🪻🪻🪻 नाना(धा.श्वशुर)🪻🪻🪻
(व्यक्ती विशेष)
🌿🪻त्यांचे नाव अरुण.
अरुण म्हणजे सूर्य देवाच्या रथाचा सारथी!
सूर्य देवाला योग्य वेळेला, योग्य स्थानी नेणारा, पोहचविणारा,
त्यांचा सारथी अरुण!
नाना, तुम्हा उभयतांना,
आजच्या दिवसाच्या
खूप खूप आनंदी शुभेच्छा!🪻🌿
आनंदी पावसात मी आज पर्यंत बरेच लेख प्रकशित केले. यातील बऱ्याच लेखांवर, अभिप्राया दाखल काही लघु-लेख वाचायला मिळतात. यातील बरेच अभिप्राय नानांचे आहे. नवीन लेख प्रकाशित झाला की, तो वाचून त्यावर अगदी सविस्तर अभिप्राय त्यांनी दिलेले आहेत. संपूर्ण अभिप्राय देवनागरी लिपीत आणि त्यांनी स्वतः हुशार-भ्रमणध्वनी वर टंकीत केलेले आहेत. साधारणपणे एक ओळीचा निरोप जरी टंकीत करायचा असला तरी कंटाळा येतो बऱ्याच लोकांना. मग अशा वेळी ही मंडळी सरळ थेट संपर्क साधून बोलणे पसंत करतात. तूर्तास इथेच त्याचे काही मोजकेच अभिप्राय पुनर्प्रकाशित करत आहे. त्यांचे सगळेच अभिप्राय वाचनीय आहेत. तथापि सगळेच इथे प्रकाशित करणे शक्य नाहीत. या सगळ्यांतून त्याचे लेखन कौशल्यही प्रतीत होतेच. आनंदी पावसामुळे, त्यांना स्वतःलाच, त्यांच्या या लेखन-कौशल्याची जाणीव झाली आणि त्यातून त्यांना भरपूर आनंदही मिळाला! हे त्यांच्या अभिप्रायातूनच कळते. सर्वत्र आनंद पसरविणे, आनंदी पावसाचा आद्य उद्देश!
कोजागिरी-१
'आनंदी पाऊस' वाचून चिंब भिजून निघालो! चला मास्तर आणि इंजिनिअर असलेल्या पाटील घराण्यात पहिलीच लेखिका उदयास आली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे! संसारात गुरफटून लेखन करणं काही सोपी गोष्ट नाही. वाचन आणि अनुभव जेवढं जास्त तितकं लिखाण सशक्त होतं. लिखाण करून त्याला ब्लॉगवर प्रसिद्ध करणं ही मोठ्या धाडसाची बाब आहे. लिखाणाचं सातत्य टिकून राहो हीच आमच्याकडून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
१२ सप्टेंबर २०१९
🌿🪻🌿
आनंदी सोहळा-२
सराईत अशा लेखनाची कुठलीही पार्श्वभूमी नसतांना तू आनंदी पाऊस ही मालिका सातत्याने दोन वर्ष अगदी नियमित लिहीत आहेस. यावरूनच तुझी प्रतिभा आणि चिकाटी दिसून येते. सुंदर लेखनाची इच्छा पूर्ण झाली असतांना तुला किती आनंद झाला असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. निलेशने स्टेटस वर लिंक पाठविल्यामुळे 'आनंदी पावसात' चिंब भिजण्याचा आम्ही मनमुराद आनंद अनुभवत आहोत. लहानपणापासूनचे बारीक सारीक प्रसंग ही इतक्या वर्षानंतर आठवणे ही एक प्रकारे तुला प्राप्त झालेली दैवी देणगीच आहे. तिचा उपयोग तू या निमित्ताने केलास आणि त्यात आम्हालाही सहभागी करून घेतलेस याबद्दल मनापासून धन्यवाद! आपले लेखन म्हणजे स्वतःचे जणू अपत्यच असते. त्यावर आपले प्रेम असणे स्वाभाविक आहे. पण त्यावरचे वाचकांचे अभिप्राय किती आणि कुणाकुणाचे आहेत यावर लेखनाचा दर्जा ठरत असतो. या कसोटीवरही तुझे लेखन खरे उतरले आहे हे विशेष! असे वैशिट्य म्हणजे काही योगायोग नाही. ते प्राप्त करून घ्यायलाही वाङ्मयाचा व्यासंग, अनुभव संपन्नता, सूक्ष्म निरीक्षण, धारदार स्मरणशक्ती आणि जिद्द यांची आवश्यकता असते. हे गुण तुझ्या ठिकाणी वास करत आहेत. म्हणूनच भाषा ओघवती आणि लिखाणात जिवंतपणा आला आहे. आनंदी पाऊस सरल्यावरही अशीच किंबहुना याहूनही सरस अशी वाङ्मय सेवा तुझ्या हातून घडत राहो, हीच सदिच्छा! पुनःश्च अभिनंदन!!!
२५ ऑगस्ट २०२१
२६ एप्रिल २०२३
🌿🪻🌿
माऊली : जीवन घटनाक्रम-५(समाधी पर्व) (featured )
आळंदीला परतल्यावर त्याकाळी या भावंडांचे जसे श्रेष्ठत्व समजणारे लोक होते, तसेच त्यांना त्रास देणारेही होतेच, हे युगानुयुगे चालू आहे, आजचीही परिस्थिती काही त्यापेक्षा वेगळी नाही आणि हे पुढेही चालूच राहणार.
परंतु विसोबा खेचर यांनी कुंभाराला मुक्ताईस मातीचे खापरही देण्यास मनाई केली, त्यांचेही हृदय परिवर्तन केले हा खरंच मोठा चमत्कार आहे. पुढे हेच विसोबा खेचर संतश्रेष्ठ नामदेवांचेही गुरु झाले आणि त्यांना विश्वव्यापी अशा निर्गुण निराकार परमेश्वराची ही प्रचिती आणून दिली हा भाग वेगळा.
तसेच पाठीशी चौदाशे वर्षे तपश्चर्येचे बळ असलेले चांगदेव महाराजही ज्ञानदेवांना कसे शरण गेले वगैरे सर्व इतिहास प्रस्तुत लेखात खूपच सुंदर पद्धतीने वाचकांसमोर मांडण्याचा तू प्रयत्न केला आहेस, त्याबद्दल तुझे पुनश्च अभिनंदन.
आनंदी सोहळा-४
"आनंदी पाऊस" या मालिकेला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुझे प्रथम हार्दिक अभिनंदन! अगदी "घरातील गमतीजमती" पासून ते थेट ज्ञानेश्वर माऊलींच्या कर्तृत्वापर्यंत एवढ्या अल्पकाळात मारलेली भरारी खरंच प्रशंसनीय आहे. आनंदी पावसाच्या सरी नंतर लगेच किंवा सर ओसरल्यावर तिचाच परिणाम म्हणून केव्हातरी इंद्रधनुष्याकडे आम्ही दिलेल्या प्रतिक्रियांच्या निमित्ताने आमचे झालेले लिखाणही आम्हाला आनंददायी वाटते. असो, "आनंदी पावसा"च्या वर्धापन दिनानिमित्त तुला तुझे लिखाण अधिक सुंदर आणि सशक्त होत राहो हीच हार्दिक शुभेच्छा.
राम कृष्ण हरी🌹
२५ ऑगस्ट२०२३
🌿🪻🌿
🎵🎶संगीतमय रेखांकन-१ 🎶🎵
सौंदर्यदृष्टी ज्यांच्याकडे असते, त्यांना कशातही सौंदर्य दिसते. ज्यांना त्यात अभिरुची नाही त्यांना सुंदर वस्तूंमध्येही सौंदर्य दिसत नाही. साध्या ड्रेस घेण्याचं निमित्त ते काय, ड्रेस वरील चित्रित केलेली संगीत वाद्ये बघून तशा प्रकारची रेखाटने स्वतः तयार करायची, याला अर्थातच सौंदर्यदृष्टी हवीच, ती तुझ्याकडे आहे. कुठलीही कला जोपासायची म्हणजे त्यासाठी साधना आलीच. अशा साधनेचे बळही तुझ्याकडे आहे, म्हणून चित्रकलेतही तुझी उत्तम प्रगती होऊ शकते असे वाटते. असो, सर्व रेखाटने बघून खूप आनंद झाला.
३ सप्टेंबर २०२३
🌿🪻🌿
🌸🌼🌷बाप्पा मोरया-१ 🌷🌼🌸
"आनंदी पावसा"त भिजलेले गणेशजी मला खूपच विलोभनीय वाटतात. बॉंड पेपर, जेल पेन, पेपर कटिंग, रंगीत पेन्सिल, आयपॅड, अशा अभिनव आणि अनेकविध प्रकारांनी सजविलेल्या गणेशजींच्या चित्रमूर्त्या खरोखरच नाविन्यपूर्ण वाटतात.
आजकाल हजारोंनी देणग्या उपटून गणेशजींच्या उंच उंच मुर्त्या उभारण्याची अहमहमिका, त्यांच्या समीप केलेले बीभत्स कार्यक्रम, डीजेंचे कानठळ्या बसविणारे आवाज, डोळ्यांना अंधत्व आणणारी लेझर किरणांची आतिषबाजी या आणि अशाच प्रकारच्या गोष्टी पाहून बाप्पा प्रसन्न व्हायच्या ऐवजी अजूनही या तथाकथित भक्तांवर कसे रुष्ट होत नाहीत, याचेच आश्चर्य वाटते! अर्थात सर्वच ठिकाणी हा प्रकार असतो असे नाही, काही ठिकाणी सृजनात्मक कार्यक्रमही पाहायला मिळतात.
म्हणून या पार्श्वभूमीवर "आनंदी पावसा"तील आनंदी आणि प्रसन्न बाप्पांचे दर्शन घेऊन मन उल्हसित होते. अभिनंदन. राम कृष्ण हरि
३ ऑक्टोंबर २०२३
🌿🪻🌿
गाॅड्ज बिवटीफुल गीफ्ट
शारीरिक व्यंगापेक्षाही मतिमंद मुलांच्या पालकांचे दुःख काय असते हे फक्त त्यांच्या आई-वडिलांनाच माहीत असते. अशा मुलांना बोलते करणे, त्यांच्या बुद्धीला काही प्रमाणात का होईना जागृत करणे, हे पवित्र कार्य करण्याचे भाग्य तुला लाभले हीच मुळात तुला मिळालेली गॉड'ज गिफ्ट आहे. त्यांहूनही त्या मुलांत पडलेला सकारात्मक फरक पाहून त्यांच्या आई वडिलांना किती किती आनंद होत असेल याची कल्पनाही करवत नाही. असो, एका आगळावेगळ्या अनुभवाचे शब्दचित्र तू अगदी छान रेखाटले आहे. गुड लक!
माझे सखे-सोबती, किटक?!
मळलेल्या वाटांना फाटा देऊन, नेहमी नवीन वाटेने मार्गक्रमण करण्याचा तुझा आजपर्यंतचा प्रयत्न स्तुत्य राहिला आहे. आपल्यातील किडे! य:कश्चित किडे तरी काय, पण त्यातही तुला जे काव्य दिसले आणि त्यातून काही कलाकृती सादर केल्या त्या खरंच सुंदर आहेत.
काहींच्या मनातील किडे रागाच्या स्वरूपात, काहींच्या लोभाच्या, काहींच्या अपमान करण्याच्या, तर काहींच्या न केलेले उपकार बोलून दाखवण्याच्या स्वरूपात बाहेर परत असतात. एक ना अनेक, असे मानवी स्वभावातील बरेच किडे आपण समाजात, नातलगांत वावरत असताना पाहत असतो. परंतु तुझ्यातील किडा फक्त निर्भेळ आणि निरागस आनंद देणाऱ्या चित्ररूपात प्रकट झाला आहे, यावरून तुझ्या स्वभावाचीही पारख होते.
कमीत कमी रेषांमध्ये 'चतुर' रेखाटण्यालाही चातुर्य लागते. त्रिमिती सारखे दिसणारे कोळ्याचे जाळे, एरव्ही रंगीबेरंगी फुले दिसणारे चित्र, झूम केल्यावर त्यात दिसणारे ढाल किडे मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातात.
थोडक्यात काहीसे नकोसे वाटणारे किडे चित्ररूपाने तू हवेसे करून टाकले आहेत. लिखाण आणि चित्रेही खूप छान वठले आहेत. अभिनंदन!!
१६ डिसेंबर २०२३
🌿🪻🌿
मुखपृष्ठाविषयी - मौज दिवाळी अंक २०२३
तू पाठवलेले "मौज' या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ बघितले, पण त्यातील गूढ असे रेखाटन बघून त्या मुखपृष्ठातून चित्रकाराला काय संदेश द्यायचा आहे किंवा त्यात काय 'मौज'आहे, हे निदान मला तरी कळले नाही किंबहुना अशा चित्रांचे किंवा मॉडर्न आर्ट ज्याला म्हणतात त्याचे मला कधीही आकर्षण वाटले नाही, ही माझ्या मानसिकतेमधील उणीव मी सरळ मान्य करतो. तथापि हे मुखपृष्ठ अर्थपूर्ण असेलच यात शंका नाही. तसेच या मासिकातील चंद्रमोहन कुलकर्णी आणि डॉ. मोरवंचीकर यांचे लेखन ज्ञानवर्धक व विद्वत्तापूर्णच असेल, यातही शंका नाही.
लहानपणी मी "मनोहर" हे हिंदी मासिक मधून मधून चाळत असे. त्यातील व्यंगचित्रे मला फार आवडत. त्या सवयीमुळे पुढे प्रसिद्ध "आवाज" या दिवाळी अंकामधील मुखपृष्ठ आणि त्यातील विविधांगी व्यंगचित्र आणि लेख वाचायची सवय जडली. नंतर विनोदी लेख, विनोदी लेखक, विनोदी नाटके, यांच्या विषयी कुतुहल निर्माण झाले. त्यांतूनच आचार्य अत्र्यांचे जवळजवळ सर्व साहित्य मी वाचले आहे, हे मी आत्मश्लाघेचा दोष पत्करून सांगत आहे. पण तुझ्यासारखे लेखनकौशल्य अद्यापही मला जमले नाही.
असो, दिवाळी अंकाची मुखपृष्ठे, दिवाळी अंक आणि वाचन या सर्वांची गोडी तुला लहानपणापासून कशी लागली याचे तू सविस्तर आणि सुंदर असे वर्णन केले आहेस. कुठल्याही जड, चेतन विषयाबद्दल तू जे लिखाण करतेस ते खरंच कौतुकास्पद आहे. एवढे सर्व स्पर्शी लेखन करायचे तर त्यामागे अनुभव, भरपूर वाचन, व्यासंग, चंद्रमोहन कुलकर्णी, व. पु. होले आणि डॉ. मोरवंचीकर या प्रभूतींसारखे मार्गदर्शन इत्यादी सर्व साधना पाठीशी हवी याची मला जाणीव आहे. असेच सातत्य तुझे पुढेही टिकून राहो हीच शुभेच्छा.
९ जानेवारी २०२४
🌿🪻🌿
🚩राम! मला भेटलेला!-२🚩
"आज अयोध्या सजली सजली", पन्नास वर्षांपूर्वीच हे मराठी गाणं २२ जानेवारी २०२४ या दिवशी प्रत्यक्षात अयोध्येत अवतरलं आणि संपूर्ण भारतवर्ष भक्तीपूर्ण आनंदात न्हाऊन निघालं! त्यानिमित्ताने तू अगदी अश्मयुगापासून ते आज तगापर्यंतचा इतिहास वाचायला दिलास, त्यामुळे खूपच नवीन माहिती मिळाली. बाबरी मस्जिद पाडली आणि आधी तिथे अस्तित्वात असलेल्या राम मंदिराची पुन्हा भव्य उभारणी केली. त्याआधी कोर्टाच्या सुनावण्या झाल्या वगैरे जुजबी माहिती मला होती. परंतु या घटनांमध्ये इतका "अथांग" इतिहास असेल याची मुळीच कल्पना नव्हती.
धरोहर यात्रेत सहभागी झाल्यामुळे वाकणकर, देगलूरकर, के.के.मोहम्मद वगैरे प्रभृतींचा तुला सहवास मिळाला ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. भारतातील हिंदूंची आपल्या धर्माविषयी जी अनास्था आढळून येते तिथे के.के.मोहम्मद सारख्या अन्य धर्मीय विद्वानाने, अयोध्या मंदिर म्हणजे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे हे सत्य उघडपणे सांगणे म्हणजे
आश्चर्यच म्हणायचे! विद्वत्ता, विनय आणि निष्पक्षपणे आपले मत प्रदर्शित करण्याचे साहस
यांमुळे त्यांच्यावरील श्रद्धा आणि विश्वास द्विगुणित होतो आणि मोहम्मद नावाचा "राम" आपल्याला भेटला असे तुझे म्हणणे किती सार्थ आहे, याची प्रचिती येते.
वरील सर्व पुरातत्त्व- शास्त्रज्ञ, इतिहासकार, राजकारणी, समाजकारणी, ज्यांना प्रत्यक्ष रामलल्लाची मूर्ती घडविण्याचे भाग्य लाभले ते अरुण योगीराज तसेच या पवित्र कार्याकरिता ज्यांना ज्यांना आपले बलिदानही करावे लागले अशा सर्व ज्ञात व अज्ञात व्यक्तींना मी मनोमन वंदन करतो.
"आपदामपहर्तारं दातारं सर्व संपदाम् लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् "
जय जय रघुवीर समर्थ
६ फेब्रुवारी २०२४
🌿🪻🌿
ताम्हण .........जारुल
कुणाला गुलाब, कुणाला मोगरा, कुणाला कुंदकळ्या, तर कुणाला जास्वंदीची फुले आवडतात. साहजिकच ज्याची त्याची आवड आहे ही. टवटवीत अशी लाल, गुलाबी, पिवळी, केशरी गुलाबाची फुले, मोहक असा सुवास असलेला मोगरा, गणपतीला वाहायलायला म्हणून आकर्षक अशी जास्वंदाची फुले लोकांना किंवा भक्तांना आवडली नाही तरच नवल!
परंतु तुम्ही काहीही म्हणा, मला बाकी आवडतात ती फक्त सदाफुलीची फुले. पांढरी किंवा गुलाबी बस. बिचाऱ्या फुलझाडांना ना सुपिक जमीन लागते, ना काही खतपाणी ना फारशी निगा. पावसाळा असो, हिवाळा असो, की उन्हाळा, सदाफुलीची झाडे आपल्या सीमित अश्या वैभवाने सतत हसत, डुलत असतात.
आपण हौसेने निरनिराळी गुलाबाची झाडे लावली तर शेजारीपाजारी आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची नजरच नव्हे तर हातही त्या फुलांपर्यंत पोहोचतात आणि ती फुले केव्हा गायब होतात याचे बिचाऱ्या मालकाच्या लक्षातही येत नाही. मोगऱ्याची फुले उन्हाळ्यातच पण झाडाला भरपूर येतात म्हणून तीही देवांना वाहण्याकरता केव्हा गायब होतील याचा नेम नसतो. चोरीचा पैसा पचायलाही हलका असतो, तशी चोरीची फुलंही अशा फुल-चोरांना धार्जिणी असतात. आमच्या कांपाऊंडमध्ये एक कुंदकळ्यांचे झाड आहे. हिवाळ्यात पानोपानी कळ्या बहरलेल्या असतात. शेजारच्या गल्लीतली आजी सकाळी सकाळी आम्ही उठायच्या आत येते आणि सर्व कळ्या गायब करून जाते, उरते फक्त झाड आणि हिरवीगार पाने! तिला कितीही सांगा, बोला काही फरक पडत नाही. देवाच्या निमित्ताने घेऊन जाते आणि तिकडे कळ्यांचे हार करून विकते असे आमच्या ऐकिवात आहे.
बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या शेजारच्या प्लॉटमध्ये असलेला भाडेकरूचा एक मुलगा सायकल शिकत होता. तो बहाद्दर त्याच्या सायकलीला शोभा म्हणून सरळ चार-पाच गुलाबाची फुले अगदी बिनधास्त घेऊन जायचा! भिडस्त स्वभावामुळे आमची बाकी शोभा व्हायची. आता आमचा परिसर जरा सुधारला आहे पण वयोमानाने आम्ही बिघडलो आहोत, म्हणून आम्ही ठरवलं आहे की झाडं लावायचीच तर फक्त सदाफुलीचीच! त्यानुसार आम्ही कृतीही केली आहे. या एकदा आमच्याकडे आणि बघा, सर्व दूर पांढरी आणि गुलाबी सदाफुलीची फुलेच फुले आपल्या दृष्टीस पडतील. तुम्हाला खूप खूप आनंदही वाटेल, तोडायची इच्छा जरी झाली तरी आणि आम्ही फुले घेऊन जा म्हटले तरी तुम्ही ती फुले येणार नाहीत. सदाफुलीची झाडे सर्व दूर लावून ठेवली असल्यामुळे आम्ही आता त्यांना अगदी नियमितपणे पाणी वगैरे घालतो आणि बिनधास्तपणे घरात वावरतो.
केंव्हा केंव्हा खिडकीतून बाहेर डोकावतो, तेव्हा उगीचच लोक आमचा बगीचा पाहून नाकं मुरडत असल्याचा भास होतो. आम्ही मात्र सदाफुली सारखे सतत हसत, डोलत दिवस काढतो. येताना मग आमचा बगीचा बघायला. अगदी जरूर या,पण फोन करून या म्हणजे आपल्या खातिरदारीत काही कमी पडणार नाही.
५ मे २०२४
🌿🪻🌿
!, अशी ही विराम चिन्हं;?
चित्ररूपातील विरामचिन्हे तू खरंच चैतन्यमय करून टाकली आहेस. विषय कुठलाही असो, त्यात झोकून देण्याची तुझी जी प्रवृत्ती आहे, ज्याला तू ध्यानधारणा म्हणतेस, ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. आता विरामचिन्हांचेच बघ ना. हा काही चित्ररूपात किंवा त्यांच्याविषयी भावना प्रकट करण्याचा विषय नाही, परंतु तोही विषय किती कलात्मक पद्धतीने आणि सहज रीतीने तू रेखाटला आहेस, यातच तुझी ध्यानधारणा सफल झाली, असे म्हणावे लागेल.
तसं म्हटलं तर मलाही लहानपणी व्याकरण हा विषय इतर मुलांप्रमाणे किचकटच वाटायचा. प्रथमा, द्वितीया, तृतीया इत्यादी.... त्यांचे प्रत्यय स,ला,ते,स,ला ना,ते .... वगैरे पाठ करून कंटाळा यायचा. अर्थात त्यावेळची शिक्षण पद्धतीही तशीच होती.
आता तुझ्या आनंदी पावसात हीच विरामचिन्हे न्हाऊन निघाली आहेत आणि त्यांना नवीन चैतन्य प्राप्त झाले आहे. खरंच ही चिन्हे जर नसती तर लिखाण आणि वाचन खूपच कंटाळवाणे झाले असते, तसेच अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागला नसता.
विरामचिन्हांचा भावनांशी संबंध जोडण्याचा तुझा जो प्रयत्न आहे, तो खूपच गमतीशीर आहे. स्वल्पविराम अथवा अर्धविराम प्रवासाला निघालेल्या व्यक्तीचे मधून मधून थांबायचे टप्पे दाखवितो, तर पूर्णविराम म्हणजे त्या व्यक्तीची मुक्कामाची जागा! पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी थोडी विश्रांती घ्या असे तो म्हणतो.
अवतरण चिन्ह म्हणजे तुमच्या जीवनातील अति महत्त्वाचे टप्पे तर प्रश्नचिन्ह म्हणजे जीवनातील समस्या.
मला आवडते ते उद्गारवाचक चिन्ह! दुःखाच्या प्रसंगी काढलेला "अरेरे" असो, आनंदाच्या वेळी निघालेला "अहाहा"असा शब्द असो, अति भव्य असे पाहताना सहाजिकच निघालेला "अबब" असो, एखाद्या रमणीच्या तोंडून निघालेला "अय्या" किंवा "इश्श्य" असो, आजकाल बर्याच ठिकाणी "ओह", "आऊच", "वाऊ" अशा शब्दांनी अतिक्रमण केले आहे, आपले हे उद्गारवाचक चिन्ह नेहमी आपल्या सेवेला तत्पर असते. त्याला भारतीय अथवा पाश्चात्य संस्कृतीशी काही देणे घेणे नाही. मदतीला येणार म्हणजे येणारच!
असो, पुनश्च एकदा तुझ्या कलात्मक सृजनशीलतेला अभिवादन. धन्यवाद
२५ मे २०२३
🌿🌿🪻🪻🌿🌿
🌦️🌥️🌞ll अनुसया-अरुणार्पणमस्तु ll🌞🌥️🌦️
©️आनंदी पाऊस
(व्यति विशेष)
२१ जून २०२४
वॉव! किती भारी आहे हा ब्लॉग. 👌👌
ReplyDeleteनाना म्हणजे महेंद्रचे वडिल ना? ते पण किती सुंदर लिखाण करायचे. त्यांच्या सगळ्याच प्रतिक्रिया वाचनीय आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया वाचून पुनःश्च एकदा तुझ्या आधीच लिहिलेल्या ब्लॉगज् चे स्मरण झाले व आपण त्याबद्दल काय विचार केला होता ते ही मनात आले.
एकूणच काय, चतुरस्त्र लिखाणाबद्दल पुन्हा पुन्हा तुझे अभिनंदन !!! 💐💐
लिहिती रहा....👍👍
दीपक चौधरी..
ReplyDeleteखुपच छान लेख...अप्रतिम.
खूप सुंदर🌹🌹
ReplyDeleteव्वा क्या बात है.. खरंच खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🎉
ReplyDelete👏👌👣
ReplyDeleteआनंदी पाउस मधील या नवीन सदराला शुभेच्छा.
ReplyDeleteनाना हे मला फार आवडले.
कदाचित हे नाना मुळशी जेठा महाविद्यालय तील प्रा. ऐ. पी. पाटील सर आहेत का?.
शब्द चित्र खूप सुंदर आहे.
धन्यवाद
Khupach chan lekh tai..👌👌
ReplyDeleteवर्षा खूप छान व्यक्तिमत्त्व रेखाटले आहेस. नाना, तुझे श्वसुर त्यांच्या बद्दल माहिती सांगितली ती वाचून एक आदरपूर्वक समाधान वाटले. ते वाचताना ते कसे असतील हे डोळ्यासमोर आले. आणि रांगोळ्या तर अप्रतिम. तुला माहित आहे मी रांगोळ्या चित्ररूप काढते. स्त्रिया किंवा ढोलकीवाला वगैरे पण ते मला सोप्पे वाटते. आणि नानांनी काढलेल्या खूप कठीण. अक्षर तर त्यांचं चसंगल असेलच यात शंका नाही. नानांचे अभिप्राय पण खूप छान. नानांना आदरपूर्वक नमस्कार.
ReplyDeleteखुप छान विषय आणि सुंदर सुरुवात. नानांबद्दल वाचून मला माझे आजोबा आठवले, त्यांचं हस्ताक्षर सुद्धा नानांसारखंच सुंदर, माझे प्रमाणपत्र ठेवण्यासाठी त्यांनी सुंदर फाईल बनवून दिली होती, आजही सगळे प्रमाणपत्र आणि मार्कशीटस् त्यातच आहेत
ReplyDeleteतुझ्या लिखाणाबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तू घेतलेला विषय व्यक्तीविशेष खूपच छान आहे.व्यक्तीभिन्नता, स्वभाव व कामगिरी दाखविता येईल .नानांचे काम, तुला दिलेले अभिप्राय खूपच सुंदर आहेत. माझ्यारख्या अपूर्ण लेखक चित्रकाराला वर्णन करणं अवघड आहे.
ReplyDelete. तू सतत लिहीत राहावे त्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.!
मला खूप अभिमान आहे माझ्या विद्यार्थीनीचा की ,आज माझी विद्यार्थीनींनी चित्र आणि लेखनस्तर वाढवत आहे.उत्तम दर्जाची लेखिका होऊन नावलौकिक मिळव ! ही सदिच्छा !!
(चित्रकार -लीलाधर कोल्हे जळगाव)२० जून २०२४.
Chchan lihile aahes.
ReplyDeleteKhup motha hota.
Vel lagla vachayla.
Aadhi Guru Arun hote
Mala vatale Yawali che Arun kaka ki kay!!
Abhipray khupch sundar aahet 👌🏻👍🏻
ReplyDeleteखूप छान व्यक्तिविशेष लिखाण, खूप आवडले हा...आनंदीबाई.👏👌🏼👍🙏😊
ReplyDeleteव्यक्तीविशेष या नवीन लेखमालिकेला शुभेच्छा 👍तुमचे सासरे खरोखरच विद्वान आहेत. नवनवीन तंत्रज्ञानदेखील त्यांनी आत्मसात केले हे वाचून आश्चर्य वाटले. शेवटी ते हाडाचे शिक्षकच आहे न… त्यांनी काढलेल्या रांगोळ्या तर अप्रतिमच🙏🏻
ReplyDeleteएखाद्या पुरुषाला एवढ्या सुंदर रांगोळ्या काढता येतात हीच मुळैत आश्चर्याची गोष्ट. त्यांच्या अभिप्रायांमधून त्यांना तुमच्याविषयी किती अभिमान आणि प्रेम जाणवते. खरच भाग्यवान आहात तुम्ही .
प्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे.
Cchan vyakti vishesh shabdankan kele ahes, he aapale physics che A p patil sir ahet ka
ReplyDeleteTyanchya abhipraya madhun tuzya aajvarchya lekhanchi range kalali, asech sunder lihit ja, khup shubhechha
खूपच छान
ReplyDeleteReally good 👏🏼👏🏼👍🏻
ReplyDeleteवा सुंदर नवीन व्यक्तीविशेष लेक
ReplyDeleteआणि सरांचे अभिप्राय 👌👌
😊warshali khoop chan lekh aani nanache sare abhipray wachniy rangoli sunder 👌
ReplyDeleteAashich aanandi lekhan yatra chalu rahu de
खूप भारी आणि कौतुकास्पद लेख .. अभिप्रायांवर अभिप्राय देणं म्हणजे एका
ReplyDeleteता-याकडून सूर्याला कौतुक आणि शुभेच्छा देणं होय...सगळे अभिप्राय उत्तमच...
कोलम रांगोळी चित्रसंग्रह आवडला...
कँलिग्राफी हस्ताक्षर पण मस्तच..
||.नानांसकट सगळ्यांना आदरणीय नमस्कार||
सुंदर लिखाण आणि अप्रतिम रांगोळी काढली आहे 😊😊👌👌
ReplyDelete"आनंदी पावसा"तील तुझे हे सुंदर सदर वाचून नेहमीप्रमाणे आत्ताही मला खूप आनंद झाला. वर्षा ऋतुच्या सुरुवातीलाच झाडांना सुंदर सुंदर आणि टवटवीत अशी पालवी फुटावी, तशी वर्षालाही काही नाविन्यपूर्ण आणि टवटवीत लिखाण सादर करण्याची कल्पना सुचावी, यात आता काही आश्चर्य राहिलेले नाही. माझ्याबद्दलच्या तुझ्या लिखाणात बऱ्यापैकी अतिशयोक्तीने तू लिहिलेले आहेस, पण तेही माझ्या वरील प्रेमामुळेच हेही मी जाणून आहे. आम्हा दोघांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त तू जी आम्हाला आमच्या कौतुकाच्या निमित्ताने अमूल्य भेट दिलीस, ती खरंच अप्रतिम आहे. त्याबद्दल तुला औपचारिक "धन्यवाद" वगैरे शब्द वापरले, तर ते तुला नक्कीच आवडणार नाहीत.
ReplyDeleteघरातील "गमती जमती" पासून तर थेट तुझ्या संशोधन विषयक लिखाणापर्यंत बरेचसे लिखाण मी वाचत आलो आहे आणि प्रतिक्रियांच्या निमित्ताने का होइना, माझ्या हातून जे काही लिखाण झाले आहे ते तुझ्यामुळेच शक्य झाले आहे. काही प्रतिक्रिया तू या सदरात उद्धृत केल्या आहेस, त्या पुन्हा वाचून मी एवढे लिहू शकलो याचे माझे मलाच नवल वाटते आहे. तसेच या प्रतिक्रियांवरही आलेल्या काही प्रतिक्रिया वाचून तर मन अगदी भरून आले आहे.
"तुमच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला मी काही कारणास्तव उपस्थित राहू शकत नाही" असा तू मला फोन केला होतास. असो, अडचणी सर्वांनाच येत असतात. नाईलाजाने काही गोष्टी आपण करू शकत नाही परंतु माझ्याबद्दलच्या ह्या लिखाणाच्या स्वरूपात तू त्यापेक्षाही सुंदर अशी भेट दिली आहेस त्याबद्दल आम्हा दोघांना खूप खूप आनंद होत आहे. असेच नाविन्यपूर्ण आणि सशक्त असे लिखाण तुझ्या हातून होत राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो. राम कृष्ण हरि 🙏🏼
🙏🏻🙏🏻🙏🏻खूप सुंदर व मार्मिक अभिप्राय आहेत.
ReplyDeleteवर्षा खूप छान लेख लिहिला आहे .नानांचे व्यक्तिमत्त्व खूप छान रेखाटले आहेस.त्यांचे लिखाण खूप छान आहे.सगळ्या रांगोळी सुरेख काढलेल्या आहेत.
ReplyDelete