त्रिवेणी संगम, वेरूळ, संभाजीनगर.
(सरिता मंदिर)
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या ...)
कोंकण ज्ञानपीठ, उरण कला व वाणिज्य महाविद्यालय आणि
भारतीय मूर्ती आणि स्थापत्य संशोधन परिषद आयोजित
तिसरे राष्ट्रीय अधिवेशन २०२३
त्रिवेणी संगम, वेरूळ, संभाजीनगर.
(सरिता मंदिर)
भारताची जगभरात एक कृषिप्रधान देश म्हणून ओळख आहे, तशीच किंबहुना त्यापेक्षा कणभर जास्तच भक्ती-प्रधान देश
म्हणून सुद्धा ओळख आहे! ही भक्ती जन्मदात्या माता-पिता यांच्या पासून सुरु होते.
देव-देवता, वृक्ष-वल्ली, प्राणी-पक्षी,
पंचमहाभूत आणि अगदी जल, पाण्यापर्यंत
सगळ्यांच्याच बाबतीत असते. एव्हढेच नाही तर समृद्ध जल साठा असलेल्या नद्या,
तळी, समुद्र यांच्या प्रती सुद्धा अगाध
भक्ती अनुभवास येते. जन्मदात्री माता एका पिढीचे किंवा एका जन्माचे पोषण-संगोपन
करते. पण जलाचा समृद्ध साठा आणि अखंड स्त्रोत असलेल्या नद्या पिढ्या न पिढ्यांचे,
अनंत जन्मांचे पोषण करतात. या जला शिवाय, पर्यायाने नद्यांशिवाय समस्त विश्वाचे अस्तित्वच असू शकत नाही. फार प्राचीन काळापासून मानवाने हे
महत्व जाणले आणि कायमच त्याच्या प्रती आदर आणि भक्ती प्रदर्शित केली, निरनिराळ्या स्वरुपात! नद्यांची त्यांच्या भौतिक रुपात
तर पूजन केलेच पण त्यांना मूर्ती
स्वरुपात, सगुण रुपात आणून त्यांचे पूजन केले. आजही 'जल' महात्म्य सांगण्याची गरज
भासतेच. कारण मानवाने नैसर्गिक जलाचाच नाही तर सगळ्याच प्रकारच्या नैसर्गिक संपत्तीची
अंदाधुंद ओरबड चालविली आहे, त्यामुळे निसर्ग मानवाच्या मुलभूत?? गरजा भागविण्यास असमर्थ आहे. जला शिवाय जीवन नाही,
याची सतत मनात जाण असणे, ठेवणे फार
महत्वाचे आहे. त्यासाठी या शोध-निबंधाद्वारे, माझा हा एक
छोटासा प्रयत्न, नद्यांची सर्वस्पर्शी ओळख करून देण्याचा,
भौतिक रूपापासून ते चैतन्यमयी-मूर्ती पर्यंत!
गंगेचे
यमुने चैव गोदावरी सरस्वती
नर्मदा
सिंधू कावेरी जलैस्मिन सन्निधिं कुरु
आपले
संस्कार आणि आपली संस्कृतीकडे सखोल बघायचे/समजून घ्यायचे झाले तर आपल्याला थेट
आपल्या जन्मापासूनच सुरुवात करावी लागते. अगदी आपण जन्माला आल्यापासून आजी-आई
अंघोळ घालत असतांना वरील श्लोक दररोज आपल्या कानावर पडत असतो. जगातील आपला एकमेव
देश आहे, ज्यात नदीला माता म्हणतात आणि मानतात. आपली
संस्कृती आहे , "मातृ देवो भव !" नदीची महती गायली जाते, माता म्हणून, पापनाशिनी म्हणून तसेच
समृद्धीदात्री म्हणून सुद्धा. अशा तीन नद्यांचा संगम म्हणजे त्रिवेणी संगम. असे
बरेच त्रिवेणी संगम भारतात आहेत. आजचा विषय आहे कैलास, वेरूळ
येथील , गंगा-यमुना-सरस्वती त्रिवेणी संगम म्हणजेच सरिता
मंदिर, कैलास, वेरूळ. या तीन
नद्यांचा संगम अलाहाबाद येथे आहे. या भागाला प्रयाग म्हटले जाते. प्रयाग या संस्कृत शब्दाचा
अर्थ आहे 'दोन
किंवा अधिक नद्यांचा संगम'.
गंगेचे पावित्र्य, यमुनेची भक्ती आणि सरस्वतीचे ज्ञानवैभव याचे विशेष
महत्व आहे. गंगेचे पाणी निळेशार आहे तर यमुनेचे पाणी काळेशार आहे आणि सरस्वती
गुप्त स्वरूपात आहे .
गंगा नदी : गंगा, भारतातील सर्वात मोठी नदी असून तिची लांबी सुमारे २४६५ कि. मी. आहे.
भारतीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून
गंगा नदीचे पूजन केले जाते. गंगेला भारतीय संस्कृतीचा आत्मा मानले जाते. तसेच
हिंदू संस्कृतीचा पाळणा सुद्धा मानले जाते. गंगा, भारतातील अशी एकमेव नदी आहे, जिचा
संबंध भारताच्या प्रत्येक आध्यात्मिक व सांस्कृतिक चळवळीशी जोडला गेला आहे.
भारतातील वैदिक, बौद्ध आणि जैन हे तीनही धर्म गंगा
खोऱ्यातच उदयास आले. साधारण चार हजार वर्षांच्या कालखंडात गंगेच्या समृद्ध खोऱ्यात
निरनिराळ्या काळात अनेक राजवटींनी वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यातूनच
भारतीय संस्कृतीचे विविधांगी व्यक्तिमत्व विकसित झाले.
गंगेच्या
नुसत्या दर्शनाने जीवन पवित्र व कृतार्थ होते. तिचे गोड पाणी प्यायल्याने सहस्त्र
अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते आणि गंगेमध्ये स्नान केल्याने मोक्ष मिळतो. या
काही श्रद्धा आहेत, भारतीय समाज मनात. भारतीयांच्या
जन्मापासून अंतापर्यंत सगळे
विधी गंगेच्या पवित्र जलाशी संबंधित आहेत.
भगीरथाने ब्रह्मदेवास प्रसन्न केल्यावर, ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूतून गंगेला मुक्त केले. पण मुक्त गंगेचा प्रवाह खूप प्रचंड होता. त्यामुळे महाप्रलय येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मग शंकराने, आपल्या जटेत तिला धारण करून, तिचा प्रवाह सुसह्य केला आणि तो सुसह्य प्रवाह पृथ्वीवर आणला. देवलोकातून अवतरल्यामुळे, गंगा नदीला 'स्वर्गीय नदी' आणि 'देव नदी' सुद्धा मानले जाते. गंगा नदीचा वेग इतका प्रचंड आहे की ती समुद्राला मिळाल्या नंतरही समुद्रात जवळजवळ एकशे वीस किमी पर्यंत वाहते.
गंगा ही सत्व गुण वृद्धी करणारी आहे. गंगेच्या
किनारी सगळ्या धार्मिक कथा घडलेल्या आहेत. ही नदी सगळ्या धार्मिक स्थळांना स्पर्श
करून जाते.
यमुना नदी : यमुनेचा उल्लेख ऋग्वेदात, अथर्ववेदात आणि ब्राह्मण ग्रंथामध्ये सुद्धा बघायला मिळतो .
यमुना
म्हणजे सूर्य देव आणि मेघदेवता संजना यांची मुलगी आणि यमाची बहीण. त्यामुळे तिला
सूर्यतनया, रवीनंदिनी, सूर्यजा
या नावांनी सुद्धा ओळखले जाते.
तसेच ती श्रीकृष्णाच्या अष्टभार्यांपैकी एक. श्रीकृष्णाला ब्रज संस्कृतीचे जनक म्हटले जाते, तर यमुनेला आई मानले जाते, यमुना
मैय्या! तसेच, कृष्ण जन्माशी निगडीत असलेली मथुरा, वृंदावन आणि गोकुळ ही तीनही शहरे यानुमेच्या काठावरच आहेत.
यमुना नदी यमुनोत्रीला उगम पावते. आणि अलाहाबाद, प्रयाग येथे गंगेत विलीन होते. ही गंगेची सगळ्यात मोठी
उपनदी आहे. भारताच्या ऐतिहासिक जडणघडणीत यमुना नदीचा सिंहाचा वाटा आहे. भारताची
राजधानी दिल्ली, यमुना नदीच्या काठावरच आहे. तसेच,
पहिल्या भारतीय महायुद्धापासून ते पानिपतच्या तिसऱ्या
युद्धापर्यंत यमुनेकाठी खूप रक्त सांडले गेले. त्यामुळे तिचा नैसर्गिक निळा रंग
काही अंशी पिवळसर झाला आहे असे म्हटले जाते. तसेच यमुना खोऱ्याशी पुष्कळच राज
घराण्यांचा संबंध आला असल्याने
यमुना खोऱ्याचा इतिहास म्हणजेच भारताचा इतिहास मनाला जातो.
यमुना गंगेच्या मानाने शांत असल्याने यमुनेचे वाहन
कासव आहे. तसेच अगदी आताही यमुनेच्या काठावर प्रचंड आकाराची कासवे बघायला मिळतात.
यमुनेच्या खोऱ्यात आर्य संस्कृती नांदाल्याचे पुरावे म्हणजे या खोऱ्यात आढळलेली अनेक स्थळं आणि त्यांच्या वापरत असलेली राखी
रंगाची खापरे.
यमुनेचे पाणी काळसर असल्याने तिला वाङमयात कालिंदी
सुद्धा म्हटले जाते.
सरस्वती नदी : सर म्हणजे पाणी आणि स्वाती म्हणजे स्थिरावणे
म्हणून सरस्वती म्हणजे स्थिर पाणी असणारी नदी! सरस्वती भारतातील एक प्राचीन महानदी
असल्याचे समजले जाते. वेदात सरस्वतीचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो, एव्हढेच नाही तर वेदांची निर्मिती सरस्वतीच्या काठी
झाल्याचे अभिमानाने सांगितले जाते. महाभारत आणि वेद यातील उल्लेखावरून कधीकाळी
सरस्वती गंगेपेक्षा प्रभावी आणि पवित्र नदी असल्याचे वाटते. वेद, महाभारत, पुराणे आणि झोराष्ट्रियन साहित्यातून
सरस्वती नदीचे अनेक उल्लेख आढळतात.
ऋग्वेदात सरस्वती स्तोत्र आहे. त्यात नदीचे वर्णन आणि
स्तुती केली आहे. वेदोत्तर काळात सरस्वती नदी कुरुक्षेत्रातील विनशन या स्थानी
लुप्त झालेली आहे, असा ब्राह्मण ग्रंथात उल्लेख आढळतो.
महाभारतात विनशन येथे लुप्त
झाल्याचे आणि चमसोद् भेद येथे पुन्हा प्रकट झाल्याचा उल्लेख आहे. पुराणात देवी मानून तिचे स्तवन केलेले
आहे. शिवाने ब्रह्म हत्या केल्याने, लागलेल्या पापाचे क्षालन करण्यासाठी तो सरस्वती नदीत
स्नान करू लागताच, ती लुप्त झाली असे वामन पुराणात
सांगितले आहे. लक्ष्मी, गंगा, सरस्वती
या श्री विष्णूच्या पत्नी होत्या . एकदा गंगा आणि सरस्वती मध्ये भांडण झाल्याने
त्यांनी एकमेकींना शाप दिल्याने, त्या नदी होऊन पृथ्वीवर आल्या अशी सुद्धा एक आख्यायिका
सांगितली जाते.
भौगोलिक दृष्ट्या मात्र
पृष्ठीय बदलांमुळे नदीचा मार्ग उंचावला आणि नदी लुप्त पावली. शास्त्रज्ञाच्या अंदाजानुसार इस पूर्व ३००० सुमारास ती लुप्त
पावली. वैदिक सरस्वती नदी शोध मोहीम आदरणीय पद्मश्री डॉ विष्णू वाकणकर, मोरोपंत पिंगळे आणि इतर सोळा जणांनी हाती घेऊन खूप
मोलाचे काम केले आहे .
त्रिवेणी संगम(सरिता मंदिर), वेरुळ
हिंदू संस्कृतीत सगळ्याच नद्यांची सगुण रुपात पूजा
केली जाते, त्यांना
देवता मानले जाते. तसेच गंगा, यमुना आणि सरस्वती या तीनही
नद्यांना देवता मानले गेले आहे आणि त्यांची मूर्ती स्वरूपात पूजा सुद्धा केली
जाते. हा त्रिवेणी संगम मूर्तीच्या स्वरूपात आपल्याला वेरूळ येथील कैलास लेण्यात
बघायला मिळतो. कैलास मंदिराच्या मुख्य आवारात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला
कोपऱ्यात गंगा, यमुना, सरस्वती
यांचे सरिता मंदिर दृष्टीस पडते.
हिमालयावरील कैलासाला जायचे म्हटले तर प्रयाग
मार्गे, जेथे त्रिवेणी संगम आहे,
तिथून जाता येते. तसेच वेरूळ येथील कैलास मंदिराकडे जायचे झाले
तर या नद्यांचे दर्शन घेऊन पवित्र झाल्यावरच पुढे जावे लागते. शिल्पकारांचा अभ्यास किती सखोल आणि सर्वस्पर्शी होता, यातून स्पष्ट दिसते. हे मंदिर थोडे उंच जोत्यावर आहे,
काही पायऱ्या चढून जावे लागते. दर्शनी भागात दोन वर्तुळाकार
स्तंभ आणि दोन अर्धवर्तुळाकार अर्ध स्तंभ असल्याने, त्याचे
तीन भाग पडतात. मागे भिंतीत चार अर्धवर्तुळाकार अर्ध स्तंभ आहेत त्यातून, तीन कोनाडे साकार झाले आहेत. प्रत्येक कोनाड्यास मकर तोरण आहे. मधल्या
कोनाड्यात गंगा, तिच्या(गंगेच्या) डाव्या बाजूला यमुना
आणि उजव्या बाजूला सरस्वती आहे. या तीन पैकी प्रत्येक कोनाड्यात दोन छोटे अर्धवर्तुळाकार
अर्ध स्तंभ आहेत आणि या स्तंभांवर असलेल्या मकरांच्या मुखातून निघालेल्या मौतिक
माळांनी अतिशय सुरेख तोरण तयार झालेले आहे.
गंगा, मूर्ती : गंगा
म्हणजे पावित्र्याचे प्रतिक! हिंदू धर्मात गंगेला देवतेचे स्थान आहे. गंगा म्हणजे गौर वर्णीय, पांढरा मुगुट धारण केलेली सुंदर स्त्री. स्थानक मूर्ती
असून, समभंग, समपद आहे. तिचे
वाहन मकर आहे, ती हातात कमळ आणि शंख धारण करते. जेव्हा
चतुर्भुज असते, तेव्हा मातीचे पाण्याचे भांडे, कमळ, शंख धारण करते आणि एक हात वरद मुद्रेत
असतो. जेव्हा गंगा महाविराट रूपात दाखवलेली असते, तेव्हा ती, तिचे वाहन मकरावर स्थानक असते आणि
आजूबाजूने बऱ्याच मकरांनी वेढलेली
असते. चतुर्भुज असून, तिच्या
हातात कलश, अक्षमाला, कमळ किंवा
शंख असून एक हात अभय मुद्रेत असतो. गंगेच्या शिल्पाकृती नेहमीच पुष्ट दर्शविल्या जातात. संपूर्ण
भारतीयांना पोसण्यासाठी तिच्यापाशी समृद्ध जलसाठा आहे, हेच त्यातून व्यक्त होते. तसेच तिच्या जल सामर्थ्याचे
प्रतिक म्हणून तिचे वाहन मकर दाखविले जाते.
कैलास लेण्यात असलेल्या मंदिरात गंगा मध्यभागी
असलेल्या कोनाड्यात असून मकरावर समपद, समभंगात उभी असलेली सोज्वळ आणि
पवित्र मूर्ती आहे. उभट करंड मुगुट परिधान केलेला आहे. कर्ण कुंडलं, ग्रेवेय, उदरबंध, मेखला, तोडे, अंगुलिका असे अलंकार परिधान केलेले आहेत. अधोवस्त्र ओले
असल्याने अंगाला चिटकलेले आहे. तथापि गंगेच्या मूर्तीचा उजवा हात खंद्या पासून भंग
पावलेला आहे. वर उल्लेख आल्या
प्रमाणे कोनाडा मौक्तिक-मकर
तोरणाने अलंकृत केलेला आहे. आजूबाजूला वेलबुट्टीची नक्षीदार सजावट आहे.
यमुना, मूर्ती : यमुना
म्हणजे भक्तीचे प्रतिक! गंगेच्या डाव्या
बाजूच्या कोनाड्यात यमुना आहे. यमुना आपले वाहन, कासव यावर स्थानक मूर्ती आहे. ही मूर्ती मात्र त्रिभंगात्मक
आहे. गंगेकडे झुकलेली. माथी उभट करंड मुगुट धारण केलेला आहे. ग्रेवेय, उदरबंध,कमरेला मेखला, पायात तोडे, नुपूर, दंडात
केयूर असे विविध अलंकार परिधान केलेले आहेत. उप आणि अधो वस्त्र परिधान केलेले आहे. या यमुनेच्या मूर्तीचा डावा
हात खांद्यापासून आणि दोन्ही पाय गुडघ्यापासून भंग पावलेले आहेत. तथापि दोन्ही
पावले झिजलेल्या अवस्थेत आहेत. गंगेप्रमाणे हा सुद्धा कोनाडा मौक्तिक-मकर तोरण
तसेच आजूबाजूला वेलबुट्टीच्या नक्षीने सुशोभित केलेला आहे.
देव दर्शनापूर्वी भक्ताने सुचीर्भूत असणे गरजेचे असते, ही आपली हिंदू परंपरा. यामुळे, गुप्तकाळात बऱ्याचवेळा गाभाऱ्याच्या द्वारशाखांवर यमुना आणि गंगा यांची शिल्प कोरलेली असतात, काहीवेळा द्वाराच्या खालच्या बाजूस सुद्धा असतात.
जेणेकरून भक्त, गंगा-यमुनेच्या दर्शनाने आत्मिक सुचीर्भूत होऊनच गाभाऱ्यात प्रवेश करतो.
सरस्वती, मूर्ती : सरस्वती म्हणजे साक्षात ज्ञानच! मथुरेला मिळालेली
एक सरस्वतीची मूर्ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात सरस्वतीने कुठलेही अलंकार परिधान केलेले नसून, हातांत फक्त धागे बांधलेले आहेत, अगदी तिच्या सात्विक वृत्तीला साजेसे! या मूर्तीवर
अभिलेख आहे यावरून असे सिद्ध होते की, कुशाण काळात
सरस्वती नर्तकांची आराध्य देवता होती.
कैलास, वेरूळ येथील सरिता मंदिरात, गंगेच्या उवज्या बाजूच्या कोनाड्यात सरस्वती आहे. ही सरस्वतीची
मूर्ती सुद्धा त्रिभंगात कमलस्थित आहे. गंगेकडे झुकलेली आहे. जणू काही यमुना आणि
सरस्वती या दोघींना गंगेला जाऊन मिळण्याची आतुरताच यातून प्रदर्शित होते. करंड मुगुट, चक्राकार कर्णकुंडलं, ग्रेवेय, उदरबंध, मेखला, तोडे,
केयूर वगैरे अलंकारांनी नटलेली आहे. इतर दोन्ही कोनाड्यां
प्रमाणेच हा कोनाडा सुद्धा छान नक्षीदार वेलबुट्टीने आणि मौक्तिक-मकर तोरणाने सजवलेला आहे. या मूर्तीचा
उजवा हात खांद्यापासून भग्न आहे तर पाय गुडघ्यापासून भंग पावलेले आहेत.
सरस्वती रेखाचित्र : हे रेखाचित्र ब्रिटिश संग्रहालयातील सरस्वतीच्या
मूर्तीचे आहे आणि हे रेखाचित्र आदरणीय पद्मश्री डॉ विष्णू वाकणकर यांनी रेखाटलेले
आहे. हे रेखाचित्रं उज्जैनच्या वाकणकर संग्रहालयात(पद्मश्री वाकणकर यांचे राहते घर संग्रहालयात रुपांतरीत करण्यात आलेले आहे. त्यासाठी त्यांच्या सर्व नातेवाईकांनी त्यांचे त्या घरातील भागावरील हक्क सोडून दिले आहेत.) आहे. तसेच या मूर्तीच्या पायाशी एक शिलालेख आहे. या शिलालेखाचा ठसा प्रथम त्यांनीच
भारतीय अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. ही मूर्ती मकराना संगमरवरात घडविलेली
असून, राजा भोज यांच्या धारच्या
राजप्रसादातील रोजच्या पूजेतील मूर्ती होती. ही मूर्ती इस्लामिक आक्रमणात
स्थानभ्रष्ट झाली होती आणि ब्रिटीश काळात इंग्लंडला पाठविली गेली. ब्रिटिश
संग्रहालयात मात्र या मूर्तीचा, जैन अंबिका मूर्ती असा
उल्लेख आढळतो.
आगळा त्रिवेणी संगम : ही दोन शिल्प पद्मश्री राम सुतार यांनी १९५७ मध्ये
तयार केलेली गंगा आणि यमुनेची शिल्प आहेत. ती मूस संग्रहालयाच्या दालनात, आत शिरताच, दरवाज्याच्या
डाव्या आणि उजव्या बाजूला आहेत आणि सरस्वती नदी जशी लुप्त झालेली आहे, त्याच प्रमाणे मूस सरांनीं आपली कला प्रयत्नपूर्वक गुप्त ठेवलेली आहे.
त्यांचे तत्वच होते , "आर्ट लाईज इन कनसीलींग द आर्ट" (art lies in concealing the art
). असा हा आगळाच त्रिवेणी संगम बघायला मिळतो, गंगा, यमुना आणि सरस्वतीचा, मूस संग्रहालय, चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे! माझ्या मनाला फार भावलेला, म्हणून इथे याचा आवर्जून उल्लेख केला!
परिषदेतील क्षणचित्रे
काय सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख!
ReplyDeleteमला तर खूप सार्या गोष्टी आताच कळल्या.
अशीच लिहिती रहा आणि आम्हालाही सुशिक्षित कर
Chaan masta
ReplyDeleteसंगम _तीर्थ फिरून आलो...
ReplyDeleteसुंदर लेख... शब्दांकन... सर्वच...👌
वर्षा तुझा लेख वाचला, लेख वाचून तुझा अभ्यास किती सखोल आहे याची कल्पना आली, एकदम मस्त लेखन, तुला मानाचा मुजरा,
ReplyDeleteअतीशय सुंदर आणि माहीतीपूर्ण लेख आहे ,आपणास खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
ReplyDeleteसखोल माहितीपूर्ण लेख आहे. बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या. खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏
ReplyDeleteछान माहिती संकलन
ReplyDeleteAbhyas purn Lake aahe👌🏻👌🏻👍🏻👍🏻🌹💐🌹💐🌹💐🌹
ReplyDeleteReading this article itself was treat. We should visit these caves with knowledgeable person like you. More than 90% people are not aware about such stories. Guides there too have limited knowledge. Let's plan trip there.
ReplyDeleteखूपच सुंदर अणि अभ्यासपूर्ण वर्णन केले आहे.
ReplyDeleteखूप उपयोगी माहिती मिळाली
खरंच तुमचा अभ्यास खूप सखोल आहे.. वाचल्यावर असे वाटत आहे स्वतः जाऊन आलो...
ReplyDeleteAll the best Tai👌🏻❤️🥰😍🙏🏻
खूप छान माहिती भेटली 👌👍
ReplyDeleteसखोल आणि उप् योगि माहिती मिळाली
खूप छान 👌👍
ReplyDeleteउपयुक्त माहिती
खूप छान आणि अभ्यासपूर्ण लेख आहे. वर्षा खूप छान लेख लिहिला आहेस. अप्रतिम
ReplyDelete