थोडं(खूप सार?) गोडाचं-६ (सांजरी/सांजोरी)
(घरातील गमती-जमती)
खानदेशातील अनेक लोकप्रिय गोड पदार्थांपैकी एक गोड पदार्थ. अगदी दराब्याच्या तोडीसतोड. सर्वांचाच अतिशय लाडका पदार्थ म्हणजे सांजरी/सांजोरी! हा लेख बऱ्याच दिवसांपासून(जवळ-जवळ दोन अडीच वर्षांपासून) लिहायचा राहतोय. खरंतर तो ताबडतोब लिहिता यावा आणि त्यासोबत त्याची प्रकाशचित्रं जोडता यावी म्हणून मी स्वतःच सांजऱ्या केल्या आणि करता करता प्रत्येक पायरी गणिक प्रकाशचित्रं सुद्धा काढत गेले. तथापि या ना त्या कारणांनी लिहायचे राहूनच जात होते. मुहूर्तच लागत नव्हता. आनंदी पावसाच्या वाचक सीमाताई यांनी काही दिवसापूर्वीच या लेखाची विचारणा केली. त्यांना सांगितले लेखन बाकी आहे. आज त्यांनी परत विचारणा केली, मग मात्र सगळी काम बाजूला ठेवून आधी हे लेखन हाती घेतले. आशा करते पुढील दोन दिवसांत हे पूर्ण होईल. कारण अक्षय्य तृतीया तोंडावर आलीये.
आता काहींना वाटेल अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक, म्हणजेच सोन-खरेदी, उद्घाटन वगैरे. तथापि खानदेशात तसे नाही. खानदेशात अक्षय्य तृतीया फार मोठा सण असतो. अगदी दिवाळीच म्हणूया, फक्त या वेळी दिवे नसतात, पण दुसऱ्या काही खास गोष्टी असतात. त्या बद्दल सविस्तर एका खास लेखात सांगेनच. तर दिवाळीत जसा फराळ केला जातो त्याच प्रमाणे अक्षय्य तृतीयेला सुद्धा चकली-चिवडा वगळता बराचसा फराळ केला जातो. त्यात दराब्या प्रमाणेच अतिशय महत्वाचा आणि लाडका पदार्थ म्हणजे सांजरी/सांजोरी! तर आज या खानदेशी सांजरीची गोष्ट.
सांजरी करायची म्हणजे दोन प्रकारची तयारी करावी लागते. एक म्हणजे पारी आणि दुसरी म्हणजे त्यात भरायचे सारण. अर्थातच दोन्हींही महत्वाचे घटक आणि पायऱ्या. यांची सविस्तर माहिती आणि इतर जमती जमती बघू या. आधी सारण कसे करायचे ते सांगते. कारण ते आधी करून ठेवावे लागते, एव्हढेच नाही तर कमीत कमी दोन-तीन रात्र तरी मुरु द्यावे लागते. तर सांजरीचे सारण करण्यासाठी मुख्य पदार्थ म्हणजे रवा. सोबत साखर, सुकं खोबरं, खसखस, तीळ, दुध, जायफळ, वेलची. प्रमाण म्हणाल तर साधारण एक किलो रवा घेतला तर, एक किलो साखर, सुक्या खोबऱ्याची एक संपूर्ण वाटी किसून घेतलेली, अर्धी वाटी तीळ, दोन चमचे खसखस आणि एक लिटरला थोडे जास्त दुध, तेही सायी सकट म्हणजे कच्चेच दुध घेतले तर उत्तम. आता गोड जसे कमी जास्त आवडते तशी साखर थोडी कमी जास्त करू शकता. तसेच सुकं खोबर सुद्धा आवडतं नसेल तर कमी करावे.
रवा, खोबर, खसखस, तीळ हे सगळे जिन्नस वेगवेगळे भाजून घ्यावे. फक्त रवा भाजून घेतांना त्यात थोडे तूप घालावे. एक एक भाजून झाले की कढईतून परातीत काढून घ्यावे. नंतर त्याच कढईमध्ये दुध घालावे त्यात साखर घालून दोन-तीन उकळ्या फुटल्या की रव्यात घालायचा. आणि ते व्यवस्थित कालवून घ्यावे. रवा थोडा फुलतो, मग त्यात खोबरं, तीळ, खसखस सुद्धा कालवून घ्यावी. तसेच आवडीप्रमाणे जायफळ,वेलची, केशर सुद्धा घालावे. हे मिश्रण जर थोडे कोरडे वाटत असेल तर त्यात थोडे थोडे गरम दुध घालत जावे. मिश्रण चांगले ओले असावे, अगदी कोरडे असू नये. उन्हाळ्यात केल्या तर दुधाचे प्रमाण थोडे जास्त लागते. तेच हिवाळ्यात केले तर दुध थोडे कमी लागते, म्हणजे साधारण एक लिटर दुधात काम होते. कोरडे झाले तर सांजरी नीट लाटली जात नाही. हे तयार झाले सारण. परंतु हे सारण कमीत कमी दोन-तीन रात्र तरी मुरु द्यावे. मगच सांजऱ्या करायला घ्याव्या.
आता दराब्या प्रमाणेच याचाही घरभर सुगंध दरवळत असेलच. तथापि मला तो कधी जाणवला नाही. त्याचे कारण म्हणजे तेव्हा मला सांजरी अजिबात आवडतं नव्हती. त्यामुळे त्याचे रसभरीत वर्णन कुठेही आले नाही. आता प्रचंड आवडते. आणि प्रकाशचित्रांसाठी म्हणून संजाऱ्या केल्या तेव्हा, करायला एकटीच, परत करता करता प्रत्येक पायरी गणीक प्रकाशचित्रंही काढायची. पुन्हा त्या छानच व्हायला हव्या होत्या. अन्यथा सगळी मेहनत वाया गेली असती. छान झाल्या नाही म्हणून घरात सगळ्यांनी नाकं मुरडली असती आणि दुसरे सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या करिता घाट घातला होता, ते म्हणजे प्रकाशचित्रं. तीही चांगली आली नसती. त्यामुळे सुगंध, पोत वगैरे माझ्या अतिशय आवडीच्या गोष्टींकडे लक्षच गेले नाही. असो.
तर हे सारण साधारण दोन-तीन रात्र मुरल्या नंतर, दुसऱ्या दिवशी सांजाऱ्या करायला घ्यायच्या. सर्वात आधी या सारणाचे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे. नंतर त्यासाठी बाहेरच्या आवरणाची म्हणजेच पारीची तयारी करायला हवी. यासाठी लागणारे प्रमुख जिन्नस म्हणजे सोजी. सोजी बद्दल विस्तृत आणि सविस्तर माहिती दराबा(https://www.anandipavus.com/2020/11/blog-post.html) लेखात दिलेलीच आहे, त्यामुळे ती इथे देत नाही. या सोजीला तुपाचे मोहन घालून दुधात भिजवायची. अशी भिजवायची की फार मऊ नको आणि फार कडक सुद्धा नको. मग याचा साधारण पोळीसाठी घेतो तेव्हढा उंडा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यायची. मग या पोळीला सर्वत्र तूप लावून घ्यायचे आणि त्यावर तांदुळाची पिठी भुरभुरवायची. त्यानंतर त्या पोळीची सुरळी करायची, अख्ख्या पोळीची. या सुरळीचे छोटेछोटे काप करून घ्यायचे. साधारण एक पुरीला लागतात त्या मापाचे. असे केल्याने सांजारीचे बाहेरचे आवरण छान खुसखुशीत होते. मग एक एक घेऊन, त्याचे उंडे करून पुरी लाटून घ्यायची. ही झाली पारी, यात आधीच वळून ठेवलेले सारणाचे लाडू भरायचे. पारीने ते नीट बंद करायचे आणि लाटायचे. लाटतांना सांजारी थोडीही फुटता कामा नये. अशी करत प्रत्येक सांजरी लाटून घ्यायची. लाटातांना शक्य तितकी बारीक करायची.
या लाटलेल्या सांजाऱ्या खाटेवर वाळत घालायच्या. त्याचे आवरण दोन्ही बाजूने नीट वाळले पाहीजे. हा भाग मला फार आवडे. कारण लहानपणापासून अनेक समारंभात पंगतीत बसून जेवण करत आले होते. पण पंगतीत वाढायला कधी मिळाले नाही. कारण पंगतीत वाढण्याचे काम पुरुषच करत. त्यामुळे संधीच मिळत नसे. यात आकर्षणाचा भाग म्हणजे तेव्हा निरनिराळे पदार्थ वाढण्यासाठी निरनिराळी खास भांडी असतं. अतिशय सुरेख आणि वापरास सोयीची. ती हौस मी या वेळी भागवून घेत असे. म्हणजे ताट भर संजाऱ्या लाटून झाल्या की त्या खाटेवर वाळत घालाव्या लागत. मग ते भरलेले ताट घेऊन मी खाटेकडे जात असे आणि जणू काही पंगतीत वाढते आहे अशी कल्पना करत असे. भारी मज्जा येत असे मला हे काम करतांना. आमचे एव्हढे मोठे एकत्र कुटुंब, त्यामुळे संजाऱ्याही भरपूर कराव्या लागत. रवाच साधारण दोन-अडीच किलो भाजला जात असे. अंदाजच येईल किती सांजऱ्या होत असतील.
थोडा वेळाने सर्व सांजऱ्या करून होत आणि पुढे वाळत सुद्धा. या पुढे तळणाचे काम म्हणजे गॅस, तूप, सारेच गरम तिकडे आम्हाला अजिबात लुडबुड करू दिली जात नसे. मस्त तापलेल्या तुपात मंद आचेवर एक-एक सांजरी घालून छान गुलाबी रंगावर तळून घ्यायची. मात्र जस-जश्या सांजाऱ्या तळून होत, तसे पुन्हा तेच काम. ताट भरले की ते खाटेवर घेऊन जाऊन, व्यवस्थित खाटेवर एक-एक करून ठेवणे. असे केल्याने त्या लवकर गार व्हायला मदत होते. पूर्ण गार झालेल्या संजाऱ्याचा डब्यात भरायच्या. तरच त्या छान खुसखुशीत राहतात, अन्यथा मऊ पडतात. मग खायला मजा येत नाही. जरा कठीणच काम असे हे. पण मला हेच जास्त आवडे. कारण पंगतीत सगळे पदार्थ कसे मस्त गरम-गरम वाढले जातात. त्यामुळे तो पंगतीत वाढण्याचा माझा अनुभव अजूनच जीवंत होत असे. सगळ्या संजाऱ्या झाल्या की खाट मस्त भरून जात असे. गुलाबी रंगाच्या खाट भर छान रचून ठेवलेल्या संजाऱ्या बघून माझे मन अगदी भरून येत असे, सांजऱ्या आवडत नसूनही. ही दोन काम करता येत, त्यामुळे मला संजाऱ्या करायच्या म्हटल्या की खूप आनंद होत असे.
बराच वेळाने त्या सर्व सांजऱ्या पूर्णपणे गार होत. मोठी मंडळी परतपरत नीट खात्री करून घेत, गार झाल्याची. मगच त्या, आधीच स्वच्छ घासून पुसून ठेवलेल्या डब्यात (याबद्दलची सविस्तर माहिती https://www.anandipavus.com/2020/04/blog-post_10.html लेखांत आलेलीच आहे.) भरल्या जात. पुढे पंधरा-वीस दिवस, महिनाभर त्याच्या मनमुराद आस्वाद घेतला जात असे.
काहींना या सांजऱ्या गरम गरमच खायला आवडतात. मग अशा वेळी लाटून झालेल्या सांजाऱ्या शीतकपाटात(फ्रीज मध्ये) हवाबंद डब्यात ठेवायच्या. खायची इच्छा/लहर आली की मस्त गरम गरम तळायच्या आणि लगेचच त्याचा फडशा पाडायचा. माझी काकू असे करते. मी वेळेवर कधीच हजर राहू शकत नाही. मग मी गेले की ती छान ताज्याताज्या सांजऱ्या तळते आणि मला गरमगरम सांजाऱ्यांची मेजवानी मिळते!
अक्षय्य तृतीया तोंडावर आलीये आणि हा लेख वेळेत सर्वांच्या हातात पडत आहे. तेव्हा सर्वांनी हा पारंपारिक पदार्थ नक्की करा. करायला फारसा अवघड नाही. फसण्याची पण शक्यता फार थोडी. तथापि संयम हवा. जो आज-काळ सगळ्यांकडेच फार कमी आहे आणि त्याची फार आवश्यकता आहे. पारंपारिक पदार्थ सर्वार्थाने आरोग्यदायी असतात म्हणजे शारीरिक आणि मानसिक सुद्धा. तुमच्याकडे संयम पुरेसा असल्यास तुम्ही मानसिक रित्या पूर्णपणे सशक्त असतात! पदार्थ घरात सगळ्यांना आवडेलच, एव्हढेच नाही तर एक पारंपारिक पदार्थ पुढची पिढी सुद्धा चाखून बघेल आणि पुढे कधीतरी का होईना करून बघेनच. थोडक्यात एक पारंपारिक, पौष्टिक, आरोग्यदायी वारसा एका पिढी कडून दुसऱ्या पिढी पर्यंत सहजच पोहोचेल! ही फार मोठ्ठी गोष्ट आहे. वारसा जतन! तो प्रत्येकाने जतन केलाच पाहीजे आणि पुढच्या पिढी पर्यंत पोहोचविला पाहीजे. तर आणि तरच आपली संस्कृती जपली जाईल!
ll अक्षय्य तृतीयेच्या आनंदी शुभेच्छा ll
©️®️आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
१९एप्रिल२०२५
खोबरं, तीळ, खसखस, जायफळ
तुपात भाजलेला रवा
दुधात साखर घालून उकळी काढणे
तो पाक रव्यात घालणे.
पाक घातलेला रवा
सारणाचे बांधलेले लाडू
सोजीची पोळी लाटून त्यावर तूप
लावून तांदळाची पिठी भूरभूरणे
त्या पोळीची अशी सुरळी करणे.
तयार सुरळी
सुरळीचे काप
पारी करून त्यात लाडू भरणे
छान गुलाबी रंगावर तळून घेतलेल्या
गरमा-गरम सांजाऱ्या!
सीमा ताईंनी केलेल्या खास सांजाऱ्या!
खास म्हणजे या सांजाऱ्या गुळाच्या आहेत!
एकदम बरोबर झालेला आहे लिहिलेला आहे
ReplyDeleteसांजोरी च्या ऐवजी सांजारा झालेला आहे👌🏻👌🏻
खूप मस्त लिखाण झालेला आहे आत्ताच तोंडाला पाणी सुटलं
सांजरी' आवडली, आता शहरात ही पाककृती सहसा कोणी करत नाही! गावातल्या बालपणाची आठवण ताजी झाली.
ReplyDeleteबापरे ,किती मेहनत आहे सांजोऱ्या करायला.
ReplyDeleteमला नव्हतं माहित की सोजीच पीठ वापरतात आणि त्याचे सारण असं दोन-तीन दिवस मुरू देतात.
मस्त मस्त...वाचून तोंडाला पाणी सुटले...😃
ReplyDeleteसांजोरी हा पदार्थ खूपच छान लागतो, मी आताच नंदूकडे सांजोऱ्या केल्या होत्या, पूर्वी खाट भरून भरून सांजोऱ्या करायचो, सगळ्या फराळाच्या पदार्थांना मागे सारून सांजोरी एक नंबर असते, मेहनत असली तरी छानच लागते, छान लेख आहे, रेसिपी दिल्यामुळे आता मुलींना पण करता येतील, अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा,
ReplyDeleteKhupach chan zaliye sanjri . Thodya pathwashil tar bare hoil . Mazi lahanpanapasun favorite ahe 😜❤️
ReplyDeleteवाह वाह छान आहे लेख आणि सांजोरी 👌👌
ReplyDeleteसुरेख पाक कृतीचे लिखाण
ReplyDeleteटेस्ट छान असणारच 🙏🙏
सांजरी हा पदार्थ गोड गोड आहे . ,पण आपल्या लेखात सविस्तर माहिती आल्यामुळे चव आतापासूनच जिभेवर आली आहे.
ReplyDeleteपूर्वी काही सणाला केलेल्या पक्वान्नाचा सुगंध घराघरातून येत असायचा, कोणत्या सणाला कोणते पक्वान्न हवे असते ते अगदी ठरलेलेच असायचे .
ReplyDeleteअतिशय उत्कृष्ट माहिती.
ReplyDeleteबौध्दिक माहिती आणि त्यासोबत खाद्य पदार्थ पण दुग्ध शर्करा योग जुळून आणल्यास
Wa wa chan lekh vachatach tondala pani sutale😋
ReplyDeleteAgadi savister mahiti 👍👌
Vismrutit gelelya padarth, savistar mahiti dili, khupch god lekh,mi nakki karel ata, thank you 🍫
ReplyDeleteKhup chhan lekh lihilay sanjori var
ReplyDeleteKhaychi khup ichha zali
Mipan darvarshi karte ghari
Mulila pan khup aavdtat
Thode late zale replay dyayla 🙏🏻
Tu keleli Sanjori khupch chaan zaleli distey.....👌🏻👌🏻
ReplyDeleteमॅडम करून पाठवा खूप छान रेसीपी आहे
ReplyDeleteमी या पद्धतीने करणार आहे मॅडम आपले खूप खूप आभार...🙏
खुप छान लेख.
ReplyDeleteमला अजूनही साजरी आवडत नाही त्यामुळे मी कधीच केली नाही
Agadi khupch Aavadali
ReplyDeleteसांजरी बघता बघता इतकी घडून गेली की.. रिप्लाय द्यायला विसरले👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻🥰🥰👍🏻😊😊