Skip to main content

पोटभर मैत्री, पोटभर जीवनानंद! (काही अनुभवलेलं...)

 पोटभर मैत्री, पोटभर जीवनानंद! 
(काही अनुभवलेलं...)


रागी रोटी 

(टीप - महाराष्ट्रेतर भागातील मराठी भाषिकांसाठी एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. मला मात्र या बद्दल शेवटच्या दिवशी सकाळी या बद्दल माहिती मिळाली. आयोजकांना सांगितले आजच्या आज अजिबातच शक्य नाही. त्या म्हणाल्या प्रयत्न तर करा. परंतु मला मात्र खात्री होती, की हे काही शक्य नाही, विचार सोडून द्यावा. तथापि थोडा वेळाने मला वाटले, मला या विषयावर मला बऱ्याच दिवसापासून लिहायचे होते. तथापि मुहूर्त लागत नव्हता. त्यामुळे या संधीचे सोने करावे. मग काय बाकी सगळी कामं बाजूला ठेवली आणि हे काम हातात  घेतले. लिहून पूर्ण झाल्यावरच उठले. तोच निबंध आज आनंदी पावसाच्या वाचकांसाठी! ऐन वेळेवर लिहिण्याचा पुष्कळ आनंद मिळाला, परंतु एका बाजूला वाटले निवांत लिहायला मिळाले असते तर अजून छान झाले असते. असो. आता तुम्ही वाचकाच ठरवा आणि आपल्या अभिप्रायातून सांगा लेखन कसे वाटले.)


किती गुणगान I करावे मैत्रीचे I
नाते हे खात्रीचे I फक्त एक II
मैत्रीमध्ये नाही I सान थोर काही I
सदा सम राही I मित्रवत II 
जगामध्ये आहे I स्वार्थी नाते सारे I
फक्त मित्र खरे I आहे येथे II
- संत तुकाराम महाराज 

               आपली म्हणजे भारतीय संत परंपरा फार थोर. सर्व संतांनी कितीतरी अभंग रचले. या अभंगातून सर्व विषय हाताळले गेले. मैत्री तर सर्वांच्या आणि प्रत्येकाच्या जीवनातील अतिशय महत्वाचा भाग. अगदी आबालवृद्ध, श्रीमंत-गरीब, शिक्षित-अशिक्षित, पुरुष-महिला, आस्तिक-नास्तिक, मितभाषी-बोलका, आनंदी-दुखीः अगदी प्रत्येकाला एक तरी मित्र असतोच. मानवी जीवनातील मैत्रीचे महत्व आणि स्थान सर्व परिचयाचे आहे. संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या केवळ एका अभंगातून हे सारे भाव विशद केलेले आहे.
               परप्रांतात राहण्याचे अनेक सकारात्मक आणि नकारात्मक मुद्दे असतात. मला नेहमीच सकारात्मकता आवडते, दिसते, अनुभवास येते आणि भावते सुद्धा. आता हा परप्रांत म्हणजे सुद्धा मोठे शहर, महानगर असेल तर आणिच आगळे अनुभव. भरपूर ओळखी होतात, मैत्री होते, मित्र-मैत्रिणी मिळतात. तथापि बऱ्याच कारणांनी ह्या सगळ्यांची भेट म्हणाव्या तशा लवकर लवकर होत नाहीत. घर बदलते, नौकारीचे ठिकाण बदलते, मुलांच्या शाळा बदलतात. या सगळ्या कारणांनी भेटण्यासाठीचे अंतर वाढते आणि मोठ्या शहरातील रहदारी बद्दल न बोललेलेच बरे. मग होते काय, आपल्या आजूबाजूला असलेल्या इतर भाषिक व्यक्तींशी आपले आदान-प्रदान सुरु होते आणि आपल्याशी मिळत्या-जुळत्या लोकांशी आपली मैत्री होते. अगदी वय, भाषा, शिक्षण, काम सर्व पातळीवर भिन्नता असली तरी आपण एकमेकांसाठी हवे तेव्हा उपलब्ध असतो. मैत्रीचा उच्चांक.
               माझेही तसेच झाले. घरून काम, त्यामुळे सहकारी वगैरेचा प्रश्नच नाही. सगळ्या मैत्रिणी माझ्याच शहरात, लांबच्या अंतरावर स्थलांतरित झाल्या. त्यामुळे भेटीगाठींचे प्रमाण हळूहळू करत फार कमी झाले. तथापि माझी एक आवड म्हणजे चालणे. आमच्या महानगराची खासियत अशी की, या महानगराच्या सगळ्या भागात, अगदी थोड्या-थोड्या अंतरावर अनेक उद्याने आहेत, अगदी सुस्थितीत. म्हणजे त्यात छान फुलं-झाडे आहेत, बसायला मुबलक संख्येने बाक आहेत, लहान मुलांना खेळायला अनेक साधने आहेत, व्यायामासाठी सुद्धा साधने आहेत आणि मुख्य म्हणजे चालणाऱ्या साठी स्वच्छ, समतल, बऱ्याच लोकांना सहजच चालता येईल असा चालण्यासाठीचा मार्ग आहे. चालण्यासाठीचे नियम आहेत आणि ते नियम सर्वजण काटेकोर पाळतात. मग मी सुद्धा या उद्यानांमध्ये जाते चालायला, सकाळ-संध्याकाळ.  
               या चालण्यामुळे माझ्यासारखे नियमित येणारे दररोज भेटतात. हळूहळू नमस्कार, थोडे फार बोलणे, असे करत छान ओळख होत गेली. या ओळखीतून बऱ्याच जणींशी मैत्री झाली. दोन-तीन उद्यानात जाते, प्रत्येक उद्यानात निरनिराळ्या मैत्रिणी, विविध भाषिक आणि वयोमर्यादा तर विचारायलाच नको. अगदी आबालवृद्ध! त्यातही मला फुले  वेचण्याचा फार नाद. हल्ली लोकांना विचित्र वाटते, खाली पडलेली फुले उचलणारी मी दिसली की. काही लोक त्याबद्दल विचारतात, काय करते या फुलांचे? काही आजार आहे का? त्यावर उपचार म्हणून नेतेस का? वगैरे. 
असाच एकदा पारिजातकाच्या फुलांचा सडा पडला होता आणि मी ती फुलं वेचत होती. एक महिला माझ्याजवळ येऊन माझ्याशी बोलू लागल्या, ती फुलं आणि वेचण्याची कारणे विचारू लागल्या. मी सांगितले, या फुलांचा सुवास अतिशय सुंदर असतो, मला खूप आवडतो. घरी जाऊन, पाण्यात ठेवते, दोन दिवस टिकतात आणि संपूर्ण घर त्या सुवासाने भरून जाते. त्यांना अतिशय आनंद झाला हे सगळे ऐकून. मग छान मैत्रीच झाली आमची.
               वय, शिक्षण, भाषा, सांपत्तिक स्थिती, दिसणे, असणे, आवडी-निवडी सारेच भिन्न! त्या माझ्या पेक्षा मोठ्या वयाने, अनुभवाने मोठ्या. मुळच्या या महानगरातीलाच रहिवासी, त्यामुळे सांपत्तिक दृष्ट्या सुद्धा खूपच वरचढ. तथापि या कुठल्याच गोष्टी आमच्या मैत्री आड आल्या नाहीत. एक सुंदर मैत्री! त्या अर्थातच दक्षिण भारतीय. आम्ही दोघीही खादाडखाऊ! दोघीही काय-काय बनवत असतो. एकमेकींना डबे भरून देत असतो. हल्ली माझ्या अभ्यासामुळे मला काही करणे होत नाही. तथापि त्या सतत काही न काही करत असतात.  अगदी सकाळच्या न्याहारी पासून ते खास पदार्थापर्यंत. तयार झाला पदार्थ की गरम गरम पाठवतात, लगेचच! डनझो, उबर ची कृपा! पूर्वी काही द्यायचे असले तर भेटावे लागे किंवा सकाळ-संध्याकाळ चालण्याच्या वेळेची वाट बघावी लागत नाही. आता तसे नाही. झाला पदार्थ तयार की लगेच केला डनझो! मग मी त्या गरम गरम पदार्थावर मस्त ताव मारते. पोटभर!
               त्यात मला सगळे दक्षिण भारतीय पदार्थ अतिप्रिय. सांबार तर जीव की प्राण. त्यांच्या पद्धतीचा उपमा, अवलक्की, पुलीओगरे वगैरे सारखे भाताचे अनेक प्रकार, ऊबट्टू /हुळगे , इडली, अनेक प्रकारेचे डोसे, रागी रोटी, अख्खी रोटी, गोड पोंगल, तिखट पोंगल,गोड कडबू , तिखट कडबू , मारुतीच्या शेपटा सारखी लांबतच जाणारी यादी आहे ही. अगदी पोटभर! माझी तब्ब्येत बरी नाही? मग या दररोज सकाळी काहीतरी करणार आणि गरमा-गरम माझ्याकडे पोहोचते करणार. बऱ्याच वेळा सकाळी न्याहारी तयार झाली की त्या येतात चालायला. येतांना दोघींसाठी न्याहारीचे पदार्थ डब्यांतून भरून आणतात. मग आमचे छान वन-भोजन होते. वन-भोजनाचा खऱ्या अर्थाने आणि शब्दशः पोटभर आनंद! इतकेच नाही तर कुठे बाहेर जायचे असले की, कामा आधी आमचे तिकडे जाऊन काय खायचे यात जास्त लक्ष! कधी चालायलाच लांबच्या उद्यानात जातो, तिकडे काय खासियत मिळते ते बघून ठेवतो. चालून झाले की तिकडे जाऊन आडवा हात! पोटभर!
               एकमेकींच्या सुख-दुखाःची देवाण घेवाण तर या मैत्रीचा अविभाज्य भाग आहेच. भरपूर बोलणे, गप्पा किती, तर त्याही अगदी पोटभर! या गप्पांच्या ओघात कितीतरी विषय येतात. एकमेकींच्या नातेवाईक, मित्र मंडळींना प्रत्यक्ष न भेटताही आमच्या आभासी भेटी झालेल्या आहेत आणि होत असतात. विषय किती, त्यामुळे गप्पा आणि बोलणेही किती होणार तर हेही अगदी पोटभर! बर या बोलण्यात विनोदाचा भाग सुद्धा असतोच. हास्य आम्हा दोघींनाही प्रिय. एकदा हसायला सुरुवात झाली की थांबणे अवघड. त्यामुळे अगदी मनापासून, खळखळून हसतो. किती तर पोटभर!
               एक महत्वाचा दोघींचाही आवडीचा भाग म्हणजे प्रवास. दोघीही निरनिराळ्या कारणांनी भरपूर प्रवास करतो. त्या भरपूर सहलींना जातात, तर मी अनेक अभ्यास सहलीला जात असते. माझ्या अभ्यासासाठी आवश्यक भाग. परंतु आम्ही दोघी सोबत बसून बऱ्याच सहलींच्या योजना आखत असतो. काही अर्ध्या दिवसाच्या, काही एक दिवसीय, काही आठवडा भराच्या, काही भारतातील विविध भागांच्या तर काही परदेशी सहली एक ना अनेक. तथापि आज पर्यंत आमच्या फक्त अर्ध्या दिवसाच्या सहलीच पूर्णत्वास गेलेल्या आहेत. तथापि आमचे योजना आखणे अखंडपणे सुरूच असते. एका क्षणी आमच्या दोघींच्याही ध्यान्यात येते, अरेच्च्या आपण फक्त योजना आखतो, पण एकदाही कुठेच गेलेलो नाही. मग स्वतःवरच हसायला सुरुवात. हसणे किती तर पोटभर!
               मी लेखन करते, चित्रं काढते, छायाचित्रीकरण करते, शोध निबंध लिहिते, ते विविध परिषदांमध्ये सादर करते, अनेक गोष्टी नियमित करते आणि आता पी एच डी करतेय. त्यांना या सगळ्या आणि प्रत्येक गोष्टीचे कौतुक, सतत माझ्या या एकन् एक गोष्टीचे कौतुक त्या करत असतात. आणि कौतुकातुनच पुढील कार्य करण्याची उर्जा मिळते, प्रोत्साहन मिळते! कौतुक सुद्धा पोटभर! त्या वयाने माझ्यापेक्षा मोठ्या आहेत याचा वर उल्लेख आलेलाच आहे. प्रत्येकाला आयुष्यात बऱ्याच लहान-मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. आयुष्यभर गृहिणी म्हणून आयुष्य जगलेल्या महिलांना तर वय झाले की सारेच कठीण वाटू लागते, त्यातही मध्येच जोडीदार अचानकपणे सोडून गेला तर अजूनच अवघड. अशा महिलांना आजच्या युगात काय काय अडचणी येऊ शकतात, कसल्या कसल्या परिस्थितीला सामोरे जावे लागते याची बऱ्यापैकी सर्वांना कल्पना असतेच. तथापि त्यांना आपल्या कल्पनेच्या पलीकडे असलेल्या असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तथापि त्या हार न मानता सर्व आघाड्यांवर अतिशय खंबीरपणे, विचारीपणे, व्यावहारिकपणे तोंड देत आहेत. या सगळ्याचे मलाच काय कुणालाही कौतुक वाटेलच. मीही त्यांचे याबद्दल भरभरून कौतुक करते. पोटभर!
               पोटभर सुग्रास अन्न, पोटभर गप्पा, पोटभर सुख-दुखाःची देवाणघेवाण, पोटभर हसणे, पोटभर चालणे, पोटभर योजना आखणे, पोटभर भटकंती, पोटभर कौतुक! या साऱ्याची गोळाबेरीज काय होते, तर पोटभर आनंद! असा पोटभर आनंद असेल तर, संपूर्ण जीवन आनंदी होऊन जाते. म्हणजेच पोटभर जीवनानंद! ज्यासाठी सारेच धडपड करत असतात. आमच्यासाठी मात्र ही आमची पोटभर मैत्री म्हणजेच पोटभर जीवानंद! आनंदाचे सारे मार्ग सुरवातीपासून शेवट पर्यंत पोटापासून सुरु होतात, पोटातूनच जातात आणि पोटापर्यंत येतात. आनंदी पोट, निरोगी पोट म्हणजेच आनंदी जीवन! पोटभर आनंदी जीवन!
पोट आनंदी 
तर आपण आनंदी!
निरोगी आयुष्याचा मंत्र म्हणून ही म्हण सर्व ज्ञात आहेच. परंतु ही म्हण फक्त शारीरिक स्वस्थ्यालाच लागू पडत नाही, तर मानसिक निरोगी स्वास्थ्याबद्दल तितकीच खरी आहे. आमच्यासाठी हाच मैत्री-मंत्र सुद्धा आहे!

©️®️आनंदी पाऊस 
(काही अनुभवलेलं...)
१४/२/२०२६ 


Cucumber avalakki 
काकडी पोहे 

उपमा 

शेवई उपमा 

वांगी उपमा 



Vegetable upma 
भाज्या उपमा 

भेळ 

इडली सांबार 

रागी रोटी 

त्या असे निरनिराळ्या प्रकारचे सांबार देतात 
मी गरमागरम भात लावते 
अणि त्यावर मस्त घरी केलेल्या 
रवाळ तुपाची धार! 
स्वर्ग सुख! 

असे अजून कितीतरी पदार्थ देतात,
खास कर्नाटकी, कानडी पदार्थ.
परंतु तो पदार्थ दिसला की खायची इतकी घाई होते 
की 
त्याचे प्रकाशचित्र काढायचे राहून जाते...

II अन्नदाता सुखी भव II 




Comments

  1. रवी भालेरावMarch 27, 2026 8:36 am

    👌🏽👌🏽👌🏽💐🙏🏽
    काकडी पोह्याची कृती पाठवता?😌

    ReplyDelete
  2. Khup ch chhan ashi maitri saglyana labho potbhar🙏🏻🌹

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...