हरतालिका
(घरातील गमती जमती)
गच्चीवरच्या लेखांची सुरवात कोजागिरी - गुलाबाई म्हणजे शंकर-पार्वतीच्या उत्सवाने झाली आणि आता घरातील लेखांची सुरुवात सुद्धा हरतालिका म्हणजे शंकर पार्वतीच्या व्रताने सुरुवात झालीये . केवळ योगायोग , ठरवून असे काही नाही . गॅलरीतील लेख लिहून झाले आणि पहिला लेख लिहायची वेळ आली आणि हरतालिका - गणपती तोंडावर आलेले मग वाटले हरतालिकेनेच सुरुवात करावी !
हरतालिकेच्या पूजेच्या तयारीची सुरुवात ४-५ दिवस आधीच होत असे . सगळ्यात महत्वाचे आणि पहिले काम , ते म्हणजे गुरुजींकडे जाऊन सकाळी लवकरची वेळ ठरवून येणे . कारण त्या दिवशी त्यांना खूप घरी जाऊन पूजा सांगायची असे . पण आमचे गुरुजी ठरलेले आणि पूजेची साधारण वेळ सुद्धा . या गुरुजींच्या जवळ जवळ तीन पिढ्यांनी आमच्याकडे वेळोवेळी येऊन सगळ्या प्रकारच्या पूजा, अगदी लग्न कार्यापर्यंत सगळे पार पाडले . अगदी आमच्या लग्नाचे विधी सुद्धा यांच्याच पुढच्या पिढीने पार पाडलेत . आता मात्र बदललेत गुरुजी आमच्या घरचे . तर सगळे साधारण ठरलेले असे, पण तरी वेळेवर गोंधळ नको म्हणून चार-पाच दिवस आधीच त्यांच्याकडे जाऊन त्यांना आमंत्रण वजा आठवण करून दिली जात असे . चौधरी सदनापासून अगदी शंभर मीटर वर त्यांचे घर होते .
दुसरे महत्वाचे म्हणजे 'फुलपत्री' . दोन दिवस आधीपासून फुलपत्री गोळा करण्याचे काम चालू होई . ज्यांच्याकडे या पूजेला लागणारी फुलपत्री असे त्यांना आधीच सांगितलेले असे , आम्ही येऊन तोडून घेऊन जाऊ . थोडक्यात आरक्षण सगळ्या गोष्टींचे ! मग मम्मी लोक आणि त्यांच्या बरोबर आम्ही मुली , दोन दिवस आधी पासून सगळीकडे फिरून ही फुलपत्री गोळा करून आणत असू . सगळ्यात महत्वाचे म्हणजे बेलाची पानं आणि पांढरी फुल , शंकराला अती प्रिय असणारी . या बरोबरच गोकर्णाचे निळे फुल सुद्धा शंकराला अतिप्रिय . का? याचे उत्तर आजतागायत माहिती नाही मला . बेलाची पानं सुद्धा तीन एकत्र असलेलीच आणि नशीब फारच चांगले असले तर पाच पानांचे सुद्धा मिळे बेल , कोण आनंद होत असे मग त्याचा ! मग बाकी दुर्वा आणि इतर बऱ्याच प्रकारची पत्री म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पानं सुद्धा लागत . हे काम फार आधी करता येत नसे , कारण घरात फ्रीझ नसल्याने ही फुलपत्री पूजेच्या दिवसापर्यंत टिकवणे फार कठीण . बरं आदल्या दिवशी गेलो बाजारात आणि आणली असेही करता येत नसे , कारण आजच्या सारखी फुलं बाजारात विकत मिळत नसतं . मग दोन दिवस आधीपासून हे काम चाले आणि ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवून ही फुलपत्री टिकवली जात असे .
पूजा करतांना वहायला फुल लागतंच . पण बाकी सजावटीचा भाग म्हणूनही बरीच फुलं लागतं . ही पूजा म्हणजे खोलीच्या मध्यभागी चौरंग ठेवला जात असे . त्यावर पूजा मांडली जात असे . मग या चौरंगाला चार कोपऱ्यांना बांधायला चार केळीचे खांब , चारही बाजुंनी गुंडाळून बांधता येईल असे आंब्याच्या पानांचे तोरण आणि सगळ्यात छान आणि माझ्या आवडीचा भाग म्हणजे येऊ मोठ्ठा हार तयार केला जाई , साधारण सात-आठ फुट लांबीचा . त्याच्या एका टोकाला जास्वदींचे फुल किंवा फुलं आणि दुसऱ्या टोकाला थोडा लांब दोरा सोडला जाई . हा दोरा असलेले टोक छताला बांधले जात असे , जेणे करून तो हार खाली मोकळा सोडला की ते जास्वदींचे फुल त्या पूजेच्या चौरंगाच्या बरोब्बर मध्यभागी येई . साधारणपणे हा हार चांदणीच्या फुलांचा फरगच्चं हार असे आणि खाली ही लालभडक फुल . फारच सुंदर दिसत असे ते सगळे . हा हार तयार करायला घेतल्यापासूनच मला फार भारी वाटत असे . पण दुसऱ्या दिवशी पूजा आवरली जाई आणि हा हार सुद्धा काढून टाकला जाई , फारच वाईट वाटे मला तेव्हा . काढूच नये असे वाटे , जे अगदीच अशक्य असे आणि दुसरे म्हणजे ती सगळी फुलं सुकून जायला सुद्धा सुरुवात झालेली असे . तसेच पूजेसाठी प्रत्येकीचे ताट तयार करावे लागे , आदल्या दिवशी रात्री . या ताटात ,हळद , कुंकू , अक्षता , फुल-पत्री सगळ्या प्रकारची आणि कापसाची घरी बनवलेली वस्त्र . ही वस्त्र करतांना आणि तयार झाल्यावर बघण्यात मला खूप आनंद मिळे , अगदी बघतच राहावेसे वाटे त्याकडे .
आणि तिसरा महत्वाचं काम म्हणजे आजूबाजूच्या ज्या कुणी बायका पूजेला येत असतं ,आदल्या दिवशी संध्याकाळी त्या सगळ्यांच्या घरी जाऊन पूजेची वेळ म्हणजे गुरुजी येण्याची वेळ सांगून यावी लागत असे . जेणे करून त्या सगळ्या दुसऱ्या दिवशी पूजेला वेळेवर येत . हे काम आम्हा मुलींचंच , कारण चौधरी सदनच्या आजुबाजुच्याच सगळ्या बायका येत , त्यांच्या घरी आम्ही एकट्या जाऊन वेळ सांगून येऊ शकत असू .
मग पूजेचा दिवस ! कोण लगबग चाले त्यादिवशी पहाटे पासूनच लवकर उठण्यापासूनच . मी स्वतः त्यावेळी फार लहान होते , त्यामुळे तेव्हा मी पूजा आणि उपवास करण्याचा प्रश्नच येत नव्हता . पण आजतागायत मी ही पूजा आणि हा उपवास कधीही केलेला नाही . मग पूजा करणाऱ्या बायकांच्या अंघोळी त्याही न्हाऊन आणि घरातील बाकी काम आटोपण्याची घाई . पुरुषांची सगळी काम करून देऊन त्यांना मार्गी लावणे . मग या सगळ्या त्या दिवशी छान ठेवणीतील साड्या-पातळ नेसतं , दागिने घालतं , केसांत छान गजरे किंवा फुलं माळत मिळेल त्याप्रमाणे . फारच छान,प्रसन्न आणि उत्साही वाटे त्यादिवशी . मग हळूहळू एक एक करून सगळ्या बायका ही येऊ लागत, त्याही अशाच छान तयार होऊन आणि हातात पूजेची ताटं घेऊन !
मग गुरुजीही येऊन दाखल होत आणि ते पूजेच्या तयारीला लागत . त्यात माझ्या सगळ्यात आवडीचा भाग असे . मी तर वाटच बघत असे ते येण्याची . त्यांना थोडी ओली वाळू लागत असे . ही आधीच तयार ठेवली जात असे . मग ते या ओल्या वाळूपासून चौरंगावर छान शिवलिंग आणि बाकी देवता साकारत . काय भारी वाटे ते सगळे तयार करत असतांना आणि तयार झाल्यावर सुद्धा . मी ते सगळं तिथेच थांबून बघत असे . कारण थोडा वेळात पूजा सुरु झाली की हे सगळं पूर्ण झाकून जात असे , त्यावर वाहिलेल्या फुलपत्रीने आणि काही सुद्धा दिसणे केवळ अशक्य . दुसऱ्या दिवशी म्हणावे तर ते सगळे अस्ताव्यस्त झालेले असे . दोन कारणांनी , एक तर पूजेच्या वेळी झालेल्या फुलपात्रीच्या माऱ्यामुळे आणि दुसरे म्हणजे ती वाळू पार कोरडी झाल्याने एकमेकांना चिकटलेले वाळूचे कण एकमेकांपासून सुटे होऊन गेलेले असतं .
अशी ही सगळी पूजेची मांडामांड सुरु असे , कितीही तयारी करून ठेवली तरी हे राहिले , ते राहिले चालूच असे . कुणातरी एकजणला गुरुजींसोबत थांबावंच लागे , त्यांना जे जे हवे ते ते द्यायला . एकदा का पूजेची मांडामांड पूर्ण झाली की मग गुरुजींची घाई चाले पूजा सुरु करण्यासाठी . पण दरवर्षी कुणा ना कुणाला उशीर झालेलाच असे . मग गुरुजींच्या विनवण्या . थांबा थोडा वेळ अमकी यायची बाकी आहे वगैरे वगैरे . मग आलेल्या सगळ्या बायका बसून घेत . त्यांना बसण्यासाठी चारही भिंतींना लागून सतरंज्या घातलेल्या असतं आणि मध्यभागी ही पूजा मांडलेली असे . मग पूजा चालू होई, जवळ जवळ तास दीड तास चाले ही पूजा . आम्ही मुली जरा बाजूला बसून ही पूजा बघत असू . पूजा सुरु असतानाही काय-काय लागतच असे . मग आम्ही पळापळ करून आणून देत असू .
अशी ही सगळी पूजा जवळ जवळ तास दीड तास चालत असे . मग पूजा झाली की गुरुजी सगळ्यांना उखाणे घेण्यास सांगत . मग सगळ्या एकमेकींना आग्रह करत-करत हळू-हळू करत एक-एक जणी उखाणे घेत . मग सगळ्या पाणी पिणार आणि एकीकडे चहाची तयारी चालू असे तर दुसरीकडे गुरुजींसाठी दुधाची . आता सगळ्याजणी जरा निवांत झालेल्या असत पूजा मनासारखी झाल्याने , पण गुरुजी घाईत , कारण त्यांना पुढच्या घरी जायचे असे पूजेसाठी . मग ते लगेच दूध पिऊन पळत पुढच्या घरी .
मग या सगळ्या बायकांचे चहा-पाणी चाले जाम गोंधळ,बडबड, गप्पा , धांदल असं सगळं एकत्र चाललेलं असे . सगळं घर अगदी वेगवेगळ्या आवाजांनी भरून जात असे . मला तर फार छान वाटत असे , या सगळ्याजणींना असे छान तयार झालेले , हसत खेळत गप्पा मारत , आपापली आज सकाळी कशी धांदल उडाली ते सांगत बघतांना . मग यांचे चहा पाणी उरकले की , घराच्या मागच्या बाजूचा रस्ता ओलांडून गेले की समोरच एक महादेवाचे मंदीर होते . खर म्हणजे हे मंदीर अजुनी आहे , पण ते आता गणपती मंदीर झालेय . असो तर छोटेसेच पण छान मंदीर ! जराही बडेजाव नाही की तामझाम नाही . छान छोटासा पांढरा शुभ्र नंदी आणि तशीच पांढरी शुभ्र महादेवाची पिंड ! त्या पिंडीला तांब्याचे नागाचे वेटोळे आणि वर टांगलेले तांब्याचेच अभिषेक पात्र . फार छान वाटे तिथे गेल्यावर , प्रसन्न ! आजच्या दिवशी मात्र गर्दी असे तिथे , सगळ्याच बायका येत ना मंदीरात, अशाच छान तयार होऊन आणि छान प्रसन्न चेहऱ्याने !
एक मला जरा न आवडणारी म्हणण्यापेक्षा भीती वाटणारी एक गोष्ट होती . ती म्हणजे एक साधू बाबा कायमचे इथे बसलेले असतं . केस आणि दाढी मोठ्ठी वाढलेली , कपाळावर आणि अंगावर सर्वत्र भस्म माखलेले . खूप भीती वाटे मला त्यांची .आणि बाहेरही कुठे दिसले तर त्यांचीही . खरे सांगायचे तर अजूनही वाटते . मध्यंतरी चंद्रमोहन सरांनी बरेच साधू साकारले त्यांच्या चित्रांमधून , तेव्हापासून चित्रातल्या साधूंची भीती बरीचशी कमी झालीय .
आजचा दिवस म्हणजे उपवासाचा दिवस . अगदी मीठ सुद्धा खात नसतं त्या दिवशी उपवास करणारी मंडळी . मग त्या साबुदाण्याची गोड खिचडी किंवा खीर करून खात . साबुदाण्याची गोड खिचडी ही संकल्पनाच माझ्या गळी आजतागायत उतरली नाहीये . तिचा वास सुद्धा मला आवडत नसे , खाणे तर फारच लांबची गोष्ट . आजतागायत मी ती चाखून सुद्धा पहिली नाहीये . पण एक मात्र खूप आवडती गोष्ट घरी येत असे हमखास . उपवास म्हणजे फळं हवीतच . या काळातच साधारण सफरचंदाचा हंगाम सुरु होतो . मग या हंगामाची पहिली सफरचंद आज घरी येत . त्यातल्या त्यात ती छोटी छोटी गुलाबी आणि मस्त आंबट गोड चव आणि रवाळ असणारी . खायला तर छानच पण दिवसायालाही काय गोड दिसतात छोटी-छोटी गुलाबी रंगाची !
संध्याकाळी आरती होत असे . मग परत शक्य तितक्या सगळ्याजणी येत , संध्याकाळच्या आरतीला सुद्धा . मग थोड्या फार चर्चा होत रात्रीच्या जागरण आणि खेळांबद्दल . पण हे कधीच झाले नाही .
संध्याकाळी आरती होत असे . मग परत शक्य तितक्या सगळ्याजणी येत , संध्याकाळच्या आरतीला सुद्धा . मग थोड्या फार चर्चा होत रात्रीच्या जागरण आणि खेळांबद्दल . पण हे कधीच झाले नाही .
मग दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा . त्यासाठी गुरुजी परत येत . मगच पूजा आवरली जात असे . गुरुजींना शिधा दिली जात असे . एका सुपात काढून ठेवलेली असे . जसे कणिक , तांदूळ , डाळ , गूळ , साखर , तेल , तूप , आणि सोबत थोडे पैसे , मला वाटते अकरा रुपये सुद्धा नसतील कदाचित . मग पूजा आवरून सगळे स्वच्छ केले की काही काळ जरा मनात वाईट वाटतं असे . पण लगेच बाप्पा येत आणि त्या उत्सवाने घर परत आनंदाने भरून जात असे ......!!!!
©आनंदी पाऊस
घरातील गमती जमती
१ सप्टेंबर २०१९
दुर्वा
निळे गोकर्णाचे फुल
पांढरे गोकर्णाचे फुल
लाल जास्वदींचे फुल
चांदणीची फुलं
तुळशी पत्र आणि मंजिऱ्या
बिल्व पत्र -तीन दलांचे
बिल्व पत्र आणि फळं
कापसाचे वस्त्र
आमचे गुरुजी
पुजेची तयारी
चौरंगावर मांडलेले वाळुचे शिवलींग
पुजा झाल्यावर फुलं पत्रीने
झाकुन गेलेली पुजा
हेच ते मंदीर मागच्या बाजूच्या
मुख्य रस्त्यावरील
पूर्वी महादेव मंदीर होते
आता गणपती मंदीर आहे
मंदिरातील बाप्पा १
Khup chhan
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद ! 🙏😇
Deleteताई खूपच छान लेख खूप आवडला
Deleteनेहमी प्रमाणेच सुंदर लेखन👌👌🙋
सुंदर वर्णन... सोबतच्या फोटो मुळे आणखी छान झालाय लेख.
ReplyDeleteपुश , मनःपूर्वक धन्यवाद !😍🤩😇
Deleteखूप छान!
ReplyDeleteकाकू , सप्रेम धन्यवाद !🙏🥰
DeleteChan varnan tey jaswandache phool madhomadh chaurangavar sodalele 👌
ReplyDeleteHubehub varnan’👍
नेमका मुद्धा नमूद करतेस . मला मनापासून आवडलेला . खूप सारे धन्यवाद !😍💖
DeleteChhan
ReplyDelete🤩😍😇 तुझे खास आभार !!😉
DeleteNavapramanech mangalamay ani prasanna lekh😊👍
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !😍 कोण आपण ?
Deletewa sunder mahiti hartalikechi vachun aamchya pan lahanpanichya aathavani jagya zalyat
ReplyDeletekhup chan
या लिखाणातून मला बालपण परत जगण्याची संधी मिळालीच आहे , प्रत्येक वाचकाला सुद्धा काही क्षण का होईना बालपणात रमता येते आणि तो आनंद परत अनुभवता येतो😇🤩 . तुझ्या आठवणी पण शेअर करत जा थोडक्यात आमच्या बरोबर ..... धन्यवाद !🙏
Deleteछान झाला आहे लेख.
ReplyDeleteनाना , मनःपूर्वक धन्यवाद ! तुमचा अभिप्राय हवाच🙏🙏😇
Deleteवा वा खूप छान लिहिता तुम्ही. अगदी डोळ्यासमोर खरा प्रसंग आणि पूजा उभारली...
ReplyDeleteमॅम , सगळ्यात आधी तुमचे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत🙏🙏 . वेळात वेळ काढून लेख वाचून अभिप्राय देऊन इतके सारे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद !😇😍
Deleteमस्त.. आमच्याकडे आजोबाच पूजा सांगत. आणि मुख्य म्हणजे त्यादिवशी त्यांचा वाढदिवस असे. घरी आजी, आई, आत्या आणि आम्ही बहिणी अशी बायकांची मेजाॅरिटी त्यामुळे त्यादिवशी पुरूषांचा स्वयंपाक साधाच केला जाई, त्याचे आजीला आणि आम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटे. पण श्रीखंड किंवा सुधारस असं सोपं आणि सगळे खाऊ शकतील असं पक्वान्र नेहेमी असे.
ReplyDeleteआजही मी पूजा उपवास करते तेव्हा आण्णा आजोबांची सौम्य हसरी मूर्ती शाल पांघरून पूजा सांगताना डोळ्यांसमोर येते..
किती सुंदर योगायोग आणि किती सुंदर आठवण😍😇 ! खूप धन्यवाद ही छान आठवण शेअर केल्याबद्दल !
Deleteबहुत खुप मस्त लिहिले आहे खुप छान
ReplyDeleteतुमच्या सगळ्यांच्या उत्साहाला कायम सलाम माझा🙇🏻♀️🙇🏻♀️ ! त्याचा काही अंश तरी माझ्यात आहे याचा मला खूपच आनंद आहे !!!😇😍🥰
DeleteMast lihilay akka
ReplyDeleteMala gandhi nagar chya pooja athavat
Fruit salad pan vhyaych na poojenantar
छान वाटले तुला इथे भेटून🥰 ! फ्रुट सलाड बऱ्याच नंतर नंतर सुरु झाले , किंबहुना मी तर म्हणतेय की हे मला आठवतच नाही . कदाचित मी वसतिगृहात राहायला गेल्यानंतर सुरु झाले असावे😔 . फ्रुट सलाड म्हणजे मला फक्त तुझ्या वाढदिवसाचेच आठवते😉 !
Deleteहो गांधी नगर मध्ये आपण एक तर पपई आणि दुध किंवा फ्रुट सलाड करायचो व खायचो
Deleteहा हा हा.... दिवस उपवासाचा अणि गप्पा चालु आहे खादाडपणा बद्दल 😁😂😇
DeleteMi pan hi maja anubhavliy pan Gandhi Nagar madhe
ReplyDeleteKhup majja yaychi
Aka varshi mi mummy naval khup hatt karun upwas kela pan mummy ne ukadlelya batatyachi bhaji banavli babansathi mag n rahun mi to upwas sodun takla duparchya jewnachya velich��
बहुतेक लहानपणी प्रत्येकाची उपवासाची अशीच एक तरी आठवण असतेच😉 . माझीही आहेच😆 , ती नंतर कधीतरी सांगीनच . तुझी आठवण सांगितल्याबद्दल धन्यवाद😄😄!
DeleteKhupch Chan��������lihile aahe
ReplyDeleteतुम्ही सगळया काय काय असे छान छान घरात करत होता🤩 , त्यामुळेच मला हे सगळे लिहिण्याची संधी मिळालीय🥰😇 , तर खूप सारे मनःपूर्वक , सप्रेम धन्यवाद ❤!
DeleteNanda wagle
ReplyDeleteHartalika pujeche warnan khoop sunder lihile aahe te doliyasamor shabda citra ubhe rahete
Pics khòop sunder mast
Aasech maze mahire shrawan friday pujancha aanand mi lahanpani ghetla aahe
Aai kakunsathi puj esathi
Phule patri durwa gola karne aamhi ek weglech energine karat aasu
Àll the best likhan chalu rahu de
काकू , तुमचा अभिप्राय आणि आठवणी वाचायला फारच आवडते मला😇 , सगळ्याबद्दल मनःपूर्वक आभार🙏 !
DeleteWa wa bharich
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद !🙏
Deleteमस्त वर्णन आहे. तुझी लेखनशैली इतकी descriptive आहे की डोळ्यासमोर ते सगळं वर्णन अगदी तंतोतंत उभं राहतं. पूजेची पूर्वतयारी आणी एकंदरीत सगळ्या पूजेला तुम्हा सगळ्यांचा वावर अणि सहभाग sagla हा ब्लॉग वाचताना मूर्तिमंत डोळ्यासमोर येतं. बारीक सारीक घटना अणि त्यांचे detailing हे sagla आठवून शब्दांकित करण्याची तुझी कला खरच थक्क करणारी आहे. एकंदरीत तू mention केल्याप्रमाणे, पुरुष मंडळींचा सहभाग या पूजेत बिलकुल नसतो. त्यामुळे आम्हा पुरुषांना पण तुझ्या ब्लॉग मुळे sagla हा उत्साह अनुभवता आला. पाच पानाचं बिल्वपत्र मी पण पहिल्यांदाच बघितलं. Nice write up, keep it up...... 👍👍👍👍
ReplyDeleteअशा छान आणि सविस्तर अभिप्रायाबद्दल अगदी मनःपूर्वक धन्यवाद सर🙏 ! पण आज पर्यंत पाच दलाचे बिल्वपत्र पहिले नाही याचे फारच आश्चर्य वाटले मला . अर्थातच सहजासहजी उपलब्ध नसतेच , त्यासाठी नशीबच असावे लागते😇 . पण भारीच आनंद होतो ते मिळाले म्हणजे !🤩😍
DeleteRead the entire column. The description is simply Live. All your writings deserve to be published as a book. So excellent......Arun mama.
ReplyDeleteसगळ्यात आधी तुमचे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत🙏🙏 इतके सारे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद !😇😍
DeleteKhup sundar lihilay... Junya Aathvani jagya zalya vachun
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !😇😍
Deleteखूप छान लिहिले आहेस. पण आईने घेतलेला उखाणा आठवला नाही का? भरजरी वस्त्र परिधान करून बायकांचे नखरे वर्णन करायला हवे होते का?
ReplyDeleteआमच्या घरातील एक सगळ्यांचा आवडता वेळेला धावून उखाणा चांगलाच लक्षात माझ्या , कारण निमित्त काहीही असो , त्या त्या निमित्ताला उपयोगी पडत असे . "हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी , ..... रावांचं नाव घेते हळदीकुंकवाच्या दिवशी " जो दिवस असेल तो मध्ये घालायचा की झालं😆 ! त्या काळात नखरा हा प्रकार अजिबात नव्हता सगळे कसे भाबडेपण आणि निरागस ! छान प्रश्न/शंका विचारलात😀 . धन्यवाद !😇🙏
Deleteहरतालिका पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा lekh apratim thanks for or sharing today
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 अणि मनापासून स्वागत!! 😇😊
DeleteKhup chan
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
DeleteHaratalikecha lekh yekadam zakas puchechi mahiti v sarv goshti agadi chan lihilya aahes kalch hartalia v tuza lekh vachun changle vatale
ReplyDeletePhotos pan sunder v puchechi mandani pan mast
😍😇मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteमस्त मला पण आठवले पूर्वी एकत्र येऊनएका घरीच पूजा करत पत्री फुल व ते वातावरण पूर्वी अशी समजूत होती अविवाहित मुलींनी ही पूजा करावी म्हणजे पती छान कर्तृत्ववान मिळतो वाळू पासून महादेव पिंड करत व दुसऱ्या दिवशी ते सर्व नदीत विसर्जन करत
ReplyDeleteहळूहळू काळा प्रमाणे सर्वच बदलत आहे त्या निमित्ताने सर्व एकत्र येत गप्पां रंगत
आता तर करोना मुळे आपल्या कडे अमेरिकेत असते असे व्हायला लागले आहे. It व इतर गोष्टींन मुळे तर हळूहळू सर्वच एकमेकांन पासून लांब जात आहेत पुढची पिढी खूप प्रॅक्टिकल होत आहे व 99℅अमेरिकेत जात आहे
खरय काळाप्रमाणे सगळे बदलत आहे....
ReplyDeleteत्यात करोना चा गोंधळ ....
😃 मनःपूर्वक धन्यवाद 🙏
हरतालिका घरातील गमती जमती खूप मस्त
ReplyDeleteपूजा झाल्यावर मंदा ताई बेलाचे पान खाऊ घालायची
अरे वा ! खरंच की , मी तर विसरूनच गेले होते ही गोष्ट . खूप खूप मनःपुर्वक धन्यवाद , ही आठवण सांगितल्या बद्दल माउली !
DeleteHartalika varatmadt varan
ReplyDeleteमनःपूर्वक सप्रेम धन्यवाद 🙏 काकु! ❤ 😇
Deleteपुजेचा प्रसंग व तयारी खुप मांगल्यपूर्ण वर्णिले आहे जो अगदीं डोळ्यासमोर अलगद हुबेहूब उभा राहतो.
ReplyDeleteपूजेची ५ फळे माला अवगत आहेत..पण ५ पानांची बील्व पत्रे पहिल्यांदाच पाहिलेली😍🙏.
with refrence to mythology महादेवा used to stay in forest..बैरागी lifestyle kind..so used to offer unprocessed offerings like milk,flowers all type.of pulses n rice.(कच्च कच्च)
असो...प्रकाश चित्रें मस्तच ..आणि हो..फुलपत्रानी झाकलेली पुजा मालाही फार आवडते.
Excellent अभिप्राय!!
DeleteAlways out of the box!!!
खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫 💐 💐 💐
Thanks, खूप छान माहिती मिळाली. माझी आई हे व्रत करत नसे त्या मुळे मी पण एकदाच उपवास केला होता. तुम्ही केलेलं वर्णन वाचत असताना संपूर्ण दृश्य समोर दिसत होत. धन्यवाद ��❤️ खूप छान माहिती दिल्याबद्दल ��
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteमस्त वर्णन.
ReplyDeleteमला आमच्या वाड्यातील पूजा आठवली.माझ्या माहेरी महानुभावपंथीय असल्याने मला आई कधीच उपवस व पूजा करू देत नसे पण काॅलेजमधे जायला लागल्यापासून हट्टाने मी पूजा करू लागले .आता जरी भुसावळ कॅालेजच्या बरेच पुढे पसरले असले तरी त्यावेळेस कॅालेजच गावाबाहेरच होते , त्यामुळे तेथे जाईपर्यंत रानच हेाते त्यामुळे आम्ही तेथूनच वेगवेगळी पत्री, फुले आणत असू. रात्री जागरण करतांना मजा येई.
वावा छानच आठवणी! ईथे सांगितल्या बद्दल खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteनमस्कार, अगदी आपण अनुभवलेल्या हरतालीके साठी लागणा-या फुलपत्री गोळा करण्या पासून गुरुजींना सांगणे,इतरांना निरोप देणे,70,80 स्रीयांची बसण्याची व्यवस्था करणे ,एखादीला नसलेली वस्तू देणे,असे सर्व अनुभव आम्ही ४-५ दिवसांपासून घेत आहोत.कारण आमचं घर याचं मुख्य केंद्र आहे.धन्यवाद.
ReplyDeleteवावा मस्तच!! हा अनुभव घ्यायला नक्की आवडेल, बघू कधी योग येतो ते!!
Deleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
For a couple of minutes l felt that I was performing the so called Pooja!! Wonders of the words ✨ 👌 👣
ReplyDeleteआदर पूर्ण नमस्कार सर 🙏 🙇🏻♀️
Deleteअगदी मस्त. हुबेहूब पूजा डोळ्यासमोर उभी राहते.सारेच फुले प्र चि एक नंबर...माला गणपती मंदिर आवडले.पूजा सजावटही वाहच.🙏👌😍😘
ReplyDeleteहो, ते मंदिर माझे सुद्धा खूप आवडते! फक्त मला शिवलिंग असलेले मंदिर आवडीचे होते!
Deleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
खूप छान लिहिलंय..लहानपणीची आठवण झाली...आम्ही पण उपास ..पूजा करायचो..भाषा पण खूप गोड असते.
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteखुपच छान!! जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.धत्तु-याचे फुल व फळही लागे.खुप महत्त्व असेत्याचे.काकडावात राहिल्या की ताई! आम्ही संकाळ्यां(अंबाडीच्या वाळलेल्या काड्या )चे छोटे तुकडे करून त्याच्या एका टोकाला कापूस गुंडाळून तिला फुलवातीसारखे टोक काढुन करायचो. आमच्या कडे त्याही आवश्यक असत.त्यासाठी ज्यांच्या कडे अंबाडीची झाडे असत तिथुन मागुन आणावी लागत. असो सर्व करुन झाले. आता उपलब्ध असेल त्यात पुजा. हो ना!!
ReplyDelete👌👌🙏
ReplyDeleteखूप सुंदर लिहिलंय...आमच्या लहानपणीची आठवण झाली.
यात वर्णन केलं आहे ते गाव कोणतं गणपती मंदिराचं?
सुंदर मांडणी वा वा मस्त
ReplyDeleteखूप छान लेख.
ReplyDeleteअप्रतीम शाब्दिक चित्रण हरतालिका पुजनाचे. माझ्या त्या वयातील आई, मावशी करत असलेल्या पूजेची आठवण करून दिली.
ReplyDeleteखुप छान लेख आहे. त्यात जे काही वर्णन केलेले आहे ते सुंदर आणि प्रेरणादायी आहे.
ReplyDeleteअप्रतिम लेख
ReplyDeleteसगळा सोहळा जशाचा तसा नजरेसमोर ठाकला,खूप खूप धन्यवाद, अभिनंदन.
एक सिद्ध हस्त कलाकार आपल्या कलाकृतीत आपले सर्व कसब ओतून ती कलाकृती निर्माण करतो तसेच एक सिद्ध हस्त लेखक आपल्या शब्द सामर्थ्य यातून आपले लेखन करत असतो .आपली लेखाची मांडणी अप्रतिम आहे 💐💐💐💐
ReplyDeleteआपण हरतालिका पुजा विषयावर छान लिहले आहे वाचतांना लहापणी आजी आई करित असलेली पुजा ती लगबग सर्व चित्र डोळ्यासमोर जसच्या तस अभे राहिले अप्रतिम लिखाण आपण केले आहे👍🏻
ReplyDeleteहो नक्कीच ! आनंदी पाऊस या पानावरून मला आणि माझ्या सारख्या कित्येक जणांना निसर्गातील प्रत्येक क्षणांचा सहवास अनुभवायला मिळाला. शिवाय बालपण देखील जागे झाले. 👆
ReplyDelete