साबुदाणा खीर
(उपवासाचे काही....)
उपवास. उपवासाचे पदार्थ. हल्ली या पदार्थांची यादी अगदी न संपणारी आहे. तथापि काही दशकांपूर्वी असे नव्हते. उपवासाचे पदार्थ तुलनेत मर्यादित होते. या मर्यादित यादीतील एक पदार्थ म्हणजे "साबुदाणा खीर." आजच्या भागात या साबुदाणा खीर बद्दल थोडी माहिती आणि ती कशी करायची, लागणारे साहित्य असे सारे थोडक्यात.
साबुदाणा खीर, उपवासासाठी असलेला पदार्थ. तथापि ही खीर, पोट बिघडले असले तर, फार उपयोगी पदार्थ आहे. साबुदाण्याचा कुठलाही पदार्थ करायचा झाल्यास, आदल्या दिवशी रात्री साबुदाणा भिजवून ठेवावा लागतो. साबुदाण्याची खीर करण्यासाठी सुद्धा साबुदाणा आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवावा लागतो. तथापि पोट कधी बिघडणार, हे आपल्याला माहिती नसते. तसेच काही वेळा आपण साबुदाणा भिजत घालण्यासाठी विसरूनही जातो. यापैकी कुठलीही परिस्थिती असली तरी ही साबुदाण्याची खीर करता येते.
साबुदाणा रात्री भिजविलेला असेल तर उत्तमच, अन्यथा साबुदाणा पाण्यात उकळायला ठेवायचा. साबुदाणा फार कडक, त्यामुळे तो शिजून मऊ होण्यास फार वेळ लागतो. परंतु भिजवायला विसरल्यास किंवा एकदम खीर करावी लागल्यास हा उत्तम उपाय. त्यानंतर यात, दुध घालायचे आणि छान दोन उकळ्या काढायच्या. दुधाचे प्रमाण साबुदाणा किती आणि खाणाऱ्यास किती घट्ट किंवा पातळ आवडते त्यावर अवलंबून असते.
त्यानंतर आपल्या आवडी नुसार त्यात साखर घालायची, म्हणजे किती गोड आवडते, त्याप्रमाणे. ही साखर विरघळली की साबुदाणा खीर तयार आहे. काही दशकापूर्वी, आजच्या सारखी सर्वत्र समृद्धी नव्हती. त्यामुळे वेलची, केशर, सुका मेवा वरचेवर वापरला जात नसे. परंतु आता तसे नाही. काहीही करायचे झाले तर त्यात सुका-मेवा घातलाच जातो. उपवास असेल तर साबुदाणा खीर मध्ये हवा तसा, आवडीप्रमाणे सुकामेवा सुद्धा घालू शकतो. त्यामुळे पोटाला आधार मिळेल आणि दीर्घकाळ काहीही खाण्याची गरज पडणार नाही.
मात्र, पोट बिघडले, म्हणून जर खीर करायची असेल तर यात सुकामेवा अजिबात घालू नये. कारण मी सांगण्याची गरज नाही. तसेच साखरेऐवजी गूळ घालून सुद्धा ही खीर करता येते, आणि अर्थातच गुळ घातल्याने ती जास्त चविष्ट लागते हे ही खरे. परंतु गूळ आणि दुध याचे गणित जमायला हवे. ते नाही जमले की खीर नासणार, अगदी खात्रीने.
अशी ही "साबुदाणा खीर" उपवासाला तिखट-मीठ न खाणाऱ्यासाठी उत्तम आणि पौष्टिक पर्याय!
भिजवलेला साबुदाणा
साखर
गूळ
दूध
सुका मेवा
©️®️आनंदी पाऊस
(उपवासाचे काही....)
१६ ऑक्टोंबर २०२६






विषय अत्यंत साधा आणि सोपा--------
ReplyDeleteपण,
पण त्याची मांडणी अत्यंत जबरदस्त!!!
साबुदाण्याची खीर मस्त 👌👌👌
ReplyDeleteजबर
ReplyDelete😊👌👍
ReplyDelete🥰👍👍
ReplyDeleteखाण्यामधे एवढी विवीधता असणारा देश म्हणजे केवळ एक अामचा भारत देशच असेल असे मला ठामपणे वाटते .
ReplyDeleteशैली छान आहे सांगण्याची...
ReplyDeleteउपयुक्त माहिती………👌
ReplyDeleteखावीशी वाटते
ReplyDeleteNostalgic... Recipe 😊
ReplyDelete