Skip to main content

लोकमनातील पाणी - म्हणी व वाक्प्रचार (featured)

 लोकमनातील पाणी - म्हणी व वाक्प्रचार

(featured)




                पाण्याच्या संबंधामध्ये सर्व भारतीय भाषांमध्ये (लेखी आणि बोली) असंख्य म्हणी व वाक्प्रचार रूढ आहेत. प्रामुख्याने ते पाण्याचे निरनिराळे गुणधर्म(स्वभाव) स्पष्ट करणारे आहेत. यामध्ये काही संतवचनांचाही समावेश होतो. याची व्यापकता इतकी प्रचंड आहे की, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि भडोच पासून त्रिपुरा पर्यंत निरनिराळ्या साहित्यिकांनी, कवींनी, संतांनी पाण्यावर आपली मते भिन्न प्रसंगाच्या अनुषंगाने व्यक्त केली आहे. विनोबांनी म्हटले आहे की, गंगाजल म्हणजे केवळ दोन भाग हायड्रोजन आणि एक भाग प्राणवायू असे समजू नये, गंगेत स्नान करणाऱ्यांचे शरीर स्वच्छ होईल; परंतु शिवाच्या जटामुकुटामधून प्रवाहित झालेली कलिमलध्वंसिनी भागीरथी म्हणून स्नान करणाऱ्याचे शरीर तर स्वच्छ होईलच, पण मनही पवित्र आणि प्रसन्न होईल. यावरून पाणी हा नुसता भौतिक अथवा व्यापारीमूल्य असणारा पदार्थ नसून या उभयतापेक्षा त्याचे सांस्कृतिक मूल्य कित्येक पटीने मोठे आहे. म्हणून पाण्याच्या संबंधात शेकडो पर्यायी शब्द निरनिराळ्या समाजात रूढ झालेले दिसतात. तसेच त्यासंबंधात शेकडो वाक्प्रचार व म्हणी कालौघात समाजात रूढ होऊन ते समाजमनाचे दर्शन घडवितात. उदा. उदक सोडणे याचा अर्थ एखादी गोष्ट सोडून देणे किंवा अर्पण करणे. पाण्यात पडणे याचा अर्थ पवित्र होणे, एखाद्या कार्यातून यशस्वी पार पडणे असा होतो. पाणी लागणे याचा अर्थ एखाद्या गोष्टीची सवय लागणे. पाणी जोखणे म्हणजे एखाद्याच्या ताकदीचा अंदाज घेणे. पाण्यात पाहणे म्हणजे एखाद्याशी वैर करणे. पाणी पाजणे म्हणजे एखाद्याला शिक्षा करणे वगैरे. शरीराच्या एखाद्या विशिष्ट अवयवाचे वर्णन करताना सुद्धा पाणी हा शब्द वापरला जातो. उदा. पाणीदार डोळे असणे. एखाद्याची भाषा पाणचट असणे. डोळ्यात पाणी भरून येणे वगैरे. 
               पाणी आणि मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने याचेही नाते जोडण्यात आलेले दिसते. उदा. थेंबे थेंबे तळे साचे. तळे राखील तो पाणी चाखेल, लाथ मारील तिथे पाणी काढील, उथळ पाण्याला खळखळाट फार वगैरे. मराठी प्रमाणेच सर्व भारतीय भाषांमध्ये पाण्याविषयी अशाच प्रकारच्या म्हणी आणि वाक्प्रचार रूढ आहेत. त्याचा हा आढावा :
राजस्थानातील पाण्याची दुर्लभता ही त्यांच्या समाजात प्रचलित असणाऱ्या म्हणीवरून स्पष्ट होते. उदा. 
खून, सरप अर मांदगी, तव हाथी किरतार I 
मारण-मारग मोकळा, मेह बिना मत मार II 
अर्थ : मला खून झाल्याने, साप चावल्याने किंवा हत्तीने तुडविल्याने किंवा एखादं दुर्धर रोग झाल्याने मरण आल्यास चालेल; परंतु पाण्याने त्रस्त होऊन मला मरण येऊ नये.   
पाणी तौ बैवतौ ई चोखौ लागै I 
अर्थ : वाहते पाणी चांगले असते. कुणीही पाण्याच्या वहनाला विनाकारण प्रतिरोध करू नये.
पाणी मछिया माखन कद आवे II 
म्हणजे पाणी घुसळून लोणी येणार नाही. 
पाणी रौ देवाळ ई नि रहचौ I 
एखाद्याला मरणासन्न अवस्थेमध्ये पाणी पाजण्याच्या संदर्भात ही म्हण वापरली जाते. त्याला पाणी देणे असे म्हणतात. या वेळेस सर्व संबंधित मरणासन्न व्यक्तीच्या तोंडामध्ये गंगाजल टाकतात.
पाणी माथे भाटा तीरही I 
पाण्यामाध्ये दगड सुद्धा तरंगतात, म्हणजे एखादी प्रभावशाली व्यक्ती सर्व समाजाला अशक्यप्राय कोटीतील काम करण्यास प्रवृत्त करते. रामच्या जलसेतूची या ठिकाणी संकल्पना आहे.
पाणी मे मीन पियासी, सुन सुन आवे हसी I 
पाण्यामध्ये मासा तहानलेला असतो असे जेव्हा काही लोक समजतात तेव्हा आश्चर्य वाटते. 

काही उत्तर भारतीय म्हणी :
नियरे मंडल लम्बा पाणी, लम्बा मंडल नियरे पाणी II 
या म्हणीतून अवधी भाषेत चंद्राच्या खळ्यावरून पर्जन्याचे भाकीत करण्यात आले. चंद्राचे खळे जर चंद्राला लागून असेल तर लवकरच पाउस पडण्याची शक्यता आहे आणि जर खळे दूर असेल तर पर्जन्य लांबण्याची शक्यता आहे. 
राम मा बोलै कागला दिन मा बोलै स्यार 
या होए इरबदरी या फिर देश उजार I 
अर्थ : रात्री कावळ्याचे ओरडणे आणि दिवसा कोळ्याचे ओरडणे अशा स्थितीमध्ये एकतर भरपूर पर्जन्य होईल अथवा मोठ्या दुष्काळाची शक्यता नाकारता येत नाही.
चींटी ले अण्णा चली चिडियाॅ नहाये धूर 
शादी कहे तो भड्डरी बरखा हे भरपूर I 
अर्थ : या ठिकाणी भड्डरी हे भाडळीला उद्देशून वापरलेले संबोधन आहे. यावरून सहदेव-भाडळीचा प्रसार किती दूरवर झाला होता हे लक्षात येते. समजा मुंगी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अंडे घेऊन जात असेल आणि चिमण्या धुळीमध्ये अंघोळ करीत असतील तर निश्चित समजावे की पाऊस मोठ्या प्रमाणात येणार आहे. 
उतरे जेठ जौ बोलै दादूर, कहे भड्डरी बरसे बादल I 
अर्थ : जेष्ठ महिन्याच्या अखेरीस जर बेडूक जोरात ओरडायला लागले तर भाडळी म्हणते की, निश्चित पाऊस येणार.
(नया ज्ञानोदय जलविशेषांक, बिन पाणी सब सून, दिल्ली, २०१४)
आपल्याकडेही अशाच प्रकारची पर्जन्याच्या भाकिता विषयीच्या म्हणी समाजमनात घर करून आहेत. उदा.
पाऊस पडतो मृग आधी रोहिणीचा, पाळणा हलतो भावा आधी बहिणीचा I
पडतील मधा तर ढगाकडे बघा, पडतील उत्तर तर भात मिळे पितरा I 
पडतील आर्द्रा तर भरतीय गर्दडा(नदी-नाले वगैरे) I 
पडतील स्वाती तर पिकतील मोती I 
अशा प्रकारच्या लोकसमजुती भारतभर पसरलेल्या आढळतात. म्हणजे भारताचे सर्वसामान्य जनजीवन हे पर्जन्याच्या निश्चित वेळेवर आणि भरपूर येण्यावर अवलंबून असते. या अनुभवजन्य ठोकताळ्यातून भावी पिढीसाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 



(यापूर्वी मी बऱ्याच वेळा माझे गुरु डॉ रा श्री मोरवंचीकर यांचा जलपुरुष म्हणून केलेला आहे. तसेच त्यांच्या नावा आधी असलेल्या बिरुदांमध्ये 'जलपुरुष' हे बिरूद कायमच असते. सोबतच त्यांचे जल या विषयावरील संशोधन, अभ्यास या बद्दलही उल्लेख केलेला आहे. त्यांचा जल संस्कृती वरील एक एकमेवाद्वितीय ग्रंथ म्हणजे "भारतीय जल संस्कृती - स्वरूप आणि व्याप्ती". या ग्रंथाचा उल्लेख पंचम वेद म्हणजेच पाचवा वेद असाही केला जातो. याच ग्रंथातील हा एक लेख. आपण सर्व वाचकांना अगदी मनापासून आवडेल, एव्हढेच नव्हे तर त्यातून बऱ्याच गोष्टी आकळतील. त्यातील शब्द न शब्द आपणास एक उर्जा देईल, विचार करण्यास प्रवृत्त करेल. अगदी आत पर्यंत पोहोचेल आणि एक प्रकारची स्वर्गीय तृप्ती देईल.)

©️®️डॉ रा श्री मोरवंचीकर 
(भारतीय जल संस्कृती
  स्वरूप आणि व्याप्ती)


Comments

  1. आर्किटेक्ट श्रीकांत भाटेJune 05, 2026 11:19 am

    खूपच छान माहिती.

    ReplyDelete
  2. All in one…..water
    Nicely scripted all water related information

    ReplyDelete
  3. कोकिळा ढाकेJune 05, 2026 2:20 pm

    पाण्याबद्दल मराठीच नव्हे तर इतर भाषांतील म्हणी , वाक्प्रचार असलेला आपला लेख आवडला .

    ReplyDelete
  4. गुलाबराव पाथरकरJune 05, 2026 2:22 pm

    अतीशय उद्बोधक आणि उपयुक्त माहीती आहे , धन्यवाद .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

थोडं (खूप सारं😉😆) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)

थोडं (खूप सारं) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)                                                          घरात सगळेच खाण्याचे शौकीन, मुख्य म्हणजे आमचे बाबा सुद्धा! त्यामुळे सारखं काही ना काही करणं आणि खाणं अखंडपणे चालूच असे. खाण्याच्या बाबतीत तर सगळ्यांचा भरपूर उत्साह होताच, पण करणाऱ्यांचा (सगळ्या मम्मी लोकांचा) सुद्धा उत्साह तेव्हढाच किंवा काकणभर जरा जास्तच मी तर म्हणेन. सगळं अगदी उत्साहाने करत. त्यांच्या या उत्साहाला आणि मेहनतीला तर कायमच आणि वारंवार सलाम करावासा वाटतो. कारण कुठलीही गोष्ट करायची असो, कधीही थोडी थोडकी करून भागतच नसे. त्यामुळे खूप बांधीलकी आणि वचनबद्धता असणे आवश्यक असे. बरं त्यांनी कुठलीही गोष्ट करायची म्हणून केली असे होत नसे . सगळं अगदी साग्रसंगीतच, योग्य आणि व्यवस्थितच करत असतं. जणू कंटाळा, थकवा असले शब्दच त्यांना माहीती नव्हते.  बरं घरातील सगळेच, सगळ्याच  म्हणजे गोड, तिखट, मसालेदार, चटपटीत, आंबटगोड अशा ...