करोना काळ. आजही हे नुसते शब्द जरी उच्चारले तरी, अंगावर काटा येतो, भीती वाटते या सारख्या कितीतरी भावना येतात मनात. सारे जण घरात बंदिस्त. फक्त बंदिस्त नाही तर भयावह सुद्धा. तथापि मला काही व्यक्तिगत कारणाने प्रवास करावा लागला, घरी जावे लागले. प्रवासाचे नियम वगैरे अभ्यासून त्याप्रमाणे प्रवास करून घरी गेले. वातावरण फारसे बरे नव्हतेच. तरीही माझ्या संशोधनाचा भाग म्हणून मला खानदेशातील मंदिरांना भेट देणे गरजेचे होते. मंदिरांत प्रवेश मिळतो का वगैरे चौकशी करून काही मंदिरांना भेट देण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील मंदिरांना भेट देण्यासाठी गेले. करोना काळ म्हटल्यावर बाहेर खाणे अशक्य. त्यामुळे घरूनच शिदोरी बांधून नेली होती. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत काही मंदिरे बघून झाली. अजून काही बाकी होती. परंतु पोटात कावळे ओरडत असल्याने त्यांना शांत करणे गरजेचे होते.
केकी मूस-१, एक अवलिया कलाकार
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
केकी मूस
शिदोरी सोबत होती, पण कुठेतरी बसून खाणे गरजेचे होते. बाहेर कुठेतरी, म्हणजे शेतावर वगैरे शक्य होते. पण चाळीसगावात आलो आणि केकी मूस संग्रहालयाला भेट दिली नाही असे शक्य नव्हते. बऱ्याच वर्षापासून ह्या संधीची मी वाट बघत होते. त्यामुळे बरोबर असलेली मंडळीचे सुद्धा मत पडले, संग्रहालयात जाऊ या आणि तिथेच कुठे जागा मिळते का पाहू या, जेवण्यासाठी. मग काय गेलो तिकडे आणि त्यांना आमची अडचण सांगितली. त्यांची सुद्धा जेवणाची वेळ झालीच होती, ते म्हणाले चला, सारे सोबतच जेवण करू या. आणि त्यांनी त्यांच्या जेवण कक्षात आम्हाला नेले, साऱ्यांनीच तिथे असलेल्या टेबल-खुर्च्यांवर बसून मस्त अंगत-पंगत केली! अन्न-पदार्थांची देवाण घेवाण झाली, मस्त हसत खेळत, गप्पा मारत जेवण पार पडले. हे सर्व कुठे तर महर्षी केकी मूस आणि पद्मश्री राम सुतार यांच्या रहिवासाने पवित्र झालेल्या वास्तूमध्ये!
त्यानंतर सर्वात महत्वाचा आणि मनात अत्यंत ओढ असलेला कार्यक्रम, तो म्हणजे संग्रहालय भेट. संग्रहालय, त्यातील संग्रहित कला आणि इतर गोष्टी याबद्दल जाणून घेण्या आधी या कलाकाराची गोष्ट जाणून घेणे, महत्वाचे, गरजेचे आहे. ही गोष्ट फारच मनोवेधक आहे. साऱ्यांचेच मन आकर्षून घेणारी! त्यांच्या जन्मापासून सुरुवात करू या. आपणासर्वांप्रमाणेच(थोरले किंवा प्रथम अपत्य) त्यांचा जन्म त्यांच्या मामांच्या घरात म्हणजे, दक्षिण मुंबई भागातील मलबार येथे झाला. त्यांचे मामा म्हणजे कोण तर आर. सी. कॉन्ट्रॅक्टर, जे त्याकाळी मुंबईचे प्रथितयश आर्किटेक्ट आणि बिल्डर. दक्षिण मुंबईतील अनेक भव्य आणि स्मारक इमारती उभारण्यात त्यांचा सहभाग होता. यासोबतच जगप्रसिद्ध इमारत म्हणजे व्ही. टी. स्थानक, आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ही इमारत उभारण्यात सुद्धा त्यांचा सहभाग होता. जन्मदिवस १ ऑक्टोंबर १९१२! पिरोजाबाई आणि माणेकजी फ्रामजी मूस त्यांचे माता-पिता, चाळीसगाव येथील रहिवासी. चाळीसगावात एक वाईन शॉप चालवून ते आपला उदरनिर्वाह चालवीत होते. हा काळ म्हणजे स्वातंत्र पूर्व काळ, त्यावेळी चाळीसगाव येथे शिक्षण आणि आरोग्याच्या पुरेशा सुविधा नसल्याने त्यांनी केकी मूस यांना मुंबईत त्यांच्या मामांकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला.
शिक्षण प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग. केकींचे संपूर्ण शिक्षण मुंबईत झाले आणि त्यांनी १९३६ मध्ये मुंबई विद्यापीठाची कला शाखेतील पदवी विल्सन महाविद्यालयातून मिळविली. त्यानंतर मात्र पुढील एक वर्ष, त्यांनी त्यांच्या पित्याच्या तब्येतीची काळजी घेत चाळीसगावात मुक्काम केला. १९३७ मध्ये त्यांच्या पित्याचे म्हणजे माणेकजी यांचे देहावसान झाल्यावर, केकींनी कलेच्या उच्च शिक्षणसाठी इंग्लंड येथे समुद्र मार्गाने प्रस्थान केले. तिथे गेल्यावर त्यांनी बेनेट कॉलेज ऑफ आर्ट्स, शेफिल्ड येथे त्यांनी प्रवेश मिळविला. पुढील वर्षभरात त्यांनी या महाविद्यालयातून, कमर्शिअल आर्ट्स मधील डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर मात्र त्यांनी, विश्व-प्रवासाची योजना आखली. समृद्ध कला आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या देशांना भेट देऊन तेथील कला आणि कलावंतांचा अभ्यास करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी इजिप्त पासून सुरुवात केली, पुढे रोम. त्यानंतर स्पेन, ग्रीस, रशिया, जपान आणि सरते शेवटी चीन या देशांना भेटी देऊन १९३९ मध्ये भारतात परतले.
पित्याचे देहावसान झाल्याने त्यांच्या माता पिरोजाबाई चाळीसगावात एकट्याच राहात होत्या. त्यामुळे त्यांनी चाळीसगावात आपल्या मातेसोबत राहण्याचा निर्णय घेतला. केकींनी बुद्ध-जन्म याविषयावर जल-रंगात एक चित्र काढले होते. निलोफर मोदी, त्यांच्या सोबत विल्सन महाविद्यालयात शिकत होती. निलोफरला हे चित्र अतिशय आवडले आणि तिने त्या चित्राची मुक्त कंठाने प्रशंसा केली. निलोफरशी ओळख, मैत्री आणि पुढे जाऊन, या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विश्व-प्रवासाहून आल्यावर त्यांनी निलोफरला, त्यांचा चाळीसगावी राहण्याचा निर्णय कळविला. हा निर्णय निलोफरच्या कुटुंबियांना मान्य नव्हता. या सर्व प्रकारामुळे ते दोघे विवाहबद्ध होऊ शकले नाही. केकी मुंबईतच राहिले असते तर ते दोघे नक्कीच विवाहबद्ध झाले असते.
केकी मूस यांनी चाळीसगाव येथे जाण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांनी त्यांच्या गाडीचे नाव आणि वेळ सुद्धा निलोफरला कळविली होती. तेव्हा निलोफर त्यांना व्ही टी स्थानकावर भेटायला आल्या होत्या. त्यावेळी केकींचा हात हातात घेऊन त्यांना सांगितले, 'Don't worry, don't be sad. You go ahead, I will follow you by Frontier Mail. We will have a dinner together at Chalisgaon. Please wait for me.' निलोफर यांनी दिलेले हे वचन केकींनी कायमचे लक्षात ठेवले आणि संपूर्ण एक वर्ष ते फ्रंटिअर मेल येण्याच्या वेळी चाळीसगाव स्थानकावर, निलोफर यांना घेण्यासाठी जात, त्यांची वाट बघत. मात्र त्या आल्याच नाहीत, कारण त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची इंग्लंड येथे पाठवणी केली होती. तथापि केकींनी मात्र त्यांचे वचन लक्षात ठेवून आयुष्यभर रात्रीचे जेवण फ्रंटिअर मेल म्हणजे आताची पंजाब मेल गेल्यावरच घेतले... थोडक्यात त्यांनी निलोफर यांची शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघितली.
त्या एक वर्षाच्या काळानंतर मात्र त्यांनी स्वेच्छा आत्मकैद स्वीकारली. त्यांनी स्वतःला, त्यांच्या वडिलोपार्जित बंगल्यात पुढील पन्नास वर्षे बंदिस्त(काही अपवाद वगळता) करून घेतले. साधारणपणे १९४० ते १९५७ याकाळात त्यांनी, घरातीलच एका खोलीत आपली कार्यशाळा उभारली आणि तेथेच आपल्या कला-निर्मितीचे काम केले. कारण त्यांच्या माता फिरोजाबाई त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय अगदी सक्षमपणे चालवीत होत्या. १९५७ मध्ये त्यांच्या मातोश्री फिरोजाबाई यांच्या निधनानंतर मात्र त्यांनी वडिलोपार्जित व्यवसाय पूर्णपणे गुंडाळून ठेवला आणि या संपूर्ण वडिलोपार्जित वास्तुत स्वतःचे कलादालन सुरु केले. तथापि त्यांच्या एकूण कला-निर्मितीच्या ७० टक्के निर्मिती १९४०-१९५७ याकाळात झालेली आहे. हा काळ म्हणजे भारताचा स्वातंत्रपूर्व काळ आणि स्वातंत्रोत्तर काळाचा संधीकाळ होता.
या नंतरच्या काळात सुद्धा केकींनी कलेची उपासना अखंडपणे सुरूच ठेवली. या कलेसोबातच आपल्या प्रेमाची अखंड आठवण एका अद्भुत प्रकारे जपली. निलोफरच्या वचनाचे स्मरण ठेवून संपूर्ण आयुष्य त्यांनी रात्रीचे जेवण
फ्रंटिअर मेल म्हणजे आताची पंजाब मेल गेल्यावरच केले, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. ३१ डिसेंबर १९८९ रोजी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली आणि ३० डिसेंबर १९८९ रोजी सुद्धा त्यांनी पंजाब मेल गेल्यावरच रात्रीचे जेवण घेतले होते, जे त्यांचे शेवटचे रात्रीचे जेवण ठरले....
(त्यांचा कला प्रवास आणि संग्रहालय पुढच्या भागात )
©️®️आनंदी पाऊस
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
२८ ऑगस्ट २०२६
एक दुर्मिळ फोटो.... सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बाहूलकर
बाबूजींचे लाईव्ह पोर्ट्रेट काढत असताना
ओरिजिनल फोटो महाराष्ट्र शासनाच्या कला संचालकांकडून आला...
१०० वर्षांपेक्षा जास्त जुना बांगला




.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)

छान,मनाला भावणारे शब्दांकन 💐💐💐💐
ReplyDeleteसुंदरच...धन्यवाद!!!🙏🥰
ReplyDeleteKhup chan mahiti sangitlis , ya baddal mahiti navhati kahich pan aata kalali 👍
ReplyDelete