एक मायाळू अभ्यासक (काही अनुभवलेलं...) निमित्त, धरोहर यात्रा. भोपाळ शहरातील छोट्याश्या हाॅटेल मधील पिटुकली खोली. पहाटे ४-५ दरम्यानची वेळ. खोलीत मी एकटीच झोपलेली. ठरल्या प्रमाणे, दोन विद्यार्थिनी आल्या. एक माझ्या बाजूला झोपणार अणि एक जमिनीवर घातलेल्या गादीवर झोपणार असे ठरलेले. तथापि आलेल्या दोघींनाही जमिनीवर घातलेल्या गादीवरच झोपायचे होते. त्यांचा झोपण्याचा अजिबातच मूड नव्हता, त्यांना गप्पा मारायच्या होत्या. त्यांना थोडे समजावले, पुढचा अख्खा दिवस खूप थकवणारा असणार आहे, तेव्हा आता जे काय दोन-तीन तास मिळाले आहेत, तेव्हढा वेळ झोपून घ्या, विश्रांती घ्या. झोपल्या मग. काही मिनिटातच हळूच दार वाजले. दरवाजा उघडला, एक महिला आत आल्या. त्या दोघींना अगदी हळू आवाजात सांगितले, ही आपली खोली नाही. झोपलेल्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या आणि बाहेर या. त्यांनी मला नीटसे पाहिलेही नसावे, ओळखणे तर फारच दूर. कारण या आधी आम्ही कधी भेटलोच नव्हतो. मी मात्र त्याक्षण...