Skip to main content

मेथीची भाजी (काही अनुभवलेलं ...)

 मेथीची भाजी 

(काही अनुभवलेलं ...)


                     तीन दिवसांचा उत्खनन दौरा संपवून आज सकाळीच घरी परतले . गेले तीन दिवस घरी नसल्याने घरात भाजी नसणार हे गृहीतच होते . डोक्यात विचार चालू होते , काय स्वयंपाक करावा आज ? विचार करता करता एकदम आठवले , मी माझ्या बालकनीतील कुंड्यांमध्ये मेथी लावलेली होती आणि जातांना काळजी वाटत होती , मी गेल्यावर मेथीला नियमित पाणी घातले जाईल ना , की मी आल्यावर मला वाळलेली मेथी बघायला मिळेल ? हे आठवताक्षणी मी बालकनीकडे धाव घेतली . छान हिरवीगार मेथी बघायला मिळाली आणि माझा जीव भांड्यात पडला . खरंतरं ती मेथी बघून एक आगळाच उत्साह संचारला माझ्यात ! ठरलेच माझे , आज सगळ्यात पहिल्या दोन कुंड्यामधील मेथी काढून तीच भाजी करायची . पुढे लागोलाग विचार आला , बऱ्याच दिवसांपासून ठरविलेले पोपटी भाजीचे लिखाणही करावे . आणि केली ही सुरवात , सगळी आवरा आवारी झाल्यावर . 
                       आधी कुंडीतील मेथीची गोष्ट सांगते . खरंतरं माझ्याकडे झाडे लावायला , कुंड्या ठेवायला जागा नसल्यातच जमा आहे . पण त्यातल्या त्यात पाच-सहा छोट्या-मोठ्या कुंड्या आणून त्यात काही-बाही लावत असते . बरीच लोकं घरी लागणारा सगळा भाजी-पाला आपापल्या घरीच बागेत , गच्चीवर , बालकनीत वगैरे लावतात . या टाळेबंदीत तर याचे फारच महत्व वाटले . मलाही वाटले आपणही थोडे फार लावावे , मेथी-कोथिंबीर तरी निदान . तसा प्रयत्नही केला पण अर्थातच तो फसला . टमाटे मात्र छान उगवून आले आणि चौदा-पंधरा लाल चुटुक टमाटे सुद्धा मिळाले मला . छान होता हा प्रवास सगळं रोप उगविण्यापासून ते छोटे-छोटे टमाटे लागून ते मोठे आणि छान लाल चुटुक होईपर्यंतचा ! रोज उत्सुकता असे बघण्याची . 
                         दोन-तीन महिन्यापूर्वी मी आरोग्य तपासण्या करून घेतल्या . त्यात काही गोष्टी इकडे तिकडे असल्याचे लक्षात आले . मग त्यावर उपचार म्हणून डॉक्टरांनी बरेच सल्ले दिले . त्यातील एक म्हणजे चमचाभर मेथी एक ग्लास पाण्यात भिजून ठेवायची आणि सकाळी ते पाणी प्यायचे . आता ते पाणी प्यायल्यावर त्या मेथीचे काय करायचे हा प्रश्न उभा राहिला पण लगेच त्यावर तोडगाही सुचला . ती मेथी फोडणीत घालायची आणि त्याप्रमाणे करू लागले . पण एका  दिवशी फोडणी नव्हती . मग अशा दिवशी ती मेथी संध्याकाळ पर्यंत तशीच पडून राहिली आणि त्याला छान मोड आले . ते पाहून मनात विचार आला , ही मोड आलेली मेथी कुंडीत लावली तर छान उगवेल . एकदा करून तर पाहू प्रयोग आणि त्याप्रमाणे केलेही . झालेही तसेच दोनच दिवसात छान मेथी उगवून आली ! मग काय नादच लागला मला . ज्या दिवशी फोडणी नाही , त्या दिवशीची मेथी कुंडीत . घरातील छोट्या-मोठ्या कुंड्या , प्लास्टिकचे डबे एक एक करत बाहेर येऊ लागले . माझी मेथीची शेतीच सुरु झाली . अगदी ब्रह्मानंदच ! एक दैवी आनंदच जणू त्या रूपाने माझ्या आयुष्यात आला . 
                           रोज सकाळी उठले की बालकनीत जायची एक तीव्र ओढ लागलेली असते , हा हिरवागार आनंद अनुभवण्यासाठी . अगदी नुकतेच मातीच्या वर येऊ पाहाणारे रोप ते पूर्ण वाढ झालेली मेथी पर्यंत जवळ-जवळ सात-आठ वेगवेगळ्या वयाची मेथी आणि त्यांची वाढ एकाच वेळी बघायला मिळते . अगदी अवर्णनीय असतो हा सोहळा दररोज ! अगदी पहिल्यांदा जेव्हा तो कोंब मातीच्या वर येण्याचा प्रयत्नात होता , तेव्हा मला फारच काळजी वाटे , सही सलामत बाहेर येतील ना ? की त्या मातीचे वजन न पेलवल्याने खालीच दबून जाईल ? पण ते बरोब्बर त्या मातीला रेटून बाहेर येते आणि छान इवली इवली दोन पानं वाऱ्यावर डोलू लागतात आणि त्यांच्या सोबत मी सुद्धा !
                         हे सगळे चालू असतांना , एक दुसराच विचार मनात सारखा येत होता . अकस्मात हा दैवी हिरवागार आनंद आयुष्यात आला . पण याचे कारण काय , तर शरीरात झालेला थोडासा बिघाड . हे सगळे समजले तेव्हा मी बेचैन , अस्वस्थ आणि उदास पण झाले . काय करावे कळेना . हे सगळे इतक्या लवकर होईल हे अपेक्षितच नव्हते मला . कारण नियमित व्यायाम , जेवण-खाण वेळच्यावेळी आणि शक्य तितके आरोग्य वर्धक , बाहेरचे खाणे अगदी खूपच गरज असेल तेव्हाच असते . मग थोडा विचार केल्यावर वाटले , हा सगळा टाळेबंदीचा परिणाम असावा . कारण घरातल्या-घरात किती ती हालचाल होणार ? बराच वेळ एका जागी बसूनच जात असे . तरी सकाळ संध्याकाळ मी अगदी वेळ लावून घरातल्या-घरात चालत होतेच . पण अर्थातच फरक होणारच बाहेर आणि घरात चालण्यात . घरात जागा कमी , त्यामुळे वेगावर परिणाम . पण त्या निमित्ताने घरातल्या-घरात किती पावलं चालता येते ते नीट कळले म्हणजे पाठच झाले . माझेच नाही तर बऱ्याच लोकांकडून हा घरातल्या-घरात चालण्याचा अनुभव ऐकायला मिळाला . असो . 
                           शेवटी विचार केला व्हायचे ते होऊन गेले . आता यातून बाहेर कसे पडता येईल यावर विचार आणि त्या दृष्टीने वाटचाल करावयास हवी . मग रोजच्या जेवणखाण्याचे नियम पळून , हा मेथीचे पाणी पिण्याचा नवीन उपक्रम चालू केला . तसेच वर उल्लेख केल्याप्रमाणे मेथीची शेतीच सुरु झाली . पण या सगळ्यात मी फारच गुंतून गेलेय . वाटले हा शरीरात झालेला बिघाड म्हणजे फक्त निसर्गाने दिलेली एक सूचना आहे . "निसर्गापासूनचे अंतर थोडे वाढले आहे , ते कमी करण्याची गरज आहे ." आणि निसर्ग म्हणजे हिरवागार आनंदी आनंद ! मग हा आनंद अनुभवायला कशाला कंजुषी करायची ? मग सगळे सोप्पे वाटू लागले , खरंतरं हे सगळे आवडायलाच लागले . दररोज मेथी भिजत घालायची , सकाळी ते पाणी प्यायचे , मेथी आठवणीने फोडणीत घालायची , फोडणी नसेल तेव्हा ती मेथी तशीच बारा तास झाकून ठेवायची . मोड आले की कुंडीत पेरायची आणि गरजेप्रमाणे पाणी घालायचे नियमित . जादू झाल्यासारखे हळूहळू पहिली दोन पानं मातीच्यावर येतात आणि पुढे पुढची येतात . माझ्या शब्दात सांगायचे तर हिरव्यागार आनंदाची उधळण ! काही मेथीच्या रोपावर फुलं सुद्धा आली . यानिमित्ताने ती सुद्धा नीट जवळून बघता आली . फारच वेगळी आणि गोड असतात ही फुल . मला बरीचशी भुईमुगाच्या फुलांसारखी वाटतात ही फुलं आकाराने . अर्थातच माप आणि रंग दोघांचा वेगळा . भुईमुगाचे छान पिवळेधम्म तर मेथीचे पांढरेशुभ्र ! 
                        आता मेथीच्या भाजीची माझी ही आगळी-वेगळी गोष्टच खूप लांबली . त्यामुळे मेथीच्या खास खान्देशी पाककृती अर्थातच पुढच्या भागात सांगेन . पण अजून माझा एक अनुभव इथे सांगावासा वाटतोय . तो सांगते . मध्यंतरी आमचा कविता वाचनाचा कार्यक्रम झाला , बहिणा बाईंच्या स्मृती दिनानिमित्त . फक्त त्यांच्याच कविता वाचायच्या होत्या . यापूर्वी मी कधीही कविता वाचन केले नव्हते आणि मला ते कठीण सुद्धा वाटत होते . त्यामुळे मी त्यात भाग न घेण्याचे ठरविले . याच निमित्ताने अजून एक कार्यक्रम होता , त्यात माननीय व . पु . होले सर बोलणार होते . एक छान पर्वणीच होती माझ्याकरिता ! टाळेबंदीचा एक छान फायदा . बरेचसे कार्यक्रम ऑनलाईन होतात . हाही कार्यक्रम ऑनलाईन असल्याने मला त्यात उपस्थित राहण्याची संधी मिळाली . त्यात सरांनी बहिणाबाईंच्या "माहेरची वाट" या कवितेचा काही भाग सादर केला आणि त्यावर सविस्तर बोलले सुद्धा . मग मात्र मला राहवेना , वाटले ही कविता फारच सुंदर आहे , ती परत वाचायला मिळायला हवी . मग त्यासाठी प्रयत्न सुरु केले आणि एका मैत्रिणी कडून त्यांच्या सगळ्याच कवितांची पी डी एफ फाईलच मिळाली . त्यात हीच नव्हे तर सगळ्याच कविता आहेत . अगदी अधाश्या सारख्या एकेक कविता वाचतच गेले आणि पुरती हरवून गेले त्यात . सगळ्याच कविता एका पेक्षा एक सरस . निसर्गाशी जोडणाऱ्या , निसर्गाकडे बघण्याची एक निराळीच दृष्टी देणाऱ्या ! पण त्यांची एक कविता "देव अजब गारुडी" ही कविता , मला इतकी आवडली की माझ्याही नकळत मी फोन हातात घेतला आणि त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी माझे नाव दिले माझेच मला कळले नाही . आणि ही कविता मी त्या कार्यक्रमात सादर सुद्धा केली . या माझ्या मेथी उपक्रमाच्या निमित्ताने ती कविता मी अगदी रोज अनुभवते , जगते ! माझे अहोभाग्यच ! बहिणाबाईंची तीच लेवा गणबोलीतील कविता तुमच्यासाठी सुद्धा इथे देतेय . नक्की वाचा आणि त्या नैसर्गिक आनंदाचा अनुभव घ्या !

देव अजब गारुडी 

धरित्रीच्या कुशीमधे 
बीयबियाणं निजली 
वर पसरली माती 
जशी शाल पांघरली 

बीय डरारे भुईत 
सर्व कोंब आले वर 
गहिवरलं शेत जसं 
अंगावरती शहारं 

ऊनवाऱ्याशी खेळता 
एका एका कोंबातून 
प्रगटली दोन पानं 
जशी हात ती जोडून 

टाळ्या वाजवती पानं 
दंग देवाच्या भजनी 
जशी करती करुणा 
होऊ दे रे आबादानी 

दिसमासा होय वाढ 
रोप झाली आता मोठी 
आला पिकाला बहर 
झाली शेतामध्ये दाटी 

कशी वाऱ्यानं डोलती 
दाणे आले गाडी गाडी 
देव अजब गारुडी 
देव अजब गारुडी 

बहिणाबाई चौधरी 
(लेवा गणबोलीतील कविता )
© आनंदी पाऊस 
(काही अनुभवलेलं ...)
२९ ऑक्टो २०२१


मेथीचे फुल 



पहिली दोन पानं उगवलेली रोपं 


त्यापेक्षा थोडी मोठी झालेली रोपं 



पूर्ण वाढ झालेली मेथी 



वेगवेगळ्या टप्प्यात वाढ झालेली रोपं 










Comments

  1. Replies
    1. सप्रेम धन्यवाद भाऊ! 🙏💫

      Delete
  2. Khupach chhan. कुंडीत ले बी उगवतं तेव्हा असाच अनुभव येतो. खुपच छान वाटत

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद! 🤩🌿☘️🌱

      Delete
  3. रेवती डिंगरेOctober 30, 2021 1:31 pm

    मेथीची भाजी ,जिवंत अनुभव
    अप्रतिम

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद अणि सहर्ष स्वागत चौधरी सदनात!! 🙏🌟⭐💐

      Delete
  4. याच मेथीच्या पानांचे पराठे पण मस्त लागतात अक्का

    ReplyDelete
  5. लीला गाजरेOctober 30, 2021 2:21 pm

    वा!वा!खरच किती छान हा उपक्रम !साधा सोपा स्वस्त आणि मस्त .फारच सुंदर संकल्पना .खरच कौतुकास्पद आहे तुमचा आनंदी पाऊस ,अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. काकू तुमच्या कडून नेहमीच कौतुक आणि आशिर्वाद मिळतात! ते असेच कायम मिळत राहो हीच मनस्वि ईच्छा! सप्रेम धन्यवाद!

      Delete
  6. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊🤩

      Delete
  7. जनार्दन चौधरीOctober 30, 2021 3:32 pm

    मेथिच्या दाण्या पासून ते रोप वाढविण्यात मिळालेला आनंद जसा तु अनभुविलास तोच अनुभव मि शेति करण्यास सुरुवात केली तेव्हा अनुभवला आहे तो किती अवर्णाय असतो याचि प्रचिति मला आलेलि आहे

    ReplyDelete
    Replies
    1. तो अनुभव अणि आनंद यापेक्षा अधिक सरसच असणार!
      खूप सारे प्रेम!!! 🤩🌱🌱🌱

      Delete
  8. छान लेख
    हिरवागार आनंद वा वा सुंदर संकल्पना आणि तो हिरवागार आनंद मि सुध्दा अनुभवला वेगवेगळ्या टप्पात वाढलेली रोपे बघून

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना हिरव्यागार आनंदाची बाकी कुठल्याच आनंदाशी तुलना होऊ शकत नाही!
      हिरवीगार धन्यवाद! 🌱🌱🌱🌿🌿🌿☘️☘️☘️

      Delete
  9. मेथी प्रमाणे ह्या लेखातील प्रत्येक वर्णन हा आनंदमय गारवा देऊन जातो.मेथीच बियांमधुन उगवण्यापासून ते पांढऱ्या गोंडस फुलापर्यंत सारेच अप्रतिम टिपलयं..आठवणीतील साजेशी गोजिरवाणी कविता...खुप कौतुकास्पदच.

    ReplyDelete
    Replies
    1. गोंडस गोजिरवाणे सप्रेम धन्यवाद!! 🌱🌱🌱🤩

      Delete
  10. खुप छान लेख आहे👌👌

    ReplyDelete
  11. methi bhaji khoop sunder lekh
    Pics
    Vidio sunderBahinabaichi kavita 9 th std la hoti
    Barech aathwani jage hotat tuze lekh wachun
    Apan perlele biyane Matitun ugawlecha anand kahi agla weglach

    ReplyDelete
    Replies
    1. हा एकच हेतू या लिखाणाचा, सर्वत्र आनंद पेरणे आणि पसरविणे!!
      खूप सारे सप्रेम धन्यवाद!! 🌱🌿☘️

      Delete
  12. खूप छान. मी पण प्रयोग केलेला असा. खूप छान वाटत भाजी उगवली की. आणि भाजी खायला tr खूपच छान वाटत.

    ReplyDelete
    Replies
    1. वावा मस्तच! खूप सारे धन्यवाद!! 🌱🌱🌱

      Delete
  13. खुपच छान अनुभव स्वनिर्मितीचा

    ReplyDelete
  14. नेहेमी प्रमाणे चवदार लेख. काही तरी out of box विषय निवडून त्यावर अफलातून विचार व्यक्त करायची तुझी हातोटी आहेच. बाजारातून हिरवीगार भाजी आणणे ह्यापेक्षा आपल्या हाताने पेरलेली भाजी मिळणे हा आनंद खरच अवर्णनीय आहेच .एखादे रोप आपण लावणे आणि ते वाढतांना कौतुकाने बघणे हा एक स्व निर्मितीचा आनंद अनुभवायला मिळणे हा योगच. आयुष्याच्या गडबडीत असे निवांत अनुभव हल्ली खूपच दुर्मिळ झाले आहेत. तू ते कटाक्षाने मिळवते आहेस हे छानच . शेतकर्यांच्या मनीचा निर्मितीचा भाव तेंव्हा आपल्याला हुबेहुब कळतो. तब्येतीच्या कारणाने का होईना तुला भाजी लावायची संधी मिळाली हे काय कमी नाही. त्याशिवाय हा हिरवा गार अनुभव तुझ्या तब्येतीला आणी एकंदरीतच मनाला refresh करणारा आहे . बहिणाबाईंची कविता एकदम समर्पक. मेथीची भाजी तशीही मला खूप आवडते त्यामुळे तुझ्या पुढील लेखातल्या चमचमीत पाककृतीची प्रतीक्षा आहेच.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...