माऊली : जीवन घटनाक्रम-४
(आळंदी पर्व२)
(featured )
आज गुरुपौर्णिमा!
माऊली,
गुरु माऊली,
ज्ञानेश्वर माऊली,
जगत् माऊली रुपी गुरु,
विश्व गुरु रुपी माऊली!
सविनय वंदन करून,
आज आळंदी पर्वाची सुरुवात करते!
चारही भावंडे 'भावार्थदीपिका' लोकार्पण करून आणि काही काळ तेथील संत मांदियाळीत व्यतीत करून आळंदीस परतली. तोपर्यंत साऱ्या वार्ता आळंदी पर्यंत पोहोचल्या होत्याच. त्यामुळे आळंदीकरांचा, या भावंडांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होताच. तथापि प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. तसेच आळंदीत ही काही अपवादात्मक लोक होतेच. त्यांना अजूनही या भावंडांचे श्रेष्ठत्व, संतपण मान्य नव्हतेच. त्यामुळे त्यांचे, ज्ञानदेवादि भावंडास या-ना त्या कारणे त्रास देणे सुरु होतेच.
या काळात सर्वांना माहिती असलेले तीन प्रसंग घडले. पहिला प्रसंग म्हणजे ज्ञानदेवांचा विसोबाने काही कारणास्तव अवमान केला. तो अवमान ज्ञानदेवांना सहन न झाल्याने ते कुटीत आले आणि ताटीचे दार बंद करून घेतले. त्यांनी दार उघडावे म्हणून, मुक्ताईने 'ताटीचे अभंग' रचले, "ताटी उघडा ज्ञानेश्वरा". ताटीच्या अभंग रचनेत अकरा अभंगांची रचना करून मुक्ताईने, "योगी पावन मनाचा I साही अपराध जनाचा I" अशी आर्त विनंती केली.
दुसरा प्रसंग म्हणजे चमत्कार! निवृत्तीनाथांना एकदा मांडे खावेसे वाटले. तसे त्यांनी मुक्ताईला सांगितले. मांडे भाजण्यासाठी परळ/मातीचे खापर हवे. ते आणण्यासाठी मुक्ताई कुंभाराकडे गेली. परंतु विसोबाने तिचा प्रयत्न सफल न होऊ दिल्याने, ती रडतच परतली. ते पाहून ज्ञानदेवांनी तिची अतिशय मायेने चौकशी केल्यावर तिने सारा वृतांत सांगितला. ज्ञानदेवांनी तिला मांड्यांची तयारी करण्यास सांगितले. त्यांनी आपल्या योग बळाच्या सहाय्याने, आपल्या पाठीवर मांडे भाजण्याची सिद्धता केली. याही प्रसंगाकडे बघतांना काही मुद्दे विचारत घ्यावेसे वाटतात. एक म्हणजे निवृत्तीनाथांना मांडे खावेसे वाटणे आणि त्यांनी तसे सांगणे. निवृत्तीनाथ खऱ्या अर्थाने सगळ्या वृत्तींपासून निवृत्त झालेले. अत्यंत ब्रह्मनिष्ठ करडे योगी. द्वेष, राग, मोह, लोभ, मद, मत्सर आदींपासून मुक्त होते. त्यामुळे त्यांना मांडे खावेसे वाटणे हे कितपत योग्य वाटते? तसेच 'इंद्रिया चोरुनी जेविजे' अशी धारणा असणारी ही भावंडे.
दुसरा मुद्दा. आपण योग या शब्दाचा जो अर्थ समजतो तो फारच संकुचित आहे. काही प्रकारे हात-पाय हलविणे आणि श्वास घेणे म्हणजे योग नव्हे. योग साधने बद्दल आदरणीय डॉ. रा.श्री. मोरवंचीकर लिखित "समधितील स्पंदने" या ग्रंथात 'योगसाधनेतील अष्टांगमार्ग' या विषयावर अतिशय सविस्तर आणि समजेल अशा भाषेत लेखन केल आहे. ज्यांना याबद्दल जाणून घेण्यात स्वारस्य असेल त्यांनी जरूर वाचावे.( पृष्ठ क्र.११३) एव्हढेच नाही, तर त्यांनी म्हणजे डॉ. रा श्री मोरवंचिकरांनी यातील बऱ्याच पायऱ्या पार केलेल्या आहेत.
या प्रसंगापूर्वीच ज्ञानदेवांनी विसोबाला सोपान देवांचे शिष्यत्व पत्करण्यास सांगितले होते. ज्ञानदेवांनी दिलेल्या आज्ञेचे पालन करून विसोबानी सोपानदेवांचे शिष्यत्व पत्करले. त्यांच्या कडूनच विसोबानी 'खेचरी' विद्या प्राप्त केली. म्हणून विसोबाला 'विसोबा खेचर' म्हणूनही ओळखले जाते. आळंदीतील शूद्र समाजकंटकांचे सृजनशीलतेत रुपांतर! हा आणखी एक खरा चमत्कार! खरंतर हाच खऱ्या अर्थाने चमत्कार!
तिसरा ठळक आणि सर्व परिचित प्रसंग म्हणजे चांगदेव भेट. असे म्हटले जाते की ज्ञानदेवादि भावंडाची परीक्षा घेण्यासाठी चांगदेवांना निमंत्रित केले होते. तसेच चांगदेवांना ज्ञानेश्वरांच्या कर्तृत्वाने, व्यक्तिमत्वाने, लोकसंग्रहाने, भक्तीरसाने अतिशय भारावून टाकले होते. त्यामुळे त्यांनाही ज्ञानदेव भेटीची इच्छा होती. ही भेट नक्की करण्यासाठी त्यांनी आपल्या शिष्यामार्फत एक कोरे पत्र धाडले. त्याकाळी कागद वगैरे अतिशय दुर्मिळ. त्यामुळे एखादे ताडपत्र, भूर्जपत्र तत्सम काही असावे, हे लक्षात घ्यावे. ज्ञानेश्वरांनी त्याच कोऱ्या पत्रावर पासष्ठ ओव्या लिहून पाठविल्या. हीच "चांगदेव पासष्ठी!" १४००(?) वर्षांची तपश्चर्या असणारा योगी व्याघ्रवाहन, नागप्रतोद आदींनी सुशोभित होऊन, शिष्य-प्रशिष्यांसह ज्ञानदेवास भेटावयास आले. त्यावेळी ज्ञानदेवादि भावंडे एका निर्जीव भिंतीवर खेळत होती. त्याच भिंतीवर आरूढ होऊन, जडातील चैतन्याला आवाहन करून चांगदेवास भेटावयास गेली. पुन्हा एक चमत्कार! खरतरं थोर व्यक्तींच्या आयुष्यातील चमत्कार हा एक स्वतंत्र अभ्यासाचा, विचाराचा, चिंतनाचा विषय आहे. त्यावर सविस्तर लिहीन कधीतरी, नक्कीच! क्षणार्धात चांगदेव ज्ञानदेवांना शरण गेले. त्यांचा अहंकार हरण झाला. ज्ञानदेवांनी, चांगदेवाला मुक्ताईस म्हणजे शक्तीला, भयविरहित जीवनाचा पुरस्कार करणाऱ्या आदिशक्ती, मुक्ताईला शरण जाण्यास सांगितले. चांगदेव मुक्ताई ला शरण गेले आणि मुक्ताबाईचे शिष्य झाले. ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाचा एक सदस्यच होऊन गेले. पुढे कालांतराने मुक्ताई चांगदेवासह तापीक्षेत्र मेहूण येथे जात असतांना मुक्ताईने वायू समाधी घेतल्याचे पंथीय मानतात.
एक ठळक मुद्दा : ज्ञानदेवांनी कुणासही आपले शिष्य करून घेतले नाही.
या प्रसंगानंतर ज्ञानदेवांच्या मनात समाधीचा विचार आला. परंतु निवृत्तीनाथांनी त्यांना नकार देवून त्यांची समजूत काढली.
क्रमशः
आनंदी पाऊस
(माऊली : घटनाक्रम-४)
४ जुलै २०२३
छान व माहिती पुर्ण लेख.
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 💫✨🌸
Deleteआजचा लेख सुध्दा खुपच छान आहे.पण मला आपले वाटते की अष्टांग. योगाच्या फक्त नियमाचा नुसता उल्लेख करायला हवा होता.
ReplyDeleteछान आहे .गुरूचे प्रतिबिंब शिष्यामधे दिसते असे म्हणतात .
ReplyDeleteखूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄
Deleteमुक्ताबाईने वायु समाधी घेतली ते गाव मुक्ताईनगर येथील कोथळी हे गाव आहे ते आमचे गाव आहे मेहुणला समाधी आहे पण ती कशी ते माहीत नाही
ReplyDeleteमाऊली जीवन घटनाक्रम मध्ये आजचा लेखही अभ्यासपूर्ण आहे माऊलीचा जीवनपट सांगताना काही संदर्भ ग्रंथांचा उल्लेख दिला तर
ReplyDeleteछान आहे लेख खूप महत्त्वाची माहिती भेटली आजपर्यत वरचावर काही घटना माहीत होता आज सविस्तर माहिती मिळाली
ReplyDeleteश्री माऊलींच्या जीवनावरील लेखमालिकेचे भाग क्र. २,३,व ४ आत्ता क्रमाने वाचून काढले.
ReplyDeleteतुला हे लिहिण्याची प्रेरणा झाली, या बद्दल प्रथम तुझे अभिनंदन.
तुझा संदर्भ स्त्रोत काय आहे? राश्रीमो यांचे लेखन? अजून काय काय वाचलेस?
माऊलींच्या आयुष्याबद्दल तुझे स्वतः चे मत / विचार स्पष्टपणे लिही, अगदी चमत्कारांबद्दल सुद्धा.
तुझी लेखनसाधना सुरुच ठेव....मस्त लिहिते आहेस. मी लगेच वाचू शकेल असे नाही, पण वाचल्यावर नक्की कळवेन.
गुरुपौर्णिमेला पुन्हा एकदा माऊलीने "आनंदी पावसा"चे सरसर शिरवे आणून आम्हाला "मन झाले ओले चिंब" असे करून टाकले. अगदी अभ्यासपूर्ण असे लिखाण करतेस, त्याबद्दल तुझे अभिनंदन! संदर्भ ग्रंथ वगैरेंचं वाचन आमच्यासारख्यांकडून होत नाही, पण यानिमित्ताने माऊली विषयी खूपच नवीन नवीन माहिती मिळते आणि तीही आयती!
ReplyDeleteआळंदीला परतल्यावर त्याकाळी या भावंडांचे जसे श्रेष्ठत्व समजणारे लोक होते, तसेच त्यांना त्रास देणारेही होतेच, हे युगानुयुगे चालू आहे, आजचीही परिस्थिती काही त्यापेक्षा वेगळी नाही आणि हे पुढेही चालूच राहणार.
परंतु विसोबा खेचर यांनी कुंभाराला मुक्ताईस मातीचे खापरही देण्यास मनाई केली, त्यांचेही हृदय परिवर्तन केले हा खरंच मोठा चमत्कार आहे. पुढे हेच विसोबा खेचर संतश्रेष्ठ नामदेवांचेही गुरु झाले आणि त्यांना विश्वव्यापी अशा निर्गुण निराकार परमेश्वराची ही प्रचिती आणून दिली हा भाग वेगळा.
तसेच पाठीशी चौदाशे वर्षे तपश्चर्येचे बळ असलेले चांगदेव महाराजही ज्ञानदेवांना कसे शरण गेले वगैरे सर्व इतिहास प्रस्तुत लेखात खूपच सुंदर पद्धतीने वाचकांसमोर मांडण्याचा तू प्रयत्न केला आहेस, त्याबद्दल तुझे पुनश्च अभिनंदन.
Khupch sakhol v sunder likhan aahe. Chan manala bhidnare aahe👌👌🙏🙏
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶
Deleteअतिशय मुद्देसूद मांडणीच्या व अभ्यासपूर्ण लेखन असलेल्या मालिकेतील अजून एक यशस्वी कडी. खरं तर भावार्थ दिपीकेची सांगता आणी तिचे लोकार्पण झाल्यानंतर ज्ञानदेवांना आपल्या आयुष्याची कार्यसिद्धी झाल्यासारखी वाटत असणार, त्यामुळेच त्यांच्या मनात समाधीचा विचार घोळत असणार. त्यांना त्यापासून निवृत्ती नाथांनी परावृत्त केले हे आपले सुदैवच, असो. आळंदी मुक्कामी परत आल्यावर आणि एवढी लोकप्रियता मिळवल्यावर तरी त्यांचे हाल व्हायला नको होते, पण दुष्ट आणी नतद्रष्ट माणसे सगळीकडे असतातच त्यामुळे सगळ्या भावांना क्लेश झालेच. ज्ञानदेवांनी कटाक्षाने शिष्यत्व कुणालाही दिले नाही़ त्यामागे त्यांचा काहीतरी ठाम विचार असणारच. लेखात उल्लेखलेले चमत्कार कदाचित त्यांच्या थोरवीने दंतकथा म्हणुन पण रुजले असतील. पण एवढ्या कोवळ्या वयात आपल्या ज्ञानाचा दबदबा निर्माण करून तत्कालीन टीकाकारांना पुरून उरून आपल्या दिव्यत्वाची प्रचिती देणे हाच केवढा चमत्कार मानला पाहिजे. विसोबा खेचरांचे हृदय परिवर्तन हा त्यांच्या यशाचा मानबिंदू असावा असे मला वाटते. इतका छोटा लेख, पण माहितीने ठासून भरला आहेस. मोरवंचीकर सरांच्या guidance चा प्रत्यय ठायी ठायी जाणवतो. शब्दप्रयोग, अभ्यासू मांडणी आणी लेखन रंजकता , सगळ्याच बाबतीत लेख उजवा झाला आहे. ज्ञानदेवांचा अभ्यासपूर्ण जीवनपट अगदी तटस्थ आणी शोधक पद्धतीने मांडल्याबद्दल तुझे कौतुक करावे तेव्हढे कमीच.
ReplyDelete👌🏻👌🏻
ReplyDeleteताटी चे अभंग वाचले की मुक्ताई च्या शहाणपणाने चकित होतो आपण, असं वाटतं,हा प्रसंग प्रत्यक्षात घडला असो वा रूपकात्मक, एरवी असे जगाचे व्यापताप सोसत असताना कधीतरी कोणीतरी कोसळत असेलच...पण त्या निमित्ताने ।मुक्ताबाईच्या मनातली आपले डोळे ओले करणारी शहाणीव या अभंगातून पाझरत आली,तिचं मोल केवढं!
नामदेवांचे मडकं कच्चं असल्याचे ओळखणारी,चांगदेवाला कोरा म्हणणारी, मुक्ता, वयाने लहान पण अधिकाराने केवढ्या तरी उंचीची!
मुक्तपण ही जणू तिच्यासाठी साधायची गोष्ट नव्हे तर तिचा अंगभूत धर्मच जणू..
☺️🙏🏻