हरी/हर की पौरी दर्शन
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
हरिद्वार! एक महत्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र! एक जलतीर्थ! शब्दातच त्याचा अर्थ स्पष्ट होतो. म्हणजेच जिथे भक्तांना स्नानाने पावित्र्य लाभते. साधारणपणे तीर्थक्षेत्र म्हणजे तिथे एखादे प्राचीन मंदिर असावे असा जनसामन्यात ग्रह असतो. तथापि तीर्थक्षेत्राचे दोन प्रकार आहेत. स्थलतीर्थ आणि जलतीर्थ. पैकी स्थलतीर्थ म्हणजे जिथे पूजेने आणि दर्शनाने पावित्र्य लाभते. अशाच स्थलतीर्थाच्या ठिकाणी प्राचीन मंदिर असते, जलतीर्थाच्या ठिकाणी नाही. तथापि कालांतराने जलतीर्थाच्या ठिकाणी सुद्धा बरीच मंदिरे असतात. जसे की हरिद्वार.
हरिद्वार / हरद्वार हे एक जलतीर्थ आहे. म्हणजे इथे भक्तांना स्नानाने पावित्र्य लाभते. त्यामुळे तिथे प्राचीन असे देवालय नाही, तथापि काळाच्या ओघात जवळपास सर्व देवदेवतांची मंदिरे, घाट परिसरात बघायला मिळतात. हरिद्वार येथे गेल्यावर हिंदू धर्मियच नाही, तर इतर धर्मीय सुद्धा गंगा-स्नान करतांना, गंगेत डुबकी मारतांना मी पाहिले आहे, प्रत्यक्ष! अद्वैत! समस्त मानव जातीचे अद्वैत! असो. तर या स्थळाच्या नावात सुद्धा गोंधळ आहे. हे स्थळ दोन नावांनी ओळखले जाते. या दोन शब्दांत फक्त एका मात्रेचा फरक आहे. परंतु हा एका मात्रेचा फरक शिवा पासून विष्णू पर्यंतचा आहे. म्हणजे हरद्वार म्हटले तर हे शैव तीर्थक्षेत्र आणि हरिद्वार म्हटले तर वैष्णव तीर्थक्षेत्र. तथापि उपरोक्त उल्लेखाप्रमाणे हे जलतीर्थ असल्याने, इथे कुठलेही प्राचीन देवस्थान नाही. एका अर्थी गंगेचा आणि शिवाचा अतिशय जवळचा संबंध म्हणजे गंगा स्वर्गातून प्रकट झाल्यावर, तीला शिवाने आपल्या जटेत धारण केले.(ही कथा विस्ताराने डुबक्या १,३,५, या लेखात आलेली आहे. त्यामुळे इथे फक्त उल्लेख केला आहे.) ही कथा सर्वज्ञात आहेच. परिणामी शिवभक्त या स्थळाला शैव-तीर्थ मानतात. अर्थातच त्याचे नामकरण 'हरद्वार' असे केले जाते आणि घाटाला 'हर की पौरी' म्हटले जाते.
माझ्या माहिती प्रमाणे किंवा ऐकिवात हरिद्वार असेच होते. त्यामुळे माझा सुद्धा प्रचंड गोंधळ उडाला. तसेच या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला गंगा-भेट महत्वाची होती. त्यामुळे मी शैव-वैष्णव भानगडीत पडलेच नाही. मुळातच हे जलतीर्थ असल्याने कुठल्या देवालयाचा किंवा कुठल्या पंथाचा तसा फारसा संबंध नाही येत, असे म्हणणे चुकीचे ठरू नये. तथापि या स्थळाला 'हरिद्वार' आणि येथील घाटाला 'हरी की पौरी' असे संबोधले जाते. अर्थातच या मागे काही तरी कारण असावे. मग ते काय याचा मागोवा घेतला असता, काही माहिती मिळाली. याच्या दोन निरनिराळ्या पार्श्वभूमी, कथा आहेत. एक म्हणजे या ठिकाणी एका खडकावर विष्णूपाद कोरलेले आहे. येथे गंगा, भगवान विष्णूंच्या चरणाशी अवतरते, त्यामुळे 'हरी की पौरी' पौरी म्हणजे पायरी. त्यामुळे वैष्णव, या स्थानाला 'हरिद्वार' म्हणून संबोधितात.
दुसरी कथा, नृपती विक्रमादित्य याचा बंधू, भर्तृहरी याने याठिकाणी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तप केले आणि येथेच प्राण सोडले. राजा विक्रमादित्याने, आपल्या बंधू स्मरणार्थ, याठिकाणी एक मोठे सरोवर निर्माण केले आणि त्यावर घाट बांधला. भर्तृहरी याच्या स्मरणार्थ, असल्याने त्यास हरीची पायरी आणि सरोवरास ब्रह्मकुंड असे नाव पडले. समुद्रमंथनातून अमृतकुंभ निघाला आणि त्यातील थेंब याठिकाणी पडल्याचे मानले जाते. याकारणे गंगा स्नान पवित्र मानले जाते आणि मोक्ष मिळतो असा.
या स्थानाचे याही पलीकडे जाऊन काही भौगोलिक महत्व आहे. गंगेच्या उगमापासून, या स्थानापर्यंतचा मार्ग हा हिमालयात आहे, म्हणजे डोंगर-दऱ्यातून. हरिद्वार या ठिकाणी गंगा सपाट मैदानी प्रदेशात प्रवेश करते. या ठिकाणी सर्वच भक्तांना गंगा-डुबकी गंगा-स्नान सहज शक्य असते. कारण यापुढे म्हणजे गंगा उगमाकडे जाण्याचा मार्ग अतिशय खडतर आहे. दुसरे असे की हिमालयात शिव आणि विष्णूची अनेक पवित्र स्थळे आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, पंचकेदार (तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर, मद्महेश्वर, केदारनाथ) आणि पंच बद्री(विशाल, योगध्यान, भविष्य, वृद्ध आणि आदी बद्री). या सर्व स्थळांना जाण्यासाठी या ठिकाणा पासूनच सुरुवात होते. थोडक्यात हे एक द्वारच आहे. म्हणून 'हरद्वार' किंवा 'हरिद्वार'.
तर असे हे 'हरद्वार' आणि 'हरिद्वार'. आणि तेथील 'हर की पौरी' आणि 'हरी की पौरी'. हे नेमके काय आहे हे स्पष्ट समजावे, मला स्वतःला आणि समस्त आनंदी वाचकांना, म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न. तथापि या सगळ्या पलीकडे जावे, अद्वैताचा मार्ग आचरावा आणि थेट गंगा मातेला जावून भेटावे, तिच्याशी हितगुज करावे, संवाद साधावा आणि संपूर्ण भयमुक्त होऊन तिच्या बाहुपाशात, तिच्या मिठीत आश्वस्त व्हावे. तिच्या प्रेमाचा, तिच्या प्रेमळ मिठीचा अनुभव करावा... यापेक्षा मोक्ष काय निराळा?
II गंगार्पणमस्तु II
©®आनंदी पाऊस
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
१८ जुलै २०२६
प्रवेशद्वार
गंगा मंदिर
सूर्य मंदिर
लक्ष्मी-नारायण मंदिर
राम मंदिर
बद्री नारयण मंदिर
केदारनाथ
शृंगेरी
घड्याळ घर
झलक१
झलक२
झलक३
झलक४
झलक५
घड्याळ घर
शिव धनुष्य पूल
झलक६
झलक७
झलक८
झलक९
भव्य शिव प्रतिमा
©️®️आनंदी पाऊस
(गोष्टी पर्यटनाच्या...)
२२जून२०२६





















नमस्कार,
ReplyDeleteआपला लेख वाचला.
मी माझ्या हयातीत दोन वेळा हरी द्वार. गेलो होतो
आपल्या लेखामुळे पुर्व स्मृती जागवल्या गेल्या.
धन्यवाद
खूपच छान!
ReplyDeleteआज हरद्वार आणि हरिद्वार difference कळला……मी डुपकी मारली आहे…. गंगा आरती पण attend केली आहे…..
ReplyDeleteउत्कुष्ट माहिती…….🙏
👌🏽💐🙏🏽
ReplyDeleteलेख आणि फोटो दोन्ही सुंदर.
फक्त एक छोटीशीच दुरुस्ती.
नावातला फरक मात्रेचा नाही वेलांटीचा आहे.
छान वाचायला मिळाले.. घरी बसून दर्शन झाल्याचा आनंद 🙏
ReplyDeleteजानेवारी १९८८-८९ युथ होस्टेलच्या वार्षिक मेळाव्यात दिल्ली येथे गेलो होतो 1 दिवसाचा वेळ होता सोबतच्या मित्रांसोबत हरिद्वार हृषीकेश चा प्लान ठरला अगदी सकाळी ब्रम्हमुहूर्तावर हरिद्वार येथे पोचलो गंगा अजून धुक्याचा पांघरुणात होती भाविक स्नान करत होते गंगा स्नान करायची इच्छा होती कपडे काढून पाण्यात उतरलो तर पाय थंड पाण्याने लाकडसारखे झाले मग पुढे हिम्मतच झाली नाही कुडकुडत बाहेर आलो 2 कप गरम चहा घेतला.... गंगा स्नान राहून गेले बसवाल्याने दिलेला लिमिटेड वेळ काय पाहिले ते आठवत पण नाही हरिद्वार चा फक्त तो प्रसंग
ReplyDeleteहृषिकेश ला आमच्या स्वामीजींच्या आश्रमात गेलो व लक्ष्मण झुला व काठावरची काही मंदिर पाहिलीत एवढीच ट्रिपची आठवण
१५-१६ वर्षांपूर्वी हिमालयाच्या ट्रिप सुरू झाल्या पहिल्याच ट्रिप मध्ये भावाने हर की पौडी तेथे संध्याकाळी स्नान व गंगा आरती असे ठरवले होते किंचीत गढूळलेले पाणी पाहून मी पाण्यात उतरायचे नाही ठरवले
निलेश (धाकटा भाऊ) जवळ आला व म्हणाला चल काढ कपडे गंगा स्नान करू चेहऱ्यावरील भाव पाहून त्याने मनातले विचार ओळखले म्हणाला ते सर्व सोड ही तर उगमाची गंगा आहे ते ब्रिटिश हजारो किमी वाहिलेली गंगा कलकत्त्याला बोटीत भरून पाणी लंडन पर्यंत नेतात ते खराब होत नाही
इथे स्नान केल्याने तुला थंडीपण वाजणार नाही सर्दी पण होणार नाही चल उतर .... थोड्याच वेळात थंडी पळाली छान फ्रेश वाटले मग जमेल त्या वेळी ट्रिप मध्ये गंगा स्नान होत राहिले तिच्या काठावर किती तरी मेमरी तयार झाल्या...होतच राहिल्या
ताई खूप छान घर बसल्या हरिद्वार चे दर्शन झाले
ReplyDeleteहरी _ स्थिती चा कारक आणि हर _ निर्मिती व लय याचा कारक;
ReplyDeleteमानवाने आपली पायरी(पौरी)/ मर्यादा सांभाळली की "हरि/ हर द्वार" दर्शन आपसुकच अनुभवता येतं....
छान प्रवास वर्णन 👌
खूप छान माहिती मिळाली.
ReplyDelete