घंटा मंदिर/घोडा खाल मंदिर/गोलू देवता मंदिर
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
आपल्या भारत देशातील उत्तराखंड राज्यात, नैनिताल जिल्ह्यात, भीमताल पासून १६७ किमी, तर नैनिताल पासूनही तितकेच म्हणजे १६७ किमी अंतरावर भवाली जवळ आहे.
२९.३८२३° उत्तर, ७९.५१९६° पूर्व.
या मंदिराचे नाव सुद्धा मला माहिती नव्हते. सहल नियोजन केले तेव्हा सुद्धा हे नाव कुठे बघितल्याचे आठवत नाही, आमच्या नियोजनात सुद्धा हे ठिकाण नव्हते. तथापि मध्येच एक दिवस मोकळा ठेवला होता, की नैनिताल येथे जास्त आवडले तर थांबायचे, नाही तर दुसरीकडे जायचे. नैनिताल येथे आमच्या वस्ती स्थानावर अजून एक दिवस आरक्षण मिळाले नाही. मग विचार केला भीमताल येथे जावे. खर सांगायचे झाले तर नैनिताल फार प्रसिद्ध आहे, भीमतालच्या तुलनेत. तथापि भीमताल म्हणजे भीम तळे आणि नैनिताल म्हणजे नयना तळे यांची तुलना केली तर भीमताल मापाने मोठे आहे. फार प्रसिद्ध नसल्याने तिथे गर्दी सुद्धा कमी. परंतु तापमानाच्या बाबतीत तुलना केली तर भीमताल नैनितालच्या तुलनेत बरेच उष्ण आहे.
नैनिताल वरून भीमताल येथे जायला गाडी ठरवली. या गाडीचे चालक फारच उत्साही. त्यांनी आम्हाला नैनिताल मधील, आम्ही न पाहिलेल्या काही जागा दाखविल्या. म्हणजे जीम कॉर्बेटचे उन्हाळी घर, अमिताभ बच्चन शिकले, ते महाविद्यालय, काही सरकारी इमारती वगैरे वगैरे. तसेच जातांनाच्या रस्त्यावर सुद्धा काही ठिकाणे आहेत, ते सुद्धा दाखवतो म्हणाले. आम्ही अर्थातच खुश झालो. काही ठिकाणे जेथून सुंदर निसर्ग दर्शन होते अशी ठिकाणे दाखविली. नंतर म्हणाले 'नीम करोली बाबा' आश्रमात जावू या. मला तर हे नाव सुद्धा माहिती नव्हते. मग रस्त्याने जातांना माहिती कळली, ते का खूप प्रसिद्ध झाले ते? ते म्हणजे अॅपलचे मालक स्टीव जॉब आणि फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग हे दोन्हीही, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात अडचणी आल्या तेव्हा, तिथे जाऊन राहिले होते. त्यांना तिथे मानसिक शांती लाभली.
मी या सगळ्यात फारशी उत्साही नसते. पण चालक दादांचा फार आग्रह. मग गाडी तिकडे वळवली, परंतु थोड्याच अंतरावर रहदारी संपूर्ण ठप्प झालेली. मग म्हटलं नकोच, इतका वेळ इथे वाया घालविण्यात काहीच अर्थ नाही. रहदारी ठप्प झालेली म्हणजे, प्रत्यक्ष आश्रमात किती गर्दी असेल याबद्दल कल्पना न केलेलीच बरी. मग म्हणाले घोडा खाल मंदिर आहे, तिकडे जाऊ या. हे सुद्धा मी पहिल्यांदाच ऐकले. म्हणाले त्या मंदिरात लाखो घंटा आहेत. घंटा, घुंगरू वगैरे म्हणजे माझा अतिशय आवडीचा विषय. मग काय, मी लगेचच म्हटले चला जावू या. तिकडे जायचा रस्ता संपूर्ण मोकळा होता. मात्र जवळ पोहोचलो तसे दिसले बऱ्याच अंतरा पर्यंत गाड्या उभ्या केलेल्या होत्या. पण मंदिर प्रवेशद्वारा पर्यंत पोहोचलो, फारसा त्रास न होता.
या मंदिराची तीन नावे आहेत. घोडा खाल मंदिर, गोलू देवता मंदिर आणि घंटा मंदिर. ही देवता घोड्यावर बसलेली असल्याने घोडा खाल असे नाव असावे. वर सांगितल्या प्रमाणे येथे लाखो घंटा आहेत म्हणून हे घंटा मंदिर. मंदिरा भोवती आपण नेहमीच बघतो, तिथे पूजा-सामुग्री, फुले, हार, नारळ वगैरे गोष्टी विकणारे विक्रेते, दुकानं असतात. इथेही ती होतीच, तथापि जास्त ठळक म्हणजे घंटा विक्री साठी ठेवलेली दुकानं. यात अगदी छोट्या आकाराच्या म्हणजे काही इंचाच्या घंटे पासून ते प्रचंड मोठ्या आकाराच्या म्हणजे एक, दीड, दोन फुट उंचीच्या घंटा पर्यंत सर्व मापाच्या घंटा विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या.
मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो, तर पायऱ्या, त्यावर लोखंडी पत्र्याचे छत आणि या छतापासून टांगलेल्या निरनिराळ्या मापाच्या घंटा. असे दृश्य दृष्टीस पडले. छान वाटले. पायऱ्या चढता-चढता जमेल तशा, जमेल तितक्या घंटा वाजवत, वर चढू लागलो. जसजसे वर चढत होतो, तसतशी या घंटांची संख्या वाढत होती. थोड्या अंतरावरून दिसले, पुढे रांग आहे, मंदिरात जाण्यासाठी. तिथे पोहोचे पर्यंत तर इतक्या घंटा होत्या की थोडे अस्वस्थ वाटू लागले. या प्रत्येक घंटेला एक सोनेरी किनार असलेले लाल वस्त्र आणि एक कागदाची चिठ्ठी बांधलेली होती. या सगळ्यावरून अंदाज आलाच होता, हे नक्की काय आहे ते. नवस! असे बऱ्याच ठिकाणी असते, नवस बोलतात आणि तो पूर्णही करतात. तथापि इथे जी काय मनोकामना असेल ती कागदावर लिहून त्या घंटेसोबत बांधलेली होती. हा भाग फारच नवखा आणि नवल वाटणारा होता.
आणि आम्ही जे काय त्या रांगेत अडकलो, की बाहेर निघूनही जाता येईना आणि पुढेही जाता येईना. म्हणजे काही मंदिरात सोय असते, गाभाऱ्यात न जाता लांबून दर्शन घ्यायचे. तशीही इथे सोय नव्हती. त्यामुळे त्या रांगेत थांबण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. रांगेत उभे राहणे, दोन्ही बाजूला आणि डोक्यावर सर्वत्र घंटाच घंटा आणि त्याला बांधलेले लाल रंगाचे वस्त्र आणि पांढरा कागद. फारच विचित्र आणि घुसमटल्या सारखे वाटू लागले. खरतरं घंटा माझ्या अतिशय आवडीचा विषय. कुठल्याही मंदिरात गेल्यावर, कितीही उंचावर घंटा असली तरी मी ती वाजवतेच, त्याशिवाय आत शिरतच नाही. तथापि इथे लाखोंनी घंटा, अगदी हाताशी, सहज वाजवता येतील अशा. अगदी छोट्याश्या मापापासून ते अक्षरशः दोन-अडीच फुट उंचीच्या. परंतु मला त्यातील एकही घंटा वाजवावीशी वाटली नाही. आजूबाजूला सर्व वयोगटातील मंडळी, अगदी तान्ह्या बाळांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे. सर्व उपाय थकले की हा एकमेव उपाय...
मजल दरमजल करत एकदाचे पोहोचलो गाभाऱ्यासमोर, जवळ पास दोन तासानंतर. तेव्हा लक्षात आले लांबून दर्शन सोय का नाही? एक तर गाभाराच मुळात खूप छोटा. त्यामुळे लांबून दर्शन वगैरे शक्यच नव्हते. गर्दी प्रचंड, गाभारा छोटासा, आणि त्यात श्वेत संगमरवराची, वस्त्र परिधान केलेली मूर्ती. त्या भागातील स्थानिक देवता असावी. जाण्या आधी मला याबद्दल माहिती नव्हती आणि जाऊन आल्यावरही मी त्याबद्दल माहिती बघितली नाही. आंतरजालावर त्याच्या चलचित्रं फिती आणि माहिती आहे बरीच. गाभाऱ्यातील देवतेचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण शक्य झाले नाही. नमस्कार केला, प्रसाद घेतला आणि बाहेर पडलो त्या गर्दीतून. भरभरून मोकळा श्वास घेतला, तेव्हा कुठे थोडे बरे वाटले. पुन्हा त्याच पायऱ्या उतरून खाली जायचे होते. या पायऱ्या चढतांना उत्सुकते पोटी छान वाटत होते. उतरतांना सुद्धा छान वाटत होते, त्या गर्दीतून बाहेर पडल्यामुळे, मोकळा श्वास घेता आल्यामुळे...
मंदिर! भारतवर्षातील मंदिर! अनेक, असंख्य मंदिरे. नव्याने उभारली जाणारी लहान-मोठी-भव्य मंदिरे! माझ्या सारख्या मंदिर अभ्यासकाला सखोल, भौतिक रुपात तर विचार करायला भाग पडतातच, तथापि मानसिक, भावनिक पातळीवर सुद्धा खोलवर विचार करायला लावतात...
II गोलू देवता अर्पण मस्तु II
©️®️आनंदी पाऊस
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
१९ जुलै २०२६
घंटा दुकान
मंदिर दृश्य
मंदिर दृश्य
घंटा, सोनेरी किनार असलेले लाल वस्त्र
आणि पांढऱ्या कागदाची चिठ्ठी
स्पष्ट दिसत आहे
मंदिर दृश्य
मंदिर दृश्य
मंदिर दृश्य
घंटा
दृश्य
मंदिर दृश्य
घंटा
घंटा
असंख्य घंटा दृश्य
घंटा
घंटा
घंटा दृश्य
दृश्य
दृश्य
देवता
देवता
दृश्य
घंटा
दृश्य

























Wow very nice👌
ReplyDelete👍🏽👌🏽 पहिल्यांदाच ऐकले या मंदिराबद्दल.
ReplyDeleteधन्यवाद💐🙏🏽
छान माहीती आहे ,धन्यवाद जी
ReplyDeleteसुंदर माहिती 👌👌
ReplyDeleteआणि तितकेच प्रभावी लेखणी... 🙏
Very good article and most disgusting experience. All our temples are like this only. We should keep away from such external show etc. What is required is to to go within. Also make sure that all your work is properly stored on digital platform so that it can be available any time in future. This is your legacy and try to preserve it with proper planning on your web site, you tube platform or Microsoft one note etc. Pl do it. Also such articles can not be read properly on small screen so normally they may be shared on e mail. Ofcourse young generation can read it but we find it comfortable on g mail. Any way you are doing great work. Keep it safe for future generations etc. Regards and lots of blessings. You may see few videos of Dr. Sushmatai Watve for real Sadhana etc. I am sending one just to show you. Lots of blessings.
ReplyDeleteजे ऐकावे ते नवलच...!!
ReplyDeleteअसे नाही वाटत आता, कारण तुझ्या लेखनातून नवी नवी माहिती मिळतेच मिळते. 👏🙏
Wa chan Navin mahiti milali tuzya lekha mule 👌👌 ghanta kiti tari aahet 😃😃
ReplyDeleteMansachi shradha asel tyavar🙏
सुरेख वर्णन,👍💐
ReplyDelete