Skip to main content

ताम्हण .........जारुल (काही अनुभवलेलं.....)

 ताम्हण .........जारुल 

(काही अनुभवलेलं.....)


                                                                          किती सुंदर शब्द आहेत दोन्ही . एकाच फुल झाडाची दोन नावं .दोन रंगाची फुलं येतातं ... गडद गुलाबी आणि फिकट जांभळा ( लव्हेंडर ) . दोन्ही रंगछटा  खूपच मोहक आणि माझ्या खूप आवडीच्या . .. आणि अख्ख झाड या रंगाच्या फुलांनी बहरलेले असते . आता (म्हणजे साधारण मार्च शेवटापासुन ते मे पहिल्या आठवड्यापर्यंत) त्याचे बहरण्याचे दिवस ... 
                                                                         ताम्हण - महाराष्ट्राचे राज्य फुल. हे महाराष्ट्रात असे पर्यंत माहीत नव्हते . एव्हढेच काय पण हे झाड महाराष्ट्रात असे पर्यंत पाहिल्याचे सुद्धा नीटस आठवत नाही . ताह्मणाशी माझ्या मनाचे आणि हृदयाचे नाते जुळले ते कर्नाटकात .... ! आणि माझ्या मना-हृदयाचा एक कप्पा कायम बहारदार ठेवते ताम्हण !!!
                                                                        माझी अगदी लहानपणापासूनची सवय आणि आवड ---- झाडाखाली पडलेल्या फुलांच्या सड्याची फुल वेचून गोळा करणे . खूप  मनापासुन आवडायचे हे सगळे . अगदी लहानपणापासून ते या क्षणापर्यंत ! बऱ्याच आवडी निवडी बदलल्या माझ्या ... पण ही आवड मात्र अजुन तशीच आहे . आणि मुख्य म्हणजे ही आवड मला अजूनही जोपासता येतेय !!! याचे मुख्य कारण म्हणजे मी सध्या कर्नाटकात राहते . आणि इथे कायमच कुठले नी कुठले मोठाले वृक्ष फुलांनी पूर्ण बहरलेले असतातच ! जय कर्नाटक माते !!!
                                                                       हल्लीच्या जगात सगळ्याच गोष्टींकडे बघण्याचे दृष्टिकोन फारच बदलले आहेत . तसेच फुलांकडे बघण्याचे सुद्धा . तुम्ही एखाद्या फुलवाल्या कडे जाऊन महागडे पुष्पगुच्छ विकत घेता , तेव्हा लोक तुमच्याकडे कौतुकाने बघतात आणि त्यावरून तुमची समाजातली पत सुद्धा उच्चं ठरते . पण याउलट मी जेव्हा जेव्हा झाडाखाली रस्त्यावर पडलेली फुल वेचते , गोळा करते तेव्हा तेव्हा खूप वेगवेगळे छान आणि विचित्र दोन्हीही प्रकारचे अनुभव येतात मला . ते एक एक अनुभव सविस्तरपणे त्या त्या फुलांविषयी किंवा जसे उल्लेख येतील तसे सांगेनच . 
                                                                     आजचा दिवस ताम्हणाचा ....... जरुलचा !!!
                                                                     माझ्या मॉर्निंग वॉक च्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर एके ठिकाणी दोन्ही बाजूनी ओळीने ३-४ ताम्हणाची झाड आहेत , फिकट जांभळ्या ( लव्हेंडर ) रंगाची . रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान फिकट जांभळ्या रंगाच्या फुलांच्या पायघड्या अंथरलेल्या असतात निसर्गानं ... आणि अर्थातच रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी बंगले आहेत . तिथेच एका झाडाखाली मी माझी दुचाकी पार्क करते आणि जेव्हढी म्हणून ताजी फुल पडलेली असतील ती वेचून गोळा करून घेते . काहीवेळा  कुणी एक गृहस्थ आजुबाजुला उभे असतं . ते त्यांच्या बाजुला पडलेली जी काय दोन-तीन फुलं असतं ती उचलुन मला देतं . काही फोटो काढते खाली पडलेल्या फुलांचे  आणि झाडावरच्या फुलांचे सुद्धा . आणि मोठा खजिना मिळाल्याच्या आनंदात घरी येते . मग सगळं घर त्या फुलांनी आणि त्या रंगांनी सजून जातं . छान वाटत असतं घरात वावरायला ..... दिवसभर ....... छान रंगीत आनंद भरून राहतो घरात ....... !
                                                                     कालही सकाळी तसेच केले . दुचाकी पार्क केली . आणि फुलं  वेचायला लागले . तेव्हढ्यात त्या बंगल्याचे दार उघडून एक बाई बाहेर आल्या . त्यांच्या हातात ताम्हणाच्या झाडाची फुलं असलेल्या काही फांद्या होत्या . त्यांनी त्या मला दिल्या आणि विचारले काय करता या फुलांचे ? मी रोज बघते तुम्हाला ही फुलं वेचताना . त्यांना मनात कदाचित वाटले असावे , बाई तर बऱ्या घराची वाटते , तरी अशी रस्त्यावरची फुलं काय वेचून नेते . थोडे पैसे खर्च करून विकत का घेत नाही ?!!?  आणि रस्ता किती घाण असतो किंवा अजून काय काय . म्हणुन त्यांनी झाडाच्या काही फांद्याच तोडून आणल्या असाव्यात माझ्यासाठी . मी सांगितले त्यांना फार काही नाही , घरात छान वेगवेगळ्या काचेच्या भांड्यात पाणी घालून त्यावर रचून ठेवते . त्यांच्या कडून त्या फांद्या घेऊन , त्यांचे आभार मानून घरी परतले . पण मनाला हे सगळे काही फारसे रुचले नाही. एक तर सडा पडलेली फुलं वेचून गोळा करण्यात जो आनंद मिळतो , तो त्यात काही मिळाला नाही आणि त्या फांद्यांना फुलं कमी आणि कळ्याचं जास्त होत्या . फारच अस्वस्थ वाटले ते बघुन . पण आता काहीही उपयोग नव्हता . त्यांना जर त्या फांद्या तोडतांना पहिले असते , तर मी त्यांना त्या तोडुच दिल्या नसत्या .  
                                                                  घरी आले तरी ती सगळी अस्वस्थता होतीच . फुलं काढून छान पैकी मोठाल्या काचेच्या भांड्यात पाणी घालून ठेवली . पण त्या कळ्या काही गप्प बसू देई ना . खुपच अस्वस्थ करीत होत्या . फेकाव्याश्या सुद्धा वाटेना . बराच वेळ तसाच अस्वस्थ मनःस्थितीत गेला . आणि मग एकदम मनात काही वेगळेच आले .  फुलांच्या पाकळ्या , कळ्या आणि त्या सोबतच काही फुलांच्या पाकळ्या गळून गेलेले देठं शिल्लक होते . त्या सगळ्या गोळा केल्या , दोन तीन डिनर प्लेट्स घेतल्या . आणि हे सगळे वापरून छानश्या रचना केल्या त्या डिनर प्लेट्स मध्ये ...... आणि मग संपूर्ण फुलांच्या रचने पेक्षा ह्याच रचना खूप छान दिसू लागल्या , कळ्या , पाकळ्या आणि फुलांचे देठ वापरुन केलेल्या ! 
                                                                   मनाला , हृदयाला , आत्म्याला आणि मेंदूला सुद्धा एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळाले ! सगळी अस्वस्थता आणि चलबिचल कुठल्या कुठे पळून गेली ......... 

 ©आनंदी पाऊस 
 (काही अनुभवलेलं.....)
५ एप्रिल २०१९



ध्वनीफित 



गुलाबी ताम्हणाचे फुल 



गुलाबी ताम्हणाचे बहरलेले झाड 




गुलाबी ताम्हण 






याच त्या फुलांच्या फांद्या 



घरात ठेवलेली ताम्हणाची फुलं 



घरात ठेवलेली ताम्हणाची फुलं 






ह्याच त्या रचना 
उरलेल्या पाकळ्या , देठ आणि कळ्यांच्या 



ह्याच त्या रचना 
उरलेल्या पाकळ्या , देठ आणि कळ्यांच्या 



दुसऱ्या दिवशी सुकून गेल्यावर सुद्धा 
किती छान दिसत होत्या त्या रचना !!!































Comments

  1. Kharach Khup sundar distat his ful. Mazya college mdhe pn ahe zad. Baharl ki khup sundar dist.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय पूर्ण बहरलेले झाड फारच सुंदर दिसते !! 🌸🌸🌸🌸

      Delete
  2. स्वाती प्रभुणेOctober 16, 2020 1:01 pm

    खूप मस्त. खरेच लोकांचा बघण्याचा वेगवेगळे दृष्टिकोन ताम्हण फुल मस्तच आहे पारिजात चा सडा अलगत हाताने गोळा करायची खूप मस्त सुंदर दिसतात . पण ती लगेच कोमेजतात . बकुळ फुले अशी फुले वेचायला मला खूप आवडतात बुचाची फुल वास मस्त असतो मिलिद ला आवडतात त्याला बस वर घ्यायला जायचे तेव्हा वेचायचे निशिंगध च्या जातीतील असते वासा त थोडे साधर्म्य असते खूप आठवणी जाग्या झाल्या मस्त लिहल आहे

    ReplyDelete
    Replies
    1. 😁😁😁गाढवाच्या गोष्टीवरून धडा घ्यावा आणि आपल्याला बरोबर वाटेल , आपल्याला आनंद वाटेल ते करावे ! लोकांना काहीही वाटू दे , आपण आपली फुल गोळा करावी वेचावी आणि आपला आनंद मिळवावा 🌺🌸🌸🏵🌹🌺🌻🌼🌷

      Delete
  3. 👌khoopach chan phoole . Mi kadhich nahi bhaghitali attaparaiyt
    Phoolancha rachana sunder ani kharach manala vegalach aanad detat

    ReplyDelete
    Replies
    1. खूप मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद !😍🤩😇

      Delete
  4. mast ������

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद🙏🤩😍

      Delete
  5. Khup chan..��

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🤩🤩🤩

      Delete
  6. रेखा अत्तरदेOctober 16, 2020 7:09 pm

    खूप छान आहे फूलांचा रंग ������

    ReplyDelete
    Replies
    1. हो ग , मला सुद्धा खूप आवडतात हे दोन्ही रंग खूप !!🌸🌸🌸

      Delete
  7. Mast���� flowers ani mahiti donhi������

    ReplyDelete
    Replies
    1. खूप मनःपूर्वक धन्यवाद प्राजक्ता 🤩😍

      Delete
  8. खूपच सुंद ताम्हण चे फुल पहिल्यांदाच नाव ऐकलं फुलांचा कलर खूप सुंदर आहे आणि तुम्ही त्याची केलेली रचना अतिशय सुंदर नवीन माहिती मिळाली

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपुर्वक धन्यवाद !🙏🙏😊

      Delete
  9. आल्हाददायक‌ लेख आणि वर्णन.. &
    too Gorgeous ताम्हण..मी पहिल्यांदा ही फुले पाहीली.
    रूप पाहता..गुलाबी-जांभळ्या रंगाच्याछटा माला अर्धपारदर्शक काचेसारखी भासते.
    I liked geometry composition of the flowers it's gives me glimpse of "glassmosiac".
    I will try 'निसर्ग चित्र' of this flower.

    ReplyDelete
    Replies
    1. तू केलेलं वर्णन जास्त आवडले मला ! निसर्ग चित्राची आतुरतेने वाट बघतेय ! खुप सारे प्रेम !😍🥰🤗

      Delete
  10. Khupach chan ahet taman chi phule ...colour hi chanach ahe ani varnan aprtim keley tai

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे प्रेमळ धन्यवाद !! 🌸🌸😍

      Delete
  11. खूपच सुंदर मनमोहक दिसते हे झाड फुले असताना.आणि तुझी फुलांची आवडही खप छान.ह्या फुलांमध्ये तुझा dp पण होता. फुले वेचल्यावर हातही सुगंधी होतात.खूप वेळ छान वाटत राहते.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे प्रेमळ धन्यवाद!!! 🌸🌺🤩😍

      Delete
  12. गीतांजलीNovember 17, 2020 3:25 pm

    मस्त ग वर्षाली
    पुष्परचनाही छान
    छोटी बेंगलोरची भटकंतीही छान
    आणि हे मराठी नावाचे झाड आहे हे इतके दिवस माहितीच नव्हते. मी त्याला परदेशी झाड समजतेय।इतके दिवस
    आठवण आली बेंगलोरची
    I miss it so much
    आणि गाडी थांबवून फुलं उचलायचा मोह मलाही खूप वेळा होतो
    आता उचलणारच
    सध्या बुचाची फुलं खूप पडतायत गल्लीत
    मला खूप आवडतात

    ReplyDelete
    Replies
    1. होत अस बर्‍याचदा. ..
      बुचाचे फुल माझ्या सुद्धा खुप आवडीचे
      मी तर दररोज गोळा करून आणते ही फुलं
      नक्की गोळा कर, खुप छान वाटेल तुलाच!!
      सप्रेम धन्यवाद 😍 😇

      Delete
  13. Khup chan diste..Mann prasann houn jate ase baharlele zaad bghun..🤗 mi pan Bangalore la aalyavar ch anubhavle😄

    ReplyDelete
  14. खुप सुंदर आहे लेख आणि फुले

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  15. मंदा चौधरीApril 12, 2024 9:38 pm

    मला आताच कळते आहे हे झाड महाराष्ट्राचे राज्याचेझाड आहे.मीतर अजून सुध्दा पाहिलेले नाही.लेख खुपच सुदर रंगला आणि फुले व फुलाच्या रचना मस्तच आहे.

    ReplyDelete
  16. स्वाती चौधरीApril 12, 2024 9:40 pm

    खूप छान आहे ताम्हण फुले रंग किती गोड आहे

    ReplyDelete
  17. गुलाबराव पाथरकरApril 12, 2024 9:42 pm

    आनंद घ्यायची कला अवगत असलेल्या व्यक्तीला पावलोपावली आनंद गवसत असतो .

    ReplyDelete
  18. विकास गायकवाडApril 12, 2024 9:43 pm

    👌👌👌👌💐💐🌹🌹sundar sakali fule pahun man prasann zale . 🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  19. सावंत सर के के मुस संग्रहालयApril 12, 2024 9:46 pm

    Khupach sunder...👌🏼👌🏼👌🏼😊 Jagnyawar prem karaycha ha tumcha andaz mala khup bhavto....
    Shubheccha!!! 🙏😊

    ReplyDelete
  20. मनिषा कुलकर्णीApril 12, 2024 9:48 pm

    किती सुंदर लिहिले आहेस ..
    माझ्या ऑफिस च्या दारात बुचाच्या फुलांची झाडे .. ती फुलली की मी फुले गोळा करत असे व माझ्या डेस्क वर ठेवत असे . नुसते पाहून ही किती समाधान .. मला फुले वेचताना पाहून बरेच जण हसत .. एकदा त्यांनी चिडवले.. मी त्यांना शांतपणे म्हणाले .. तुमच्या हास्या पेक्षा हे झाड किती सुंदर हसते .. तेच गोळा करते मी जगण्यासाठी ..
    नंतर सर्वांना सवय झाली .

    आपण अगदी सारख्या वेड्या आहोत

    ReplyDelete
  21. ये खूप भारी! आणी‌ Ek numberच...
    महाराष्ट्राचे राज्य झाडांची फुले बंगळुरू मध्ये वेचताना चे आपल्या अनुभवाची "ध्वनिफीत ऐकताना ,ताम्हण वर्णन पाहताना.. अगदी आल्हाददायक वाटतं अगदी ताम्हण पुष्प रंग गुलबक्षी रंगासारखा...
    ताम्हण फुलांची आपण केलेली सर्व रचनाकृती माला फार आवडली.
    Landscape चा Syllabus design करत असताना..ताम्हण फुलांबद्ल बरंच Discussion जाहले. तेव्हाची मजा‌ आताही येत आहे.- संजिता

    ReplyDelete
  22. ताम्हण ची फुलं खूप छान आहे.या फुलाचे विविध रंग आज मला बघायला मिळाली आहेत.अप्रतिम लेख लिहिला आहेस.

    ReplyDelete
  23. प्राध्यापक अरुण पाटीलMay 07, 2024 6:10 pm

    कुणाला गुलाब, कुणाला मोगरा, कुणाला कुंदकळ्या, तर कुणाला जास्वंदीची फुले आवडतात. साहजिकच ज्याची त्याची आवड आहे ही. टवटवीत अशी लाल, गुलाबी, पिवळी, केशरी गुलाबाची फुले, मोहक असा सुवास असलेला मोगरा, गणपतीला वाहायलायला म्हणून आकर्षक अशी जास्वंदाची फुले लोकांना किंवा भक्तांना आवडली नाही तरच नवल!
    परंतु तुम्ही काहीही म्हणा, मला बाकी आवडतात ती फक्त सदाफुलीची फुले. पांढरी किंवा गुलाबी बस. बिचाऱ्या फुलझाडांना ना सुपिक जमीन लागते, ना काही खतपाणी ना फारशी निगा. पावसाळा असो, हिवाळा असो, की उन्हाळा, सदाफुलीची झाडे आपल्या सीमित अश्या वैभवाने सतत हसत, डुलत असतात.
    आपण हौसेने निरनिराळी गुलाबाची झाडे लावली तर शेजारीपाजारी आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची नजरच नव्हे तर हातही त्या फुलांपर्यंत पोहोचतात आणि ती फुले केव्हा गायब होतात याचे बिचाऱ्या मालकाच्या लक्षातही येत नाही. मोगऱ्याची फुले उन्हाळ्यातच पण झाडाला भरपूर येतात म्हणून तीही देवांना वाहण्याकरता केव्हा गायब होतील याचा नेम नसतो. चोरीचा पैसा पचायलाही हलका असतो, तशी चोरीची फुलंही अशा फुल-चोरांना धार्जिणी असतात. आमच्या कांपाऊंडमध्ये एक कुंदकळ्यांचे झाड आहे. हिवाळ्यात पानोपानी कळ्या बहरलेल्या असतात. शेजारच्या गल्लीतली आजी सकाळी सकाळी आम्ही उठायच्या आत येते आणि सर्व कळ्या गायब करून जाते, उरते फक्त झाड आणि हिरवीगार पाने! तिला कितीही सांगा, बोला काही फरक पडत नाही. देवाच्या निमित्ताने घेऊन जाते आणि तिकडे कळ्यांचे हार करून विकते असे आमच्या ऐकिवात आहे.
    बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या शेजारच्या प्लॉटमध्ये असलेला भाडेकरूचा एक मुलगा सायकल शिकत होता. तो बहाद्दर त्याच्या सायकलीला शोभा म्हणून सरळ चार-पाच गुलाबाची फुले अगदी बिनधास्त घेऊन जायचा! भिडस्त स्वभावामुळे आमची बाकी शोभा व्हायची. आता आमचा परिसर जरा सुधारला आहे पण वयोमानाने आम्ही बिघडलो आहोत, म्हणून आम्ही ठरवलं आहे की झाडं लावायचीच तर फक्त सदाफुलीचीच! त्यानुसार आम्ही कृतीही केली आहे. या एकदा आमच्याकडे आणि बघा, सर्व दूर पांढरी आणि गुलाबी सदाफुलीची फुलेच फुले आपल्या दृष्टीस पडतील. तुम्हाला खूप खूप आनंदही वाटेल, तोडायची इच्छा जरी झाली तरी आणि आम्ही फुले घेऊन जा म्हटले तरी तुम्ही ती फुले येणार नाहीत. सदाफुलीची झाडे सर्व दूर लावून ठेवली असल्यामुळे आम्ही आता त्यांना अगदी नियमितपणे पाणी वगैरे घालतो आणि बिनधास्तपणे घरात वावरतो.
    केंव्हा केंव्हा खिडकीतून बाहेर डोकावतो, तेव्हा उगीचच लोक आमचा बगीचा पाहून नाकं मुरडत असल्याचा भास होतो. आम्ही मात्र सदाफुली सारखे सतत हसत, डोलत दिवस काढतो. येताना मग आमचा बगीचा बघायला. अगदी जरूर या,पण फोन करून या म्हणजे आपल्या खातिरदारीत काही कमी पडणार नाही. 🤗

    ReplyDelete
  24. सीमंतीनी चाफळकरApril 25, 2025 11:08 am

    खूप सुंदर लिहिलंस..

    कॅालेजमधून परतताना बुचाची फुले वेचून गुंफलेल्या वेण्या अजून डोळयासमोर आहेत.

    देव तुला आयुष्यात फुलं वेचायसाठी खूप सवड देवो

    आमेन

    ReplyDelete
  25. उदय बोरगावेApril 27, 2025 2:28 pm

    ही फुले पाहिली होती....
    पण त्यांची नावे नव्हती माहीत...!!या लेखामुळे कळली. (पण शेवटी नावात काय आहे?)
    त्यांचे रंग, दिसणे, बहरणे सर्वच मनमोहक असते...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...