नदीचे मातृत्व
(featured)
लाडकी कावेरी!
(श्रीरंगापट्टनम्)
लाडकी कावेरी!
(श्रीरंगापट्टनम्)
पर्यावरण.
निसर्ग.
दोन वेगवेगळे शब्द.
वरवर पाहता दोन्ही शब्द सारखेच वाटतात.
तथापि तसे नाही.
परंतु परस्परांशी निगडीत आहेत.
पाच जुन, जागतिक पर्यावरण दिवस!
सर्व सामाजिक माध्यमांमधून या दिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या जातात.
फक्त एक दिवस.
मग सारे संपते.
आपण सारेच दावा करतो.
मानव निसर्ग प्रेमी आहे.
त्याचे निसर्गाशी जवळचे नाते आहे.
तथापि त्या निसर्गावर प्रेम करणे तर बाजूलाच
त्याला अव्याहतपणे ओरबाडण्याचे काम मात्र करत असतो
निसर्गाचा एक अतिशय महत्वाचा, अविभाज्य भाग म्हणजे,
नदी, सरिता, तटी, तटिनी, जलवाहिनी, तरंगिणी, निर्झरिणी, आपगा, कल्या, निग्मना, कल्लोलिनी,...
आपण नदीला माता म्हणतो, मानतो.
तथापि तिला दिलेले हे स्थान आपण विसरून जातो, विसरून गेलो आहे.
त्यामुळे तिची अवस्था, पर्यायाने आपली अवस्था अतिशय भयावह झालेली आहे.
आमचे दादा,
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहास आणि पुरातत्त्व संशोधक, जल-संस्कृतीचे आद्य अभ्यासक, ऋषितुल्य डॉ रा. श्री. मोरवंचीकर
यांनी पाणी या विषयावर अतिशय सखोल अभ्यास केलेला आहे.
"भारतीय जल-संकृती" नावाचा ग्रंथ लिहिला आहे.
या ग्रंथाला, पाचवा वेद असेही म्हटले गेले आहे.
त्यांनी सगळे लिहून ठेवले आहे. आपण फक्त ते वाचून, त्याप्रमाणे गोष्टी आमलात आणल्या,
तर आजची मुख्य, भीषण समस्या म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष!
सोडविण्यास नक्कीच मदत होईल.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून,
त्यांच्याच,
"शुष्क नद्यांचे आक्रोश"
या ग्रंथातील "नदीचे मातृत्व" हा भाग, आज आपल्या सर्वांसाठी.
वाचून त्यावर विचार, चिंतन व्हावे आणि शक्य तेव्हढे नदीला, पर्यायाने पाण्याला सर्वार्थाने समजून घ्यावे.
त्यांनी दिलेला मंत्र, "जलातून जीवनाकडे बघा"
खऱ्या अर्थाने समजून घ्यावा...
कवडी वाड्यातून गोदा दर्शन!
(नाग घाट, प्रतिष्ठान)
नदीचे मातृत्व
नदीचे अंतर्मन हे मातेचे आहे. आज ही लोकमाता आपल्या पुत्राची जोपासना करण्यास असमर्थ ठरत आहे. तेव्हा तिचे दुखावलेले अंतःकरण काय आक्रोश करत असेल हे समजून घेणारे मन मानव हरवत चालला आहे. प्रत्येक नदीचा आक्रोश सारखा असतो का? त्यांच्या काठावर घडलेल्या प्रत्येक घटनेच्या त्या मूक साक्षीदार आहेत. सुखाचे क्षण, दुःखाचे क्षण आणि या क्षणाचे भविष्यावर झालेले खोल परिणाम या सर्व घटनांच्या त्या प्रत्यक्षदर्शी आहेत. त्रंबकेश्वरहून वाहत येणारी गोदावरी सीतेच्या नितळ सौंदर्याचे कौतुक करत पुढे जाते तेव्हा रानावनातून वाट काढत येणारी वैनगंगा तिला तिच्या काठी राहून धन्य झालेल्या शबरीची गोंडी कथा सांगत असावी असे उगाचच वाटत राहते. हे सुखद चित्र आता दिवसेंदिवस दुःखद होत आहे असे जाणवते. नद्यांचा ऐतिहासिक काळ वैभवाचा होता; पण वर्तमानात त्यांना अशी मानहानी का स्वीकारावी लागते? याची उत्तरे माणसाकडेच आहेत. कारण या समस्या त्यांनीच निर्माण केल्या आहेत. मानव आपल्या टोकाच्या स्वार्थी भूमिकेमुळे लोकमातांचे कृतघ्न पुत्र ठरत आहेत.
प्रत्येक लोकमातेची कथा स्वतंत्र आहे. व्यथा स्वतंत्र आहे. कारण तिचे कुटुंब स्वतंत्र आहे. तिच्या दुःखाचे मुख्य कारण म्हणजे मनुष्य नावाचा दुःखी प्राणी तिच्या सहवासात राहतो. तिच्यावर मातेसमान प्रेम असल्याची बतावणी करतो आणि आपल्या स्वार्थासाठी तिला उध्वस्त करतो. हा प्राणी जिथे जातो तिथे दुःखच निर्माण करतो. ऐंद्रिय सुखाचा प्रच्छन्न पाठलाग हे त्याच्या दुःखाचे मूळ आहे. ही आपली सांस्कृतिक धारणा आहे. भौतिक सुख प्राप्तीसाठी त्याने नदी जलाचे प्रदूषण करून, जलाचे पावित्र्य नष्ट करून मातृत्वाचे स्थान दिलेल्या नदीलाही प्रदूषित करण्याचे उद्योग अव्याहतपणे चालू ठेवले आहेत.
आज माणूस आणि प्रदूषण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की काय असे वाटू लागले आहे. कारण मानवाने आपली नैसर्गिक जीवन शैली सोडून चंगळवादी शैलीचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाची विल्हेवाट लावण्यास निसर्ग कमी पडत आहे. नव्या तंत्रज्ञानावर आधारित उद्योग प्रधान नगरांतून मैला-पाण्याच्या आणि सांडपाण्याच्या रूपाने, औद्योगिक रासायनिक द्रव्याच्या रूपाने होण्याच्या प्रदूषणाच्या असह्य वेदानातून आम्हाला मुक्त करा हा तर नद्यांचा आक्रोश आहे. या विघातक द्रव्याच्या मिश्रणामुळे अमृतवाहिन्यांचे विषवाहिन्यांत रुपांतर होत आहे. हे कठोर पावले उचलून थांबविणे गरजेचे आहे.
आपण गंगेला भारतीय पर्यावरणाची पदसिद्ध जननी मानतो. सर्व नैसर्गिक अन्नसाखळ्या तिच्या अंतरंगातून घडत असतात. जीवजंतू, जलचर, वनस्पती, प्राणी इत्यादी असे सर्व सजीव सरिताजलाच्या उपलब्धीवर अवलंबून जगतात. तथापि, जेव्हा नदीचे जलच अशुद्ध होऊन ती या अन्नसाखळ्यांची निर्मिती करण्यास अपुरी पडत असेल तर तिच्या आक्रोशाला पारावर नाही. प्रदुषणाविरुद्ध संघर्ष करण्याची नैसर्गिक क्षमता दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे. हे नैसर्गिक चक्र प्रतीबंद्धीत झाले आहे. कारण तिच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला. असंख्य बंधाऱ्यांची निर्मिती झाली. धरणे बांधतांना समोर सामान्य शेतकरी असतो. तथापि लाभ घेणारा मात्र अतिश्रीमंत गटातील अथवा कोर्पोरेट क्षेत्रातील असतो. त्याच्या या अपात्रतेचा किती व्यापक परिणाम होतो याची आपण कल्पनाही करू शकत नाही. जीव-वैविध्याच्या ऱ्हासाचा वेग कमालीचा वाढला आहे. वाघ, मगर, डॉल्फिन सारखे पर्यावरण संतुलन सूचक जीव(Environment-indicators) अस्तित्वाच्या संकटात सापडले आहेत. सारीतांनी जोपासलेली पाणथळे एका मागून एक नष्ट होत आहेत. एक समृद्ध वृक्ष म्हणजे एक लहानसा जलसाठाच असतो. जंगले साफ झाल्याने किती प्रचंड जलावरण नष्ट झाले असेल याची कल्पनाच करवत नाही.
सरितेच्या धार्मिक तथा सांस्कृतिक मूल्यांचाही झपाट्याने ऱ्हास कसा होतो याचे उदाहरण पाहू. भारतात ज्या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो त्यापैकी महत्वाचे ठिकाण उज्जैन. येथे क्षिप्रा नदीच्या काठी भरणारा कुंभमेळा काहीसा आगळा-वेगळा असतो; पण सद्यःपरिस्थितीत क्षिप्रा नदीत पाणीच नाही. सत्तर किलोमीटर वरील नर्मदेतील पाणी नालीकेद्वारे आणून क्षिप्रेत सोडावे लागते. एखाद्या नदीसाठी याहून दुसरी शोकांंतिका कोणती असू शकते? भारतीय धारणेनुसार क्षिप्रेच्या पवित्र जलात उज्जैनच्या महाकालेश्वर तीर्थक्षेत्रात कधीकाळी अमृताचे थेंब सांडले होते. कुंभमेळ्याच्या पर्वणीला त्या जलात ते पुन्हा अवतरतात आणि ते प्राशन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक तेथे एकत्र येतात. तथापि क्षिप्रा त्यांना पाण्याच्या एक थेंबही देऊ शकत नाही. केवळ लज्जा रक्षणार्थ तिला आपल्या भागीनिकडे, नर्मदेकडे मदतीची याचना करावी लागते, ही केव्हढी शोकांतिका.
अशाच एका प्रसंगी काही काळ क्षिप्रे काठी अमृत कणांचा शोध घेण्याचा कसून प्रयत्न केला; पण मन प्रसन्न होण्या ऐवजी विषण्णच होत गेले. विचित्र संकेत मिळू लागले. अज्ञात आवाजांनी कानाच्या पाळ्या गच्च झाल्या. समजले नाही की क्षिप्रा तेव्हा काही सांगू इव्च्छिते काय? कुंभमेळ्यातील भक्तगण जेव्हा क्षिप्रेच्या अमृतमय जलाने सुस्नात होत असतील तेव्हा त्यांच्यापैकी किती जणांना हे ज्ञात असेल, की हे क्षिप्रेचे अमृत कणांनी भारलेले जल नसून नर्मदेचे पाणी आहे? कदाचित क्षिप्रेच्या पात्रात रेवेचे जल अंगावर घेतांना त्याचा आनंद शत गुणितही होत असेल; पण हे किती दिवस चालणार?
सिंचनास जल उपलब्ध व्हावे म्हणून धरणे बांधून भौतिक विकास साध्य करून घेतला. तथापि कालनिहाय भौतिक विकासाच्या सीमा विस्तारतच गेल्या. अमर्याद भोग तृष्णेचा पाठलाग करत असतांना त्यांच्या महत्वाकांक्षेला नदीजल अपुरे पडले. परिणामी जमिनी दलदलीच्या झाल्या. त्या क्षारफुटीला बळी पडल्या आणि पिकाचा उतारा कमी झाला. त्यांचे वाळवंटीकरण होत चालले. सिंधू सारख्या महाकाय नदीचा बळी गेला. नाईल, पीत, यांगत्सेसारख्या नद्याही याला अपवाद ठरल्या नाहीत.
(अर्थातच हे त्यांच्या पूर्व परवानगीने प्रकाशित करत आहे.)
- डॉ रा श्री मोरवंचीकर
शुष्क नद्यांचे आक्रोश
(पान नं २१,२२)
खूप च मस्त
ReplyDeleteखूप सुंदर लेखन डॉक्टर मोरवंचीकरांच्या आठवणी ताज्या झाल्या .खरंच त्यांचं कार्य खूप मोठ आहे.समाजाने या विषया कडे आता गांभीर्याने पाहिले पाहिजे.अन्यथा, भविष्य अंधकारमय आहे.धन्यवाद!!,शेअर केल्याबद्दल🙏🙏🙏🥰
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख👍🙏
ReplyDeleteखुपचं सुंदर लिखाण केले आहे .नद्यांची परीस्थिती फार कठीण आहे. आताच कितीतरी जिल्ह्यांना पाणी टंकरने पूरवावे लागत आहे .पण कोणीही पाणी कमी वापरत नाही.
ReplyDeleteसुंदर 🙏🙏🙏
ReplyDeleteजलाकडून जीवनाकडे बघण्याचा हा लेख खरंच खुप छान👌👍
ReplyDelete👏atishy sunder lekh
ReplyDeleteखूप संवेदनशील लेख जाहलाय..नदीचं सारं आणि जल हेच जीवन हे मार्मिकरीत्या वर्णिले आहे.
ReplyDeleteकावेरी-कृष्णाचा उगम पाहिलाय...कूर्ग आणि महाबळेश्र्वरला....बुद्ध्यांळ गावातील
वाहणा-या कृष्णा नदीचा डोह आवडतो.
शरयू नदी नाही पाहण्यात अजून तरी...
नदीचा प्रवाह हा निसर्गाप्रमाणे व्हावा..एकरूप,natural..Soul of River आरशासारखं चकचकीत व आनंदी असेल.-
असो.. परत पुन्हा एकदा होगेनकल ला tamilnaduतील कावेरी मध्ये coracal ride घ्यायला आवडेलच.
-स न वि वि.संजिता
१०० % सत्य.सर्वांनीच मनापासून प्रयत्न करायलाच हवे अन्यथा विनाश ठरलेला आहेच.
ReplyDeleteखूपच सुंदर लेख आहे. नदी ला जपलेच पाहीजे नाहीतर विनाश अटळ आहे.
ReplyDeleteखूप छान...खूप नवीन माहिती मिळाली..
ReplyDeleteखूपच सुंदर लेख. शुष्क नद्यांचे आक्रोश हा विचारच विचार करायला लावणारा. कुंभमेळ्यांच्या वेळी धार्मिक, पौराणिकआणि त्यामुळे मानसिक कारण असले तरी त्यावेळेसच नद्या सर्वात जास्त घाण होतात. तुम्ही सांगितलेल्या नद्यांच्या नावांपैकी आपगा, कल्या, निग्मना, कल्लोलिनी ही नावे पहिल्यांदाच कळली. कघी वाचलेलीही आठवत नाही. खूप अभ्यास आहे तुमचा.
ReplyDeleteप्रा. सौ वैशाली चौधरी
ठाणे.
खूप छान पद्धतीने लेख लिहिला आहेस.नद्यांचे सद्य परिस्थिती वर खूप छान लिहिले आहेस.याविषयी खूप समर्पक लिहिण्याची जरुरत होती.
ReplyDeleteनदिचे मातृत्व
ReplyDeleteवैनगंगेच्या वर्णनामधे शबरीचा उल्लेख केला त्याविषयी सविस्तर माहिती मिळाली तर बरे होइल
आपला अभ्यास व लेखन शैली अप्रतिम आहे