Skip to main content

जलसंवाद विशेषांक - लेख (featured)

जलसंवाद विशेषांक - लेख 
(featured) 

नामा म्हणे आता लोपला दिनकर l
बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ...




              आपण सारेच अगदी नकळत्या वयापासून रामायण-महाभारतातील कथा ऐकत असतो. या कथांत मौजीबंधन झाले की गुरूगृही म्हणजे ऋषींच्या आश्रमांत जाऊन शिक्षा ग्रहण करण्याची प्रथा होती. तथापि सर्वसाधारणपणे सारेच ही एक भूतकाळातील गोष्ट आहे म्हणून त्याकडे बघतात. परंतु माझ्या मनाला मात्र नेहमीच या शिक्षण पद्धतीचा, त्या प्रकारच्या गुरूंचा ध्यास लागलेला असे. आपल्यालाही असे ऋषी, गुरु म्हणून लाभावे आणि त्यांच्याकडून विद्या ग्रहण करण्याची संधी मिळावी असे मनापासून वाटे. एक मन सांगे, हे कलीयुग आहे, या युगात असे गुरु लाभणे अतिशय दुरापास्त. तथापि दुसरे मन या गोष्टीचा ध्यास सोडायला तयार नव्हते.
               आणि चमत्कारच झाला जणू! सर्वसाधारणपणे गुरूंकडे जाऊन अभ्यास केला जातो. परंतु विरोधाभास असा की मला अभ्यास ध्यासातून गुरु प्राप्ती झाली. कलियुगात ऋषीतुल्य गुरु लाभले. अर्थातच हे ऋषीतुल्य गुरु म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहास आणि पुरातत्त्व संशोधक,जलपुरुष, संस्कृतीपुरुष, ऋषीतुल्य, आदरणीय डॉ रामचंद्र श्री मोरवंचीकर! एकदा का योग्य गुरु, गुरु सान्निध्य लाभले की जीवनाची बाग सर्वार्थाने बहरून येते. 
जाणतेने गुरु भजिजे I तेणे कृतकार्या होईजे II 
जैसे मूळ सिंचने सहिजे I शाखा पल्लव संतोषिती II

               सुरुवातीला मी इतरांप्रमाणे त्यांना सर म्हणून संबोधित होते.तथापि अनेक कारणांमुळे माझे मलाच ते रूचत नव्हते, योग्य वाटत नव्हते. परंतु दुसऱ्या काय नावाने संबोधावे ते कळेना. माझ्या वडिलांना मी दादा म्हणून संबोधित करते. माझ्याही नकळत मनातल्या मनात मी सरांचाही उल्लेख 'दादा' म्हणून करू लागले. एके दिवशी त्यांना विचारलेच, मी तुम्हाला दादा म्हटले तर चालेल का? सोबतच त्याची करणे आणि पार्श्वभूमीही सांगितली. क्षणभराचाही विलंब न करता त्यांनी होकार दर्शविला. आणि ते माझे दादा झाले. कालांतराने माझ्या आई-वडिलांची आणि दादा-माईंची(वसुंधरा मोरवंचीकर) प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा, विकास-विजय दादा आणि वर्षा ताई यांच्या बद्दल सांगून माझ्याकडे हात करून म्हणाले हे माझे चौथे अपत्य! आम्ही सारेच भरून पावलो. ओलाव्याने ओथंबलेला एक क्षण...!
               ओलावा म्हणजे जलाचे अस्तित्व. जलपुरुष तिथे जल म्हणजेच ओलावा. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे यांना काही बिरूदं मिळालेली सर्वज्ञात आहेत. तथापि आजच्या युगात इतकी बिरूदं असलेली व्यक्ती माझ्या तरी पाहण्यात, ऐकण्यात आलेली नाही. त्यापैकी जलपुरुष हे एक बिरूद. त्यांनी जलावर किती अभ्यास, संशोधन केले आहे याचे प्रत्यक्ष प्रमाण, शब्दरूप! दादांचा जलावरील संशोधनात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी मराठी भाषेला जल-संस्कृती तर जगाला म्हणजेच इंग्रजी भाषेला water-culture  हे शब्द दिले. हे फक्त शब्द नाहीत, तर संशोधनासाठी दिलेली एक महत्वाची वाट आहे, ज्या वाटेने जाऊन कितीतरी प्रकारचे संशोधन केले जाऊ शकते. पाणी म्हणजे जीवन! त्यामुळे हे संशोधन आज सर्वात महत्वाचे आहे. आज जगभरात पाण्याच्या अडचणी सर्वज्ञात आहेत. हे मासिक जलासंबंधी असल्यामुळे वरील उल्लेख करणे महत्वाचे वाटले. अन्यथा दादांच्या सर्व संशोधनाबद्दल लेखन करायचे म्हटले तर माझ्यासारखे कितीतरी आयुष्य खर्ची पडतील. असो.
               या लेखासंबंधी आदरणीय गजानन देशपांडे सरांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला तेव्हा म्हणाले तुमच्या व्यक्तिगत आठवणी सांगाव्या. दादांच्या सोबतच्या माझ्या आठवणी असीम आहेत, सर्वार्थाने. त्या पूर्णार्थाने समजून घेण्यासाठी एकच मार्ग, तो म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. त्याशिवाय त्या समजणे अवघडच. सकाळी साडे दहा आणि सायंकाळी साडे चार अशी आमच्या संवादाची वेळ ठरलेली! यात कधीतरी खंड पडे, कुणी पाहुणे येणार, दादांचे काही लेखन, मनन, चिंतन यापैकी काही काम असे, तर मी प्रवासात आहे किंवा इतर काही काम यावेळीच असे तेव्हाच. अन्यथा हा रोजच्या दैनंदिनीचा हा अतिशय महत्वाचा भाग असे. जणू दादांच्या व्याख्यानाची वेळच असे माझ्यासाठी. 
                दररोज अभ्यास, वाचन, लेखन वगैरे चालूच असते. यात काही न काही अडचण, शंका असतच मला, आजही असतात. मग या आधीच दादांना whatsapp च्या माध्यमातून कळविलेल्या असत. त्यामुळे प्रत्यक्ष दूरध्वनीवर हा वेळ वाचून प्रत्यक्ष व्याख्यानाला सुरुवात होत असे, नमस्कार दादा!, बरं, नमस्कार, बोला अशी रोज सुरुवात होत असे. ते म्हणत, सारखी काय नमस्कार करतेस? सरळ बोलायला सुरुवात करत जा. मी सांगितले दादा मी कितीही वेळा तुम्हाला नमस्कार केला तरी माझे मन भरणार नाही, तुमच्या बद्दलचा आदरभाव व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे माझा, तेव्हा तुम्ही मला असे करण्यापासून अडवू नका. मग त्यांनी ते मान्य केले. सगळ्यात धाकटे अपत्य आणि सगळ्यात धाकटी शिष्या, त्यामुळे अभ्यासासोबत माझे सारेच लाडही पुरवत असतं. तर या पुढे मग आधीच ठरलेल्या विषयावर चर्चा सुरु होई. चर्चा म्हणजे दादांचे व्याख्यानं, ते कधी संपूच नये असे मला वाटे. तथापि त्यांची तब्येत सांभाळणे सुद्धा गरजेचे वाटे. त्यामुळे ठरलेला विषयावर त्यांचे भाष्य झाले की आम्ही थांबत असू. किंवा त्यांना बोलतांना त्रास होत असल्यास आधीही थांबून, पुढच्या वेळी तो विषय पूर्ण केला जात असे. दादा नमस्कार, तेही म्हणत बरं नमस्कार! या शब्दांनी या दूरध्वनीवरील व्याख्यानाची सांगता होत असे. 
               दिवसातून एकदा तरी त्यांच्याशी बोलणे, त्यांचे व्याख्यानं ऐकणे म्हणजे दिवसाचे सार्थक झाल्यासारखे वाटे. एखादा शब्द अडला, त्याबद्दल विचारले, की म्हणत, तुम्ही शब्दापाशी थांबत नाही, त्याच्याशी बोलत नाही, त्याला विचारत नाही, त्यामुळे तुम्हाला या अडचणी येतात. त्याच्याशी बोला, मग तोच तुम्हाला सारे सांगतो, कसलीही अडचण येत नाही, तो शब्दच सारे उलगडून सांगतो. माझी थोडीफार सवय होतीच अशी, तथापि दादांमुळे ती पूर्ण अधोरेखित झाली. तथापि हे सारे आणि त्या-त्या शब्दाबद्दल त्यांच्या मुखातून ऐकणे म्हणजे एक आगळेच स्वर्गीय सुख असे, अगदी अतुल्य स्वर्गीय सुख! जणू दिवसाच्या सुरवातीला आनंदाचा सडा!(यात कणभरही अतिशयोक्ती नाही!) संपूर्ण दिवस या सुगंधी आनंदाने भरून जाई.
               दादांशी संवाद मग तो दूरध्वनीवरून असो की प्रत्यक्ष, या संवादात खात्रीने फक्त ज्ञानात भर पडे असे नाही तर, काहीतरी थक्क करणारे ज्ञान, संशोधनासाठीचे विषय, ते करता येण्यासाठीच्या अगदी वेगळ्या वाटा, त्या वाटांवरून कसे चालावे, काय बघावे, कसे बघावे एक न अनेक ऐकायला मिळत असे. इतके सगळे दिलेय त्यांनी की हाच नाही तर पुढील कित्येक जन्म पुरेल इतकी शिदोरी मला मिळालीय...! बर फक्त अभ्यास, लेखन, वाचन, संशोधन याबद्दलच बोलत असे नाही. त्याची विनोद बुद्धीही अतिशय वाखाणण्याजोगी होती. कित्येकदा तर हसुन्हासून माझी पुरेवाट होत असे, गाल आणि पोट दुखायला लागत.
               प्रत्यक्ष भेटीचा आनंद तर काही औरच असे. मी भेटायला जाणार म्हणजे, अर्थातच आधीच विषय ठरलेले असतं. अलीकडे २-३ वर्षांपासून महत्वाचा विषय म्हणजे माझी पी एच डी. आधी विषय नक्की करणे, मग त्या विषयावर चर्चा. खरतरं मी या जन्मी कधी पी एच डी करेल असे मला वाटले नव्हते. ते म्हणाले, एखाद्या पी एच डी पदवी धारकाला जितके ज्ञान असते, त्यापेक्षा कितीतरी जास्त ज्ञान तुझ्याकडे आहे, मला जसा पदवीचा मोह नाही, तसाच तो तुलाही नाही. तरीही तू पी एच डी करावी. हे ऐकून मला व्यक्तच होता आले नाही. मग माझा पी एच डी अभ्यास प्रवास सुरु झाला. हा झाला अभ्यासाचा भाग. मी पोहोचले की, माई(वसुंधरा मोरवंचीकर) काहीतरी खास खाऊ देत, त्यांनी ठरविलेला. तो पाहून दादा म्हणत हे नाही मी एक लाडू काढून ठेवला आहे, तो द्या. म्हणजे मी येणार म्हणून माझ्यासाठी, दादा स्वतःही काहीतरी खाऊ काढून ठेवत असतं. दुपारी जेवण तर सोबतच होत असे, त्यांची आणि माझी वेळ जुळत असेल तर. अन्यथा मला जेवायला बसून ते स्वतः माझ्या बरोबर बसत, काय हव नको जातीने बघत, माई असून सुद्धा. कधी मी स्वतः ताट वाढून घ्यायला लागले आणि एखादा पदार्थ चुकीच्या जागी वाढून घेतला तर तिकडेही लक्ष असेच त्याचं. सांगायचा मुद्धा एक म्हणजे गुरूला गुरु-माऊली का म्हटले जाते, हे स्पष्ट करणारा प्रसंग. दुसरा मुद्दा म्हणजे दादांना अभ्यासासाठी कुठलाही विषय वर्ज्य नव्हता किंवा त्यांच्या अभ्यासण्यात आलेला नाही असा विषयच नाही.
               खाद्यपदार्थ! दादांच्या अतिशय आवडीचा विषय. त्याच्या शारीरिक व्याधींमुळे त्यांना बरेच पदार्थ वर्ज्य होते. तथापि सर्व प्रकारच्या शाकाहारी पारंपारिक पदार्थांवर त्यांचे मनापासून प्रेम होते. या विषयावर एकदा का चर्चा सुरु झाली की त्यातून काय काय पदार्थ, त्यांचा इतिहास, त्यांच्या पाककृती ऐकायला मिळतील, याचा अंदाजच करता येणार नाही. एकदा मी मोठ्या एकादशीला चालणाऱ्या किंवा आमच्याकडे होणाऱ्या खाद्यापादार्थांवर लेख लिहिला. तो वाचून त्यांनी उपवासाचे इतके खाद्यपदार्थ आणि त्यांच्या कृती सांगितल्या की त्यावर एक लांबलचक लेख तयार होईल. आमच्या खानदेशातील सुद्धा सर्व खाद्य पदार्थांचा त्याचा सखोल अभ्यास होता आणि त्यांना आवडतही होते. त्यापैकी काही मी जातांना घेऊन जात असे. गोड पदार्थ असला तर सरळ म्हणत माईंची परवानगी असेल तरच मी खाईन. त्याच्या तब्ब्येतीची माई काळजी घेत, त्यामुळे त्यांना विचारणे गरजेचे. कधीतरी परवानगी मिळाली तर कणभर खात. 
               त्यांच्या अभ्यास, संशोधन याबातात सर्व ज्ञात आहेत असे म्हटले जाते. तथापि मला तसे वाटत नाही. कारण त्यांच्या संशोधन-अभ्यास यातील काही विषयांवर त्यांनी लेखन केले, ते ग्रंथ स्वरुपात प्रकाशितही झालेले आहेत. आजवर त्यांचे ५४-५५ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. शेवटा ग्रंथ मात्र त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे अपूर्ण राहून गेला... तथापि त्यांच्या होणाऱ्या दैनंदिन संवादातून, त्यांनी अभ्यासलेल्या अनेक विषयांवर त्यांनी मांडलेले विचार, मुद्दे ऐकण्याचे अहो भाग्य मला लाभले. तथापि ते सर्व लेखन करून प्रकाशित स्वरुपात उपलब्ध नसल्याची फार खंत वाटते. 
                दादांच्या स्मरणशक्ती बद्दल तर काय म्हणावे! मी, त्यांचा सातवाहन कालीन महाराष्ट्र या ग्रंथाचा अभ्यास करत असतांना, त्यात त्याकाळी लोणी निर्यात केले जात असे. असा उल्लेख आला. लोणी निर्यात करायचे म्हणजे ते टिकवून ठेवण्याचे तंत्र हवे, तेव्हा लोणी टिकविण्या बद्दल दादांना विचारले असता, त्यासंबंधी दिलेले संदर्भ पुस्तकाचे नाव आणि लेखकच सांगितले नाही तर, त्या पुस्तकातील पान क्रमांक आणि ओळ क्रमांकही सांगितला. काय म्हणावे या स्मरणशक्तीला आणि अभ्यासाला! बाकी भागवत, ज्ञानेश्वरी वगैरे बद्दल तर सांगायलाच नको. प्रत्येक ओवी पान क्रमाक, ओळ क्रमांक आणि त्याच्या गर्भितार्थासह अगदी चैतन्यमयी स्वरुपात अनुभवलेलीच! रुमी, गालिब, कबीर सर्व तोंडपाठ! एकदा वाचले, ऐकले, बघितले की ते कायमचे त्यांच्या स्मरणात अगदी पक्के, विसरायची शक्यताच नाही! हे सर्व त्यांच्या वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत...
               मी मुळात वास्तूविद्या विशारद(architect), दादा, इतिहास आणि पुरातत्त्व संशोधक थोडक्यात आमचे विषय अतिशय भिन्न, त्यामुळे तुलनेत आमची भेट उशिराने झाली. त्याबद्दल त्यांना फार खंत वाटत असे. नेहमीच म्हणत, ही भेट थोडी लवकर झाली असती तर संशोधनाचे पुष्कळ काम झाले असते. तथापि तू ते करावे. मी म्हणत असे, दादा आता काय आणि किती काम होणार माझ्याकडून सुद्धा, तर त्यांचे उत्तर ठरलेले...

अभी तो पहिली तार झेडी है 
पुरी महेफिल बाकी है...

चीर-तरुण्याचा आशिर्वादच दिला जणू...

               त्यांनी इहलोकीची यात्रा संपविल्याचे कळले, तेव्हा माझ्याही नकळत माझ्या मनात संत नामदेव यांचा, दादांनीच चैतन्यमयी अनुभव करून दिलेला, हा अभंग मनात घोळत राहिला... 
 
नाम म्हणे आता लोपला दिनकर l
बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ...

(टीप - हा लेख जलसंवाद - डॉ रा श्री मोरवंचीकर स्मृती विशेषांकात प्रकशित झालेला आहे.)

 
https://www.dropbox.com/scl/fi/0ixke5ktiohc7tsl9ksw5/jalsamvad-morwanchikar-visheshanka.pdf?rlkey=z4lvhf518yxmp5e3dq7izwqsk&st=7g49or40&dl=0

जलसंवाद विशेषांक
यातील सर्व लेख वर दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहेत



 ©️®️आनंदी पाऊस 
(www.anandipaus.com)
३० मार्च २०२६ 
गुरु पौर्णिमा २०२६ 



Comments

Popular posts from this blog

दळणं (घरातील गमती जमती)

दळणं (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                  ...

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

थोडं (खूप सारं😉😆) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)

थोडं (खूप सारं) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)                        दराबा! तर या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द कुठून आला? तर हा पदार्थ बऱ्हाणपूर येथील दरबारातील खास पदार्थ. हा पदार्थ रोबुन रोबुन करावा लागतो म्हणून हा दराबा!                                                           घरात सगळेच खाण्याचे शौकीन, मुख्य म्हणजे आमचे बाबा सुद्धा! त्यामुळे सारखं काही ना काही करणं आणि खाणं अखंडपणे चालूच असे. खाण्याच्या बाबतीत तर सगळ्यांचा भरपूर उत्साह होताच, पण करणाऱ्यांचा (सगळ्या मम्मी लोकांचा) सुद्धा उत्साह तेव्हढाच किंवा काकणभर जरा जास्तच मी तर म्हणेन. सगळं अगदी उत्साहाने करत. त्यांच्या या उत्साहाला आणि मेहनतीला तर कायमच आणि वारंवार सलाम करावासा वाटतो. कारण कुठलीही गोष्ट करायची असो, कधीही थोडी थोडकी करून भागतच नसे. त्यामुळे खूप बांधीलकी आणि वचनबद्धता असणे आवश्यक असे. बरं त्यां...