काही रोजच्या रांगोळ्या
दररोज चालण्याची सवय अगदी लहानपणापासून आहेच. अगदी आठ-दहा वर्षाची असल्यापासून. काही काळ चालायला जाण्याची वेळ बदलते, तर काही काळ सोबत बदलते, काही वेळा रस्ते बदलतात, काही वेळा गाव बदलते, काही वेळा राज्यही बदलते. तथापि चालायला गेले म्हणजे घरातून निघाले, ठरलेले अंतर चालले आणि आले घरी परत असे होत नाही. या चालण्यासोबत बऱ्याच गोष्टी जोडल्या गेलेल्या असतात. कधी भेटणाऱ्या व्यक्ती, कधी झाडं, त्या त्या मौसमा प्रमाणे फुलं, सणावारा प्रमाणे ठराविक ठिकाणी गर्दी, सजावट असे एक ना अनेक. या सजावटीचा एक भाग म्हणजे दारासमोर रेखाटलेल्या रांगोळ्या. काही खास निमित्त, महत्वाचे सण असले की खास रांगोळ्या, आकाराने मोठ्या, निरनिराळे रंग भरलेल्या!
मात्र, काही दारा समोर दररोज रांगोळ्या काढलेल्या असतात. अगदी छोट्या आणि मोजकेच रंग भरलेल्या, परंतु एकदम मनमोहक! हल्ली तर दक्षिण भारतात राहात असल्याने या अशा दैनिक रांगोळ्या तर खूप प्रमाणात बघायला मिळतात. इतक्या सुरेख असतात की आपण कितीही आपल्याच तंद्रीत असलो तरी त्या बरोबर आपले लक्ष वेधून घेतात. मी कितीतरी वेळा ठरवते, रांगोळी कितीही सुंदर असली, तरी तिथे क्षणभर थांबायचे, ती मनसोक्त न्याहाळायची आणि पुढे चालायला सुरुवात करायची. पण असे होतच नाही, पिशवीतून भ्रमणध्वनी बाहेर काढून त्या रांगोळीचे एक तरी प्रकाशचित्रं काढलेच जाते, माझ्याही नकळत.
रांगोळ्या सुरेखच असतात त्याबद्दल काही दुमतच नाही. तथापि या सगळ्या छायाचित्रांचे नंतर करायचे काय? असे मोठ्ठे प्रश्नचिन्ह उभे ठाकते. कारण त्याचे काहीच न करता तसेच खोडून टाकणे शक्यच होत नाही आणि ते सांभाळून ठेवायचे म्हटले तर त्यामुळे पुष्कळ जागा व्यापली जाते. एक-दोन दिवसांपासून मनात आले, ब्लॉग आहेच तर त्यावर प्रकाशित करू. ज्यांना बघायला आवडतील ते बघतील, वेळेवर रांगोळी कशी काढायची सुचले नाही तर या रांगोळ्या बघून काही नवीन कल्पना सुचायला मदत होईल वगैरे. मग काय केल्या या प्रकाशित... वाचकांना बघायाला, वेळेवर मदतीला... सर्वात महत्वाचे म्हणजे माझे मानसिक समाधान झाले.
या रांगोळ्यांचे कलाकार मला माहितीचे नाहीत. काहीवेळा कुणी समोर असेल, तर त्यांना विचारून मगच छायाचित्रं घेते, कुणी नसेल तर तसेच घेते. कारण विचारायचे म्हणजे त्यांच्या कामाचा वेळ अन्यथा वाया जाईल वगैरे. मी अशी छायाचित्रं घेते तेव्हा रस्त्यावरील आजूबाजूला असलेले लोक माझ्याकडे बघत असतात, प्रत्येकाच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर निरनिराळे भाव बघायला मिळतात. जसे आश्चर्य, कौतुक, आनंद किंवा अगदी काय करतेय ही महिला वगैरे...
















मी ही काढते, जमेल तेव्हा!
ReplyDeleteआई मात्र गेली कित्येक वर्षे रोज काढते! ते ही त्या त्या दिवसाप्रमाणे..म्हणजे रविवारी आदित्य राणूबाई असणार,मंगळवारी,शुक्रवारी देवीची पाऊले,श्रीयंत्र असणार..चैत्रात चैत्रगौर तर नागपंचमी ला नागोबा...रोजच्या रोज गोपद्म, स्वस्तिक आणि दिवा तर मस्टच!
तुमच्या ब्लॉगमुळे आठवणी ताज्या झाल्या!☺️👌
खूपच छान कलेक्शन आहे
ReplyDeleteजुने मंदिर सुद्धा ऊर्जावान वाटते
आनंदी पाऊस हे सदर केव्हा केव्हा असे वाटते की जीवनातील हिरवळ फुलविणारा पाऊस आहे
सुंदर! 👌👌👌
ReplyDeleteरांगोळी👌👌
ReplyDeleteसंग्रह चांगला आहे...👌
ReplyDeleteखुप सुंदर रांगोळ्या आहेत! खरच काहीजणी अगदी अनुरूप व मनमोहक रांगोळी काढतात.
ReplyDelete