एका प्रवासाच्या प्रवासाची गोष्ट
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
पऱ्यांच्या देशातील एका उपवनातील बोगदा
आपल्यापैकी प्रत्येक जण प्रवास करतच असतो. त्याची कारणं प्रत्येकाची निरनिराळी असतात. प्रवासाची माध्यमं सुद्धा वेगवेगळी असतात. प्रवासाचा कालावधी सुद्धा अगदी काही मिनिटा पासून ते काही दिवसांपर्यंत असतो. यासोबतच या प्रवासाच्या नियोजना मध्ये खूप फरक असतो, एखादा प्रवास काही महिने आधी ठरतो तर एखादा प्रवास लगेच ठरतो आणि लगोलग प्रवासाला निघावे सुद्धा लागते. माझेही थोड्या फार प्रमाणांत असेच असते. तथापि एक प्रवास फारच रंजक प्रकारे झाला. इतका की, या 'प्रवासाचा प्रवास' अशी मोठ्ठी गोष्टच तयार झाली. आज ती गोष्ट सांगते.
तर झाले काय, माझ्या लाडक्या भाचीने शिक्षणासाठी परदेशी जायचे ठरविले. पुढे त्या दृष्टीने गोष्टी सुरु झाल्या. तिचा व्हिसा प्रकरणाची कामं सुरु असतांना मी काही कारणाने त्यांच्याकडे गेले होते, त्यामुळे या सगळ्या बद्दल माहिती झाली. परंतु भाची आणि तिची आई, दोघींचे सुरु झाले, भाची तिकडे गेली की मी सुद्धा तिकडे जाऊन यावे. मी म्हटले अरे तिचे तर सगळे सोपस्कार सुरळीत पार पडू दे आणि ती तिकडे पोहोचून, तिचा अभ्यासक्रम ठरल्या प्रमाणे सुरु होऊ दे, मग आपण बघू. त्यावरही, दोघी माय-लेकीचा आग्रह प्रचंड. तथापि या सगळ्या गोंधळात तिचा व्हिसा वेळेत न मिळाल्याने ती ठरलेल्या वेळी जाऊ शकली नाही. मात्र पुढच्या सत्राच्या वेळी ती तिकडे वेळेत पोहोचली.
तिचा अभ्यासक्रम वेळेत सुरु झाला. ती तिथे छान स्थिर झाली. मग छायाचित्रं, चलचित्र दूरध्वनी अशा विविध माध्यमांतून तिचे भोवताल आम्हाला दिसू लागले, कळू लागले. बघता बघता एक वर्ष कधी निघून गेले कळलेच नाही. जानेवारी महिन्यात, तिच्या भारतातील काही मैत्रिणींचे तिच्याकडे जायचे नियोजन सुरु झाले. मग परत दोघी माय-लेकी मला म्हणून लागल्या, तू सुद्धा नियोजन सुरु कर, व्हिसा काढ वगैरे. मी बहिणीला म्हणजे तिच्या आईलाच म्हटले तू येते का सोबत, तर जाऊ दोघी मिळून. तथापि ती तिच्या अडचणी मुळे, तिच्या निर्णयावर ठाम होती. एकटी जायचे म्हणजे बऱ्याच गोष्टी आल्या. इथून एकट्याने प्रवास करायचा, तिथे गेल्यावर भाचीला ज्या दिवशी जमणार नाही त्यादिवशी एकटीने हिंडायचे. मी नेहमीच एकटी कुठे कुठे फिरत असते, परंतु एव्हढे सगळे एकटीने करायचे नको वाटत होते. त्यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिच्याकडे जायला भारतातून थेट विमान नव्हते. त्यामुळे कुठेतरी विमान बदलावे लागणार होते, ही माझ्यासाठी भीतीदायक गोष्ट होती. त्यामुळे एकदा परत बहिणीला म्हटले चल तू माझ्यासोबत, पण तिने ठाम नकार दिला. मग मात्र मी माझे जाणे रहित केले.
एके दिवशी एकदम मनात विचार सख्ख्या मैत्रिणीला विचारू या. यापूर्वीही बरेच प्रवास आम्ही सोबतीने केलेले आहेत. पण खात्री नव्हती, तिला तेव्हा वेळ असेल की नाही वगैरे. विचारले, क्षणार्धात तिचा होकार आला. कोण आनंद झाला आम्हा सर्वांनाच! मग आमच्या वास्तू विशारद मैत्रिणींच्या गटातील इतरही मैत्रिणींना विचारले, त्यांच्याकडून मात्र त्यांच्या विविध अडचणींमुळे नकार आला. दोघींचे जायचे नक्की झाले. परदेश प्रवास म्हणजे सगळ्यात महत्वाचा व्हिसा. कुठल्यातरी सहलीचा भाग असले म्हणजे ते सर्व नियोजन करतात, आपल्याला फक्त पैसे द्यायचे असतात. परंतु आम्ही दोघी एकट्याच जाणार, त्यामुळे सर्वच आम्हाला स्वतः करावे लागणार होते. दोघीही आपापल्या व्यापात बऱ्याच व्यस्त असल्याने, तसेच थोडा ताण कमी व्हावा या दृष्टीने आम्ही एका अभिकर्त्याची/अडत्याची मदत घ्यायचे नक्की केले.
सगळे कागदपत्र गोळा करणे, व्हिसा साठी भेट ठरविणे, त्यासाठी वेळ घेणे. अशा सर्व गोष्टी सुरु झाल्या. कागदपत्रं तयार झाले, पण भेट-वेळ घेण्यासाठी काही काळ त्यांची खिडकी उघडेना. काही काळानंतर मात्र वेळ मिळाली, दोघींनाही. तथापि त्या आधीच युद्ध सुरु झाले. मैत्रिणीची वेळ माझ्या काही दिवस आधीची होती. काय करावे? समजेना. तरीही आम्ही विचार केला इतके सगळे आपण जुळवून आणले आहे तर जावे व्हिसा मुलाखती साठी. हल्ली सगळेच परदेश प्रवास करतात, त्यामुळे व्हिसा मुलाखतीच्या आधी काय काय तयारी करावी लागते, ते सर्व ज्ञात आहेच. तरीही या गोष्टीचा भाग म्हणून थोडक्यात सांगते. व्हिसा मुलाखती आधी आपण कुठे राहणार?, किती दिवस राहणार?, प्रवास कधी आणि कसा करणार? याची सर्व कागदपत्र आवश्यक असतात.
पैकी प्रवासाची तिकिटे आमच्या प्रवास-अभिकर्त्याने करून दिली, परंतु तिथे राहण्यासाठीचे सर्व आरक्षण आम्हालाच करायचे होते. भाची तयारच होती. तोपर्यंत तिने तिच्या मैत्रिणींचे आरक्षण करून दिले होतेच. मग मी आणि भाची चलचित्र-दूरध्वनीवरून संवाद साधला. ती राहण्याची ठिकाणे शोधून सांगत आणि दाखवत होती. मग ज्याचे भाडे कमीत कमी बघून आम्ही ते आरक्षण करत होतो. लिहितांना हे एका वाक्यात संपले. पण प्रत्यक्ष करतांना या साठी जवळ जवळ पाच तास लागले. खरंतर हे सगळे आज मितीस फारच सोप्पे झालेय, कुणीही हे करू शकते, परंतु ती म्हणाली राहण्याचे ठिकाण योग्य जागी म्हणजे शहराच्या केंद्रापाशी असेल, तर उत्तम. कारण बहुतेक ठिकाणी चालतच जावे लागते. जवळ असेल तर चालणे कमी आणि वेळ वाचतो, जे सर्वात महत्वाचे. म्हणून मग तिच्या मदतीने हे सगळे केले.
आता प्रत्यक्ष मुलाखतीची वेळ. मैत्रिणीची वेळ आधी होती. तिचे सारे सुरळीत पार पडले आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांचे एस एम एस द्वारे निरोप यायला सुद्धा सुरुवात झाली. कारण युद्ध सुरु असले तरी त्यांच्याकडे सारे व्यवस्थित सुरु होते. आम्ही मात्र बुचकळ्यात पडलो, जावे की नाही? याचे मुख्य कारण म्हणजे आम्हाला नेमके अखाती देशांत विमान बदलायचे होते. जे फारच धोकादायक होते. त्यानंतर माझी मुलाखतीची वेळ येईपर्यंत तर युद्ध चांगलेच तापले होते. मला समजेना काय करावे? वेळ ठरली होती त्याप्रमाणे गेले, सगळे सुरळीत पार पडतेय असे वाटले आणि त्यांनी सांगितले एका कागदपत्राची थोडी अडचण आहे. आम्ही दहा मिनिटाचा वेळ देतो, तुम्ही सुधारणा करून आणा. त्यांना विचारले येथे आजूबाजूला शक्य आहे का? तर सरळ नाही म्हणाले. मग म्हटलं उपयोग काय या दहा मिनिटाचा? आमच्या अडत्याला हे सगळे दूरध्वनी वरून सांगितले तर म्हणतो, नाही असे नसते, आमचे तर रोजचे काम आहे वगैरे. परंतु, नियमावलीत स्पष्ट लिहिलेले होते. ते वाचणे त्याचे काम होते, जे त्याने केले नव्हते आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मीही वाचले नव्हते.
झालं, परत वेळ घेणे आले, परत पैसे भरणे आले, निव्वळ अडत्याच्या चुकी मुळे. वेळ जात होता युद्ध चालूच होते. परत वेळ घेतली, यावेळी सारे सुरळीत पर पडले. मैत्रिणी प्रमाणे मलाही त्यांचे निरोप सुरु झाले. दरम्यान तिचा व्हिसा आला. या नंतर मी एका दुसऱ्याच प्रवासात असतांना माझा व्हिसा आला, सांगणारा दूरध्वनी आला. त्यांना सांगितले मी घरी नाही आणि ज्या दिवशी घरी येणार त्याची तारीख आणि वेळ सांगितली. परत गोंधळ. मी ज्या रूळ गाडीने येणार होती ती तब्बल सहा तास उशिराने धावली. त्यादिवशीही व्हिसा माझ्या हातात पडला नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी एकदाचा व्हिसा माझ्या हातात मिळाला. हुशश्श्श्श... झाले अगदी.
व्हिसा तर मिळाला दोघींचा. पण युद्ध पेटलेले, अखाती देशातील सर्व विमानतळ जवळ जवळ बंद झालेले. मग आता जाणार कसे? प्रवासाची तारीख जवळ येत होती. शेवटी निर्णय घेतला, आता इतके पैसे खर्च केले आहेत, तर दुसरे तिकीट काढावे आणि आधीचे रद्द करावे. आधीचे तिकीट रद्द करता येईल असेच केलेले होते. मग दुसरे तिकीट लंडन वरून काढले. तिकीट आले, त्यावरील नियम वाचले आम्हीच. आधीच्या अनुभवावरून शिकलो होतो. त्यात परत तिथल्या व्हिसाची काही भानगड होती. पण आमचा अभिकर्ता काही ऐकेना. त्याने इमेल करून चौकशी केली तेव्हा तो कबुल झाला. म्हणजे आता परत तिकीट बदलणे आले.
तोपर्यंत दुबई विमानतळ चालू झाले होते. मग तिथून जाण्याचे तिकीट काढले. आता याला काही अडचण येणार नाही असे म्हणाला. परत आम्ही नियमावली वाचलीच. आता आमचे विमान मुंबई वरून असल्याने आम्हाला मुंबईला जाणे आले. त्यासाठी आम्ही रूळ गाडीचे आरक्षण केलेले होते. नशिबाने ते बदलावे लागले नाही. घरून निघायच्या आदल्या दिवशी मी वेब-चेक इन करायचा प्रयत्न करू लागले, कारण मला नेहमी खिडकीची जागा हवी असते. पण ते काही होईना. परत अभिकर्त्याला सांगणे आले. त्याने प्रयत्न केला, पण होईना. मग त्याने पुढे चौकशी केली तेव्हा कळले, ते विमानच रद्द झाले आहे. संपले. मला तर कळेना, काय चाललेय हे नक्की? आता काही आम्हाला जाता येणार नाही, हा झाला एक भाग. परंतु आता पर्यंत खर्च केलेला वेळ कष्ट आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे पैसे वाया जाणार. पण आमचा अभिकर्ता म्हणाला, मी आहे नं, मी कसेही करून तुम्हाला पाठविणार. आता एव्हढे सगळे झाल्यावर याच्यावर कसा विश्वास ठेवावा कळेना. त्याने यावेळी परत म्हणजे चौथे तिकीट काढले. ही सगळीच तिकिटे रद्द करता येतील अशी काढलेली असल्याने पैश्यांचा अपव्यय टळला होता, ही सर्वात महत्वाची बाब!
शेवटी घरातून निघण्याचा दिवस आला. रूळ गाडीचे आरक्षण केल्यावर काही दिवसांनी मला रेल्वे कडून एक निरोप आला होता, तुमची गाडी तुमच्या नेहमीच्या स्थानका वरून सुटणार नाही. पुढे येणाऱ्या दोन स्थानका पुढच्या स्थानका वरून सुटेल. इथे मी या पूर्वी कधीही गेलेले नव्हते. त्यात घरात मी एकटी, सोबतीनेच इथला संध्याकाळचा पाऊस सुरु झालेला होता. जाण्याच्या दिवशी सुद्धा असा पाऊस असेल तर रिक्षा, गाडी मिळणे अवघड. रस्त्यावर रहदारी जाम होईल ते वेगळेच. भ्रमणध्वनीवर बघितले तर जायच्या दिवशी पाऊस नव्हता. थोडा दिलासा मिळाला. गाडी संध्याकाळची, पण सकाळीच रूळ गाडीची काय परिस्थिती आहे ते बघावे म्हटलं तर एका नेहमीच्या अॅप वर गाडी चक्क विस तास उशिराने धावत असून ती दुसऱ्या दिवशी सुटेल अशी सूचना आली. काही सुचेनाच झाले.
बहिणीला, सोबत येणाऱ्या मैत्रिणीला दूरध्वनीवर संपर्क केला आणि ही सर्व परिस्थिती सांगितली. मला स्थानकावर जाऊन बघणे शक्य नव्हते, कारण अंतर खूप आणि रहदारी बद्दल तर बोलायलाच नको. मैत्रीण त्याच गाडी तिच्या स्थानका वरून चढणार होती. तिला शक्य होते, मग ती स्थानकावर जाऊन चौकशी करून आली. पण काहीही ठोस माहिती मिळाली नाही. मग मीच निर्णय घेतला, संध्याकाळी गाडीच्या चार तास आधी मी स्थानकावर सामान घेऊनच जाईन. गाडी असली तर उत्तमच. नसेल तर विमान किंवा बस, त्यावेळी जे उपलब्ध असेल आणि आरक्षण मिळेल तसा मी प्रवास करेन. सर्वांनाच हा निर्णय योग्य वाटला. बहिण म्हणाली लगेच संपर्क साधून कळव म्हणजे गरज असल्यास आम्ही(तिचे अहो) तुझे बस किंवा विमानाचे आरक्षण करून देऊ. मैत्रीण म्हणाली, कळव, त्याप्रमाणे मी ठरवीन आणि शक्य तसे मुंबईला पोहोचेन. प्रत्यक्ष हे सगळे घडत होते, तेव्हा तर आम्ही प्रचंड थकलो होतोच, या सगळ्या ताणामुळे. तथापि आता लिहिता लिहिता सुद्धा मला प्रचंड थकवा येत आहे, त्यामुळे मध्ये मध्ये थांबावे लागत आहे.
ठरल्या प्रमाणे मी चार तास आधी त्या स्थानकावर पोहोचले. तिथे जाऊन चौकशी खिडकी वर जाऊन चौकशी केली. त्यांनी सांगितले गाडी आहे, वेळेवर सुटेल, इतकेच नाही तर गाडी आत्ताच फलाटावर उभी आहे. परत एकदा हुश्श्श झाले. खांद्यावरील मणा-मणाचे ओझे उतरल्या सारखे झाले. बहिण आणि मैत्रिणीला फोन करून सांगितले, त्यांनाही हायसे वाटले. हे स्थानक मुख्य स्थानक नाही. त्यामुळे तेथे वाट बघण्याची खोली वगैरे प्रकार नव्हताच. इतके तास फलाटावर काढायचे होते. गाडी होती पण त्यात दिवे आणि पंखे वगैरे सुरु नसल्याने आत जाऊन बसणे शक्य नव्हते. पण त्याचे काही वाटले नाही, अगदी सहजतेने मी हा वेळ फलाटावर बसून काढला. गाडी फलाटावर होती तरी बाकी काही कारणांनी ती उशिराने धावली, त्याचेही काही वाटले नाही, त्यादिवशी. एरवी गाडी थोडीही उशिराने धावत असली तर आपण वैतागतो.
रात्रीचे जेवण सोबत नेले होते, ते जेवले आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी मैत्रीण जेवण आणणारच होती. मग दोघींनी सोबतीने जेवण केले. पण गाडी थोडी उशिराने धावत होती. आमच्या हातात वेळ फार थोडा होता. दादर ला उतरून विमानतळ गाठायचे होते. रात्रीच्या जेवणाचा प्रश्न होताच. विमानतळावर अव्वाच्या-सव्वा पैसे खर्च करून काहीतरी खाण्याची आमची अजिबात इच्छा नव्हती. मग मी दादर वरून विमानतळावर जाण्यासाठी, भ्रमणध्वनी वर गाडीचा अंदाज घ्यायचा आणि मैत्रिणीने तोपर्यंत काहीतरी बांधून आणायचे, असे ठरले. तसेच केले आणि गाडीत बसल्यावर विमानतळाच्या रस्त्यावर जातांना धावत्या गाडीत जेवण केले. आणि एकदाचे पोहोचलो विमानतळावर, अगदी वेळेत! what a feeling!
विमानतळावरील सर्व सोपस्कार पार पडून इच्छित फाटकापाशी जाऊन बसलो. विमान वेळत आले, आम्ही बसलो आणि विमान उडाले सुद्धा. तथापि वेळेत पोहोचूनही खिडकीची जागा मिळाली नाहीच. खाऊन झोपण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. दोन वेळा खाऊन चार तास झोप काढून एकदाचे फ्रांकफर्ट ला उतरलो. पण आम्हा दोघींची थोडी चुकामुक झाली, दोघी एकमेकींना शोधात होतो. थोडा वेळातच भेट झाली. यापुढे अर्थातच इमिग्रेशनला सामोरे जावे लागले. सगळे सुरळीत चालू आहे असे वाटत होते. पण इथे अजून एक धक्का बसला, जोरात. तिथे सांगण्यात आले तुम्हाला दोन दिवस आधीच परत जावे लागणार कारण तुमचा व्हिसा फक्त नऊ दिवसांचा आहे. मग आम्ही परत नीट बघितले व्हिसा तारीख २३ दिवसा नंतरची होती, परंतु पुढे बारीक अक्षरात 9 days असे लिहिलेले होते. आम्ही हताश, काय बोलावे, कसे व्यक्त व्हावे कळेना.
परत आमच्या अभिकर्त्याला संपर्क केला, त्याचे परत म्हणणे, असे नसते, पहिल्यांदाच बघतो आहे असे. मी चौकशी करतो आणि कळवितो. त्याच मानसिक स्थितीत ते विमानतळ बघत फिरलो, काय मनोवेधक वाटले त्याची छायाचित्रं काढली. आम्ही वास्तूविशारद, त्यामुळे आमचा सतत आणि अखंडपणे, सर्वत्र अभ्यास चालूच असतो. तसाच इथे सुद्धा चालू होताच. सरते शेवटी आम्ही पुढच्या विमानाच्या प्रतीक्षेत त्या फाटकापाशी जाऊन बसलो. थोडाच वेळात आमच्या आजूबाजूला बसलेली मंडळी दुसरीकडे जाऊ लागली, तेव्हा बहुतेक आपल्या विमानाचे फाटक बदलले असे वाटले. तेव्हा सूचना नीट ऐकली तर समजले ते नक्की बदलले आहे. तिथे सूचना इतक्या बारीक आवाजात दिल्या जात होत्या की, लोकांना कशा ऐकू येतात आणि कशा समजतात याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही.
या छोट्या तासाभराच्या प्रवासात मात्र खिडकीची जागा मिळाली. थोडावेळ बाहेर बघता आले, परंतु थोड्या वेळातच ढग आल्याने पुढचे काही बघता आले नाही. परत विमान उतरायच्या थोडा वेळ आधी ढग नव्हते, तेव्हा परत तो भाग न्याहाळता आला. बाकी सगळे सोपस्कार आटोपून सामान घेऊन एकदाचे विमानतळाच्या बाहेर आलो आणि समोर भाची आलेली दिसली, आम्हाला घ्यायला आलेली होती. तिनेच पुढच्या प्रवासाची तिकिटे काढली आणि आम्हाला एका बस मध्ये चढविले. बस मधून उतरलो ते खाली पृथ्वीच्या पोटात गेलो, बरेच खोलवर. तिथे स्वयंचलित सरकते जिने होते. इतके लांबलचक सरकते जिने मी पहिल्यांदाच पाहिले, थोडी भीती सुद्धा वाटली. कारण या जिन्यांचा वेग सुद्धा बराच जास्त होता. अजून एक गोष्ट म्हणजे इथे खाली उतरायला लागल्या पासून एक प्रचंड वेगाने येणारा वाऱ्याचा झोत एकदम अंगावर येतो, अगदी काही वेळा तर तोल जाईल अशी भीती वाटते. अर्थातच हा प्रवास म्हणजे मेट्रो चा प्रवास. या नंतर बाहेर आलो, म्हटले आता काय? तर लगेच तिने ट्राम चा आकडा सांगितला आणि त्यात जायचे असे सांगितले.
आणि ट्राम मधून उतरल्यावर जे काही दिसले, वाटले त्याचे वर्णन करणे अवघड आहे. मी तर व्यक्तच होऊ शकले नाही. मैत्रीण म्हणाली पऱ्यांच्या देशांत आल्या सारखे वाटतेय. मी म्हटले खरच की, पऱ्यांच्या देशांत, आनंदी परी! थोडे चालत गेल्यावर आमचे पुढचे पाच दिवस राहायचे ठिकाण आले. तिथल्या सगळ्या कार्यालयीन बाबी पार पाडून एकदाचे आमच्या खोलीत आलो!
(आता तुम्हा वाचकांना वाटले असेल, या प्रवासाची गोष्ट इथे संपली असणार. पण तसे नाहीये. अजून बरीच गोष्ट बाकी आहे. ती आता भाग २ मध्ये वाचायला मिळणार.)
हेच ते
बरेच तास तिष्ठत बसलेले रूळ-गाडीचे स्थानक
लाडके मोरपीस
भारताच्या बाहेर पडले की जणू
पावांचे देश लागतात सर्वत्र!
विमानतळावरील पावांची झलक
सुंदर आधुनिक वास्तुकलेचा नमुना
याशिवाय विमान प्रवास केल्यासारखे वाटतच नाही
कितीही वेळा विमान प्रवास केला तरी 😉
पऱ्यांच्या देशात स्वागत!
इच्छित विमानतळावर पोहोचल्यावर
काही वेळ वाट बघितल्या नंतरचा
आनंदी क्षण!
हेच ते पृथ्वी च्या पोटात नेणारे आणि पृथ्वीच्या
पोटातून बाहेर काढणारे स्वयंचलित सरकते जीने
पऱ्यांच्या देशाची पहिली झलक!
©️®️आनंदी पाऊस
(पऱ्यांच्या देशांत आनंदी परी)
४जुन२०२६











वॉव खूपच सुंदर. आणि परदेशात जायचे म्हणजे एवढ्या भानगडी आणि अडचणी येतात हे बघून नको जायला असे वाटते 🤪🤣😄
ReplyDeleteKya bat hai छान माहिती
ReplyDeleteखूप च मस्त ..सुरुवात छान झाली ..आता पुढे वाचायची उत्सुकता लागली
ReplyDeleteजग हे मुळात सुंदर आहे , पण खूप गोष्टी आपल्या दृष्टीवर अवलंबुन असतात .आपल्या प्रवासातून आम्हालाही प्रवासाचा आनंद मिळत असतो .धन्यवाद जी
ReplyDeleteउपयुक्त माहिती आहे🙏👍💐
ReplyDeleteIndia is better .. comparing with other countries .
ReplyDeleteWa sunder mahiti aahe pravasachi tumachya👌👌
ReplyDeleteKhup chan👌👌😃
ReplyDeleteChchan laaaaamb pravas
ReplyDeleteप्रवासचा प्रवास...!!
ReplyDeleteखरंच वाचताना दमायला होतं.😀
अगदी प्रवास तयारी पासून landing पर्यंत छानच लिहलय ...पुढील वाचनाची उत्सुकता वाढवण्यासाठी ..खालील उत्तर नक्कीच हवंय..जसे की रात्री train madhye काय काय खाल्लं दोघींनी?
ReplyDeleteप-यांच्या देशाचं नाव?
प-यांच्या देशातील Travel Photography पण पाहण्यास उत्सुकच..... संजिता