माऊली : जीवन घटनाक्रम-१
(आळंदी पर्व१)
(featured )
ज्ञानेश्वर मंदिर!
डॉ बाळासाहेब पाटील अर्किओलोजिकल म्युझिअम, पैठण
मूर्तिकार सुनील देवरे!
माऊली
जगत् माऊली
साऱ्या विश्वाची माऊली
ज्ञानेश्वर माऊली!
ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञानकण...
ज्ञानेश्वर माऊली म्हणजे देवकण...
ज्ञानेश्वर माऊली म्हणजे दैवी ज्ञानकण...
ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञानातील देवकण...
किती बोलावे, किती लिहावे, कसे व्यक्त व्हावे अशी अवस्था होऊन जाते आपल्या साऱ्यांचीच...
माऊलींचे आयुष्य, उणेपुरे २१वर्ष, ३महिने, ५दिवसाचे! आज कित्येक शतके उलटली, तथापि माऊली पूर्णार्थाने आकळल्याचे जाणवत नाही. माझा तर अगदी अलीकडचा अभ्यास, सुरुवातच म्हणू या. ती पण माझ्या गुरूंच्या अभ्यासातून/संशोधनातून सुरु झालेली. आपल्या साऱ्यांनाच माऊलींबद्दल नितांत प्रेम, आदर, माया...! तथापि माझ्या लक्षात आले, त्यांचे आयुष्य आणि त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटना याबाबत सुद्धा जनसामन्यात बराचसा गोंधळ आहे. काही मुद्दे यापूर्वी मलाही काहीसे अस्पष्ट होते. या सगळ्यामुळे माऊलींच्या आयुष्याचा थोडा मुद्देसूद आणि कालक्रमाने अभ्यास करावा आणि तो लिहून जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवावा असे वाटले, म्हणून हा लेखन प्रपंच.
रुक्मिणी-विठ्ठलपंत, माऊलींचे मा ता-पिता. सुरुवात त्यांच्या पासूनच करू या.
विठ्ठलपंत गोविंद कुलकर्णी, त्यांच्या पित्याचे पूर्ण नाव. गोविंद त्र्यंबक कुलकर्णी, आपेगावचे वतनदार म्हणजे विठ्ठलपंतांचे वडील, माऊलींचे आजोबा. निराई, विठ्ठलपंतांच्या माता, माउलींच्या आजी. निराईचे माहेर म्हणजे विठ्ठलपंतांचे आजोळ पैठण! विठ्ठलपंतांचे मामा म्हणजे पैठणचे देवकुळे. वयाच्या जवळ-जवळ पंचावन्नाव्या वर्षी गोविंद-निराईला पुत्र रत्न प्राप्त झाले - विठ्ठलपंत!(माऊलींचे पिता) विठ्ठलपंतांनी वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत ज्ञान ग्रहण केले. ज्ञानप्राप्ती पूर्ण झाल्यावर त्यांनी तीर्थयात्रेची सुरुवात केली. गोदावरीच्या उत्तरेस असलेल्या काशीपासून सर्व तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ही यात्रा करत करत ते आळंदीला आले आणि तेथेच मुक्काम केला. त्यांच्या या तीर्थयात्रेचा कालावधी साधारण तीन-पाच वर्षांचा असावा.
रुक्मिणी सिद्धोपंत कुलकर्णी, माउलींच्या माता, त्याचे हे माहेरचे नाव.
आळंदी मुक्कामात विठ्ठलपंतांची, सिद्धोपंत कुलकर्णी यांच्याशी भेट घडली. सिद्धोपंत कुलकर्णी म्हणजे रुक्मिणीबाईंचे पिता, उमाबाई सिद्धोपंत कुलकर्णी म्हणजे रुक्मिणी बाईंच्या माता. माऊलींचे आजोळचे आजोबा-आजी. विठ्ठलपंतांच्या आळंदी मुक्कामात त्यांची सिद्धोपंतांशी गाठ झाली. सिद्धोपंतांनी, विठ्ठलपंतांना आपल्या गृही पाचारण करून मुक्कामी राहण्याची विनंती केली. विठ्ठलपंतांच्या मुक्कामात, सिद्धोपंतांच्या स्वप्नात पंढरपूरच्या विठ्ठलाने दर्शन देऊन आज्ञा केली, या तरुणास तुझी कन्या अर्पण करावी. तसेच विठ्ठलपंतांनाही प्रत्यक्ष पांडुरंगाचा दृष्टांत झाला आणि त्यांनीही या विवाहास संमती दिली. यथासांग विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंचा विवाह पार पडला. खरंतर पुरुष प्रधान समाज आणि संस्कृती. त्यात विठ्ठलपंत त्यांच्या माता-पित्याचे एकुलते आणि विलंबाने झालेले पुत्र, तरीही विवाह झाल्यावरही श्वशुर-घरी कसे वास्तव्य करीत होते? हा प्रश्न मनात आल्या वाचून राहात नाही. विवाहोत्तर विठ्ठलपंतांच्या मनात तीर्थयात्रेचे विचार आले. तसे त्यांनी सांगितलेही आणि दक्षिण भारतात तीर्थयात्रेस जाण्याचे नक्की केले. पांडुरंगाच्या आशीर्वादानेच हा विवाह झाला होता. त्याकारणे सिद्धोपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या मनातही पांडुरंगाचे दर्शन घेण्याची इच्छा होती. मग पंढरपूर पर्यंत नवदाम्पत्य आणि रुक्मिणी बाईंचे माता-पिता असे सगळ्यांनीच जाण्याचे ठरले. त्याप्रमाणे सारे रवानाही झाले. पंढरपूर मुक्काम संपल्यावर मात्र विठ्ठलपंत एकटेच दक्षिण भारताच्या तीर्थयात्रेस रवाना झाले आणि बाकी मंडळी माघारी आली.
विठ्ठलपंतांनी मात्र रामेश्वर पर्यंतची तीर्थयात्रा पूर्ण केली आणि आळंदीस परतले. परतल्यावर त्यांनी माता-पित्याच्या भेटीची इच्छा प्रकट केली. सिद्धोपंतांनाही व्याही भेट घेण्याची इच्छा होतीच. त्यामुळे सारेच कुटुंब, सिद्धोपंत-उमाबा ई, विठ्ठलपंत-रुक्मिणीबाई, आपेगावास रवाना झाले. आपेगावास विठ्ठलपंतांचे वृद्ध माता-पिता मीराबाई आणि गोविंदपंत पुत्र विरहाने अत्यंत व्याकूळ झालेले होते. अचानक पुत्र-सून, व्याही-विहीण बाई यांना आपेगावास आल्याचे पाहून त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्यांनी सर्वांचे आनंदाने स्वागत केले. साऱ्यांचा मुक्काम काही दिवसांकरिता आपेगावीच होता. वृद्धापकाळाच्याआजाराने गोविं दराव आणि मीराबाई यांचे निधन झाले. आता आपेगावी विठ्ठलपंतांचे जवळचे, मायेचे असे कुणीही राहिले नव्हते. तसेच रुक्मिणीबाई, सिद्धोपंत आणि उमाबाई यांची एकुलती एक कन्या. त्यामुळे त्या उभयतांना त्यांच्याशिवाय आळंदीस परतणे अतिशय कठीण वाटत होते. त्यामुळे उभयता रुक्मिणीबाई आणि विठ्ठलपंत यांच्या सह आळंदीस परतले.
सिद्धोपंतांची तेवीस गावांची वतनदारी होती, त्यांची सर्व जबाबदारी आता विठ्ठलपंतांवर आली. सारे काही भरगच्च होते. तथापि पुत्र प्राप्तीस विलंब होत असल्या कारणाने विठ्ठलपंतांना नैराश्य येऊ लागले, मनात सन्यास घेण्याचे विचार येऊ लागले. त्यांनी ते, रुक्मिणीबाईंना बोलूनही दाखविले, सारखीच विचारणा करू लागले. त्यामुळे रुक्मिणीबाईंनी नकळत होकार दिला आणि त्याच रात्री त्यांनी कशी-प्रयाग यात्रेचा विचार पक्का करून, त्या मार्गाने वाटचाल सुरु केली.
विठ्ठलपंतांनी स्वतः चे श्राद्ध करून, रामानंदांची दीक्षा घेऊन, चैतन्य आश्रमात दाखल झाले. तथापि संन्यास घेण्याचा निर्णय त्यांच्यासाठी अजिबात सोपा नव्हता, बऱ्याच मानसिक ताण-तणावातून त्यांना जावे लागले होते. संन्यास धर्माचा आणि त्या संबंधित शास्त्रांचा अभ्यास करून फारच थोड्या कालावधीत त्यांनी स्वतःला सिद्ध केले आणि रामानंद स्वामींच्या विश्वासास पात्र ठरले. रामानंदांनी आश्रमाची सर्व जबाबदारी विठ्ठल पंतांवर सोपवून, आपला दक्षिण भारत यात्रेचा मनोदय प्रकट केला. त्याप्रमाणे त्यांनी दक्षिण यात्रेसाठी प्रस्थान केले.
या यात्रे दरम्यान ते आळंदीस पोहोचले. आळंदी मुक्कामात त्यांची एका मातेशी गाठ पडली. पतीने परत यावे म्हणून व्रतस्थ राहून मंदिरातील पिंपळ वृक्षास नित्य प्रदक्षिणा घालत होत्या. त्यांनी चैतन्य स्वरूप स्वामींचे दर्शन घेतले असता, त्यांनी 'पुत्रवती भव' असा आशीर्वाद दिला. तो ऐकताच रुक्मिणीबाई दुःखी झाल्याचे रामानंदांच्या लक्षात आले. त्यांनी कारण विचारातच, रुक्मिणी बाईंनी आपली सारी परिस्थिती कथन केली आणि आपला आशीर्वाद परत घेण्याची विनंती केली. ते ऐकून रामानंदांनी विठ्ठल पंतांची सविस्तर चौकशी केली. त्यांची खूणच पटली. त्यांचा नवीन शिष्य म्हणजेच चैतन्यास्वामी, हेच रुक्मिणीबाईंचे पती असावेत. त्यांनी त्यांच्या दक्षिण भारत यात्रेचा विचार तिथेच थांबवून माघारी काशीस जाण्याचा निर्णय घेतला. सोबत रुक्मिणीबाई आणि सिद्धोपंत यांना सुद्धा घेतले. काही काळाने आश्रमात पोहोचल्यावर, त्यांनी चैतन्य स्वामीस समक्ष बोलावले आणि चैतन्य स्वामी हेच विठ्ठलपंत म्हणजेच रुक्मिणी बाईंचे पती असल्याचा उलगडा झाला.
रामानंद स्वामींनी लगेचच चैतन्य स्वामीस सन्यास धर्म सोडून परत गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञाच दिली. चैतन्य स्वामींनी बऱ्याच शंका-कुशंका काढून, कारणे दाखवून त्यांना सन्यासाश्रमातच राहू देण्याची विनंती केली. परंतु त्यांचे काही एक न ऐकता चैतन्यस्वामींना म्हणजेच विठ्ठलपंतांना गृहस्थाश्रमाचा आनंदाने स्वीकार करून आपल्या गावी प्रस्थान करण्यास सांगितले.
क्रमशः...
(आजतागायत हे लिखाण करायचे म्हणून दोनदा टिपणे काढून ठेवली. पण प्रत्यक्ष लिखाणाचा मुहूर्त काही लागला नाही. एका सकाळी उठल्यावर अचानकच लिखाणाला सुरुवात केली. सकाळचे लिखाण संपल्यावर भ्रमणध्वनी पाहिला आणि लक्षात आले, आज माऊली-पालखी प्रस्थान दिवस! काय म्हणावे या योग-योगाला? कसा व्यक्त करावा हा स्वर्गीय आनंद! मनात भावना आल्या...FEELING TOTALLY BLESSED!)
©️आनंदी पाऊस
(featured)
माऊली पालखी प्रस्थान दिन २०२३
खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती 👍👌👌
ReplyDeleteकाकु, खूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 ✨
Deleteमंत्रमुग्धमय हे सारे वाचून..
ReplyDeleteअसं वाटतय.."लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा".
थोडं हलक-फुलकं होऊं...संजिता
खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद, संज! 😍
Deleteआमच्यासारख्यांना ज्ञानेश्वर माऊलींचा परिचय म्हणजे, ती चौघं भावंड, रुक्मिणी आणि विठ्ठलपंत, म्हणजे त्यांचे आई-वडील, संन्याशाची पोरं म्हणून त्यांची झालेली परवड इत्यादी जुजबी माहिती, बस! नाही म्हणायला मधून मधून कीर्तनात आलेला त्यांचा उल्लेख आणि फार तर ज्ञानेश्वरांचा हरिपाठाचं पाठांतर.
ReplyDeleteपरंतु सदर लिखाण वाचून लेखिकेने माऊलींविषयी केलेलं सूक्ष्मचिंतन, संशोधन आणि गुरुं विषयी असलेली नितांत श्रद्धा, इत्यादी गोष्टी सहज प्रत्यास येतात आणि पुढील लिखाणाविषयीची उत्कंठा वाढत जाते. तुकोबारायांच्या आणि माऊलींच्या दिंड्या आधीच मार्गस्थ झाले आहेत, त्यांच्यावर आणि आमच्यासारख्या घरीच बसून दूरदर्शनवर दिंड्यांचा आनंद घेणाऱ्यांवर माऊलीच्या कृपेने असाच "आनंदी पावसा"चा वर्षाव होत राहो, उत्तरोत्तर होणाऱ्या लिखाणाचा आम्हा वाचकांना अधिक आनंद मिळत राहो हीच हार्दिक शुभेच्छा.
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 🙏🏼
नाना, असेच तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा असू द्या 🙏 खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteखूपच छान माहीती मिळाली.👌👍👏💐🙏
ReplyDeleteखूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄
Deleteखूपच छान अभ्यासपूर्ण माहिती
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶
Deleteखूप छान माहिती मिळाली माऊली विषयी🙏👌
ReplyDeleteछान माहिती लिखित केली आहे. ज्ञानदेवांबद्दल तंतोतंत लेखन करतांना आणी त्यांचे समाजाने एवढे हाल केले, त्याची पार्श्वभुमी नीट समजायला त्यांच्या वडिलांच्या आयुष्यातील घटनाक्रम उलगडून पाहिला पाहिजे होताच, तो ह्या तुझ्या लेखाच्या सुरवातीच्या प्रवासातच आम्हाला उमगायला लागला . तुझी भाषा अगदी साधी आणी स्वच्छ ठेवली आहेसच, शिवाय लिखाण तपशीलाने ठासून भरलेलं आहेस, त्यामुळे माझ्या सारख्या नास्तिक माणसाला पण ते वाचनीय झाले आहेच. तुझी जशी जशी पुढील लेखांत प्रसंगानुरूप मार्गक्रमणा सुरू होईल, तसा तसा आम्हाला एक एक प्रसंगानुरूप उलगडा होत जाईल. या निमित्ताने श्री ज्ञानदेव माऊलींच्या चरित्रात डोकवायला मिळणे, ते पण तुझ्या अथक परिश्रमाने, हे आम्हा वाचकांचे भाग्यच.
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteदीपक चौधरी.
व्यासंगी लिखाण ...👏🏻
ReplyDeleteताई , माऊली: जीवन घटनाक्रम -१ ( आळंदी पर्व १ ) वाचले . छानच लिहिले आहे . सहज व सोप्या भाषेतील लिखाण वाचून छान वाटले .
ReplyDelete