Skip to main content

सोमवारची कहाणी-१(घरातील गमती जमती)

 सोमवारची कहाणी-१

(घरातील गमती जमती)

                       आजपर्यंत सगळ्यांनी अनेक धार्मिक पुस्तकांमधून सोमवारची कहाणी वाचली/ऐकली असेल . पण आज मी चौधरी कुटुंबातील सोमवारची कहाणी सांगणार आहे. जी कहाणी या सगळ्या कहाण्यांपेक्षा खूप वेगळी आहे. व्रताचीच आहे, पण एका खूप आगळ्या वेगळ्या व्रताची! एका त्यागाची, एका जाणिवेची, एका जबाबदारीची!! देशप्रेमाची!!!
                  योगायोग असा की आज सुद्धा सोमवार आहे, म्हणजे हे लिखाण मी सोमवारीच केले, ठरवून नाही. लिहायला बसल्यावर लक्षात आले. दुसरा योगायोग म्हणजे आज मी साबुदाण्याची खिचडी केली आहे, जी मी फारच क्वचितच करते. उपवास आणि साबुदाणा खिचडीचा संबंध, मी काही इथे सांगण्याची गरज नाही. या सगळ्या योगायोग मुळे, मी अगदी प्रत्यक्षपणे प्रत्येक क्षण अनुभवत होते आणि लिहीत होते! 
                 आमच्याकडे अगदी सुरवाती पासून, सकाळी सात-साडेसात वाजताच सगळा स्वयंपाक तयार असे , रविवार आणि सोमवार वगळता. आता रविवारी सुट्टी म्हणून थोडा उशीर होत असे, तरी रविवारी सुद्धा एकद्या तासाच्या फरकाने तयार असेच. सोमवार सोडला तर बाकी दिवशी सगळी पुरुष मंडळी आणि शेतात जायचे असेल तर, आई(आजी) सुद्धा जेवण करून साडे आठच्या आसपास रवाना होत असत. याला अपवाद होता सोमवारचा! सोमवारी सुद्धा सगळी मंडळी ठरलेल्या वेळीच रवाना होत आपापल्या कामासाठी, पण न जेवता. कारण दर सोमवारी घरात अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा उपवास असे. दिवसातून फक्त एकदाच, दुपारी स्वयंपाक होत असे. दर सोमवारी सगळी पुरुष मंडळी दुपारी घरी जेवायला येत. हे सोमवार दुपारचे जेवण इतर दिवशीच्या जेवणापेक्षा थोडे वेगळे असे. सकाळी नाश्ता वगैरे प्रकार नव्हताच. अगदी एखाद्या सोमवारी सकाळी शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू किंवा गुळदाणे केले जात. मग सगळे यातील थोडं थोडं खाऊन जात असतं. 
                    बरं, संध्याकाळी जेवण तर नसेच, पण घरातील सगळी मोठी मंडळी काहीच खात नसतं, एकदम कडक उपवास! आम्हा मुलांना भूक लागली आणि काही खायचे असेल तरी, स्वयंपाक होत नसे. दुपारचे उरलेले असेल तेच खावे लागे. कधी कधी मला फार राग येत असे. पण घरात काही नियम होते, शिस्त होती. ते सगळे नेहमीच पाळले जात असतं. कुणीही प्रश्न करत नसे किंवा ते नियम, ती शिस्त कोणीही मोडत नसे. अगदी जन्मापासून बघत आलो हे सगळं. नंतर पुढे वाढत्या वयाने भूक वाढत गेली, मग यात काही बदल झाले. ते सगळे नंतर सांगेनच सविस्तर कधीतरी. 
                     वाचकांच्याही लक्षात आले असेल, खाण्याच्या बाबतीत आमचे सगळे कुटुंब किती उत्साही आणि रसिक! तरी हे सगळे काय? माझ्याही मनात हेच विचार येत होते, हे लिखाण सुरु केल्यापासून. अगदी एकादशीला सुद्धा, "एकादशी नी दुप्पट खाशी" अशी परिस्थिती असे. मग सोमवारीच असे का? बरं आमचे बाबा(आजोबा) पूर्णपणे नास्तिक, कधीच कुठल्या देवळात गेले नाहीत की घरातील देवांना नमस्कार केला नाही. एव्हढेच काय पण आमची आई(आजी) चारधाम यात्रेला सुद्धा एकटीच गेली, ते गेलेच नाही. फक्त दोनच गोष्टींवर त्यांची श्रद्धा! एक म्हणजे दररोज दुकानात गेले की दुकानाच्या(खादी भांडार) पायरीला नमस्कार करीत, मगच वर चढत, आपण देवळात करतो तसे. दुसरे म्हणजे वर्षातून तीन वेळा पितरांचे श्राद्ध घातले जाते. ते असतांना, ते आगारी(या बद्दल सविस्तर माहीती एका स्वतंत्र लेखात कळेलच) टाकत आणि पूजा करत. तेव्हा ते आपल्या पितरांना अगदी पूर्ण श्रद्धेने आणि आदराने नमस्कार करीत! 
                      मग हा सोमवारचा उपवास का? तोही इतका कडक का? आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती का करते? बरं मी मोठी होईपर्यंत त्याला बरेच धार्मिक स्वरूपही आले होते. आई(आजी) म्हणे शंकराचा उपवास आहे, एकदा केला की सोडता येत नाही, कायमच करावा लागतो. बाकी उपवासाचे उद्यापन करून, ते थांबवता येतात. पण सोमवारचे तसे नाही वगैरे वगैरे. पण बाबा हे सगळे मानणाऱ्यातील नव्हतेच कधी. कितीतरी कठीण प्रसंगांना तोंड दिले, पण अगदी धीराने! कधीही देव वगैरे चा आधार घेतला नाही. पण ते सुद्धा हा सोमवारचा उपवास करीत होते, अगदी कडक!
                       हे लिखाण चालू केले तेव्हा ते या जगात नव्हतेच. त्यामुळे त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणे शक्यच नव्हते . पण या ना त्या कारणाने दादा(माझे वडील) आणि बाकी मंडळींशी चर्चा होतच असते. असेच एकदा दादांशी चर्चा चालू असतांना, हा विषय निघाला. मग मी त्यांना विचारले, हे असे कसे? का हा उपवास? वगैरे वगैरे. मग त्यांनी या सोमवारच्या कडक  उपवासाचा उगम आणि गोष्ट सांगितली. ती गोष्ट मनाला आणि बुद्धीला नुसती पटलीच नाही, तर आणखी या एका गोष्टी मुळे बाबांबद्दलच्या अभिमानाने उर भरून आला! मनोमन त्यांना आदरपूर्वक वंदन करून, त्यांना एक घट्ट मिठी मारली! कारण त्यांनीच हा सोमवारचा कडक उपवास आमच्या घरात चालू केला होता! मधल्या काळात वसतिगृहातील रहिवास आणि आता बऱ्याच काळानंतर तब्बेतीच्या कारणांनी सोमवारचा उपवास मधेच खंडित झाला होता, आता कायमचा सुटला. त्याबद्दल अधून मधून मनात विचार येत, कधी थोडी भीती सुद्धा वाटे, पाप लागेल का? वगैरे वगैरे. पण ही गोष्ट ऐकली आणि आभाळ एकदम स्वच्छ आणि निरभ्र झाले! छान "झाले मोकळे आकाश" चा अनुभव आला. सगळी भीती पळून कुठल्या कुठे गेली. 
                    "जय जवान, जय किसान" हा नारा सगळ्यांनाच माहितीचा, माझ्या सुद्धा माहितीचा. पण या निमित्ताने मला याचा खरा आणि नीट अर्थ कळला. मला जसा आणि जितका समजला तितका सांगण्याचा प्रयत्न करते. शास्त्रीजी पंतप्रधान झाले तो काळ फार संघर्षाचा होता. चीनशी झालेल्या युद्धात, देशाचे प्रचंड नुकसान झालेलं होते. उद्योगधंदे हेलकावत होते, बेरोजगारीचे प्रमाण वाढत होते, लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत होती. त्यातच भारत पाकिस्तान युद्धाला तोंड फुटले. भारतातील अन्नधान्यांचा साठा वेगाने कमी होत होता. गहू आणि इतर धान्याची अमेरिकेकडून मदत घेणे, हा एक उपाय त्यांच्या समोर होता. पण त्यासाठी अमेरिकेच्या जाचक अटी स्वीकारण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यावेळी जनतेला संबोधित करतांना घोषणा केली "जय जवान, जय किसान."  ज्याप्रमाणे हातात बंदूक घेऊन आपले जवान शत्रूशी लढत आहेत, त्याप्रमाणे शेतात राबणारा शेतकरी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे हा संदेश दिला! क्षणभर थांबा आणि आजही विचार करून बघा, किती मोलाचा आणि आजही लागू पडणारा संदेश त्यांनी दिला. 
                      यासोबतच जनतेला एक महत्वाचे व्रत सांगितले "एक वेळ उपवास पाळण्याचे व्रत." ते आपल्या भाषणात म्हणतात, "हमें भारत का स्वाभिमान बनायें रखने के लिये देश के पास उपलब्ध अनाज से ही काम चलाना होगा. हम किसी देश के आगे हाथ नहीं फैला सकते. यदी हमने किसी देश द्वारा अनाज देने की पेशकश स्वीकार की तो यह देश के स्वाभिमान पर गहरी चोट होगी. इसलिये देशवासियों को सप्ताह में एक वक्त का उपवास करना चाहिए. इससे देश इतना अनाज बचा लेगा की अगली फसलं आने तक देश में अनाज की उपलब्धता बनी रहेगी." 
                     जवानांना अन्नधान्य पुरावे म्हणून, त्यांच्यासाठी जनतेने आठवड्यातून एक वेळ उपवास ठेवावा. हे जनतेला सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतःही याचे पालन केले. पंतप्रधान निवासात सुद्धा आठवड्यातून एक वेळ अन्न शिजत नसे. देशभरात याचा परिणाम झाला. शहर असो की खेडे, प्रत्येक घरात सोमवारी किंवा मंगळवारी एक वेळेचं जेवण शिजले नाही. आपलं रक्षण करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी, गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाने उपवास केला. शास्त्रीजींच्या या कल्पनेला हिंदीत "अनाज यज्ञ" म्हणून ओळखले जाते. आजही अनेक घरात हा उपवास केला जातो . त्यातीलच एक घर म्हणजे, "चौधरी सदन!" 

जयहिंद!!!
भारत माता की जय!!!

©आनंदी पाऊस 
(घरातील गमती जमती)
३१ मे २०२१





मुख लिंग , उदयगिरी , मध्य प्रदेश 
पाचव्या शतकातील आहे  



मुख लिंग , उदयगिरी , मध्य प्रदेश 
पाचव्या शतकातील आहे 



मूर्ती लहान , पण कीर्ती महान !
लाल बहादूर शास्त्री 
(भारताचे दुसरे पंत प्रधान)







Comments

  1. जनार्दन चौधरीJune 04, 2021 11:19 am

    शब्दांकन लय भारि आहेच पण आशय पण तडपदार मांडला गेला आहे

    ReplyDelete
  2. Replies
    1. अरे व्वा!! खूप सारे मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  3. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  4. Khup ch chhan aahe

    ReplyDelete
    Replies
    1. सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  5. Khup sunder mahiti somavar upavas chi v tuzya lahanpanichya sarv aathavani likhanatun samjatat
    Photos pan chan

    ReplyDelete
    Replies
    1. माझ्या ब्लॉग च्या  नियमित वाचकांपैकी तू एक आहेस , फारच आनंद होतो मला नेहमीच तुझे अभिप्राय वाचून ! खूप सारे प्रेम !!🤩😍

      Delete
  6. Khupach chan lekh 👌👌

    ReplyDelete
  7. Khoopach chan varnan 👌
    Kharach Upwas karnamagil udesh, nichay 👍

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  8. Greatच अँड hats off you all.उपवास व त्या मागच्या भावना,श्रद्धा उत्कृष्टरीतीने मांडलेले आहे.
    अनाजयज्ञा ची संकल्पना माला आपल्या लेखातुनच प्रचितीस
    आली.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम धन्यवाद संजिता !! आणि मला या सगळ्या गोष्टी आमच्या या वारसा लिखाणामुळे कळल्या ..... 🙏🤩😇

      Delete
  9. बापरे मला तर यातले काहीच माहीत नव्हते सोमवार करण्यामागील उद्देश!
    बाबांना खरेच मानले. खरे देशभक्त.
    लेख लय भारी.

    ReplyDelete
    Replies
    1. हं ....  लिखाणामुळे मला आणि आपल्या सगळ्यांना आपल्याच कुटुंबाबद्दल आणि आपल्या माणसांबद्दल कितीतरी गोष्टी माहिती झाल्या .  सगळ्याबद्दल चंद्रमोहन सरांचे किती आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत ! 
      in a way we all are blessed soul !!😇😇🤩

      Delete
  10. रंजना राणेJune 06, 2021 10:39 am

    मी आज सोमवार ची कहाणी वाचली मला तर खूप खूप आवडली तसा माझा इथे दर आठवड्याला सोमवारचा उपास असतो त्यामुळे खूप भावलं म्हणाला खरंच खूप खूप खूप छान (सोमवारची कहाणी��������

    ReplyDelete
    Replies
    1. वावा , छानच ! खूप खूप सप्रेम धन्यवाद !🙏😇

      Delete
  11. डॉ रा श्री मोरवंचीकरOctober 02, 2023 7:47 am

    Chhan Chhan. Uttareshwar Mandira paithan, there the Shiva icon is shown with five mukhalingas !!🙏🏻👌👣

    ReplyDelete
  12. दिलीप बलसेकरOctober 02, 2023 12:43 pm

    छान

    ReplyDelete
  13. आपले आजोबा खरे देशभक्त होते. माझ्या बाबांनी असाच देशाभिमान होता ताई.

    ReplyDelete
  14. भारती फेगडेOctober 02, 2023 3:52 pm

    खुप सुंदर, असे काही होते हे माहिती नव्हते

    ReplyDelete
  15. तृप्ती पाटीलOctober 03, 2023 7:05 am

    👌👌👌 khupch chan

    ReplyDelete
  16. उदय बोरगावेOctober 02, 2024 8:49 am

    👍👍
    छान लिहिलय...
    "साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण"
    देशप्रेमाचे एक अद्भुत व उत्तम उदाहरण...

    ReplyDelete
  17. *👍Great Leader ... Respected Follower's...... Loving new generation following the foot prints of predecessors.👌🌹*

    ReplyDelete
  18. मंदा चौधरीOctober 02, 2024 3:52 pm

    खुप छान लिखाण केले.त्यावेळी सर्व भारतभर युध्दामुळे देश भक्तीची गाणिपण म्हटली जायची .आणि देशात शास्त्रीजींच्य घोशणांचाही परिणाम होता.सर्व लोक उपवास करत .त्यावेळच्या आठवणि ताज्या केल्या तुझ्या लेखाने .लेख खुपचं छान झालेला आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...