Skip to main content

गर्जिया देवस्थान (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

गर्जिया देवस्थान 
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) 

               देवस्थान! देवालय! मंदिर! देऊळ! शब्द कितीतरी. मात्र अर्थ एकच. वरपांगी विचार केल्यास देवाचे घर, निवास असलेले स्थान. मात्र सखोल विचार केल्यास किंवा या सर्वांचा खरा अर्थ जाणून घेतला, समजून घेतला, उमगला तर मुक्तीची वाट नक्कीच गवसते. थोडक्यात ज्ञानच मुक्तीचा मार्ग दाखवतो. यासाठीचे एक भौतिक साधन म्हणजे मंदिर! असो.
               भारतभर अगदी प्राचीन काळापासून जल आणि स्थलक्षेत्र म्हणजेच देवस्थान यांचा अगदी जवळचा संबंध असल्याचे आढळून येते.  बहुतेक मंदिरे नदी किनारी, नैसर्गिक जलाशयापाशी असते. ते शक्य नसेल तेथे बांधीव तलाव, कुंड, विहीर, पायविहीर असते. जलाचे महत्व ओळखून मानवाने देवस्थानापाशी मानवनिर्मित पाण्याचे साठे तयार केले. शेवटी जल म्हणजेच जीवन आणि जीवन जलाशिवाय अशक्य.
               अलीकडच्या एका सहलीत एका देवस्थानाला भेट देण्याचा योग आला. नावाचा वर उल्लेख आलाच आहे. तिथे आम्ही वेगळ्याच हेतूने गेलो होतो. मात्र तिथे पोहचल्यावर, 'गर्जिया' देवस्थान असल्याचे कळले. नाव नवखे तसेच थोडे वेगळेच, ज्याचा अर्थ कळेना. त्याभागातील प्रसिद्ध म्हटल्यावर लक्षातच येते, ते कशासाठी प्रसिद्ध असेल. त्यामुळे अर्थातच माझा फारसा कल नव्हता, तिकडे भेट देण्याबाबत. त्यामुळे माहिती झाल्यावर सुद्धा त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. हा भाग म्हणजे उत्तरखंड राज्यातील कॉर्बेट जंगलाचा भाग. येथे जंगल भटकंतीसाठी निरनिराळे भाग आहेत आणि त्यांची नावे सुद्धा आहेत. तथापि इकडे भेट द्यायचे झाले, तर त्याचे आरक्षण करावे लागते आणि ते मिळाले तरच जाता येते. 
               आम्हाला दुपारचे आरक्षण मिळाले होते. त्यामुळे सकाळचा वेळ रिकामाच होता. मग विचार केला, शक्य होईल तितके अंतर चालत जाऊन भटकंती करायची. कारण एक म्हणजे चालण्याचा छंद, तेही चालणे जंगलातील असेल तर स्वर्गच! आणि दुसरे म्हणजे कुठे जायचे म्हटले तर रिक्षा वगैरे सारखे काही साधनही आजूबाजूला दिसेना. तर निघालो चालतच. जंगलातील रस्ता असला, तरी प्रचंड वाहतूक होती, त्यामुळे काळजीपूर्वक चालावे लागत होते. तथापि जंगल, त्यातील झाडे आणि थोडे अंतर चालून गेल्यावर उजव्या बाजूला कोसी नदीचा प्रवाह सोबतीला, बहारच! थोडे अंतर चालून गेल्यावर, एक मंदिर असल्याचे दिसत होते. गर्जिया देवी मंदिर याच दिशेला आहे, असे साधारण माहिती होते. त्यामुळे वाटले, हेच ते मंदिर असावे. मात्र तिथे पोहोचल्यावर लक्षात आले, हे दुसरेच मंदिर होते. 
                थोडे पुढे गेल्यावर मात्र गर्जिया देवस्थान मंदिराचा फलक दृष्टीस पडला. फलक वाचल्यावर थोड्याच वेळात, नदीच्या पात्रात असलेले हे देवस्थान दिसले आणि त्याक्षणी मी त्याच्या प्रेमातच पडले. त्या स्थानाला भेट देण्याची तीव्र इच्छा झाली. परंतु त्यावेळी तिथपर्यंत चालत जाण्यासाठी वेळ कमी पडणार होता. अर्थातच तिथे न जाता ठरलेली भटकंती पूर्ण केली आणि परतलो, सोबतीला तिथे भेट देण्याचा निश्चय करूनच.
               दुसऱ्या दिवशी परत तेच, दुपारच्या भटकंतीचे आरक्षण मिळाले. सकाळचा वेळ मोकळा आणि योगायोगाने एक रिक्षा सुद्धा मिळाली, तेही, आमच्या वसतीस्थानावरच. मग जवळच असलेले एक संग्राहलय आणि गर्जिया देवस्थान भेट, असे ठरवून गेलो. आधी संग्रहालय भेट दिली आणि नंतर गर्जिया देवस्थान. आज फक्त गर्जिया देवस्थान भेटीची गोष्ट.
                हे मंदिर म्हणजे पुरातन पाषाणातील कोरीव काम असलेले असे मंदिर नाही. मग इतके का आकर्षण वाटले मला? तर निसर्ग, नैसर्गिक सौंदर्य, निसर्गाची कलाकृती! हे मंदिर कोसी नदीच्या पात्रात आहे. खरे सौंदर्य इथेच आहे. या नदीच्या पात्रात एक नैसर्गिक खडकाचा सुळका आहे. त्याचा आकार आणि पोत याचे सौंदर्य शब्दांत पकडणे केवळ अशक्य. ते पाहायलाच हवे.(खाली बरीच छायाचित्रं दिलेली आहे जेणे करून त्याची जास्तीत जास्त कल्पना यावी.)  या सुळक्यावर हे बांधीव मंदिर आहे. बांधकाम आधुनिक आहे. वर चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि त्यावर लोखंडी पत्रांचे छत आहे. 
               आता गंमत अशी आहे की, आम्ही गेलो तेव्हा या सुळक्याचे मजबुतीकरण करण्याचे काम चालू होते. हा भूभाग म्हणजे साधारणपणे हिमालयाच्या पायथ्याचा सपाट भाग. म्हणजे येथून मैदानी प्रदेश सुरु होतो. त्यामुळे या नदीला बारमाही पाणी असावे. आम्ही गेलेलो तेव्हा बराच भाग कोरडा असला तरी एक वेगवान प्रवाह नदीच्या पत्रात सुरु होता. पावसाळ्या नंतर पात्र दुथडी भरून वाहत असणार, तेही वेगाने. हवामान आणि या पाण्याचा प्रवाह यामुळे ह्या सुळक्याची बऱ्याच प्रमाणात झीज झाली असणार. तसेच भेट देणाऱ्यांची तोबा गर्दी, त्याचाही परिणाम असणारच थोडाफार. भक्तांच्या भावना आणि सुरक्षा या दोन्ही कारणांनी त्याचे मजबुतीकरण करणे आवश्यक. 
             उपरोक्त उल्लेखित कारणांनी हे मुख्य देवस्थान बंद होते, म्हणजे वर चढून जाता येत नव्हते. त्यामुळे वर असलेले मंदिर प्रत्यक्ष कसे आहे, त्यात देवता कोणती आहे, कशा स्वरुपात आहे, कुठल्या माध्यमात आहे, यापैकी काहीही बघणे शक्य झाले नाही. पायऱ्या कशा आहेत म्हणजे बांधीव आहेत की त्या खडकातच कोरलेल्या आहे हे सुद्धा कळू शकले नाही. मात्र हा जो नैसर्गिक सुळका आहे, त्याचे सौंदर्य सर्व बाजूंनी न्याहाळता आले. जवळ जाऊन बघता असे लक्षात आले, की त्याच्या पायथ्याच्या भागाचे काँक्रीट ओतून मजबुतीकरण तर करणे चालूच होते, तथापि त्याच्या सर्व भागावर, सर्व बाजूंनी काँक्रीट शिंपडून(स्प्रे करून) मजबुतीकरण केलेले होते. नदीचे पात्र याकाळात कोरडे पडत असल्याने हे सर्व करण्यासाठी हा अगदी योग्य काळ होता.
               हे सारेच बघून मन आनंदित झाले, निसर्गाचे आगळेच सौदर्य बघून एक स्वर्गीय तृप्ती मिळाली. मन अगदी आतून आनंदित झाले!
               अशी सगळी परिस्थिती असून तोबा गर्दी, कारण सुट्टीचा काळ आणि महत्वाचे म्हणजे अतिशय प्रसिद्ध म्हणजे जागृत देवस्थान! मग या सर्व भाविकांसाठी एक वेगळी सोय आहे. ती म्हणजे या पात्रातच एक छोटे देऊळ आहे, ज्यात पादुका ठेवलेल्या आहेत. त्याचे दर्शन घेता येत होते. आता हे मंदिर कॉर्बेट जंगलाच्या परिसरात म्हणजे आजूबाजूच्या वस्ती असलेल्या भागापासून बरेच लांब. त्यामुळे येणाऱ्या भाविकांच्या खऱ्या आणि हौशी भुकेसाठी, नदीच्या पात्रातच मोठी खाद्य-जत्रा लागलेली होती. त्यात तऱ्हेतऱ्हेचे खाद्य पदार्थ विक्रीस होते. इथपर्यंत सगळे ठीक आहे. एक विरोधाभास म्हणावा की नको वाटणारा भाग म्हणावा, या जत्रेत असंख्य टू मिनिट मॅगीची दुकाने होती. आपल्या पवित्र नद्यांच्या पात्रात ही अशी विदेशी आणि सत्वहीन किंवा निकस अन्न बघून मन अतिशय अशांत झाले. आधी गंगेच्या पात्रात आणि आता कोसीच्या पात्रात....
                तसेच मंदिर परिसरात प्रसाद-केंद्र सुद्धा आहे. तेथे प्रसाद वाटप सुरु होता. प्रसाद म्हणजे जेवणातील ताजे शिवजलेले पदार्थ. ते घेण्यासाठी मोठ्ठी रांग, तोबा गर्दी. पर्यायाने तो प्रसाद खाऊन झाल्यावर, त्याचा कचरा, घाण ओघाने आलेच. का आपण भारतीय स्वच्छता ठेऊ शकत नाही? तेही आपली श्रद्धा-भक्ती असलेल्या देवतेच्या स्थानावर? अशा ठिकाणी आपण स्वच्छता ठेवू शकत नाही तर बाकी ठिकाणावर प्रश्नच येत नाही.
                मंदिर परिसरातील अजून एक भाग म्हणजे मंदिरात शिरण्यापूर्वी असलेली निरनिराळ्या वस्तू आणि पूजा-साहित्य विकणारी छोटेखानी दुकाने. प्रत्येक मंदिरात, त्या देवतेच्या आवडीची आणि त्या परिसरात पिकणारी फुले विक्रीसाठी असतात. ती निरनिराळ्या परड्यांमध्ये, छानछान पद्धतीने सजवलेले असतात. मन आकर्षून घेतात. नैसर्गिक सौदर्य आणि रंग सारेच अतुल्य! यासोबतच काही देव-देवतांच्या मूर्ती, पूजेसाठी लागणारे साहित्य, स्वयंपाक घरात लागणाऱ्या विविध वस्तू, लहान मुलांसाठीची खेळणी असे एक नी अनेक! गम्मत वाटते हे सर्व बघायला. मला तर फार आवडते, काही घ्यायचे नसले तरी, बघायला छान वाटते. या सर्वाची झलक आपणा सर्वांना खाली जोडलेल्या प्रकाशचित्रांमधून मिळेलच. तथापि आपण सर्वांनीच तिथून काहीतरी नक्की विकत घ्यावे, कारण त्यावरच, त्या सर्व दुकानदारांच्या कुटुंबाचे पोट भरते. याव्यतिरिक्त आपल्यालाही, ती वस्तू, त्या ठिकाणाची आठवण करून देते....


मुख्य देवस्थान 

शिकंजी 

प्रसाद 

पूजा सामग्री 

प्रसाद प्रकरण

प्रसाद रांग

कोसी प्रवाह

मुख्य मंदिर

मुख्य मंदिर

मुख्य मंदिर

मुख्य मंदिर

कोसी नदीतील पाण्याचा एक प्रवाह

मुख्य मंदिर

प्रवेशद्वार 

म्हातारीचे गुलाबी केस 

भजी आणि विविध पदार्थाचे पूडे

यात नेहमीची कांदा, बटाटा, मिरची अशी भजी तर होतीच,
सोबतच हिरवट रंगाची जी भजी दिसत आहे ती,
भांग पानांची भजी आहेत.
खाऊन मात्र पाहिली नाही, त्यामुळे चव माहिती नाही.

उन्हाचे चष्मे

बांगड्या

पूजा साहित्य

शिकंजी म्हणजे लिंबू-पाणी 


Comments

  1. डॉ सुभाष ओरसकरSeptember 18, 2026 11:15 am

    छान आहे. कुठून शोधतेस तु असली आडवळणातली ठिकाण ? कम्माल आहे तुझी

    ReplyDelete
  2. मंजुषा चौधरीSeptember 18, 2026 11:18 am

    छान वेगळी माहिती 💕

    ReplyDelete
  3. डॉ दीपक शिरसाठSeptember 18, 2026 11:20 am

    खुप सुंदर🌹

    ReplyDelete
  4. Khup Chan mahiti milali

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

थोडं (खूप सारं😉😆) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)

थोडं (खूप सारं) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)                        दराबा! तर या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द कुठून आला? तर हा पदार्थ बऱ्हाणपूर येथील दरबारातील खास पदार्थ. हा पदार्थ रोबुन रोबुन करावा लागतो म्हणून हा दराबा!                                                           घरात सगळेच खाण्याचे शौकीन, मुख्य म्हणजे आमचे बाबा सुद्धा! त्यामुळे सारखं काही ना काही करणं आणि खाणं अखंडपणे चालूच असे. खाण्याच्या बाबतीत तर सगळ्यांचा भरपूर उत्साह होताच, पण करणाऱ्यांचा (सगळ्या मम्मी लोकांचा) सुद्धा उत्साह तेव्हढाच किंवा काकणभर जरा जास्तच मी तर म्हणेन. सगळं अगदी उत्साहाने करत. त्यांच्या या उत्साहाला आणि मेहनतीला तर कायमच आणि वारंवार सलाम करावासा वाटतो. कारण कुठलीही गोष्ट करायची असो, कधीही थोडी थोडकी करून भागतच नसे. त्यामुळे खूप बांधीलकी आणि वचनबद्धता असणे आवश्यक असे. बरं त्यां...

दाय गंडोरी-पद्धत१(मिरचीची भाजी)(थोडं झणझणीत...)

  दा य गंडोरी-पद्धत१ (मिरचीची भाजी)   (थोडं झणझणीत...)                           दाय गंडोरी ! खास खानदेशी शब्द आणि खास खानदेशी भाजी! अवघ्या खानदेश वासीयांची अतिशय लाडकी, आवडती भाजी.                          दाय गंडोरी यातील दाय शब्दाचा अर्थ आहे डाळ आणि गंडोरी म्हणजे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. थोडक्यात मिरचीची डाळ घालून केलेली भाजी. दाय गंडोरी खास 'लेवा गणबोली' तील शब्द!                          यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, आंबटचुका, वांग, कच्चे टमाटे, आलं, लसूण, हळद, शेंगदाणा कुट, सुक्या खोबऱ्याचा कीस, भरपूर, खूप सारी कोथिंबीर, तेल मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मीठ. उपरोक्त उल्लेखाप्रमाणेच ही भाजी अतिशय झणझणीत असते. परंतु आता सगळेच तिखट थोड्या कमी प्रमाणात खातात त्यामुळे फार तिखट नसते. पण आवड असलेले, पट्टीचे खाणारे असलेल्या घरांतून अजूनही चांगली झणझणी...