Skip to main content

माऊली : जीवन घटनाक्रम-२(पैठण पर्व) (featured )

  माऊली : जीवन घटनाक्रम-२ 

(पैठण पर्व)

(featured )



गुरूंच्या आज्ञेप्रमाणे विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारून, रुक्मिणीबाई आणि सिद्धोपंतांसोबत आळंदीस प्रस्थान केले. आळंदीस पोहोचल्यावर विठ्ठलपंतांचा परत प्रपंच सुरु झाला. संन्यासाश्रामातून परत गृहस्थाश्रमात प्रवेश केल्याने समाजाने त्यांना वाळीत टाकल्या कारणाने, त्यांना सिद्धबेटावर जाऊन प्रपंच सुरु करावा लागला.(आता इंद्रायणीचे पात्र अतिशय संकुचित झाल्याने, सिद्धबेट हे बेट राहिलेले नसून नदी किनारच झालाय.) अतिशय खडतर असे आयुष्य कंठावे लागले, या कुटुंबियांना. वाळीत जीवन जगावे लागणे, ही  मध्ययुगीन काळातील अत्यंत कठीण अशी शिक्षा होती. नवलाची बाब म्हणजे विठ्ठलपंतांचे वडील आपेगावचे वतनदार, त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या वतनाचे काय झाले? तसेच रुक्मिणीबाईंचे वडील सुद्धा २३ गावांचे वतनदार होते. त्यांनी या उभयतांना मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकऱ्यांनी त्यांना तसे करू दिले नाही. माता-पित्याला लेकीचे आणि जावयाचे हाल बघवले नाही, हे दुःख सहन न होऊन त्यांची प्रकृती खालावत गेली, त्यातच आधी सिद्धोपंतांचे नंतर काही दिवसांनी उमाबाईंचे निधन झाले. परिणामी या उभयतांना अतिशय हालाखीत जीवन कंठावे लागले. हा कालावधी साधारण बारा वर्षांचा होता. या काळात शके ११९५ (इ.स. १२७३) मध्ये निवृत्तीनाथ, शके ११९७(इ.स.१२७५) मध्ये ज्ञानदेव, शके ११९९(इ.स.१२७७) मध्ये सोपानदेव, शके १२०१(इ.स.१२७९) मध्ये मुक्ताबाई या चार अपत्यांचा जन्म झाला. साऱ्या कुटुंबाला वाळीत जीवन जगावे लागत असले तरी, या काळात विठ्ठलपंतांनी अपत्यांना प्रयत्नपूर्वक सर्व प्रकारचे ज्ञान दिले. 

मुलांच्या जन्मानंतर साऱ्या कुटुंबाने तीर्थयात्रा केली. त्र्यंबकेश्वरी मुक्कामी असतांना प्रचंड वादळ आणि अचानक सामोरे आलेल्या वाघाने, कुटुंबाची ताटातूट झाली, निवृत्तीनाथ एकटेच कुटुंबापासून वेगळे पडले. हे वादळ गहिनीनाथांनी आपल्या योग विद्येच्या बळावर घडवून आणले होते. ते गहिनीनाथांच्या गुहेमध्ये गेले. नाथपंथीयांच्या श्रद्धेनुसार गहिनीनाथ त्यांचीच प्रतीक्षा करीत असावेत. गहिनीनाथांनी त्यांना नाथपंथाची दीक्षा दिली. पहिला शाबरी मंत्र आणि कुंडलिनी शक्तीची दीक्षा देऊन शक्तिपात घडवून आणला. अत्यल्प काळातच ते या विद्येत पारंगत झाले. काही दिवस निवृत्तीनाथांचा शोध घेत असतांना, अचानक निवृत्तीनाथ समोर ठाकले. पुन्हा सर्व कुटुंब एकत्र आल्याने सर्वांनाच आनंद झाला! 
आता मुलांचे उपनयन संस्कार करण्याचे वय झाले होते. मुलांचे उपनयन विधी केले तर, त्यांचे वाळीतील कष्टमय जीवन संपेल, असे विठ्ठलपंतांना वाटले. त्यासाठी त्यांनी आळंदीच्या धर्ममार्तंडांना वारंवार विनंती केली. एव्हढेच नाही तर, आपण उभयता प्रायश्चित्त घेण्यास तयार असल्याचेही सांगितले. आळंदीच्या धर्मसभेने विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्त देण्याचे नक्की केले. त्यांनी ते मान्यही केले. तथापि मुलांच्या उपनयन विधीच्या मुद्द्यावर मात्र त्यांना प्रतिष्ठानच्या(पैठणच्या) धर्मसभेकडून शुद्धिपत्र आणण्यास सांगितले. प्रतिष्ठान धर्मसभेला उद्देशून तशा आशयाचे पत्र सुद्धा दिले.  एका भल्या पहाटे, मुले झोपेत असतांनाच, विठ्ठलपंत-रुक्मिणीबाई उभयतांनी अंतिम यात्रेसाठी प्रयागला प्रयाण केले. यावेळी निवृत्तीनाथांचे वय केवळ दहा-बारा वर्ष, तर मुक्ताबाई जेमतेम चार-सहा वर्षांची. वाळीतील जीवन त्यात आईवडिलांशिवाय पोरके जीवन. काय झाले असेल या चार लेकरांचे? 
प्रतिष्ठानची/पैठणची ब्रह्मसभा! कितीतरी वेळा आपण सहजच उल्लेख करतो. पण ही ब्रह्मसभा म्हणजे नेमके काय? यात सभासद किती आणि कोण कोण? तर या ब्रह्मसभेत दहा विद्वान ब्राम्हण म्हणजे ह्यात पंडितांचा सामावेश होता. ते म्हणजे तीन वेद जाणणारे तीन, श्रुती व स्मृती जाणणारा एक, मीमांसा जाणणारा एक, निरुक्त जाणणारा एक, एक धर्मशास्त्रज्ञ, एक ब्रह्मचारी, एक गृहस्थ आणि एक वानप्रस्थी. तर धर्मसभेत हे दहा पंडित तर असतच, शिवाय यांच्या बरोबरीने देसाई, देशमुख, कुलकर्णी, बारा बलुते, महाजन, शेट्ये आदी मंडळी सुद्धा या धर्मसभेचा भाग असतं. ज्ञानेश्वरांच्या आधी एक दशक श्री चक्रधर स्वामींच्या रूढी बाह्य वर्तनाबद्दल आरोप पत्र दाखल करण्यात आले होते. या कारणे श्री चक्रधर स्वामींना या धर्मसभेपुढे हजर व्हावे लागले होते. या प्रसंगानंतर बरोबर दहा वर्षांनी ज्ञानेश्वर आणि भावंडांना या धर्मसभेत शुद्धीपत्रासाठी यावे लागले होते. यावेळीही या धर्मसभेतील बरीचशी तीच(श्री चक्रधर स्वामींच्या वेळी असलेली) सभासद मंडळी होती. 
तर ही चार बालके आळंदी धर्मसभेने दिलेले पत्र घेऊन प्रतिष्ठानास रवाना झाली, तिथल्या धर्मसभेकडून शुद्धीपत्र आणण्यासाठी! निवृत्तीनाथांनी अगदी स्पष्टपणे सांगितले, आपल्याला या शुद्धीपत्राची काहीही आवश्यकता नाही, आपण आपल्या सन्यास धर्माचे पालन करून, आपले कर्तव्य पार पाडावे. तसेच सोपानदेव सुद्धा याच मताचे होते. तथापि ज्ञानदेवांचे म्हणणे होते, शुद्धिपत्र मिळो किंवा न मिळो, आपण समाज धारणा मोडू नये, आपण आपले कर्तव्य करणे गरजेचे आहे. तसेच लोक संग्रहासाठी ज्ञानदेवांना प्रतिष्ठानास जाणे आवश्यक असल्याचे वाटले. आपण अगदी सहजच म्हणून जातो, ज्ञानदेवादि भावंडे शुद्धिपत्र आणण्यासाठी पैठणला गेले. तथापि आळंदी ते पैठण अंतर किती? तर हे अंतर १२५ मैल म्हणजेच २०० किमी! त्याकाळी म्हणजे १३व्या शतकात, दळण-वळण, रस्ते यांची नेमकी काय परिस्थिती होती? तसेच वाटेतील जंगले, त्यातील हिंस्त्र श्वापदे, त्यांचे तसेच मानवी हल्ले वगैरे सारखी संकटं. याही पुढे जाऊन ही चार बालके, त्यांचे वय लक्षात घ्यावे. निवृत्तीनाथ सर्वात थोरले, त्यांचे वय साधारण दहा-बारा वर्ष, तर मुक्ताई चे वय चार-सहा वर्ष. या प्रवासात त्यांचे अन्न-पाण्याचे आणि मुक्कामाचे प्रश्न त्यांनी कसे सोडविले असतील? पैठणला पोहोचायला किती दिवस लागले असतील? असंख्य प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. 
ज्ञानदेवादि भावंडे आळंदीच्या धर्मसभेने दिलेले पत्र घेऊन प्रतिष्ठानी दाखल झाले. पैठण येथे धर्मसभा बोलावणे काहीसे किचकट काम होते. पैठणच्या नागघाटावर ही धर्मसभा बोलाविण्यात आली होती. या सभेत निवृत्तीनाथांनी, आळंदीकरांनी दिलेले पत्र सादर करून शुद्दीपत्र आणि उपनयन विधीसाठी विचारणा केली. तथापि धर्मसभेने शुद्धिपत्र देण्यास साफ नकार देऊन सांगितले की, तुम्हास कुठलेही धार्मिक विधी करता येणार नाही. तुम्ही भिक्षा मागून आपला चरितार्थ चालवावा. यावर ज्ञानदेवांनी सांगितले "भिक्षा मागण्याचा अधिकार केवळ व्रतबंध झालेल्यांनाच असतो, त्यामुळे आम्हास तेही करता येणार नाही. यावर धर्मसभा निरुत्तर झाली. धर्मसभेचा पूर्ण पराभवच झाला. तथापि, त्यांनी ज्ञानदेवांच्या नावावरून त्यांची टिंगल केली आणि आपल्या नावाप्रमाणे काहीतरी चमत्कार करून दाखविण्यास सांगितले. ज्ञानदेवांनी गुरु आज्ञा घेऊन सर्व ज्ञात चमत्कार म्हणजे रेड्या मुखी वेद वदवून दाखविण्याचा चमत्कार करून दाखविला.(येथेही क्षणभर थांबून या चमत्काराचा विचार व्हावा. हा चमत्कार म्हणून विचार करायचा, की एक रूपक म्हणून विचार करायचा की आणखी काही?) याचा परिणाम, पैठणकरांचा या चार भावंडांकडे बघण्याचा दृष्टीकोनाच बदलला. ही वार्ता साऱ्या पैठण मध्ये पसरली आणि अशा अलौकिक भावंडांना बघण्यासाठी गावातील विद्वानांपासून, सारा गावं नागघाटावर आला. सर्व भावंडांचे, विशेष करून ज्ञानदेवांचे कौतुक करत पैठणकर थकत नव्हते. त्यांना गोदा तीरी असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात राहण्याची परवानगी मिळाली. त्यांची बाकी सर्व जबाबदारी पैठण मधील विद्वानांनी घेतली. सारे जणच त्यांना आपल्या घरी भोजनास बोलावू लागले. आश्चर्य म्हणजे, खरंतर पैठण, विठ्ठलपंतांचे आजोळ, देवकुळे म्हणजे त्यांचे मामा, पण त्यांचा कुठेही उल्लेख आलेला आढळत नाही.

पैठण म्हणजे काशी सारखेच सर्व मान्यताप्राप्त विद्यापीठ होते. पैठणचा उल्लेख 'दक्षिणकाशी' म्हणूनच केला जात असे. विविध विद्यांत पारंगत असलेले विद्वान येथे वास करत होते. त्यामुळे येथील विद्वानांच्या दालनांत अगणित अतिउत्तम अशा ग्रंथांचा संग्रह होता. अनेक वेद-विद्यांत ते तरबेज होते. ज्ञानदेवांच्या चमत्कारामुळे, पैठणकरांनी त्यांना भोजनाची आमंत्रणे तर दिलीच, पण त्यासोबतच आपले ग्रंथ-संग्रह, हस्त-लिखिते या भावंडांना  अध्ययनासाठी खुली करून दिली. सारे पैठण भारावून गेले होते. ज्ञान भांडारच त्यांच्यासाठी खुले झाल्याने त्यांनी अध्ययन तर  सुरु ठेवलेच, तथापि अनेक ग्रंथांवर चर्चा, तसेच प्रवचने देऊन समाज प्रबोधन करीत राहिले. एव्हढेच नाही, तर सर्व प्रकारच्या सामाजिक अणि धार्मिक उपक्रमांत सहभागी झाले. धर्मसभेने त्यांना शुद्धी पत्रही दिले, कारण आता हे शुद्धिपत्र दिल्याने धर्मसभेचे श्रेष्ठत्व सिद्ध होणार होते. पण या भावंडांनी ते अत्यंत नम्रपणे नाकारले. पैठण मध्ये त्यांचा मुक्काम साधारण एक ते दोन वर्षांचा असावा. पैठणकरांच्या प्रेमळ आग्रहाच्या मोहात न अडकता त्यांनी तिथून प्रस्थान केले. तथापि या भावंडांना निरोप देणे, पैठणकरांना अतिशय कठीण गेले. सारा गाव त्यांच्यासोबत बरेच अंतर चालत गेला. ज्ञानदेवांनी कितीतरी वेळा त्यांना माघारी परतण्याची विनंती केली. पण गोदावरी ओलांडून त्यांच्या पहिल्या मुक्कामापर्यंत सारी मंडळी सोबत गेली आणि तेथून माघारी फिरली. ज्या लोकांनी या भावंडांना शुद्धीपत्र देण्यास नकार दिला होता, तीच मंडळी आता त्यांचा जास्तीत जास्त सहवास मिळविण्यासाठी धडपडत होते, हा चमत्कार नाहीतर काय म्हणायचे? खरंतर हाच खरा चमत्कार...!
 
क्रमशः


©️आनंदी पाऊस 
(featured)
२३ जून २०२३
   

Comments

  1. मंजुषा चौधरीJune 30, 2023 8:07 am

    खूप सुंदर ग ❤️❤️💐

    ReplyDelete
  2. महेंद्र कोल्हेJune 30, 2023 8:08 am

    खूप छान

    ReplyDelete
  3. खुपच छान 💐🙏

    ReplyDelete
  4. डॉ सुनील पुरीJune 30, 2023 10:46 am

    सखोल माहिती खूपच छान💐

    ReplyDelete
  5. रघुदास गर्गेJune 30, 2023 11:56 am

    नव्या दृष्टीकोनातून होत
    असलेले अभ्यासपूर्व लिखान.

    ReplyDelete
  6. अध्यात्मिक रूपात सखोल लिहलंय...विद्वान सापेक्ष सकारात्मक द्रृष्टिकोन कसा निर्माण जाहला हे अचूकपणे ओळखुन लिहणे म्हणजे "चमत्कारच"...पुढील " धागे" वाचण्यास ऊत्सुक.

    ReplyDelete
  7. Tuza lekh vachun purn gyaneshvari dolya pudhe ubhi rahili. Khdatar jivan tari aanadi rahanare te bhau bahin 🙏🙏
    Sarvana gyan deun gelet. Mi Mauli serials pahaychi khuch sunder hoti samapli aata ti.
    Samadhi cha episode pahatana radu aale 🙏
    Khup chan likhan👌🙏

    ReplyDelete
  8. वा वा छान माहिती मिळाली.
    छान लेख 👌🙏

    ReplyDelete
  9. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर इतक्या लोकांनी लेखन केले आहे, पण त्यांचा जीवनपट इतक्या रोमांचकारी आणी अद्भुत घडामोडींनी भरलेला आहे की त्यांचे चरित्र पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतेच. तू त्या घडामोडी माहितीपूर्ण लिखाणाने अगदी रंजक आणी वाचनीय केल्या आहेत . ज्ञानेश्वर महाराज किंवा त्यांची भावंडे ह्यांची अगदी बालपणातच समाजाने ससेहोलपट केली ,परंतु ते सुद्धा आपल्या ज्ञान शक्तीने सगळ्यांना पुरून उरले, पण त्यांच्या आई वडिलांचा त्याग किंवा समर्पण पण दुर्लक्षित करण्यासारखे नाही. हे आई वडिलांचे हाल मात्र तू अगदी ठळकपणे वाचकापर्यंत पोहोचवले आहेत. पैठणला जायचा प्रवास म्हणा किंवा धर्मसभेच्या सभासदांचे वर्णन म्हणा किंवा रेड्या कडून वेद उच्चारण करून घेण्याला प्रतिकात्मक म्हणणे ह्या सगळ्यांबाबत, तू अगदी अभ्यासू आणी तर्कशुद्ध विवेचन केलेले आहेस. धर्मसभेने इतके प्रतिकूल मत देऊन सुद्धा ज्ञानदेवांनी आपल्या बुद्धी चातुर्याने सगळ्या पैठण वासीयांची मने जिंकली आणी बाणेदारपणाा दाखवून शुद्धीपत्र नाकारले हा त्यांचा गुण मला फार भावला. एकंदरीत लिखाणात कुठेही विस्कळितपणा न आणता लेखिकेने संक्षिप्त स्वरुपात परन्तु वेगवान पद्धतीने चरित्राची मांडणी केल्यामुळे वाचकांसाठी ते अतिशय रंजक व माहितीपूर्ण झालेले आहे. चरित्रपटाच्या पुढील भागासाठी वाचकांची उत्सुकता कायम राहिली आहे. तुझ्या ह्या वाटचालीसाठी शुभेछा .

    ReplyDelete
  10. Dipali WaghuldeJuly 04, 2023 9:19 am

    खूप छान लेखन आणि मांडणी अगदी उत्तम

    ReplyDelete
  11. Mm, speechless
    Mi adhich tyanche nave emotional ahe
    Pn wachun punha dhanya pawle👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  12. रुपाली मुतालिकJuly 05, 2023 6:51 pm

    वाचून जर मला एव्हढे छान वाटले तर तुला लिहिताना परमानंदच 🙏

    ReplyDelete
  13. वाह काय अप्रतिम वर्णन केले आहे,
    माऊलींचे जणू काही दर्शन झाले 🙏
    सखोल अभ्यास असल्या शिवाय अशक्य आहे

    ReplyDelete
  14. माऊलींचा जीवनपट सगळ्यांना अगदी तोंडपाठ असला तरी परतपरत वाचल्याशिवाय रहावत नाही . 🙏🏻

    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...