सीताबनी सफारी (काॅर्बेट संरक्षक पट्टा)
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
मुख्य प्रवेशद्वार
सीताबनी - भारतातील उत्तराखंड राज्यात असलेले जिम कॉर्बेट या मुख्य जंगलाच्या संरक्षक पट्ट्यात सिताबनी हा भाग आहे. रामनगर येथे पोहोचल्यावर, तिथे या भटकंती साठी आरक्षण करता येते. या भटकंतीची गाडी तुमच्या वसतीस्थानापर्यंत येते आणि तुम्हाला घेऊन जाते. जाण्या-येण्याचा एक-एक तास आणि तिथे दोन तास, असे सर्व मिळून साधारण चार तासाची ही भटकंती असते. रहदारी असेल तर अजून जास्त वेळ.
एक महत्वाचे म्हणजे ही भटकंती फक्त १५ ऑक्टोबर ते १५ जून या काळातच असते. या व्यतिरिक्त गेलात तर ही संधी हुकणार.
सफारी हा शब्द मूळ स्वाहिली भाषेतील आहे. स्वाहिली ही टांझानिया देशाची मुख्य भाषा आहे. सफारी हा शब्द मूळ अरबी भाषेतील सफर या शब्दावरून आलेला आहे. सफर या शब्दचा अर्थ प्रवास असा आहे. तर सफारी या शब्दाचा अर्थ, 'लांबचा प्रवास' किंवा 'एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे'.अर्थातच जंगल सफारी याचा अर्थ जंगलातील लांबचा प्रवास किंवा जंगलातील फेरफटका. तथापि साधारणपणे जंगल सफारी म्हटले की, त्या-त्या ठिकाणी असलेले प्राणी बघायला मिळणे असा अर्थ घेतला जातो. आणि मग ही सफर चालू असतांना सर्व पर्यटक कुठला तरी प्राणी दिसतो का या नादात असतात. त्यामुळे त्या जंगलाचा आनंद घेण्याचे, त्यांच्या मनातही येत नाही. तथापि या जंगल सफारी करतांना, सर्वात आधी त्या जंगलाचा अनुभव घ्या, त्यातील आनंद लुटा. हे करत असतांना कुठलाही वन्य प्राणी दिसला तर तो म्हणजे तुम्हाला मिळालेले एक दैवी बक्षीस समजावे.
प्राणीच बघायचे तर प्राणी संग्रहालये आहेत, सर्वत्र, अगदी मुबलक प्रमाणात. तथापि त्यांना त्यांच्या निसर्ग वासात बघायचे असेल, तरच जंगल फेरफटका मारण्यास जावे. सोबतीला तुमचे नशीब सुद्धा असायला हवे. खरतरं या सफारीला जातांना बघितले तर बऱ्याच गाड्या असतात. त्यापैकी काही गाडीतील लोकांना कुठलाच प्राणी बघायला मिळत नाही तर, काही गाडीतील लोकांना एकाद-दुसरा प्राणी बघायला मिळतो आणि काहींना भरपूर किंवा बरेच प्राणी बघायला मिळतात.
तथापि या प्राण्यांव्यतिरिक्त जंगलात कितीतरी प्रकारचे पक्षी, कीटक, झाडे, झुडुपे, फुले, पाने असतात. त्याबद्दलची माहिती सुद्धा अतिशय रंजक असते. अशी जर सर्वस्पर्शी भटकंती केली, तर तुम्हाला संपूर्ण आनंदाची प्रचीती आल्यावाचून राहणार नाही. परंतु याच्या अगदी उलट केले जाते, फक्त प्राण्यांच्या शोधात जाऊन, प्राणी बघायला न मिळाल्याने संपूर्ण निराशा पदरी पाडून घेतली जाते. अगदी निराश मनाने या भटकंतीची सांगता होते.
सौ साल खड़ा I सौ साल पडा I सौ साल सडा I
ही म्हण साल या वृक्षाशी निगडीत आहे. ही माहिती या सिताबनी जंगलात जाऊन कळली. साधारणपणे साग-साल असे जोड नावच आपल्या तोंडी असते, अगदी शालेय जीवनापासून. त्यात आम्हा वास्तू-विशारद मंडळींचे सागावर जीवापाड प्रेम. बांधकामासाठी आणि इमारतीच्या अंतर्गत सजावटीसाठी सुद्धा आम्हाला सागच हवा असतो. परंतु ही संधी नेहमीच मिळते असे नाही. साल वृक्षाशी मात्र तसा फारसा संबंध राहिला नव्हता, शालेय जीवना नंतर. तो थेट आत्ताच आला. ही माहिती ऐकून आवाकच व्हायला झाले. आमच्या लाडक्या साग वृक्षा बद्दलची माहिती ऐकून तर पार वाईटच वाटले. साग ह्या वृक्षाचे लाकूड अतिशय उपयुक्त! तथापि हा वृक्ष जमिनीतील सर्व ओलावा शोषून घेतो, जमीन पार कोरडी ठणठणीत करतो. ह्या झाडाखाली कुठलाही दुसरा वृक्षच काय, पण झुडुपच नाही तर कुठल्याही प्रकारचे गवतही वाढू शकत नाही... या कारणाने, आता तिथल्या जंगलातील सागाचे वृक्ष काढून टाकून, इतर वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अजून बरीच नवल वाटावी अशी माहिती, या जंगलाबाबत ऐकायला मिळाली. या जंगलातून खूप मोठ्या प्रमाणात, गवतीचहा आणि कढीपत्ता बघायाला मिळतो. यासोबतच बेलाचे पुष्कळ वृक्ष बघायला मिळतात, अतिशय मोठाले आणि संपूर्ण झाडच बेल-फळांनी भरगच्च बहरलेले! फळही मापाने मोठाले आणि पिवळेधम्म! संपूर्ण पिकलेली. महाराष्ट्र, कर्नाटक वगैरे सारख्या भागात जेथे ऊस मुबलक प्रमाणात पिकतो, तिथे रस्त्या-रस्त्यावर उसाच्या रसाचे गुऱ्हाळे बघायला मिळतात. तथापि या भागात म्हणजे उत्तराखंड राज्यातील सर्व भागात रस्त्या-रस्त्यावर बेलाच्या फळाच्या रसाची छोटी-छोटी दुकाने थाटलेली दिसतात. तुम्ही जेव्हा-केव्हा या भागाला भेट द्याल, तेव्हा एकदा तरी या बेल-फळाच्या रसाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. अतिशय मधुर, अगदी अमृततुल्य! मी तर आकंठ प्रेमात बुडाले, या बेल-फळाच्या रसाच्या. सुरवातीला मी काही, ह्या रसाचा स्वाद घेतला नाही. नंतर मात्र भरपूर दुकाने थाटलेली दिसली तेव्हा वाटले, एकदा तरी चव घ्यावी. चव घेतल्यावर मात्र पश्चाताप झाला, त्या आधी तो रस न प्यायल्याचा...
अशी एक न अनेक प्रकारची रंजक माहिती मिळते. कुठलेही प्राणी-पक्षी बघायला मिळाले नाहीत, ही निराशा कुठल्या-कुठे पळून जाते. जंगल, जंगल भटकंती याबद्दलचे विचार, याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून जातो. एका अनोख्या जगाशी ओळख झाल्याचा नैसर्गिक आनंद अनुभवास येतो!
या जंगलात, कुठल्याही आणि कुणाच्याही व्यक्तिगत गाड्यांना प्रवेश नसतो, अगदी जंगलातील अधिकाऱ्यांच्या सुद्धा नाही. तथापि या जंगलांत एक प्राचीन मंदिर आहे, प्रवेशद्वारापासून साधारण चार किमी अंतरावर आहे. स्थानिक भक्तांना मात्र, या मंदिरापर्यंत, तेही काही विशिष्ट दिवशी, त्यांच्या व्यक्तिगत गाड्या घेऊन प्रवेश करता येतो. हे मंदिर सुद्धा या जंगल भटकंतीचा भाग असतो, पण सक्तीचे नाही. तुम्हाला पर्याय दिला जातो. अर्थातच मी भेट दिलीच. त्याची गोष्ट मात्र एका वेगळ्या खास लेखात.
याशिवाय, या सिताबनी जंगलात अनेक वृक्षांसोबत काही टिटव्या, मोर, कीटक आणि मोठाली मुंग्यांची वारूळं बघायला मिळाली. ही मुंग्यांची मोठाली वारूळं याआधीही बऱ्याचदा बघितली होती. तथापि त्याबद्दल फारशी माहिती कुठेही मिळाली नव्हती. इथल्या मार्गदर्शकांनी एक खास माहिती सांगितली याबद्दल. ती म्हणजे -
ही मुंग्यांची वारूळं
म्हणजे
आनंदी जंगल!
©️®️आनंदी पाऊस
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
२५ जून २०२६
वृक्षराजी
मुंग्यांचे वारुळ
टिटवी
सागाचे लाकूड
मचाण
मोर
मोर
रंगीत किटक
ही वाट दूर जाते...










खुप सुंदर👌🙏 सफारी!
ReplyDeleteसर्व ch माहिती भन्नाट...मला तुझी लेखन शैली आवडते ..खूप मस्त
ReplyDeleteमस्त लेख आहे...निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर काही दिवस परतावेसे वाटत नाही, हे खरे. तू मजा करते आहेस हे बघून छान वाटले.
ReplyDeleteआणि ती 'धुरंधर' स्टाईल.....
या लेखात एव्हढेच...बाकी पुढच्या लेखाची उत्सुकता वाढवून जाते. 😀😀👍👍
अप्रतीम जंगल आहे बरेच लोकांना वाघ दिसले कीच जंगल असे असते. जंगलात अनेक नानाविधी गोष्टी असतात तो पाहण्याचा दृष्टीकोन हवा असे वाटते अनेक पक्षी, प्राणी विविध झाडे झुडपे. निसर्गाने आपल्याला काय भरभरून दिले आहे पण त्याचे संरक्षण करणे आपले पण कर्तव्य आहे हे अनेकजण विसरून जातात.
ReplyDelete