाणे घेऊन मस्त आडवा हात मारावा! पराठे खाऊनच पोट भरते. पुन्हा ते तेल,तुपाने शेकलेले असल्याने सारखे पाणी प्यावे लागते. मग जे काही पोट टम्म फुगते की....
पनीर, कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ आणि लसूण
एकत्र करून तयार केलेले सारण
कणकेचे गोळे
सारण भरून तयार
पराठा लाटून तव्यावर
टम्म फुगलेला पराठा
एक तव्यावर, एक बाजूलाच भाजून ताटली मध्ये.
एकाच वेळी एक लाटलेला,
एक तव्यावर,
एक भाजून झालेला ताटात!








Comments
Post a Comment