☕☕चहा ३६ मी ☕☕
(काही अनुभवलेलं...)
जागतिक चहा दिवस! जगातील सर्व चहा-प्रेमींनी असंख्य ठिकाणी, विविध प्रकारे केलेला, निरनिराळ्या चवीच्या चहाचा आस्वाद घेतलेला असेल. तसेच, आज पर्यंत असंख्य चहा प्रेमींनी अगणित कविता, चारोळ्या, लेख लिहिलेले आहेत. तथापि या विषयावर मीही कधी लिहेन, असे मला कुणी सांगितले असते, तर माझा विश्वास बसला नसता. कारण माझा आणि चहाचा अगदी छत्तीसचा आकडा! चहा आवडतं नाही इथपर्यंत ठीक, तथापि माझा अगदी छत्तीसचा आकडा म्हणजे नक्की काय? तर मला चहाचा वास सुद्धा सहन होत नाही, लगेचच पोटात कसेसे व्हायला लागते, पोटात डचमळायला लागते वगैरे वगैरे. अगदी कुणीही व्यक्ती असो, स्वयंपाकातील काहीही येत नसते, परंतु चहा तेव्हढा करता येतोच आणि करतातही. माझे मात्र तसे नाही, माझे म्हणजे मी १२-१३ वर्षांची असल्यापासून स्वयंपाकातील बऱ्याच गोष्टी हळूहळू करून शिकत होते, करता यायलाही लागल्या होत्या. शाळेच्या दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत करतही होते.
तथापि चहाच्या बाबतीत अगदी विरुद्ध. म्हणजे साधारणपणे चहा कसा करतात माहिती होते, परंतु कधी केला नव्हता किंवा करायची वेळ आली नव्हती. कारण एकत्र कुटुंब! घरात भरपूर सदस्य आणि आमच्या घरी सतत कुणी न कुणी भेटायला येणारी मंडळी असतच. त्यामुळे दिवसाला कमीत कमीत तीसेक कप चहा तर होतच असावा. पण तो करण्याची माझ्यावर वेळ कधीच येत नसे, आलीच नाही. कारण मोठ्या व्यक्तींपैकी काही जण कामा निमित्त बाहेर गेलेले असले, तरी घरात एखादी तरी मोठी व्यक्ती असेच. आमचे बाबा(आजोबा), समाजातील अनेक शिक्षण संस्था आणि इतर बाबतीत जोडले गेलेले होते. त्यामुळे या न त्या कारणाने सतत कुणी ना कुणी येतच असे. परिणामी चहा सतत होतच असे.
मला लहानपणा पासून चहा कसा करतात किंबहुना आमच्या घरात चहा कसा केला जात असे, हे अगदी नीट माहिती होते. एव्हढेच नव्हे तर व्यक्ती आणि त्यांच्या आवडी परत्वे त्यात काय काय बदल करावे लागतात हेही माहिती होते. कारण घरातील मंडळी चहा पितांना त्याबद्दल चर्चा सुद्धा करत असत. तर आमच्या घरात चहा करण्याची पद्धत म्हणजे, सर्वात आधी किती जणांना चहा प्यायचा आहे, त्याची मोजदाद करायची, त्यातील किती जणांना पूर्ण कप, किती जणांना अर्धा कप आणि किती जणांना घोटभर घायचा आहे, हे सुद्धा बघायचे. यावरून किती कप चहा करावा लागेल याची गणना करावी लागे. बऱ्याच वेळा बाहेरच्या खोलीत पाहुणे मंडळी असतं, विविध कारणांनी भेटायला आलेली. मग आम्हा लहान मुलींना सांगितले जाई, जा ग बाहेर जाऊन बघून या किती लोक आहेत, ते बघून/मोजून या. अगदी लहान असतांना आम्ही सरळ पाहुण्यांसमोर मोठ्याने मोजत असू, एक, दोन, तीन... मग आम्हाला आत बोलावून घेतले जाई. नंतर नीट समजावून सांगितले, सहजच गेल्यासारखे करायचे आणि मनातल्या मनात मोजायचे, किती लोक आहेत ते. नंतर मात्र आम्ही मुली हे काम करण्यात एकदम पटाईत झालो.
तर एकदाचे ठरले, किती कप चहा करायचा आहे, की त्याच्या निम्मे कप पाणी चहाच्या भांड्यात घालायचे आणि ते गॅसच्या शेगडीवर ठेवायचे. त्यात जितके कप चहा हवा आहे, तितके चमचे साखर आणि तितकेच चमचे चहा भुकटी(पावडर) घालायची. त्याकाळात, सर्वांच्या घरात असंत, त्याप्रमाणे आमच्याही घरात चहा आणि साखरेसाठी ते 'त्रिदल' आकाराचे म्हणजेच खेळायच्या पत्त्यांमधील 'किलवर' च्या आकाराचे चमचे होते. पैकी चहाचा चमचा लहान आणि साखरेचा चमचा त्यातुलनेत थोडा मोठा. तर, या मिश्रणाला छान उकळी फुटली की त्यात जितके कप पाणी घातले तितके कप म्हणजेच जितके कप चहा हवा आहे, त्याच्या निम्मे कप दुध घालायचे. मग या मिश्रणाला छान उकळी येऊ द्यायची की झाला चहा तयार! मग तो चहा-गाळणीने कपात गाळायचा, ते कप तबकात ठेवायचे आणि ज्यांना हवाय त्यांना द्यायचा.
ही झाली चहा बनविण्याची सर्व साधारण पद्धत. आमच्या घरातील सर्वांना साखर थोडी कमीच आवडे. याला अपवाद म्हणजे आमचे बाबा(आजोबा)! त्यांना थोडी जास्त साखर आवडे. मग चहा कपांत गाळून झाला की, त्यांच्या कपात थोडी साखर घालून चमच्याने ढवळली जात असे. ही वरून घातलेली साखर संपूर्ण विरघळली आहे की नाही हे बघण्यासाठी, चमचा अगदी तळाशी घालून वर काढून त्यातील चहा परत कपात ओतून घातला असू. म्हणजे समजे साखर संपूर्ण विरघळली आहे की नाही. पण! जर का ही कृती त्यांच्या समोर केली की ते भयंकर वैतागत असतं. म्हणत, बस, किती उपनते? कारण त्यांना अगदी वाफाळता चहा लागे. तथापि वर केलेल्या कृतीने अर्थातच त्यातील थोडी वाफ निघून जात असे. आज ते या जगात नाहीत, परंतु चौधरी कुटुंबातील प्रत्येकाला हे वाचून त्यांची तशीच्या तशी चैतन्यमयी मूर्ती डोळ्यासमोर दिसेल! या आठवणीने डोळ्यात पाणी येऊन, संमिश्र भाव उमटतील...
तसेच त्यांना, म्हणजे आमच्या बाबांना त्यांनी स्वतः केलेला चहाच जास्त आवडे! तो म्हणजे अजिबात पाणी न घालता, संपूर्ण दुधाचा चहा. ते पहाटेच, कुणीही उठायच्या आत उठून किंवा फार कधीतरी दुपारी सुद्धा, त्यांच्या स्वतःच्या हाताने हा चहा करून घेत. त्यांची कृती मात्र मला माहिती नाही. कारण मी तेव्हा अगदी गाढ झोपेत असे, त्यामुळे ते बघण्याची संधीच मिळत नसे. हा चहा ते कधीच कप-बशीत घालून पीत नसत. सरळ एक काचेचा पेला घेऊन त्यात गाळत असतं. त्यामागे दोन करणे असावीत, असे मला वाटते. एक महणजे तो जास्त वेळ जास्त गरम राहील आणि दुसरे म्हणजे कपात मावतो, त्या पेक्षा जास्त चहा पेल्यात घेऊ शकतो. मग तो तसाच अगदी वाफाळता चहा ते पीत आणि लेगेचच संपवत असतं. आम्हाला नेहमीच आश्चर्य वाटे इतका गरम चहा कसा पितात बाबा! चटका कसा लागत नाही त्याच्या हाताच्या बोटांना आणि तोंडात. कारण कपाला धरण्यासाठी कान/दांडी असते, त्यामुळे तो कितीही गरम असला तरी आपण कप सहजच पकडू शकतो. काचेच्या पेल्याचे तसे नसते. एक तर त्याला धरण्यासाठी कान/दांडी नसते आणि एकदा का पेल्यात उकळता चहा ओतला की तो पेला अतिशय गरम होतो. असा पेला हातात उचलायचा म्हणजे आपल्याला चटका लागतो. तथापि ते, तसा गरम चहाचा पेला, आरामात उचलून त्या पेल्यातील चहाचा आस्वाद घेत असतं!
घरातल्या मंडळींना कधी कधी खास चहा प्यायची हुक्की येत असे. हा खास चहा म्हणजे चहा करतांना निम्मे पाणी आणि निम्मे दुध असे नेहमीप्रमाणे न करता, त्यात पाण्याचे प्रमाण अगदी कमी आणि भरपूर दुध. बाकी सगळ्या सामुग्रीचे प्रमाण तसेच! असा चहा त्यांना अगदी मनापासून आवडे. मग हा चहा छान मनासारखा झाला की सगळे एकत्र निवांत बसून गप्पा मारत या चहाचा आस्वाद घेतला जात असे.
आमच्याकडे सगळ्यांनाच साखर थोडी कमी आवडे, चहा मध्ये. परंतु कुणी पाहुणे आल्यावर मात्र हमखास थोडी जास्त साखर घालावी लागत असे, घालती जात असे. येणारे पाहुणे जवळचे असतील, तर ते नेहमीच आश्चर्य व्यक्त करत, इतका फिका चहा कसा पिता तुम्ही लोक! काही काही कारणाने काही मंडळी खेड्यातून सुद्धा येत असतं. यांचा चहा आणखी वेगळा असे. म्हणजे सर्व कृती सारखीच, परंतु त्यांच्या चहा मध्ये साखरेचे प्रमाण बरेच जास्त असे. कारण त्यांना अतिशय गोड चहा आवडतं असे, किंबहुना अजूनही ते तसेच असावे असे वाटते. असा चहा मात्र आमच्या घरात कुणीच पिवू शकत नसे. गमतीने या चहाचा उल्लेख बासुंदी असाच केला जात असे, आमच्या घरात.
घरातील सर्वच मंडळींना चहा अतिशय प्रिय, अर्थातच त्यांच्या आवडीच्या पद्धतीने आणि प्रमाणात केलेला! आता ही मंडळी कुणाकडे गेली आणि तिथे चहा प्यायची वेळ आली की, आधीच सांगत चहात साखर जरा कमी घाला. बाबांप्रमाणेच आमच्या घरात, चहा अतिशय प्रिय असलेली व्यक्ती म्हणजे आमचा पिटू, धाकटा भाऊ! चहा किती आवडत असे तर, घरी त्याला चहा दिला आणि त्याच कप अगदी तसूभरही रिकामा असला तर त्याला चालत नसे. कप अगदी पूर्ण भरूनच चहा लागत असे, इतका पूर्ण की अगदी थेंबभर चहा अजून घातला कपात, तर तो कपातून ओसंडून जाईल. अगदी काठोकाठ भरलेला चहाचा कप! आम्हाला सगळ्यांनाच या प्रकारची पण जाम गंमत वाटत असे, आणि मला मात्र या गमती बरोबरच काळजी सुद्धा वाटे. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ, सगळ्यात धाकटा, त्यात त्याची तब्येत म्हणजे अगदी किरकोळ. चहा तब्येतीला चांगला नसतो, असे ज्ञान लहानपणापासूनच होते. त्यामुळे त्याने फक्त काठोकाठ भरलेला दुधाचा पेला तेव्हढा प्यावा असे मला तेव्हाही वाटे. हो, त्याच्या साठी तेव्हा 'काठोकाठ भरलेला' हे फार म्हणजे सगळ्यात महत्वाचे होते.
इथपर्यंत ठीकच! त्याची चहाची आवड आणि निरागसता याचा उच्चांक! म्हणजे त्याच्यासोबत, कधी कुणाकडे गेलो, बसलो, पाणी वगैरे पिवून झाले. यानंतर थोडा वेळात त्या घरातील गृहिणी तिथून उठून स्वयंपाक घरात गेली नाही, तर हा स्वतःच म्हणायचा, काकू तुम्ही आमच्यासाठी चहा नाही करत का? एक म्हणजे चहाची आवड. दुसरे म्हणजे त्यावयात असलेले ज्ञान, पाहुणे आले की त्यांच्या करिता चहा केला जातो आणि निरागसता - अरेच्च्या आपण येऊन बराच वेळ झाला, पण या काकू आपल्यासाठी चहा करायला अद्याप उठल्याच नाहीत. नंतर मात्र त्याला समजावून सांगितल्यावर त्याचे हे असे विचारणे बंद झाले. जशी आम्हा बहिणींची निरासागता - पाहुण्यांसमोर त्यांना कळेल अशा पद्धतीने त्यांची मोजणी करायची नाही, हे कळत नसे... आजतागायत हे प्रसंग कधीही, कितीही वेळा आठवले तर, त्याचे प्रचंड हसू येते, अगदी प्रचंड हसतो आम्ही अजूनही...
लग्नानंतर सुद्धा तीच अडचण, साऱ्यांनाच चहा अतिप्रिय. तथापि त्यांची पण चहा तयार करण्याची पद्धत मात्र आमच्या प्रमाणेच होती. कालांतराने जाऊ घरात आली, तिलाही चहा अतिशय प्रिय. मात्र तिची चहा करण्याची पद्धत वेगळी. तिची चहा करण्याची पद्धत म्हणजे चहाच्या वेगवेगळ्या माध्यमातील चहा-संचाच्या मदतीने चहा बनविला जातो तसा. परंतु चहा संच न वापरता. म्हणजे एका भांड्यात दुध गरम करायचे आणि दुसऱ्या भांड्यात पाणी घालायचे त्यात आधी साखर घालायची, मग त्यात चहा भुकटी असे मिश्रण करून उकळी काढायची. मग हे चहाचे उकळलेले पाणी कपात हवे तितके गाळून घ्यायचे आणि मग त्या कपात, दुसऱ्या भांड्यात गरम केलेले दुध घालायचे, आवडीप्रमाणे.
तथापि चहा संचात चहा केला जातो तेव्हा, चहाचे उकळलेले पाणी, दुध, साखर या प्रत्येकासाठी वेगवेगळे भांडे असते. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या आवडी प्रमाणे, प्रत्येक घटक हवा त्या प्रमाणात घेऊन, आपापल्या पसंतीच्या चवीच्या चहाचा आस्वाद घेता येतो. चहा करण्याचा हा प्रकार म्हणजे मी कधीतरी दूरदर्शन संचावर पाहिला असावा, नक्की केव्हा ते आठवत नाही. पण साधारण मी बारावीत असतांना किंवा त्यानंतर. कारण तोपर्यंत मी कधीही, कुठलाही चित्रपट पाहिला नव्हता, छत्रपती शिवाजी महाराज हा चित्रपट वगळता. मी बारावीत असतांना आमच्याकडे दूरदर्शन संच खरेदी केला होता, हे नक्की आठवते. चहाचा आणि माझा छत्तीस चा आकडा असला तरी मला हे चहाचे विविध माध्यमातील चहा संच मात्र अतिशय आवडतात! तथापि आजतागायत त्याची खरेदी केलेली नाही. थोडक्यात अतिशय आवडती वस्तू, पण माझ्याकडे ती नाही.
पुढे, लेकीच्या मैत्रिणीच्या आई माझ्या मैत्रिणी झाल्या. अशीच एक मैत्रीण घरी आली, तिला चहा अतिशय प्रिय. मग तिच्यासाठी म्हणून चहा करायला घेतला. तीही आली माझ्या सोबत स्वयंपाक घरात आणि स्वयंपाकाच्या कट्ट्यावर थोडी रिकामी जागा होती तिथेच बैठक मारली. गप्पा मारत चहा करत होते. ती बघत होती. मध्येच मला थांबविले आणि म्हणाली अय्या तुला चहा करता येत नाही अजून? मला वाटले काय चुकले माझे नेमके? ती म्हणाली अग असा नसतो करायचा चहा. पाणी चहा भुकटी आणि साखर हे मिश्रण उकळलेच होते चांगले. मग तिचे शेगडीची आच पूर्ण बंद केली आणि त्या चहाच्या भांड्यावर एक झाकण ठेवायला लावले. त्यानंतर म्हणाली, आता असे केल्यावर थोडा वेळाने सगळी चहा भुकटी भांड्याच्या तळाला बसून जाईल, मग हा चहा गाळून घेऊन त्यात दुध घाल आणि एक उकळी काढ. चहा तयार! मी हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला होता, मला खूपच गंमत वाटली. चहा बनविण्याची अशी काही वेगळी पद्धत असेल, असे माझ्या कधी कल्पनेतही आले नव्हते, तोपर्यंत! पण नंतर कळत गेले, बरेच लोक या प्रकारे चहा बनवितात आणि अशाच पद्धतीने बनविलेलाच चहा आवडतो, हवा असतो. त्यामुळे चवीत नेमका काय फरक पडतो, हे मात्र त्या पिणारांनाच माहिती.
एकदा गुरूगृही गेले असतांना, दिवसभर तिथेच थांबले होते. साहजिकच दुपारच्या चहाच्या वेळी साऱ्यांनाच चहाची तल्लफ लागते. मग आमच्या माईंनी, चहा कसा करायचा ते सांगितले आणि त्याप्रमाणे चहा केला. ही कृती आणखी वेगळीच! मला परत एकदा आश्चर्य वाटले, अरेच्च्या, चहा अशा पद्धतीने सुद्धा केला जातो तर! आता त्यांची पद्धत ते सांगते. चहा भुकटी पाण्यात टाकून सौम्य उकळून घ्यायची. अर्थातच यात आवडी प्रमाणे आलं वगैरे जीन्नस घालावे. मग हे उकळलेले पाणी दुसऱ्या भांड्यात गळून घ्यायचे. ते भांडे शेगडीवर ठेवून त्यात आवडी प्रमाणे दुध घालून पुन्हा एक उकळी आणायची. सरते शेवटी कपात घालायचा आणि त्यात प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे साखर घालायची.
मी वास्तू कला महाविद्यालयात असतांना तर साऱ्यांनाच फार नवल वाटे, मी चहा पीत नाही म्हणून. कारण आमचा अभ्यासक्रम म्हणजे सतत रेखाटने करणे. अगदी पहिल्या वर्षापासून ते पाचव्या वर्षापर्यंत! अगदी, दररोज रात्र-रात्र जागून करावी लागत, ही रेखाटने. साहजिकच रात्री जागता यावे म्हणून सारेच, थोडा थोडा वेळाने चहा पीत असतं. आमची एक मैत्रीण तर रात्रीचे जेवण झाले की २-३ कप चहा तयार करून थर्मास मध्ये भरून ठेवत असे. रात्री, जसा लागेल तसा थोडा थोडा कपात काढून पीत असे. मला सगळे म्हणत, चहा पीत नाही म्हणतेस पण आता, इथे नक्कीच चहाचे व्यसन लागेल. तथापि तसे काही झाले नाही.
परंतु एकदा कुणीही, अगदी थोडाही आग्रह केला नव्हता, तरीही मी थोडा चहा प्यायले. तर त्याचे झाले असे चार-पाच वर्षांपूर्वी मी एका सहलीला गेले होते. तिथे प्रचंड थंडी तर होतीच पण बर्फही पडला होता. एकावर एक बरेच गरम कपडे घातले होते, तरीही थंडी वाजतच होती. आमचे जे सहल संयोजक होते, त्यांनाही चहा अतिशय प्रिय. त्यामुळे चहा-प्रेमींना वेळेवर चहा मिळाला नाही तर काय होते, हे त्यांना नीट माहिती होते. सकाळी विश्रामगृहातून निघण्या आधी सर्वांचा व्यवस्थित चहा-नाश्ता झालेला असे. तथापि दुपारी मात्र ते शक्य नसे. त्यावर त्यांनी एक छान तोडगा काढला होता. हल्ली, बाजारात कॉफी आणि चहाची पाकिटे मिळतात, ज्यात चहा/कॉफी भुकटी, दुधाची भुकटी, साखर आणि वेगवेगळ्या विशेष चव आणणाऱ्या गोष्टी असे सगळे एकत्र केलेले मिश्रण त्यात असते. कपात गरम पाणी घेऊन, त्यात हे मिश्रण घातले की चहा/कॉफी तय्यार! तर त्यांनी तसली भरपूर पाकिटे सोबत आणलेली होती. सकाळी निघतांना तीन-चार थर्मास भरून गरम पाणी घेत असतं. आणि दुपारी कुठेतरी थांबून अशा प्रकारे चहा बनवून देऊन सगळ्यांना तृप्त करत असतं. अर्थातच याच्याशी माझा काही संबंधच नसे. पण एके दिवशी त्या भयंकर थंडीने मला हा पिण्यास भाग पाडले. निदान थोडे गरम पेय पोटात गेले तर थोडी तरी थंडी कमी होईल असे वाटले. थंडी सहनच होत नव्हती. शेवटी मी स्वतः चहा मागितला आणि संपूर्ण कप चहा संपवला सुद्धा. अर्थातच हा झटपट(instant) चहा असल्याने त्याला चहाची फारशी चव नसावी, मला फक्त वेलची उकळलेले गोड गरम पाणी प्यायलो असे वाटले. माझे मलाच आश्चर्य वाटले, मी कसा काय चहा प्यायले! तारीख सुद्धा कायमची लक्षात राहिली १६ नोव्हें!
इतक्या निरनिराळ्या चहा बनविण्याच्या पद्धती मी पाहिलेल्या आहेत, आजवर. अर्थातच या व्यतिरिक्तही वेगळ्या पद्धती असू शकतील. त्या किंवा तुमच्या खास पद्धत खाली असलेल्या अभिप्राय भागात किंवा contact me किंवा सरळ whatsapp च्या माध्यमातून सांगायला विसरू नका.
II इति चहा पुराणम् II
कडक चहा!
बांबू माध्यमात विशेष, संशोधक काम करणाऱ्या
महिला वास्तू विशारद यांच्या घरी चहा!
हा आमच्या मम्मी-दादांचा चहा!
लग्न झाल्यापासून मम्मीने कायमच ८-१० कपांच्या
कमी कप चहा केला नव्हता.
आता मात्र दोनच कप.
आमच्या काकूचा समुद्रभर चहा!
सकाळी उठल्यावर असा समुद्रभर
चहा प्यायल्या शिवाय तिचा दिवस
सुरूच होऊ शकत नाही.
अति चहा प्रेमी - नाथ हा माझा!
करोना काळातील मन लावून, भरपूर वेळ देऊन
केलेला भरपूर चहा...
हल्ली आमचा पिटू सर्दी-खोकला झाला की
असा काढा पितो
आणि नेहमीसाठी या कोऱ्या चहावर स्थिरावला आहे!
या आधी वर्णन आलेल्या एकत्र कुटुंबाच्या, कितीतरी पटीने
मोठ्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून जबाबदारी पेलणारा आणि
सर्व प्रकारचे कौटुंबिक, सामाजिक वगैरे वगैरे चे भान
असलेला अतिशय जबाबदार आणि सर्व प्रिय व्यक्ती आहे!
आणि
हाच तो झटपट चहा,
जो मी प्यायले होते!
बसची सामान ठेवायच्या जागेची
दारं उघडून, तिथे हा चहा बनवला जात असे.
©️®️आनंदी पाऊस
(काही अनुभवलेलं...)
सप्टे २०२५
खूपच छान!
ReplyDeleteएकदम भारी!
आम्हीही चहाचे बरेच वेगवेगळे प्रयोग करतो अगदी युट्युब वर सुद्धा चहाची रेसिपी बघून झालेली आहे.
ReplyDeleteपण मला मात्र बिन पाण्याचा पूर्ण दुधाचा चहा लागतो
किलवर' च्या आकाराचे चमचे ...👌
ReplyDeleteचौधरी कुटुंबच काय प्रत्येकाला हे वाचून लहानपणी च्या आठवणी चाळवतील...
चहा सारखाच कडक लेख...
Pune madhe shikat astanna Maramari navane chaha milat hota.
ReplyDeleteChaha + coffee+ masala ase combination asayche.
Vishesh mhanje
1 maramari= 2 cups milayache
चहा पुराण चांगले आहे
ReplyDeleteमी तुझ्याकडे चहा प्यालो आहे
चहा पुराण छान
ReplyDelete👌🏻चहा छान आहे बरे का
ReplyDeleteहो बापरे तू आणि चहा?
ReplyDeleteJust can't imagine
वाह... मी तर चहाबाज आहे
ReplyDeleteसुंदर चहा पुराण. .आणि निरनिराळ्या चहा बनविण्याच्या पध्दती . मस्तच.
ReplyDeleteचाय पे चर्चा ,चहाच्या पेल्यातील वादळे , चाय पे बुलाया है , साधा चहा सुधा गेल्यावर विचारला नाही , किलवर चमचा एक माझ्याकडे आहे .खूप आठवणी जागृत झाल्या
ReplyDeleteआप चाहकर भी चहा नही पिते फिर भी चाहकर इतना सारा चहा पे लिख दिया...
ReplyDeleteअसो...सारे अमृततुल्य चहामय प्र चि खूप कमाल...माला जास्वंद..चहा, गोकर्ण चहा, लमसा chocolate flavour hyderabadi चहा ,मसाला चहा भयंकर आवडतो..
आजकाल तंदूरी चहा....5 cha cutting चहा...कप बशी आणखीकपाचे विविध प्रकारआवडतात....
चहात जी आपुलकी असते ती
filter काँफीतही असतेच की.....
पुढे काँफीवरही लिहताय काय?-:स.न.वि.वि.संजिता
आता दुपारचा चहा घ्यायचे वातावरण आहे. समोर आमचा द्वाड सोबती 'मोबाईल' आहे, काकूच्या रागाची पर्वा न करता, त्याच्याकडे बघत बघत तुझ्या आनंदी पावसातील आनंदी चहा, नव्हे "चहा-३६-मी" वाचत वाचत चहा घेत आहे. तुझे सूक्ष्मातिसूक्ष्म वर्णिलेले चहा पुराण संपवले. कुठल्याही, अगदी कुठल्याही विषयावर इतक्या सूक्ष्म पद्धतीने, सहज लाभलेल्या स्मरणशक्तीने आणि चिकाटीने तू लिखाण करतेस याचे प्रत्यंतर आले तसेच नवलही वाटले. तुझ्या या सवयीचा तू हाती घेतलेल्या संशोधनात नक्कीच उपयोग होईल याची खात्री वाटते. जितका चहा तुला नको नकोसा वाटतो तितका चहा मला हवा हवासा वाटतो.
ReplyDeleteपूर्वी बाबांची फिरस्तीची नोकरी असल्यामुळे आईलाही बदलीच्या ठिकाणी जावे लागे, तसेच तिला वाचनाचीही आवड होती. त्यामुळे तिच्याजवळ अवांतर गोष्टींचा आणि ज्ञानाचा भरपूर साठा होता. आम्ही मूळ गावी हिंगोण्याला राहायला आल्यावर वाड्यातील, गावातील बाया माणसे बऱ्याच वेळा आईशी गप्पा मारायला येत, तेंव्हा चुलीवरचा चहा हा मुख्य विषय असायचा. चहा घेत घेत मस्त गप्पा रंगायच्या. आई बऱ्याच वेळा सांगायची की, पूर्वी ज्यांच्याकडे चहा होत असे त्यांना लोक नावे ठेवत, जसं काही चहा
म्हणजे एखादं भयंकर व्यसनच! आणि आता तर पै पाहुणा घरी आल्यावर त्याला चहा नाही दिला, तर लोक नावे ठेवतात. वगैरे वगैरे. आता तर चहाचे भरपूर प्रकार आहेत, ग्रीन टी, ब्लॅक टी, येलो टी, लेमन टी, आणखी काही काही. चहाच्या कंपन्याही खप वाढण्याकरता त्यांच्या चहाचे औषधी गुणधर्म वर्णन करून जाहिराती करत असतात.
असो, सध्या आमच्याकडे सकाळी आणि संध्याकाळी असा दोन वेळा चहा होत असतो. अगदी साधा पण पुणेरी भाषेत "अमृततुल्य" चहा! साखर, चहा पावडर, दूध, पाणी, आले, चहाचा मसाला युक्त चहा! सदर चहाचे वैशिष्ट्य म्हणजे, चहा अगदी अप्रतिम, परंतु काकूला आजपर्यंत कधीही अगदी हवा तेवढाच चहा करता आलेला नाही. दोन कप हवा असेल तर तो तीन कप होणार म्हणजे होणारच. तिथे बोलायची सोय नाही! तसेच पाहुणे नेहमीचेच असतात, त्यामुळे कोणाला अति गोड, कुणाला नुसता गोड, कुणाला कमी गोड, कोणाला बिना साखरेचा चहा लागतो हे सगळे तिच्या ध्यानात असते. त्यामुळे चहाप्रेमी पाहुणे आमच्याकडे नेहमी खुश असतात, नव्हे तर जळगावला आल्यावर आमच्याकडे चहा घ्यायचा आहे म्हणून इतरांकडचा चहा टाळत टाळत शेवटी आमच्याकडे भेट घ्यायला येतात आणि चहा
घेऊन तृप्त होतात, आता बोला! अरेच्चा, हा तुझ्या चहा पुराणाला दिलेला अभिप्राय नसून चहाचा वेगळा निबंधच तयार झाला की! हे असं होतं चहा घेऊन स्फूर्ती आल्यामुळे. आता मी देखील गोड चहा घेण्याचं सध्या टाळतो आहे, परंतु सवय म्हणून किंवा व्यसन म्हणून तो घेतल्याशिवायही करमतंच नाही. असो, अभिप्रायाचं (?) लांबलेलं चर्हाट संपवतो, धन्यवाद 😂
खूप छान!
ReplyDeleteएकदम मस्त!
चहा पुराण...
प्रत्येकाची चहा बनविण्याची पद्धत वेगळी असते.काहींच्या हातचा चहा खरंच खूप छान असतो.मी चहाप्रेमी नाही.पण माझी लहान वहीनी खुप छान चहा बनवते.😊
ReplyDeleteChaha puran 👌🏻👌🏻👌🏻👌🏻chan💐🌹💐🌹
ReplyDeleteखूप मस्त 👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय तुम्ही
ReplyDeleteमी सुद्धा अठरा ते वीस वर्षापासून चहा घेत नाही
अगं तुझे चहा पुराण मी आज वाचले आणि माझ्या पण मागच्या आठवणी जागृत झाल्या😄 सगळे घरी असले आणि मी पण असले की दुपारचा चहा मीच करायचे आणि माझ्या हातचा चहा सगळ्यांना फार आवडायचा आणि बाबा तर त्याला अमृततुल्य चहा म्हणायचे आणि दादा सुद्धा
ReplyDeleteघरचे म्हशीचे दूध असायचे मग काय विचारते"" अहाहा!! 😊😊