Skip to main content

साबुदाण्याची गोड खिचडी(उपवासाचे काही....)

 साबुदाण्याची गोड खिचडी 
(उपवासाचे काही....)



                         उपवास म्हटले की काय खायचे? काय करायचे हा मोठ्ठा प्रश्न असतो. "मोठी एकादशी" या लेखात काही पदार्थ आलेलेच आहेत. तथापि "सोमवारची कहाणी" या लेखात सांगितल्या प्रमाणे चौधरी सदनात आमच्या सगळ्यांचाच सक्तीचा उपवास असे. आमचा मुलांचा मुख्य हेतू साबुदाण्याची खिचडी खाणे हाच होता. कारण तेव्हा साधारणपणे उपवास असेल तरच घरात साबुदाण्याची खिचडी होत असे. परंतु आम्ही मुलं नेहमीची साबुदाण्याची खिचडी खात असू. तथापि आमच्या तिन्ही मम्मी सोमवारचा उपवास फार वेगळ्या पद्धतीने करत असत. म्हणजे फार कडक. कडक उपवास म्हणजे काय तर, त्या तिघीही सोमवारी दिवसातून एकदाच तिखट-मीठ खात असतं, ते म्हणजे सोमवारचा उपवास दुपारी सोडतांना, जे जेवण करीत त्यातच तिखट-मीठ असे. दिवसातून दुसऱ्यांदा तिखट-मीठ खात नसत. त्यामुळे नेहमीची साबुदाण्याची खिचडी किंवा इतर पदार्थ त्या खात नसत/खाऊ शकत नसत. 
                        सोमवारी दिवसातून एकदा जेवण, त्याव्यतिरिक्त काहीही खायचे नाही. मात्र कधीतरी त्यांना फार काम असे, बाहेर जावे लागे किंवा अजून काही कारणाने दुसऱ्यांदा खाण्याची वेळ येणार असेल तर, अशावेळी ज्या पदार्थात तिखट-मीठ नाही असे पदार्थ करून त्या खात असतं. त्यातील पहिला पदार्थ म्हणजे "साबुदाण्याची गोड खिचडी." हा प्रकार किंवा पदार्थ मी आमच्या घराव्यतिरिक्त दुसरीकडे पाहिला किंवा एकालाही नाही, आजतागायत. मला तर ही कल्पना सुद्धा सहन होत नसे, गोड साबुदाणा! त्यामुळे मी या पदार्थाची आजतागायत चव सुद्धा घेतली नाहीये, आमच्या घरात हा पदार्थ होत असून सुद्धा! अजूनही कधीच खावासा वाटत नाही, त्यामुळे करण्याचा प्रश्नच येत नाही. 
                           गोड साबुदाणा साधारणपणे कसा करतात, याची थोडी कल्पना होतीच. परंतु आनंदी पावसात त्याबद्दल लिहायचे म्हणून क्रमांक दोन काकू कडून एकदा उजळणी करून घेतली. त्याप्रमाणे सांगते आता, कशी करायची ते. नेहमीप्रमाणे सकाळी खिचडी करायची म्हणजे रात्री साबुदाणा भिजत घालायचा. सकाळी हा भिजलेला साबुदाणा वाटीने मोजून घ्यायचा, त्याच्या निम्मे साखर घ्यायची. म्हणजे एक वाटी साबुदाणा असेल तर, त्याच्या निम्मे म्हणजे अर्धी वाटी साखर. शेंगदाणे भाजून, त्याचे कुट करून घ्यायचे. शेंगदाण्याचे कुट आवडी प्रमाणे कमी-जास्त घ्यावे. थोडे तूप. इतकेच जिन्नस लागतात.
                         कढई आचेवर ठेवायची. त्यात थोडेसे तूप घालून ते कढईच्या संपूर्ण पृष्ठभागावर लावून घ्यावाचे. या खिचडीला फोडणी वगैरे काही घालायची नसते, तथापि साबुदाणा कढईला चिकटू नये म्हणून त्याचा वापर. तसेच या तुपामुळे खिचडीची चव सुद्धा छान लागते. मग त्यावर साबुदाणा, साखर, शेंगदाण्याचे कुट घालावे आणि नीट परतून घ्यावे, म्हणजे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे मिसळले जातील. 
                          कढईवर झाकण ठेवावे. साखरेमुळे पाणी सुटते. त्यात चांगली वाफ काढावी म्हणजे साबुदाणा चांगला शिजतो. साबुदाणा शिजल्यावर त्याचा रंग बदलतो. रंग बदलल्याची म्हणजेच साबुदाणा शिजल्याची खात्री करून घ्यावी. आता हा साबुदाणा खाण्यासाठी तयार आहे. ताटलीत वाढायचा आणि खायचा!
IIइति साबुदाणा गोड खिचडी पुराण II

साबुदाणा 

साखर 

शेंगदाणे भाजून, 
सोलून 
त्याचे कुट करावे 



 ©️®️आनंदी पाऊस
(उपवासाचे काही....)
२२ सप्टेंबर २०२६

Comments

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

दाय गंडोरी-पद्धत१(मिरचीची भाजी)(थोडं झणझणीत...)

  दा य गंडोरी-पद्धत१ (मिरचीची भाजी)   (थोडं झणझणीत...)                           दाय गंडोरी ! खास खानदेशी शब्द आणि खास खानदेशी भाजी! अवघ्या खानदेश वासीयांची अतिशय लाडकी, आवडती भाजी.                          दाय गंडोरी यातील दाय शब्दाचा अर्थ आहे डाळ आणि गंडोरी म्हणजे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. थोडक्यात मिरचीची डाळ घालून केलेली भाजी. दाय गंडोरी खास 'लेवा गणबोली' तील शब्द!                          यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, आंबटचुका, वांग, कच्चे टमाटे, आलं, लसूण, हळद, शेंगदाणा कुट, सुक्या खोबऱ्याचा कीस, भरपूर, खूप सारी कोथिंबीर, तेल मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मीठ. उपरोक्त उल्लेखाप्रमाणेच ही भाजी अतिशय झणझणीत असते. परंतु आता सगळेच तिखट थोड्या कमी प्रमाणात खातात त्यामुळे फार तिखट नसते. पण आवड असलेले, पट्टीचे खाणारे असलेल्या घरांतून अजूनही चांगली झणझणी...

भरीत रविवार सकाळ (घरातील गमती जमती)

भरीत रविवार सकाळ   (घरातील गमती जमती)                                                                                                                                     हिवाळ्यात खूप महत्वाची आणि सगळ्यांचीच आवडती म्हणजे भरीत सकाळ!  ही सकाळ म्हणजे फक्त हिवाळ्यातच शक्य असते. आणि हो, हे भरीत म्हणजे तेच प्रसिद्ध खान्देशी  वांग्याचे भरीत! हे  जे खास भरीताचे वांगे असतात ते फक्त हिवाळ्यातच मिळत तेव्हा तरी. आता मिळतात जवळ जवळ वर्षभर, पण मग या वांग्यांना आणि भरताला छान चव नसते. खरी चव चाखायची तर ती फक्त आणि फक्त हिवाळ्यातच! या भरीतासाठी लागणारे दोन फार महत्वाचे घटक म्हणजे कांद्याची पाथ आणि भरीताच्या खास जाड मिरच्या! या दोन्ही घटक...