(गच्चीवरील गमती जमती)
घरी शेती असल्या कारणाने आणि वर्षभराचे घरात लागणारे धान्य पोत्यां-पोत्यानेच आणावे लागत असल्यामुळे , घरात कायमच रिकामी पोती असत . मग ही रिकामी पोतीच आमच्या खेळाचं साहित्य होऊन जाई . आम्ही सगळ्या ही रिकामी पोती पायातून घालत असू , ती साधारण कमरेपर्यंत किंवा अजून थोडी वरपर्यंत येत . मग वरची बाजू हाताने धरून ठेवायची आणि उड्या मारत मारत दुसऱ्या टोकापर्यंत जायचे . जो कोणी आधी पोहोचेल , तो ही शर्यत जिंकणार . ही म्हणजे गोणपाट शर्यत ! आमच्या शाळेत शारदोत्सवाच्या वेळी सुद्धा , सगळ्या स्पर्धांबरोबर ही गोणपाट शर्यत असे . जाम मज्जा येत असे. कुणाला उडीच मारता येत नसे , कुणी उडी मारता मारता धडपडत असे , कुणी बाजूच्यांच्या अंगावर आदळत असे , तर कुणी जमिनीवर एकदम आडवे पडत असे . एक एकदम धम्माल खेळ किंवा शर्यत !! .
---------------------------
तेव्हा आमच्या दादांकडे राजदूत होती आणि एका काकाकडे बुलेट होती . मग जेंव्हा केंव्हा या गाड्यांची टायरं खराब होऊन बदलली जात असत तेव्हा ही जुनी टायरं मग गच्चीवर येऊन पडत . मग हे एक नवीन साहित्य मिळे खेळायला . एक छोटी लाकडी काडी घ्यायची आणि हे टायर उभे करून , त्याला त्या काडीने मागून ढकलून पळवायचे आणि आम्हीही त्याच्या मागे पळायचो , मध्ये मध्ये त्याचा वेग कमी झाल्यावर त्याला परत त्या काडीने ढकलून त्याचा वेग वाढवायचा आणि पळत राहायचे . काडी नसेल तर हातानेच हे काम करायचे . एखाद्-दुसरेच टायर उपलब्ध असे , त्यामुळे आम्ही सगळ्याजणी परत आळीपाळीने खेळत असू . एकीचे खेळता खेळता टायर जमीनीवर आडवे पडले कि ती बाद होत असे आणि मग दुसरीला संधी मिळत असे खेळण्याची . फारच धम्माल येत असे हा खेळ खेळायला !
----------------------------- -
आमच्या लाडक्या धाकट्या काकाकडे भोवरा असायचा . तो फारच पटाईत पण होता भोवरा खेळण्यात ! अगदी भोवऱ्याला दोरी गुंडाळण्यापासून , त्याच्या वेगवेगळ्या करामती करण्यापर्यंत सगळ्या गोष्टीत . मग त्याच्या कडून मी सुद्धा हे सगळं शिकण्याचा प्रयत्न केला होता . मला तर कधी नीट जमले नाही यातील काही . फक्त दोरी नीट गुंडाळता येत असे . पण ती सुद्धा गुंडाळलेली सगळीच्या सगळी सटकून जात असे . एखादे वेळी नीट गुंडाळली गेली तर तो भोवरा नीट चपळाईने जमिनीवर सोडून देणे जमेना , अशा एक ना अनेक फजित्या होत . पण तो फारच पटाईत होता , छान दोरी गुंडाळायचा मग बरोब्बर चपळाईने हव्या त्या वेगाने जमिनीवर सोडायचा आणि मग भोवरा अतिशय वेगाने जमिनीवर फिरू लागे . मग काका तो वेगाने फिरणारा भोवरा स्वतःच्या तळहातावर उचलून घेई . मग तो भोवरा त्याच्या तळहातावर तितक्याच वेगाने फिरत राही मग मधूनच तो परत भोवरा जमिनीवर टाके , तरी तो भोवरा तसाच छान वेगाने फिरत राही आणि नंतर केव्हातरी हळू हळू करत थांबत असे . मलाही वाटे आपणही आपल्या हातावर घ्यावा फिरता भोवरा . मग त्यासाठी मी काकाकडे हट्ट करत असे . मग तोही देई , तो फिरता भोवरा माझ्या तळहातावर मला नीट घ्यायलाही जमत नसे . एकतर त्या भोवऱ्याची टोकदार आरीची फारच भीती वाटे . शिवाय तो फिरता भोवरा हातावर दिल्यावर ती आरी इतक्या जोरात टोचत असे की काही कळायच्या आतच तो जमिनीवर पडून जात असे आणि सोबत तोंडातून जोरात किंकाळी बाहेर पडे ते वेगळेच .
----------------------------- ---
गोट्या ! मला फारच आवडत त्या बघायला , जादूईच वाटत मला त्या ! अख्खी गोटी पारदर्शक आणि मध्यभागी मात्र छान झळाळते आणि घट्ट रंग ! आमच्या या काकाकडे एक मोठ्ठा कमंडलू होता धातूचा . हा कमंडलू भरून गोट्या जमा झाल्या होत्या त्याच्याकडे . मोठ्ठा जादुई खजिनाच जणू ! गोट्या जितक्या आवडत तितकाच तो कमंडलू सुद्धा आवडे मला . तो या खेळात सुद्धा एकदम पटाईत होता . खूप छान खेळत असे त्याच्या मित्रांसोबत , अगदी बघत राहावेसे वाटे . मग काही वेळा आम्हाला सुद्धा साधे आणि सोप्पे खेळ शिकवी गोट्यांचे आणि आमच्या बरोबर सुद्धा खेळत असे . काय भारी वाटे त्या जादुई गोट्या हातात घेऊन खेळायला ! अधून मधून या गोट्यांच्या मोजणीचे काम चाले . मला तर फार आवडे हे काम करायला . गोट्यांची संख्या वाढलेली असली की अजूनच भारी वाटे ! मग हे काम संपले की परत सगळ्या गोट्या त्या कमंडलूत भरल्या जात आणि कमंडलू परत त्याच्या ठरलेल्या जागी ठेवून दिला जात असे , त्या जागेवर आमचा हात पोहोचत नसे .
----------------------------
हल्ली मुलं कुठलस इंग्रजी गाणं म्हणून हा खेळ खेळतात . आम्ही ...
आडींग माडींग फुल दे
खालचे वरचे वेचून घे
एका चोराला जाऊ दे
दुसऱ्या चोराला जाऊ दे
तिसऱ्या चोराला पकडून घे
असे गाणं म्हणून हा खेळ खेळत असू दोन मुली समोरासमोर उभं राहून हात वर करून एकमेकींचे हात पकडून उभ्या राहत असत . उरलेल्या बाकी मुली या दोघींच्या मधून त्यांच्या हाताखालून चालत/धावत जात असत . तिसऱ्या चोराला पकडून घे इथपर्यंत गाणं आलं की तेव्हा जी कुणी मुलगी त्या दोघींच्या मध्ये असे , तिला या दोघी मुली पकडून घेत आणि एका बाजूला नेवून , बाकी मुलींना ऐकू जाणार नाही अशा आवाजात तिला दोन नावं सांगत , ही दोन नावं म्हणजे त्यांनी खेळ सुरु होण्यापूर्वी ठरवलेली असत . एक नाव एकीच्या ग्रुपचे असे आणि दुसरे दुसरीच्या . मग ही पकडलेली मुलगी त्यातील एक नाव निवडत असे . असं करत करत अगदी शेवटच्या मुलीपर्यंत हेच परत परत चाले . मग या दोन मुलींचे दोन ग्रुप तयार होत . कधी कधी समसमान तर कधी एकीकडे खूप जास्त मुली आणि एकीकडे खूप कमी असेही होत असे . मग परत या दोन मुली एकमेकांसमोर उभ्या राहत असत आणि त्यांच्या ग्रुप मधल्या मुली त्यांच्या मागे . समोरासमोर उभ्या असलेल्या मुली एकमेकींचे उजवे हात धरत आणि मध्यभागी या दोघींच्या मधोमध एक रेषा आखलेली असे जमिनीवर . या प्रत्येक ग्रुप मधील मुली एकमेकींच्या पोटाभोवती दोन्ही हातानी विळखा घालून उभ्या राहत . रेडी म्हटले की एका ग्रुप मधल्या मुली दुसऱ्या ग्रुप मधल्या मुलींना खेचून आपल्या बाजूला आणण्याचा प्रयत्न करत असत . सरते शेवटी जो ग्रुप समोरच्या ग्रुप ला त्या रेषेच्या आत ओढून आपल्या बाजूला आणत असे , तो ग्रुप जिंकत असे . एकच होते , या खेळासाठी मुलींची संख्या भरपूर असली तरच छान मज्जा येत असे .
----------------------------- ---
अधून मधून आमच्या डोंगराला आग सुद्धा लागत असे . दचकू नका , आमचा कुठलाही डोंगर नव्हता त्यामुळे त्याला आग लागणेही शक्य नव्हते . हे आमच्या एका खेळाचे नाव ! डोंगराला आग लागली पळा पळा . ज्याच्यावर राज्य असे तो एका भिंतीकडे तोंड करून उभं राहत असे आम्ही खाली जायच्या जिन्याचं दार बंद करून घेत असू आणि या बंद दरवाज्याकडे तोंड करून उभे राहून राज्य देत असू . उरलेले बाकी सर्व जण , डोंगराला आग लागली पळा पळा हे गाणं म्हणत आणि पळत असत . मग राज्य देणारा तोंड सगळ्यांकडे फिरवून त्यांना पकडायला येत असे आणि पकडायचा प्रयत्न करत असे . यात जर कुणी पकडले गेले की मग त्याच्यावर राज्य येत असे . किंवा ज्याच्यावर राज्य असे तो सगळ्यांकडे तोंड फिरवून स्टॅचू ,म्हणत असे . मग सगळ्यांनी आहे तिथे आहे तसे उभे राहायचे , पुतळ्यासारखे , जराही न हालचाल करता . मग ज्याच्यावर राज्य असे तो प्रत्येकाजवळ येऊन काहीतरी बडबड करून किंवा हालचाली करून , हसविण्याचा प्रयत्न करत असे . जेणे करून ते हसू लागतील किंवा विचलित होऊन हालचाल करतील आणि हालचाल केली की बाद . मग त्याच्यावर राज्य ! धम्माल खेळ होता हा सुद्धा !!
---------------------------------
---------------------------------
आणि सरते शेवटी सर्वांचाच आवडता आणि मनाच्या अगदी जवळचा खेळ म्हणजे फुगडी ! हा खेळ निरनिराळ्या सणांच्या खेळाचा एक भाग सुद्धा असतो , जसे मंगळागौर , हरतालिका जागरणं , काही वेळा तर बराचश्या मिरवणुकांमध्ये नाचण्यासोबत फुगडी सुद्धा खेळली जाते . अगदी सगळ्या वयोगटाच्या मुली-बायका खेळतात हा खेळ . कमीत कमी दोन जणी आवश्यक असतात . मग त्या पुढे जाऊन तीन किंवा चार जणी सुद्धा खेळू शकतात . अगदी मूलभूत खेळ म्हणजे दोघींनी समोरासमोर उभे राहायचे आणि एकमेकींचे हात धरायचे , उजव्या हाताने उजवा आणि डाव्या हाताने डावा . गुणाकाराची खुणेची रचना तयार होते अशा प्रकारे धरलेल्या हातांची . मग दोघींनी एकाच दिशेने म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने किंवा त्याच्या उलट्या दिशेने गोल गोल फिरायचे . हळूहळू वेग वाढवायचा आणि जितका वाढवता येईल तितका वाढवायचा . खेळणाऱ्यांना तर मज्जा येतेच , पण बघणाऱ्यांना सुद्धा खूपच मज्जा येते . अगदी कुठल्याही कोनातून पहिले तरी फारच सुंदर , वेगवान आणि विहंगम दृश्य असते ते . मला पण भारी मजा यायची फुगडी घालायला . खूप गरगरत असे मला , पण तरी आवडे खेळायला . खूप वेगाने शक्य तितकी खेळायची आणि मग एकदम डोळे गच्च बंद करून थोडा वेळ खाली बसून जायचे , गरगरणे थांबे पर्यंत . मग लगेच परत खेळायला तय्यार ! यातही थोडी गम्मत असे , काहींना खूप वेगाने घालता येत असे आणि वेगानेच खेळायला आवडत असे . मग अश्या जणी ज्या जरा हळू खेळतात त्यांच्या बरोबर खेळायला नाखूष असत . पण या हळू खेळणाऱ्यांना त्यांचा वेगवान खेळ पाहून त्यांच्या बरोबरच खेळण्याची इच्छा असे ! अजून एक म्हणजे फुगडी खेळता खेळता आम्ही जातं घालत असू . किती लोकांना हा प्रकार माहीत आहे माहीती नाही . दोघींपैकी एक जण अर्धवट खाली बसे आणि एक पाय , ज्या दिशेने फिरत असत त्यादिशेचा पाय सरळ करायचा आणि मग सगळा भार आणि वेग संभाळण्याचे काम उभं राहून खेळणारीवर येई . भारी मज्जा यायची . पण याला बराच सराव लागतो , फुगडी अगदी छान घालता येत असली तरी ! तर असा हा सगळ्यांचा आवडता खेळ फु बाई फु !
या लिखाणाच्या माध्यमातून काय काय खजिना माझ्या हाती लागतोय आणि अगदी अमूल्य असा आनंद देतोय मला ! अजून पुढे पुढे काय काय आणि किती किती असे आनंदाचे ठेवे हाती लागणार आहे याची कल्पनाही नसते मला . पण अजून अजून एक एक अगदीच अकल्पित ठेवा माझ्या हाती लागत आहे आणि अवर्णनीय असा आनंद देत आहे मला आणि वाचणाऱ्या तुम्हा सगळ्यांनाही !!!
आनंदी पाऊस
गच्चीवरील गमती जमती
२२सप्टेंबर २०१९
गोणपाट शर्यत
टायर
आडींग माडींग
फुगडी नेक्स्ट जनरेशन च्या
लिंबू टिंबू सोबत !
लिंबू टिंबू सोबत !
फुगडी
गोट्या
आमचा गोट्या ठेवायचा कमंडलु
भोवरे
सगळेच खेळ मस्त आहेत. यातील मुलांचे खेळ आम्ही खेळायचो. त्या मुळे जे जे सगळेजण हे खेळ खेळले आहेत ते सगळे instantly तुझ्या ह्या लेखा सहित connect होतील. मस्त आहे. विशेषता the pictures are refreshing addition. Keep it up.... 👌👌👌👌
ReplyDeleteसर मनःपूर्वक धन्यवाद🙏 🙇♀️! धन्यवाद फक्त ह्या अभिप्रायासाठी नाही तर, कायमच माझे सगळे लेख वेळ काढून वाचता आणि मला त्यामुळे खूप प्रोत्साहन मिळते 😇आणि पुढच्या लेखनासाठी खूप सारी सकारात्मक ऊर्जा !!!😍😇✨
Deleteजुने मैदानी खेळ तेही चित्रा सहित, great collection hats off to Anandi Varsha . VILAS KINGE
ReplyDeleteविलास , खूपच छान वाटते , तू अगदी नियमित इथे ब्लॉग वर मला भेटतोस तुझ्या छान छान अभिप्रायासह 😍💖!!! खूप खूप धन्यवाद !🙏🙏
Deleteछानच,हे सर्वच खेळ मी खूप कमी खेळली...मस्तच.
ReplyDelete-- सोनल चौधरी
खूप खूप धन्यवाद !🙏🙏 सोनल , हो यातील बरेच खेळ मुलांचे आहेत , त्यामुळे शक्य आहे , बऱ्याच मुली हे खेळ खेळलेल्या नसतीलच . आम्ही नशीबवान या बाबतीत 😇😇, लाडक्या काका😍💖 मुळे आम्हाला हे खेळ खेळता आले !💃💃💃
Deleteखूपच छान वर्णन केलय ताई तुझा ब्लॉग वाचून मी देखील आता आमच्या नातुना व नातीना आमच्या म्हणजे आपल्या काळातील खेळांच्या गमती जमती सांगत असतो व या ब्लॉग मूळे जून्या आठवणीत खूप रममाण होतो व त्यामळे खरोखर मन काहीवेळ का होईना प्रसन्न होऊन जातं खरच ग्रेट👌👌👌👌👍👍
ReplyDeleteमाझा मुख्य हेतू हाच , वाचणाऱ्याला काही काळ का होईना आनंद मिळावा 😍आणि चेहऱ्यावर हसू फुलावे 😊😃😄!!! नेहमीच छान पावती देतोस तू माझ्या लिखाणाला ! खूप सारे धन्यवाद !!!🙏🙇♀️
Deleteअक्का, खूप छान लिहिलंय, मी हे सर्व तुमच्यासोबत अनुभवलेले नसूनही सर्व अगदी माझ्या डोळ्यासमोर आले .आणि हो..तुझ्या लाडक्या काकांचे बालपण मला अनुभवायला मिळाले त्याबद्दल धन्यवाद��
ReplyDeleteसगळ्यात आधी मनःपूर्वक स्वागत तुझे 😍!!! खूप आनंद झालाय मला तुम्ही दोघे या लेख रुपी चौधरी सदनात आल्यामुळे😇💃 ! आणि तू हे सगळे प्रत्यक्ष अनुभवलेले नाही पण तरी याचा एक भाग होऊन गेलीस .....अगदी मनपूर्वक दाद आहे ही माझ्या लिखाणासाठी💖💕 !!! हा फक्त एक छोटासा भाग होता काकाच्या बालपणाचा ....अजून पुढे खूप गमती जमती आहेत ....stay tuned here permanantly !!! love......😍💖💕💃
Deleteतुला कस आठवत ग खूप छान लिहते तुमच्या त्या गोट्या च कमडु माझ्या कडे होता
ReplyDeleteमला हल्ली सगळ्यात जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न ! त्यामुळे असं वाटायला लागलेय खरंच माझी स्मरण शक्ती इतरांपेक्षा थोडी जास्त आहे . थोडक्यात I m blessed soul !!
Deleteबालपणी खेळलेलेखेळ आजच्या पिढीतील मुली.मुलींना नवलाईचे वाटतील.तू वर्णन केलेले खेळ खूप मागे पडले आहेत.टीव्ही,माेबाईल गेमच आकर्षण वाढल.खेळ आणि खेळण्याची पद्धत खूपच वास्तव वर्णन केले आहे.����������
ReplyDeleteखरंय अगदी, पण त्यांची सुद्धा यात काही चूक नाही . त्यांना खेळायला जागा आणि वेळ दोन्ही नाही , सोबतीला हे कसले कसले गॅझेट सुद्धा नको इतके उपलब्ध आहेत . असो , धन्यवाद ! 🙏😊
DeleteKup chan
ReplyDeleteMala pan chan भोवरा फिरवता येतो
पण आता माझ्या कडे नाही आहे भोवरा
वा ग , राणी तू तर भारीच आहे . आता पुढच्या वेळी जेव्हाकेव्हा भेटू तेव्हा आपण भवरा नक्की खेळू या !
Delete😀😃😄
वा.. मस्त. ����
ReplyDeleteपण याचा अजून एक भाग आहे का? आम्हीही हे सगळे खेळ खेळायचो.. पण अजून खूप खेळ होते, ते नाहीत यात..
खरं तर , अजून एक भाग लिहायचा विचार होता , पण वाटले वाचकांना कंटाळवाणे होईल का ? म्हणून नाही लिहिला
Deleteमस्तच... खरंच पुन्हा ते सगळे बालपणीचे खेळ आठवले��
ReplyDelete💃🤩😍
Deleteमस्तच !!! सगळे खेळ आम्ही खेळलोय लगानपणी. हे तू वर्णन केलेले खेळ एका मर्यादित परिघात खेळले जायचे. याशिवाय विटीदांडू, सुरकाडी व खुपसणी इ. खेळ मोठ्या मैदानात कधी खेळली आहेस का?
ReplyDeleteतुझा लेख गच्चीवरील खेळ असा असल्याने कदाचित उल्लेख केला नसशील.
बाकी लेखांमुळे लहानपणीच्या बर्याच आठवणी ताज्या होतात. ������������������
बरोबर , हे खेळ आम्ही गच्चीवर खेळत असू त्यामुळे काही खेळ खेळता येत नसत , आणि काही खेळ खाली घरात खेळत असू , त्यांचा खाली उतरून घरात गेल्यावर उल्लेख येईलच 😊😄
DeleteAbhipray- Conservation of Traditional sports with Sportive Amazing writing ... आम्ही कोयीचा गेम खेळायचो...
ReplyDeletemost awaited abhipray ! धन्यवाद ! 🙏😊💃
Deleteनेहमी प्रमाणे खूपच छान लिहिलंय अगदी माझ बालपण मला आठवले खूपच सुंदर मांडणी
ReplyDeleteखूप सारे धन्यवाद !!!🙏🙇♀️
DeleteMissing all those games
ReplyDeleteMast zalay lakh
सारे धन्यवाद ! 🤩🙏
DeleteLahanpaniche khel khupch chan ����mast lihile aahes v tumache khel pan bhari ��
ReplyDeleteAamhi pan khelayacho yatil thode far sagargote, langadi ase
सप्रेम धन्यवाद 💖🤩🙏
Deleteहे खे.ळ मी खूप पाहीले आहे
ReplyDeleteनशिराबाद. ला मुले खूप खेळत असत
मस्त छान छान लिहते
पुढील लेखा.साठी शुभेच्छा
tons n tons of love !!!💖🤩💃
Deleteकिती समृध्द बालपण होते न… मी यातले फक्त डोंगराला आह लागली, पळा, पळा आणि फुगडी खेळली आहे. आम्ही दोन मैत्रिणींबरोबरच तीन मैत्रिणींची म्हणजे सहा हातांची पण फुगडी खेळत. मजा असायची. पडायचो, लागायचे पण तरीही खेंळायचो. त्या काळात कोणतीही इलेक्ट्राॅनिक माध्यमे आपल्याकडे नसल्याने आपण या गोष्टींचा पुरेपूर आनंद घेऊ शकलो. आता आपण या माध्यमाचाही आनंद घेतो आणि तोपण घेतलाय म्हणजे आताच्या पिढीपेक्षा आपण स्जावतःला स्त भाग्यवान समजायला हवे.
ReplyDeleteप्रा. सौ. वैशाली चौधरी
ठाणे.
माला सारेच खेळाचे कलरफुल चित्र आवडले..गोणपाट व टायर गेम्स हे माझ्यासाठी नविन आहेत...गोट्यांचा कमंडलू खूप गोड आहे..माझ्याकडेही असा कमंडलूआहे...पारंपरीक खेळ हे कितीवेळापण खेळा कंटाळा येत नाही..बालपणीच्या काळात घेऊन जाणारा लेख आहे.
ReplyDeleteखूप छान लिहिलंय. त्यामुळे मी बालपणामध्ये एक फेरफटका मारून आले. हे सर्व वरील खेळ आम्ही खेळलेलो आहोत, त्याशिवाय आंधळी कोशिंबीर, ठिकऱ्या, लगोरी आणि दोरीवरच्या उड्या हेही खेळ होते. दोरीवरच्या उड्यांमध्ये सुद्धा अनेक प्रकार होते. काचापाणी, सागरगोटे, बिट्ट्या हे खेळ तर आता बहुतेक मागेच पडले असावेत. गोट्या तर मी पण खूप खेळलेली आहे. माझ्या फ्रॉकच्या खिशात सुद्धा सतत गोट्या असायच्या आणि आई त्यामुळे जाम वैतागायची😀 आमची कॉलनी खूप मोठी होती आणि विस्तारत होती त्यामुळे जिथे कुठे बांधकाम चालू असेल तिथल्या रेतीतून आम्ही क्ले आणायचो आणि खूप वस्तू बनवायचो, त्यासाठी आई आम्हाला एक जागा नेमून देत असे आणि कधी रागावली पण नाही❣️🥰
ReplyDeleteपुनश्च धन्यवाद
मस्त मस्त!
ReplyDeleteकिती मस्त हे खेळ .... ते सुद्धा बिना पैशाचे... आपोआप व्यायाम होत असे.... जुन्या आठवणींना उजाळा मिळाला..
ReplyDelete👌👌👌
वा वर्षा! जुने खेळ किती रंगवून सांगितले आहेस'अगदी डोळ्यासमोर उभे राहिले'आता एक दोन वर्षाच्या मुलाला सुद्धा मोबाईल हवा असतो; मगाशी खेळ त्यांना कुठून समजणार! खरं म्हणजे हे सगळे खेळ मुलांनी खेळायला पाहिजे'आनंद आणि व्यायाम त्यातून मिळ तो'आता काय ते दिवस येणे नाही! पण खेळांचे वर्णन खूप आवडल, छान वाटले वाचून
ReplyDeleteखूप छान लिहिलंय, आश्चर्य वाटेल पण आम्ही गल्ली (हा शब्द लोप पावतोय,सोसायट्या निर्माण होत आहेत त्यामुळे,आपण आपलं गल्लीमधलंच घर पुन्हा व्यवस्थित बांधलं तर...)मधली मूलं आणि मूली सगळे एकत्र हे सगळे खेळ खेळायचो,माझे भाऊ तर सागरगोटे,बिट्टे सुध्दा चपखलपणे खेळत असत,शब्द चुकले तर दुरूस्त करू शकता
ReplyDelete