🌾🪻काही अल्प ज्ञात पुष्पं-१ 🪻🌾 पुष्पं सुमनं कुसुमं फुलं या पृथ्वी तलावर फुलं न आवडणारा व्यक्ती असेल असे वाटत नाही. प्रत्येक व्यक्तीला कुठले नी कुठले पुष्पं आवडतेच, आकर्षित करतेच. काही वर्षापूर्वी बहुतेक साऱ्या भारतीयांचे सगळ्यात आवडते फुलं म्हणजे गुलाब, मोगरा, बुच, निशिगंध, झेंडू, जाई, जुई वगैरे सारखी भारतीय फुलेच असत. तथापि मधल्या काही काळापासून जगातील कान्याकोपऱ्यातील निरनिराळी फुले भारतात मिळू लागली, त्यांची लागवड सुद्धा होवू लागली. याचा परिणाम म्हणून साऱ्यांनाच ही सगळी विदेशी फुले आवडू लागली. सर्वत्र हीच फुले बघायला मिळतात, विकत मिळतात. आमच्या घराजवळील फुलवाल्या दादांकडे निशिगंधाच्या काड्या मागते, तथापि त्या मिळतच नाही, मात्र विविध विदेशी फुले मात्र उपलब्ध असतात. असो. या सगळ्या फुलांच्या व्यतिरिक्त खूप सारी अतिशय सुंदर आणि गोड फुले आपल्या अवती-भवती असतात, ज्याकडे साधारणपणे कुणाचे फारसे लक्ष जात नाही. अशीच काही फुले मी आज माझ्या प्रकाशचित्रीकरणाच्या छंदातू...