पुष्करीणी, हुळीकेरे (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) तो दिवस खास दिवस होता, म्हणून आम्ही कुठेतरी लांबवर गाडीने चक्कर मारून एखाद्या छानशा स्थळ भेट द्यावी, असे ठरविले. घरून निघतांना मनात ठरविले होते, की श्रावणबेळगोळा येथे जाऊ या. तिथे दोन डोंगर आहेत, मुख्य विंध्यगिरी आणि दुसरा चंद्रगिरी. मुख्य डोंगर छान आहेच, पण मला चंद्रगिरी वर चढून, तिथून विंध्यगिरीचे सौंदर्य न्याहाळायला आवडते. तसेच काहीसे मनात ठरवून निघालो. पण न्याहारी करायला थांबलो तेव्हा अचानक लक्षात आले, बऱ्याच दिवसापासून पुष्करीणी बघायला जायचे होते आणि तिथे एकदाही गेलेलो नव्हतो. त्यामानाने श्रावणबेळगोळा येथे बऱ्याचदा भे ट दिलेली होती. मग आमचे ठरले, पुष्करीणीला जायचे आणि मार्गाला लागलो. ही पुष्करीणी प्रसिद्ध हाळेबिडूच्या मंदिरापासून फक्त पाच किमी अंतरावर ...