माऊली : जीवन घटनाक्रम-३
(नेवासा पर्व)
(featured )
नेवाश्यात प्रवेश करते वेळी, यांना एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या अंतिम यात्रेस सामोरे जावे लागले. ज्ञानदेवांनी तात्काळ प्रेतयात्रा थांबवून, प्रवरेतील अमृतजलाच्या सिद्धीने सच्चिदानंदांचे कलेवर सर्वासमक्ष सजीव केले. पुढे जाऊन हेच सच्चिदानंद कुलकर्णी ज्ञानदेवांच्या निरूपणाचे आणि सर्वच साहित्याचे लेखकु झाले. पुढील सर्व काळ त्यांच्या बरोबरच राहिले. आणखी एक चमत्कार! आपल्याकडे कुणाही थोर व्यक्तीचे आयुष्य चमत्काराशिवाय पूर्णच होत नाही. तथापि इथेही क्षणभर थांबून, थोडा विचार व्हावा. परत भूतकाळाची पुनरावृत्ती झाली, पैठणकरांप्रमाणेच नेवासेकरांनी त्यांचे भव्य स्वागत केले. सारा गाव त्यांच्या दर्शनासाठी गोळा झाला आणि त्यांचे वास्तव्य तसेच योग-क्षेमाचे प्रश्न सुटले. इथेही त्यांनी सांगितले, आम्ही संन्यासी आहोत, आम्ही मंदिरातच वास्तव्य करू. आणि त्यांनी प्रवरे काठच्या शिवालयात वास्तव्याचे नक्की केले.
मधल्या काळात हे शिवालय उध्वस्त झाले होते. त्याचे कारण समजू शकत नाही. तथापि महापूर किंवा भूकंप ही कारणे असू शकतात. विसाव्या शतकात सोनोपंत दांडेकर या थोर महात्म्याने या शिवालयाचे सारे अवशेष गोळा करून त्या देवालयाची पुनरुभारणी केली. तेच आजचे हे शिवालय! मंदिराच्या गाभाऱ्यात यादव कालीन अवशेषांमधील एक खांब आहे. तोच "पैसाचा खांब." ज्या खांबाला टेकून किंवा आधार घेऊन ज्ञानेश्वरांनी "भावार्थ दीपिका"/ज्ञानेश्वरी सांगितली. याच खांबाच्या दर्शनासाठी हजारोंनी भाविक येतात. आता त्या देवालयाची ओळख ज्ञानेश्वर मंदिर!
नेवास्याला पोहोचल्यावर, आपण काही काळ थांबणार असल्याचे निवृत्तीनाथांनी सांगितले. नेवासा म्हणजे जिथे भगवंत विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून, इथे काही काळ वास केला होता. त्यांनी सुरांना अमृतपान घडविले आणि त्यातील अमृताचे काही थेंब प्रवरेत मिसळले गेले, असा लोकसमज आहे. तसेच नेवासे हे सिद्धपीठ होते. गोरक्षनाथांचे समकालीन चौरंगीनाथ यांचे कायमचे नेवास्यात वास्तव्य होते. इतकेच नाही, तर नेवासे महालायाचे(म्हाळसाचे) माहेर सुद्धा आहे. नेवास्याचे मूळ नाव "निधीनिवास." निधी म्हणजे लक्ष्मी. थोडक्यात इथे विष्णू सोबत लक्ष्मीचाही वास आहे. हा प्रदेश भौतिक दृष्ट्या अतिशय संपन्न. त्याकारणे नेवास्यात बाजारपेठ होती. त्यामुळे अनेक कारणांनी येथे विविध भागातील आणि थरातील लोक येत असतं.
ज्ञानेश्वरांनी, ज्ञानेश्वरी लिहिली हे सर्वज्ञात आहे. परंतु तिचे मूळ नाव काय? कुठे लिहिली गेली? लिहिण्यास किती काळ लागला? यात नेमके काय आहे? वगैरेबद्दल सर्व सामन्यात थोडा गोंधळ असल्याचे जाणवते. तर गीतेतील तत्वज्ञान संस्कृतात असल्याने ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नव्हते. कारण त्याकाळात सर्वसाधारणपणे संस्कृतचे ज्ञान फक्त विद्वान पंडित ब्राह्मणांनाच होते. बाकी जनतेला संस्कृतचा गंधही नव्हता. त्यामुळे हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचणे दुरापास्तच होते. तसेच गीतेत बरेच विरोधाभास असल्याने ती समजून घेणे काहीसे अवघड होते. त्यामुळे ज्ञानदेवांनी गीतेतील मूळ सातशे श्लोकांचे, नऊ हजार ओव्यात प्राकृतात रसांतर केले. त्यात रोजच्या दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे दिली, त्यामुळे ती सर्वांना समजण्यास सुलभ झाली. गीतेतील तत्वज्ञान सोप्या पद्धतीने सांगितलेल्या या ग्रंथाचे मूळ नाव आहे "भावार्थ दीपिका!" एकनाथ महाराजांना दृष्टांत मिळाल्यावर त्यांनी ती पुन्हा प्रकाशात आणली, तेव्हा त्यांनी, ज्ञानेश्वरांनी सांगितली ती, "ज्ञानेश्वरी" असे नामकरण केले.
"भावार्थ दीपिका" ज्ञानेश्वरांनी लिहिली! हा एक चमत्कार आहे. पण एका आगळ्या अर्थाने! तो म्हणजे त्यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी गीतेच्या निरुपणास सुरुवात केली म्हणजेच लिहिली! ती क्षणात वगैरे लिहून झाली नाही. किंवा एकदम आकाशातून पडल्यासारखी नाही. त्यामागे त्यांचा अतिशय गाढा अभ्यास होता! त्यांचे वडील विठ्ठलपंत. विठ्ठलपंत गाढे विद्वान होते. ते वेद आणि शास्त्रांत अतिशय पारंगत होते. वाळीतील कष्टमय जीवन जगत असतांना त्यांनी प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक आपल्या अपत्यांना ज्ञान दिले. तसेच ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ, ते त्यांच्या नित्य आणि कायम सहवासात असतच. त्यामुळे त्यांच्याकडून सतत ज्ञान ग्रहण चालूच असावे. तसेच शुद्धीपत्र घेण्यासाठी पैठणला गेल्यावर, त्या मुक्कामात त्यांनी शक्य तितके, मिळेल तितके ज्ञान ग्रहण केले होते. याकाळात त्यांनी कुठले ग्रंथ अभ्यासले, हा एक स्वतंत्र आणि मोठा अभ्यासाचा विषय आहे. तथापि त्यांचे गीतेवरील अध्ययन पूर्णत्वास गेले असावे.
नेवास्यातील वास्तव्यात एका सुमुहूर्तावर प्रवरेमध्ये स्नानादी करून, ज्ञानेश्वरांनी मोहिनिराजाचे दर्शन घेतले. त्यानंतर गुरूंना नमस्कार करून, ज्ञानदेवांनी श्रोत्यांनाही वंदन केले, त्यांना आत्मविश्वासात घेतले. आणि निरुपणास आरंभ केला. ज्ञानदेवांकडून पुनर्जीवन मिळालेले सच्चिदानंद बाबा, त्यांचे आदरु लेखकु झाले. ज्ञानदेवांच्या मुखातून बाहेर पडणारा शब्द न् शब्द पूर्ण भावासहित त्यांनी लिहून घेतला. प्रवरे काठचे शिवालय, पहाटेची प्रसन्न, पवित्र वेळ, तेजस्वी ज्ञानदेवादि भावंडे, समोर तेवत असणारा एक पाषाणातील दिवा, सोबत सच्चिदानंद बाबा आणि सन्मुख बसलेले श्रोतेगण! माऊली निरुपण करत आहेत, त्यांचा घन गंभीर, पण अतिशय कोवळा-मधूर ध्वनी शिवालयात घुमत आहे! अति तेजस्वी आणि पवित्र असे दृश्य! ज्याला कशाचीही उपमा देता येणार नाही!
दिवसागणिक श्रोत्यांची संख्या सुद्धा वाढत होती. आता विचार करा. तेरावे शतक, त्याकाळी एखादी घटना, सर्वांपर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागत असावा? आजच्या सारखी कुठलीही साधने तर, तेव्हा उपलब्ध नव्हतीच, परंतु दळण-वळण सुद्धा फारसे सुखकर आणि सुलभ नव्हते. इथे निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव भावंडांची दूरदृष्टी आणि सर्वस्पर्शी विचारधारेची कल्पना येते. नेवासे-विष्णूचा वास असलेले म्हणजेच भवागन श्री कृष्णाचा वास असलेले ठिकाण. भगवान श्री कृष्णाच्या सानिध्यातच, त्यांनीच सांगितलेल्या गीतेचे निरुपण! हा एक भाग आणि दुसरा भाग म्हणजे नेवास्याची भौतिक समृद्धी असल्याने तिथे असलेली बाजारपेठ. बाजारपेठ असल्या कारणाने साहजिकच त्या ठिकाणी विविध भागातील आणि थरातील लोक येणार आणि त्यांना इथे चाललेल्या या निरूपणाची माहिती होणार. ते अजून निरनिराळ्या आणि त्यांच्या मूळ गावी जाणार, त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या लोकांना ही माहिती मिळणार. म्हणजे या निरूपणाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार! काय म्हणावे या दूर दृष्टीला! तेही वयाच्या १२-१३व्या वर्षीच!
असे हे निरुपण दररोज जवळ-जवळ तीन वर्ष सलग चालू होते. म्हणजे "ज्ञानेश्वरी" म्हणजेच "भावार्थ दीपिका" लिहिण्यास तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्ञानेश्वर सोळा वर्षाचे असतांना "भावार्थ दीपिका" लिहून पूर्ण झाली होती. "भावार्थ दीपिका" म्हणजे गीतेवरील निरुपण. त्यात त्यांना स्वानुभवाचे तत्वज्ञान सांगता आले नव्हते. त्यामुळे त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांनी ज्ञानदेवांना स्वानुभवावर आधारित तत्वज्ञान सांगणाऱ्या ग्रंथाची निर्मिती करण्यास सुचविले. तो ग्रंथ म्हणजेच "अमृतानुभव" अमृतानुभवाची निर्मिती सुद्धा नेवास्यातच झाली. त्यानंतर त्यांनी नेवासे सोडण्याचा निर्णय घेतला.
नेवासे सोडल्यावर आळंदी ऐवजी पांडुरंग दर्शनार्थ त्यांनी पंढरपुरास प्रस्थान केले. तसेच तिथे जाऊन तिथल्या संतांसोबत चर्चा करावी. आजवरचे आपले चिंतन त्यांच्यासमोर मांडावे. पंढरपुरात पोहोचल्यावर चंद्रभागेत स्नान करून, पांडुरंग दर्शनार्थ मंदिरात गेले. तिथेच त्यांची जनाबाई आणि नामदेव यांच्याशी प्रथम भेट झाली! ज्ञानदेव-नामदेव भेट महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे सुवर्णपान मानले जाते. ज्ञानेश्वरांनी पांडुरंगाच्या साक्षीने "भावार्थ दीपिका" लोकार्पण केली! काही दिवस पंढरीत मुक्काम केला आणि त्यानंतर नामदेवासह आळंदीस परतले.
क्रमशः
आनंदी पाऊस
(ज्ञानेश्वर जीवन घटनाक्रम)
आषाढी एकादशी
२९ जून २०२३
भक्ती, स्नेह आणि अभ्यास यांचा मिलाफ असलेले विलक्षण विवेचन. अप्रतिम !
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद सर 🙏 💫
Deleteविस्तृत आणि तितकेच सुंदर
Deleteअतिशय सुंदर लेखन.
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteमाऊलींचा जीवन घटनाक्रम तर हा सगळ्यांनाच माहिती पाहिजे आणि खूप उपयुक्त माहिती आहे शिवाय तुमची क्रिएशन सुद्धा खूप छान आहेत
ReplyDeleteखूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄
Deleteअत्यंत विस्तृत आणि अभ्यासपूर्ण अशी ही एवढी नेमकी माहिती कशी गोळा केली जाते हा मला नेहमीच पडत असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. ह्या विषयावर माझा फारसा अभ्यासही नाही.
ReplyDeleteजे काही ऐकलं आहे त्याला अभ्यास वगैरे म्हणणं सुद्धा धाडसच ठरेल. खरं तर तुमच्या लिखाणाला प्रतिक्रिया देण्यासाठी आणलेला आव आहे असे म्हणता येईल.
कित्येक माहित नसलेल्या गोष्टी तुमच्या मुळे कळल्या. एके ठिकाणी भगवान च्या ऐवजी भावागन झाले आहे. शक्य असल्यास तेवढी "टायपिंग एरर" दुरूस्त करावी.
😊 लवकरात लवकर खरी 🍫 द्यावी.
नक्कीच 😁
Deleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
आत्तापर्यंतचा सर्वात चांगला जमलेला लेख.!
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏
Deleteउत्तम लेखन अतिशय उपयुक्त माहिती मिळाली, आभारी आहे.
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद 🙏
Deleteफारचं छान आणि अभ्यासपूर्ण लेख. माहिती नसलेले ज्ञान माहिती झालं
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 😍😇🤩
Deleteखूपच छान आणि परिपूर्ण अभ्यास आहे मॕडम आपला .धन्यवाद
ReplyDeleteआनंदी धन्यवाद सर 🙏
DeleteKhupach Sundar
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteअशी ही आमची मुक्त ई किती . सुंदर लेख आहे गणपती बाप्पा अशीच स्मरण शक्ती दे आमच्या ताईल
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 😇😇😇
Deleteफारच सुंदर लेख वाचून आनंद मिळाला.खरच खुप मस्त.
ReplyDeleteखूप सारे प्रेम! 😍 😇
Deleteछान लिहिले आहेस 👍🏻👌👌🙏🙏
ReplyDeleteछान छान आनंदी धन्यवाद 🙏 ✨
Deleteखूप छान आपल्या हातुन अशीच ईश्वर सेवा घडावी
DeleteKhup chan sopya shabdat mandles
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏
Deleteपुष्कळ अभ्यास करून लिहिलयस. कमाल आहे तुझी 🙏
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद सर 🙏
Deleteआम्हाला एम् ए ला ज्ञानेश्वरीतील १२ व १५ हे अध्याय प्राचीन साहित्य अभ्यासात अभ्यासायचे होते . तसेच ज्ञानेश्वरांच्या बाकीची ग्रंथसंपदा, अभंग , विराण्या ही अभ्यासल्या. साहित्याच्या दृष्टीने सर्वांगीण अभ्यास त्यावेळेस केला होता.
ReplyDeleteप्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे.
"माऊली"चे तिसरे पुष्पही उमलले, पण दुसऱ्या पुष्पाकरिता साधा अभिप्रायही लिहिणं माझ्यानं जमलं नाही, त्यास आमचा आळस आणि लिखाणाविषयीची उदासीनता कारणीभूत आहे. तेवढ्या कालावधीत तुझे वाचन, मनन आणि लिखाणंही पूर्ण झाले हे कौतुकास्पद आहे.
ReplyDeleteमागच्या लेखात ग्रामस्थांकडून चौघं भावंडांना किती मनस्ताप सहन करावा लागला, हे वाचून सहजच मनात आले की त्यावेळची सामाजिक परिस्थिती कशी होती पहा, विठ्ठलपंतांचे कुटुंब उच्चवर्णीय, आणि त्यांना त्रास देणारी मंडळीही उच्च वर्णीयच! असं असताना, खालच्या वर्गातील जनतेला त्यावेळेला या मंडळीकडून किती त्रास भोगावा लागला असेल, याची कल्पनाच केलेली बरी. आज परिस्थिती तशी राहिली नाही, हे आजच्या समाजाचे सुदैवच म्हणावे लागेल.
पैठणचे धर्ममार्तंड ज्ञानदेवांना काय शुद्धिपत्र देतील, उलट या चौघं भावंडांच्या दर्शनाने त्यांचीच धर्मसभा पावन झाली हे मात्र नक्की. असं शुद्धिपत्रही ज्ञानदेवांनी नम्रपणे नाकारलं यातही ईश्वरेच्छाच असावी. ईश्वरालाच त्यांच्याकडून पुढे महान कार्य करवून घ्यायचं होतं असं म्हणावं लागेल. गीतेतील गूढ तत्त्वज्ञान सुलभ करून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे महान कार्य ज्ञानदेवांनी केलं, तेही इतक्या लहान वयात, हाही एक चमत्कारच आहे. संस्कृतातल्या एखाद्या सुभाषिताचा अर्थ समजून घ्यायला आपली किती त्रेधा तिरपीट उडते. यावरून ज्ञानदेवांची बुद्धिमत्ता, ज्ञानपिपासा, स्मरणशक्ती, समाजाचा अनुभव, गुरुविषयीची निष्ठा, जो जे वांछील तो ते लाहो, अशी सर्वांविषयीची कळकळ या गोष्टी ध्यानात येतात.
अशी विशाल दृष्टी असलेल्या बऱ्याच प्रभृती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेल्यात, याचा आपण अभिमान बाळगायला हवा. धन्य ती भावंडे, धन्य ते गुरु निवृत्तीनाथ आणि धन्य त्यांचे माता पिता!🙏🏼
ताई नेहमी प्रमाणे क्या बात 👌
ReplyDeleteआणि तुझ्या वाचन आणि अभ्यास पूर्ण लेखन ला सलाम ...🫡
🙏☺️
खूप छान लेख आहे 👌🏻👌🏻🙏
ReplyDeleteखूपच छान लेख आहे माहिती नसलेले ज्ञान माहिती झाले 👌👌
ReplyDeleteज्ञानेश्वर चरित्र खूपच भावतंय👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻😊
ReplyDeleteताई नमस्कार. अगदी मनापासून लिहिलं आहेस. अनंत शुभेछा. श्याम पवार. आळंदी.
ReplyDeleteइतक्या छोट्या,लेखात इतके घटनाक्रम आणी माहिती मांडायची हे कठिण काम तू लीलययेने पेलले आहेस. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आयुष्यातील घटनाक्रमातील बर्याच गोष्टी मला पहिल्यांदाच कळल्या. त्यांचा नेवासे येथील मुक्काम, त्या स्थळाची जाणीवपुर्वक केलेली निवड आणी एकंदरीत ज्ञानेश्वरीचे निरुपण हा सगळा मजकूर खूप चित्तवेधक झाला आहे. ज्ञानेश्वर महाराजानी केलेले चमत्कार हे एक वेळ लेखकाचा कल्पनाविलास गृहीत धरला तरी त्यांची बुद्धिमत्ता अचाट होतीच. इतक्या लहान ,खेळण्याच्या वयात भगवत गीतेसारख्या महान ग्रंथाचा सखोल अभ्यास,करून, त्यातील विरोधाभास समजाऊन घेऊन त्याचे जनसामान्यां साठी सोपे भाषांतर करणे ह्यावरून त्यांच्या वडिलांनी आणी निवृत्ती नाथांनी त्यांची केवढी तयारी करून घेतली असणार ह्याची कल्पना येते. नेवासे सोडल्यानंतर घेतलेल्या संतांच्या भेटीचा तापशील जरा जलद गुंडाळला असं वाटलं. असो, सगळाच लेख रंजक आणी माहितीपूर्ण झाला आहे.
ReplyDeleteखूप छान..माहितीत भर पडली.👌👌🙏🌷
ReplyDeleteअतिशय सुंदर लेखन सर्वांसाठी उपयुक्त अशी माहिती
ReplyDeleteवा
ReplyDeleteअत्यंत सुंदर माहिती
माऊली खरोखर अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व...
खूपच सुंदर व माहितीपूर्ण लेख.
ReplyDeleteखुप सुंदर आणि माहितीपूर्ण लेख
ReplyDeleteमाऊली सुंदर माहिती.👌
ReplyDeleteGood information
ReplyDelete