Skip to main content

गोपाळकाला(काही अनुभवलेलं...)

 गोपाळकाला
(काही अनुभवलेलं...)


                    जन्माष्टमी! दहीहंडी! गोपाळकाला! यापैकी कुठल्याही एका शब्दाचा उल्लेख आला, की बाकीचे शब्दही आपोआपच डोळ्यासमोर येतात. त्याच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी, आठवणी सुद्धा मनात गर्दी करतात. कारण हे सर्व शब्द निगडीत आहेत, ते आपल्या लाडक्या कान्ह्याशी, म्हणजेच बाळ कृष्णाशी. अगदी आपल्या नकळत्या वयापासूनच आपल्याला याची ओळख झालेली असते आणि त्या ओळखीतूनच तो आपला सर्वांचा लाडका झालेला असतो, अगदी कायमचा! अर्थातच माझाही अत्यंत लाडका आहेच! तसेच त्याच्याशी निगडीत वरील सर्व शब्द सुद्धा आवडते, त्यांच्या आठवणी सुद्धा अतिशय सुंदर. निरागस, एक स्वर्गीय आनंद देणाऱ्या वगैरे वगैरे. आजची या शब्दांची व्याख्या, त्यांचे स्वरूप, साजरे करण्याच्या पद्धती सारेच अत्यंत क्लेशकारक. त्याबद्दल न बोललेलेच बरे. 
                    अर्थातच या सर्व शब्दांची, कान्ह्याची, ह्या सणांची ओळख झाली ती 'चौधरी सदना'तच. चौधरी सदनाच्या जवळ दोन मंदिरे होती, ती म्हणजे महादेव मंदिर आणि मारुती मंदिर. याचा पूर्वीही काही लेखात उल्लेख आलेलाच आहे. मुख्यत्वे करून 'हरतालिका' या लेखात. तथापि या लेखात महादेव मंदिर, तेव्हाचे आणि आताचे, यासोबतच उर्वरित माहिती तपशीलात आलेलीच आहे. आज मात्र मारुती मंदिराशी निगडीत आठवणी आहेत, मुख्यत्वे करून गोपाळकाल्याशी निगडीत. तर आम्ही लहान असताना हे मंदिर एक साधेसुधे मारुती मंदिर होते. मध्यंतरी केव्हातरी पाहिले तेव्हा त्याचे नामकरण दक्षिणमुखी हनुमान मंदिर झालेले होते. 
                  हे मंदिर म्हणजे पाषाणाचा पाया आणि उर्वरित बांधकाम वीटकाम करून रंगरंगोटी केलेले आधुनिक मंदिर. बऱ्याच भागावर लोखंडी जाळी तीही रंगीत. उपरोक्त उल्लेखाप्रमाणे दक्षिणमुखी मंदिर. दक्षिण दिशेला दोन प्रवेशद्वारे. पैकी कोपऱ्याकडील प्रवेशद्वाराने प्रवेश केला की समोरच एक गाभारा, गाभाऱ्यात मारुतीची शेंदूरी रंगाची मूर्ती, उंच म्हणजे जवळ-जवळ तीन फुट उंच पिठावर विराजमान. गाभाऱ्याच्या डाव्याबाजूला म्हणजे पश्चिमेकडे सभामंडप. या सभामंडपात कायम भजन-कीर्तन वगैरे कार्यक्रम होत असतं. या सभामंडपातून पश्चिमेकडील भिंतीत एक दार होते. या दारातून पलीकडे गेले की तिकडे एक नंदी आणि शिवलिंग होते. थोडक्यात छोटेसे उपदेऊळ. सरते शेवटी शिखर, मारुतीची मूर्ती असलेल्या गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला एक झळाळत्या रंगांचे आधुनिक शिखर, त्यावर कळस, सोनेरी रंगाचा आणि वर एक भगवा झेंडा फडफडत असे. असे हे आमचे मारुती मंदिर! आजही संपूर्ण मंदिर, त्याची रचना, वगैरे साऱ्या तपशिलासहित लख्ख आठवणीत आहे.
                   तर आमची आई(आजी) या मंदिरात नेहमीच जात असे. तिथे होणाऱ्या भजन-कीर्तन कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहात असे. आम्हीही काही वेळा तिच्या सोबत जात असून. परंतु भजन-कीर्तन, त्यातील विषय वगैरे न समजल्याने कंटाळून जाऊन परत घरी निघून जात असु. याला फक्त एक अपवाद होता, तो म्हणजे काल्याचे कीर्तन! कारण त्या दिवशी कीर्तन झाले की प्रसाद म्हणजे 'गोपाळकाला' मिळत असे. हा मंदिरातील गोपाळकाला म्हणजे जीव की प्राण! अतिशय आवडीचा! आजची गोष्ट अर्थातच या गोपाळकाल्याची! मंदिरातील आणि घरातील गोपाळकाल्याची! 
                    मंदिरातील गोपाळकाला आधी. तर मंदिरात ठरलेले असे. काल्याची कीर्तनाच्या दिवशी येणाऱ्या प्रत्येक भक्ताने, मंदिरात येतांना सोबत काल्या साठी लागणारे घटक आपापल्या घरून घेऊन यायचे. कीर्तन झाले की मग हे सर्वांनी आणलेले घटक वापरून गोपाळकाला तयार केला जात असे. देवाला नैवेद्य दाखवून, मग साऱ्यांना वाटला जात असे. ह्या प्रसाद म्हणून मिळालेल्या गोपाळकाल्याच्या चवीला तुलनाच नाही, या संपूर्ण विश्वात! आज सुद्धा आठवते आणि हवाहवासा वाटतो. आधी प्रसाद म्हणजे काय ते सांगते. आपण नेहमीच या नी त्या कारणाने, इथे, तिथे सगळीकडे मंदिरात गेल्यावर, कुणाच्या घरी गेल्यावर सर्वत्र प्रसाद खात करीत असतो, तथापि त्या शब्दाचा, त्याच्या अर्थाचा कधीही विचार करीत नाही. तो जर केला, समजून घेतला तर तुम्ही कधीही प्रसाद खाणार नाही, तर प्रसाद ग्रहण कराल! देवाचा प्रसाद म्हणजे देवाकडून मिळालेला प्रतिसाद! या प्रतिसाद शब्दाचा अपभ्रंश होऊन म्हणजेच त्या शब्दातील ति अक्षर लोप पावून त्याचा झाला 'प्रसाद'! असा हा देवाचा प्रसाद! किती गहन आणि खोल अर्थ आहे त्याचा! त्यामुळे तो ग्रहणच करावा, खाऊ नये....
                    आता 'गोपाळकाला'! थोडक्यात सांगायचे झाले तर कृष्ण आणि त्याचे सर्व सवंगडी आपापल्या गाई-गुरे चरण्यासाठी रानात घेऊन जात. जाताना घरून प्रत्येकाला काही ना काही शिदोरी मिळत असे. प्रत्येकाची शिदोरी एकत्र करून त्याचा काला केला जात असे, आणि हा काला सर्व मिळून खात, हा झाला गोपाळकाला! माझ्या विचारानुसार थोडा सखोल विचार केला तर, गुरे चरायला रानात नेणे म्हणजे जवळपास संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम. म्हणजे नाही म्हटले तरी सात-आठ तासाचा वेळ. इतक्या वेळात या साऱ्या गोपाळांना निदान दोनदा तरी खायला लागत असावे. मग त्यासाठी त्यांना घरून, आजच्या भाषेत दोन डबे दिले जात असावे. एक म्हणजे पोळी, भाकरी, भाजी वगैरे म्हणजे मुख्य जेवण. आणि दुसरे म्हणजे संध्याकाळचे खाणे. त्यासाठी पोहे, मूरमुरे, लाह्या, चणे, दाणे असे काही पदार्थ दिले जात असावे. 
                    दुपारचे जेवण सुद्धा ही सर्व मंडळी रानात छान गोलाकार करून अंगंत-पंगत करत असणार आणि सोबत आणलेले सर्व पदार्थ एकमेकांना देऊन खात असणारच किंवा सर्व प्रकारच्या पोळी-भाकरी एकत्र मोडून त्यात सर्व भाज्या एकत्र करून, कालवून सर्व एकत्रच खात असणार. त्यामुळे आपण रोजच्या जेवणात सुद्धा पातळ म्हणजे रस्सा भाजी असेल तर पोळी किंवा भाकरी बारीक मोडून घेतो, त्यावर भाजी घालून ते छान एकत्र करून काला करून खातो. खानदेशात तरी म्हटले जाते, आई, मला काला करून दे, मी काला करून खाणार, मी आता कालाच करतो/करते वगैरे. आणि हा काला सर्वांचा अतिशय आवाडीचा! काला केला की आडवा हात! असा हा काल्याचा एक प्रकार! रोजच्या जेवणाला किती पवित्र बनवतो, एका वेगळ्याच स्वर्गीय पातळीवर घेऊन जातो. काला!
                    आता या बाळ-गोपाळांना संध्याकाळी, घरी परतायच्या आधी परत भूक लागताच असणार. मग या छोट्या भुकेसाठी त्यांना घरून पोहे, मूरमुरे, ज्वारीच्या लाह्या, साळीच्या लाह्या, चणे, दाणे असे काही पदार्थ दिले जात असावे. मग हे सर्व पदार्थ एकत्र करून, जेवणासाठी आणलेले काही शिल्लक घटक म्हणजे कांदा, मिरची, टमाटे, लोणचे तसेच आजूबाजूच्या मळ्यातील काही गाजर, मुळा, मुळ्याचा पाला, कोथिंबीर या सारखे जे घटक मिळतील ते घटक. पुन्हा सोबत दही, दुध, ताक सोबत असणारच त्यांच्या. मग हे सर्व घटक एकत्र करून तयार होणार तो 'काला' म्हणजेच 'गोपाळकाला'! गोपाळकाला म्हणजे एक अद्वैताचा धडा, अनुभव, अनुभूती! मग मंदिरात काय होत असे, सर्व भक्त मंदिरात येतांना आपापल्या घरून जे असतील ते घटक घेऊन येत. ते सर्व एकत्र मिसळून घेत. त्याचा हा काला तयार होत असे! प्रसादाच काला! अद्वैताचा काला! तो ग्रहण करतांना स्वर्गीय अनुभूती यायलाच हवी! तरच तो तुम्ही ग्रहण केला, अन्यथा तुम्ही तो फक्त खाता....
प्रसाद हा ग्रहणच करावा.... कारण तो त्याच्याकडून आपल्यासाठी आलेला प्रतिसाद असतो!
                      आता मंदिरात हजर असलेल्या प्रत्येकाला काल्याचा प्रसाद मिळत असे, सोबतच ज्या भांड्यातून, डब्यातून काल्यासाठी आणलेले घटक ज्यात भरून आणलेले असत, त्यात सुद्धा काल्याचा प्रसाद भरून दिला जात असे, घरी असलेल्या मंडळींसाठी. आम्ही मंदिरात हजर असू, तथापि आम्ही लहान असल्याने, आमचे हात सुद्धा छोटे छोटे! त्यामुळे त्या प्रसादाने आमचे मन भरत नसे. यादिवशी घरी सुद्धा मोठ्ठ भांड भरून काला तयार करत असे मम्मी. आम्हाला मनभरून खाता यावा म्हणून. त्याचा तर आम्ही फडशा पाडतच असू. तथापि त्यानंतर एकदा तरी म्हणत असू , मंदिरातील काल्याचा प्रसाद फारच छान होता. कारण त्याची चव. या चवीचे कारण तो काल्याचा प्रसाद असे, देवाकडून आलेला प्रतिसाद असे, अद्वैताचा काला असे....
                    आता हा काला म्हणजे अतिशय पौष्टिक. एकतर सर्व पारंपारिक पदार्थ पौष्टिक असतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यात सर्व पौष्टिक घटकांचा समावेश असतो, ताजा असतो, फार क्रिया-प्रक्रिया केलेल्या नसतात. किंवा काही क्रिया प्रक्रिया केलेल्या असल्याच तर त्या योग्य रीतीने, अन्न-शास्त्राचे नियम प्रमाण मानून केलेल्या असतात. आता काला, गोपाळकाला, दहीकाला हे सर्व पदार्थ एकच. फक्त त्याची विविध नावे. तर हा काला करतांना कुठलीही प्रक्रिया केलेली नसते. त्यासाठी वापरलेले सर्व घटक अतिशय पौष्टिक, त्यामुळे तो संपूर्ण अर्थाने पौष्टिक असतो. असा पौष्टिक पदार्थ वर्षातून एकदा तरी करावा, खावा. आरोग्य तर मिळतेच त्यातून पण त्यापेक्षा कैक पटीने जास्त मानसिक आरोग्य लाभते, जे सर्वात जास्त महत्वाचे! त्याची गोष्ट जाणून घेतली, पुढच्या पिढीला सांगितली, तर तो अन्न-वारसा, प्रसाद, अद्वैताचा अनुभव त्यांच्या पर्यंत पोहोचतो. तो पोहोचविण्याने एक स्वर्गीय आनंद मिळतो. मानसिक आरोग्य! दोघांना, सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला सुद्धा!
                   गोपाळकाल्याच्या अनेक कृती आंतरजालावर उपलब्ध आहेतच. तथापि त्याचा समावेश आनंदी पावसात हवाच! तर याला लागणारे साहित्य म्हणजे ज्वारीच्या लाह्या, मूरमुरे, साळीच्या लाह्या, पोहे, चणे, दाणे हे मुख्य. मग जेवणातील शिल्लक पदार्थ, तसेच आजूबाजूच्या मळ्यात उपलब्ध असणारे घटक. म्हणजे कोथिंबीर, काकडी, मुळा, मुळ्याचा पाला, गाजर, टमाटे असे काही. परत दही, दुध, ताक वगैरे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाच्या घरतील निरनिराळे लोणच्याचे प्रकार. लोणचे कैरीचेच असले तरी त्याची प्रत्येक घरात चव निराळी असते. त्यामुळे काला अतिशय चविष्ट होतो.(मंदिरातील काला, अद्वैताची चव!) हे सारे घटक एकत्र करून कालवले की झाला काला तयार!
                      तथापि आजकाल आपण घरीच करतो. घरात इतरही बरेच पौष्टिक घटक उपलब्ध असतात. ते सुद्धा वापरू शकतो. डाळिंबाचे दाणे, काकडी, कोथिंबीर, गाजर. तसेच घरात बऱ्याच प्रकारची लोणची सुद्धा असतातच, सर्वच लोणच्यांचा थोडा थोडा वापर करावा. एक अतिशय चविष्ट, रुचकर, स्वादिष्ट आणि पौष्टिक असा पदार्थ तयार होतो. पारंपारिक पदार्थात थोडा बदल. बदल हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे अन्न-संस्कृतीत सुद्धा बदल होतोच, तो  करावा सुद्ध, तथापि अन्न-शास्त्राचे नियम पाळून. जे सर्वात आणि अतिशय महत्वाचे!
असा हा काला!
प्रसादाचा काला!
गोपाळकाला!
प्रसादाचा गोपाळकाला!
अद्वैताचा गोपाळकाला!
देवाकडून आलेल्या प्रतिसादाचा गोपाळकाला!
सरते शेवटी...
देवाकडून आलेल्या प्रतिसादाचा आनंदी गोपाळकाला!!!
ज्वारीच्या लाह्या

डाळिंबाचे दाणे 

बारीक चिरलेली काकडी 

बारीक चिरलेले गाजर 

डाळ्या 

मक्याचे दाणे 

बारीक चिरलेली कोथिंबीर 

झळाळते रंग! 

ज्वारीचे मुरमुरे 

 लाल पातळ पोहे 

हळदीचे लोणचे

टमाट्याचे लोणचे

कैरीचे लोणचे

तयार गोपाळकाला! 


गोपाळकाला! 





(टीप - आजचा लेख आता अगदी पहाटे सहा वाजता उठून दीड तासात पूर्ण केलेला आहे, तसेच गोपाळकाला, त्यासाठी लागणारे घटक या सर्वांची छायाचित्रं आधीच घेऊन ठेवलेली नव्हती त्यामुळे आता घरात जे समोर दिसले तितक्याच घटकांचे छायाचित्रं प्रकाशित केले आहे. उद्या गोपाळकाला केल्यावर अन्य सर्व छायाचित्रं बघायला मिळतीलच)
©️®️आनंदी पाऊस 
(काही अनुभवलेलं...)
जन्माष्टमी
४ सप्टेंबर २०२६









Comments

  1. कन्हैय्या गुरुजीSeptember 05, 2026 1:42 pm

    खूप छान माहिती

    ReplyDelete
  2. आर्कि श्रीकांत भाटेSeptember 05, 2026 1:46 pm

    खूपच छान

    ReplyDelete
  3. शाम पवारSeptember 05, 2026 1:47 pm

    जुन्या अनंत आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद. श्याम पवार. आळंदी.

    ReplyDelete
  4. Dr Manish ChaudharySeptember 05, 2026 1:50 pm

    Chchan lihile aahes.

    ReplyDelete
  5. सुमंत पांडेSeptember 05, 2026 1:52 pm

    कमी वेळात लिहिले असे म्हणता,पण सगळी सामुग्री,व्यंजनासह वर्णन. खूपच माहितीपूर्ण

    ReplyDelete
  6. माझ्या सासूबाई,लाल पेरू चे तुकडे घालायच्या!
    फार चविष्ट...


    सुरेख लेख👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

थोडं (खूप सारं😉😆) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)

थोडं (खूप सारं) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)                        दराबा! तर या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द कुठून आला? तर हा पदार्थ बऱ्हाणपूर येथील दरबारातील खास पदार्थ. हा पदार्थ रोबुन रोबुन करावा लागतो म्हणून हा दराबा!                                                           घरात सगळेच खाण्याचे शौकीन, मुख्य म्हणजे आमचे बाबा सुद्धा! त्यामुळे सारखं काही ना काही करणं आणि खाणं अखंडपणे चालूच असे. खाण्याच्या बाबतीत तर सगळ्यांचा भरपूर उत्साह होताच, पण करणाऱ्यांचा (सगळ्या मम्मी लोकांचा) सुद्धा उत्साह तेव्हढाच किंवा काकणभर जरा जास्तच मी तर म्हणेन. सगळं अगदी उत्साहाने करत. त्यांच्या या उत्साहाला आणि मेहनतीला तर कायमच आणि वारंवार सलाम करावासा वाटतो. कारण कुठलीही गोष्ट करायची असो, कधीही थोडी थोडकी करून भागतच नसे. त्यामुळे खूप बांधीलकी आणि वचनबद्धता असणे आवश्यक असे. बरं त्यां...

दाय गंडोरी-पद्धत१(मिरचीची भाजी)(थोडं झणझणीत...)

  दा य गंडोरी-पद्धत१ (मिरचीची भाजी)   (थोडं झणझणीत...)                           दाय गंडोरी ! खास खानदेशी शब्द आणि खास खानदेशी भाजी! अवघ्या खानदेश वासीयांची अतिशय लाडकी, आवडती भाजी.                          दाय गंडोरी यातील दाय शब्दाचा अर्थ आहे डाळ आणि गंडोरी म्हणजे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे. थोडक्यात मिरचीची डाळ घालून केलेली भाजी. दाय गंडोरी खास 'लेवा गणबोली' तील शब्द!                          यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, आंबटचुका, वांग, कच्चे टमाटे, आलं, लसूण, हळद, शेंगदाणा कुट, सुक्या खोबऱ्याचा कीस, भरपूर, खूप सारी कोथिंबीर, तेल मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मीठ. उपरोक्त उल्लेखाप्रमाणेच ही भाजी अतिशय झणझणीत असते. परंतु आता सगळेच तिखट थोड्या कमी प्रमाणात खातात त्यामुळे फार तिखट नसते. पण आवड असलेले, पट्टीचे खाणारे असलेल्या घरांतून अजूनही चांगली झणझणी...