पश्चिमरंग
चित्र शीर्षक : चांदणी रात्र,
चित्रकार : व्हीन्सेंट व्हॅन गाॅख
वाचन, लेखन, अभ्यास चालू असतो. त्यात सतत काही न काही अडचणी, शंका येत असतात. पण त्या सोडवायला मी गूगल कडे जात नाही. कारण माझ्याकडे गूगल पेक्षा पावरफुलच नाही, तर सर्वस्पर्शी अभ्यासाचा चैतन्यमयी स्त्रोत आहे. अर्थातच हा स्त्रोत म्हणजे माझे गुरु आदरणीय ऋषीतुल्य डॉ रा. श्री. मोरवंचीकर! त्यामुळे त्यांच्याशी अगदी दररोजच संवाद होत असतो. एक दिवस म्हणाले मी तुझ्यासाठी दोन पुस्तकं राखून ठेवली आहेत, तुझ्यापर्यंत कशी पोहोचवायची? किंवा बघतो, शशिकांत पिंपळापुरे यांच्या मदतीने पाठवायचा प्रयत्न करतो. मग मीच शशिकांत पिंपळापुरे यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. त्यांनी ती लगेचच मान्य करून, 'ती' पुस्तकं पाठवली. (मला अभ्यासाठी लागणारी बरीच पुस्तकं शशिकांत पिंपळापुरे पाठवीत असतात.) पुस्तकं घरी पोहोचली पण मी प्रवासात. आठ-दहा दिवसांचा प्रवास, तोही भर उन्हाळ्यातील त्यामुळे भरपूर थकवा वगैरे, तसेच थोडे घराकडेही लक्ष देणे गरजेचे होते. पाकीट उघडून पुस्तकांचे शीर्षक आणि मुखपृष्ठ पाहिले आणि मिळाल्याचे सरांना कळविले.
मी अपेक्षा करीत होते माझ्या अभ्यासाविषयी पुस्तकं असावी. तथापि त्यांचे विषय वेगळेच आणि अतिशय अवघड, बोजड वाटत होते. बरं लेखकांविषयी सुद्धा फारशी माहिती नव्हती. ती पुस्तकं सरांनी वाचावी आणि त्यावर अभिप्राय द्यावा, यासाठी लेखकाने ती पुस्तकं सरांना पाठीविली होती. मग वाटले सरांनी अभिप्राय दिला असेल तर तोच ऐकावा आधी, मग वाचावी ही पुस्तकं म्हणजे नीट समजायला सोप्पे जाईल. पण ते म्हणाले तू देऊ शकतेस का अभिप्राय? मी जरा साशंक मनाने सांगितले, आधी वाचते, मग ठरवते.
पुस्तकं बघून, चाळून खूपच किचकट वाटत होते. वाचायला सुरुवात केली तर ते मला झेपेल का? वाचन पूर्णत्वास जाईल का? वगैरे शंका मनात येत होत्या. पण गुरु आज्ञा समजून, मन स्थिर करून वाचून पूर्ण करण्याचा पणच केला आणि झेपेल तसे वाचत गेले. तर हे म्हणजे चित्रकार पंडितराव देशमुख यांचे 'पश्चिमरंग' हे पुस्तकं! चित्रकला माझा आ(ळस)वडता विषय असला, तरी चित्रकला माझा अभ्यास विषय नाही.(आवडीने स्वतः साठी गाणे म्हणणाऱ्यास बाथरूम सिंगर म्हटले जाते, तसेच चित्रकलेच्या बाबतीत काय म्हणतात माहिती नाही. मी तशी आहे🤭.) त्यामुळे दररोज थोडे-थोडे करून वाचत गेले . काहीकाही भाग समजेपर्यंत परत परत वाचला.
आणि हा माझा "पश्चिमरंग" बद्दलचा अभिप्राय!
प्रस्तावना छान सविस्तर आहे, अगदी मला अपेक्षित असते तशीच. म्हणजे त्यात सदर पुस्तकाबद्दल अतिशय अभ्यासपूर्ण माहिती हवीच, परंतु लेखाकांबद्दलही, त्या संदर्भात माहिती हवी. थोडक्यात त्यांचे कार्यक्षेत्र, अभ्यासक्षेत्र, आधी यासंदर्भातील कार्य इ. त्यामुळे सदर पुस्तकाबाबतीतील त्यांचा नेमका दृष्टीकोन समजायला मदत होते. या सगळ्यामुळे वाचकाला ते पुस्तक वाचायला आणि समजायला मदत होते. डॉ. जनार्दन वाघमारे, (मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, माजी खासदार, राज्यसभा, महाराष्ट्रातील एक नावाजलेले विचारवंत.) यांनी प्रस्तावनेत लेखकांबद्दल मोजकी पण नेमकी माहिती दिली आहे, त्यामुळे हे पुस्तक अभ्यासण्याच्या दृष्टीने, समजावून घेण्याच्या दृष्टीने एक योग्य अशी दिशा आणि दृष्टी मिळते. तसेच सदर पुस्तकाबद्दलही अतिशय अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले आहे. कला म्हणजे काय?, एखादी कलाकृती घडतांना त्यावर परिणाम करणारे नेमके घटक कुठले? त्यांचा नेमका परिणाम कसा होतो वगैरे मुद्दे अतिशय सविस्तरपणे मांडले आहेत. तसेच काही कलाकार आणि कलाकृतींचा सुद्धा अतिशय सखोल अभ्यास मांडला आहे.
आता मुख्य पुस्तक! यात अगदी प्रागैतिहासिक कले पासून ते अगदी एकोणीस-विसाव्या शतका पर्यंतच्या काळातील कलाकृतींचा समावेश आहे. तसेच भौगोलिक दृष्ट्या सुद्धा विविध भागांचा समावेश आहे. त्यामुळे वाचकाला मानसिकरीत्त्या, बौद्धिकरीत्त्या त्या-त्या काळात आणि त्या-त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो, घडतो.
कुठलीही कलाकृती असो, त्यातून सर्वसाधारणपणे सौंदर्य आस्वाद घेता येतो आणि तो घेतला जातो. पण मी या मताशी पूर्णपणे सहमत नाही, कुठल्याही कलाकृतीमध्ये सौंदर्य आस्वदापेक्षा जास्त भाग अभ्यासास्वादाचा असतो. आणि हा अभ्यासास्वाद घेता आला तरच त्या कलाकृतींचा सौंदर्यास्वाद पूर्णपणे घेता येतो.व्यक्तिगतरीत्या मला असाच आस्वाद घ्यायला मनापासून आवडते! माझे काही खास कलाकार मित्र-मैत्रिणी आहेत, त्यांना मी नेहमीच आवर्जून सांगत असते, तुमच्या कलाकृती सोबत दोन ओळी तरी लिहित जा, ज्यामुळे ती कलाकृती पूर्णपणे समजायला मदत होते. पण असे बऱ्याचदा होत नाही, त्यामुळे मला ती-ती कलाकृती पूर्णपणे समजत नाही. पर्यायाने मी त्या कलाकृतीतून मिळणाऱ्या सर्वानंदाचा आस्वाद घेऊ शकत नाही.
सुरवातीला अतिशय अवघड वाटलेले पुस्तक, पण प्रत्यक्ष वाचायला घेतले आणि मी त्यात हरवूनच गेले. एखाद्या कलाकृती बद्दलची जी जी माहिती मला हवी असे वाटे, ती तर सगळी वाचायला मिळालीच, पण एखादी कलाकृती घडतांना अजून कितीतरी आयाम असतात हे लक्षात आले. कारण ते सारे आयाम देशमुख सरांनी अगदी सविस्तर पण नेमक्या आणि मोजक्या शब्दांत सांगितलेले आहेत. एक कलाकृती आपण बघतो, पण त्या कलाकृतीचा विषय कसा ठरला? कोणी ठरविला? त्यानंतर ती कलाकृती घडतांना कलाकाराची मानसिक स्थिती, भावनिक स्थिती, आर्थिक स्थिती, कौटुंबिक स्थिती कशी होती? तसेच कलाकाराचे स्वभाव वैशिष्ठ , या साऱ्याचे त्या कलाकृतीवर काय काय आणि कसे कसे परिणाम होऊ शकतात/झाले, हे सगळे मुद्दे तर आहेतच. तथापि यापलीकडे जाऊन त्या काळाची राजकीय, सांस्कृतिक, सार्वजनीक परिस्थितीचे सुद्धा एखाद्या कलाकृतीवर कसे परिणाम होतात. या साऱ्या-साऱ्याचे आकलन होते, हे पुस्तक वाचतांना.
या पुस्तकांत साधारण पंचवीस पाश्चिमात्य कलाकृतींची(काही चित्रं, काही शिल्पं) सर्वस्पर्शी अभ्यासपूर्ण अशी मांडणी केलेली आहे. प्रत्येक कलाकृती आणि कलाकार वेगळ्या भागातील, वेगळ्या कौटुंबिक परिस्थितीतील, वेगळ्या आर्थिक पार्श्वभूमीतील, वेगळ्या विचारधारेचा, तसेच विभिन्न राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीतील आहे. या सगळ्या घटकांचा, एखादी कलाकृती घडतांना नेमका कसा प्रभाव आणि परिणाम होतो, याचा अभ्यासपूर्ण तपशील मांडला आहे.
याचे उदाहरणच द्यायचे झाले तर, जगप्रसिद्ध कलाकार, लिओनार्दो दा' व्हिन्ची यांचे सुप्रसिद्ध चित्र "मोनालिसा". या चित्राचा, माझा कधी फारसा परिचय झाला नव्हता. पण ती खूप उच्च कोटीची कलाकृती आहे हे मात्र नीट समजत होते. तथापि ती कुणी नीट समजून सांगेल, याची खात्री वाटत नव्हती. त्यामुळे मी तिकडे वळण्याचा सुद्धा कधी विचार केला नव्हता. पण देशमुख सरांच्या सर्वस्पर्शी अभ्यासाची आणि प्रभावी लेखनाची जादू काही औरच आहे, याचा प्रत्यय आला. या चित्रात निसर्ग पार्श्वभूमीचा अतिशय नाट्यमय रित्या उपयोग करून, स्फूमॅटो तंत्र अतिशय प्रभावीपणे वापरले आहे. या तंत्रामुळे एक विशिष्ट गूढतेची निर्मिती झाली आहे. तसेच मोनालिसाचे जीवंत, पाणीदार, हसरे, टपोरे डोळे आणि एकमेकांवर जुळवून ठेवलेले हात, हा जणू या चित्राचा आत्मा आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लिओनार्दो दा' व्हिन्ची यांची स्त्रीकडे 'आदिमाता' स्वरूपात पाहण्याचा दृष्टीकोन!(हा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा परिणाम)
'मोनालिसा'कडे मी बघितले तेव्हा, अगदी क्षणभर तिचे दोन्ही ओठ विलग होऊन तिचं स्मित मी अनुभवले...
हा झाला एक अनुभव! असे कितीतरी अनुभव हे पुस्तकं वाचत असतांना येत गेले. पण त्या वाचनात पूर्णपणे हरवून गेल्याने काही अनुभव क्षणिक होऊन स्मृतीच्या पडद्या आड गेले. पण ते अनुभव अनुभवल्याची जाणीव मात्र कायम राहिली. काही कलाकृती समजून घेण्यासाठी त्याची प्रकाशचित्रं परत परत पाहिली, परत परत वाचली! वाचत वाचत पाहिली, पाहत पाहत वाचली! असे करत असतांना त्या त्या कलाकृती जीवंतच झाल्या, चित्रांचे शिल्पं झाली आणि शिल्पं, चल चित्रांत परिवर्तीत झाली, अगदी तो प्रसंग प्रत्यक्ष समोर घडतांना दिसला! चैतन्यमयी! या सगळ्या अनुभवांचे शब्दांत वर्णन करणे केवळ अशक्य...
या सगळ्या कलाकृती श्रेष्ठ आहेत हे फक्त माहिती असून उपयोग नाही. त्या फक्त सौंदर्य दृष्टीने श्रेष्ठ नाहीत, तर त्या प्रत्येक कलाकृतीच्या जन्माची, निर्मितीची एकमेवाद्वितीय अशी कहाणी आहे. आपण ऐकतो त्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात. पण आपल्याला खूप जास्त खऱ्या गोष्टी माहिती नसतात. त्यापैकी या काही खऱ्या गोष्टी! अद्भुत गोष्टी! ज्या आपल्याला, त्या कलाकृतींचा सर्वार्थाने, पूर्णत्वाने आस्वाद घेण्याची संधी देतात. तुम्ही कलाकार असा, माझ्यासारखे चित्रकलेची आवड असणारे असा अथवा चित्रकलेचा गंध नसणारे सर्व सामान्य असा, तुम्ही सुद्धा व्हीन्सेंट व्हॅन गाॅख च्या चांदण्या रात्रीचा आनंद खऱ्या अर्थाने, त्याच्या सोबतच बसून घेऊ शकाल आणि त्या चांदणी रात्रीतच हरवून जाऊन तिथेच 'फ्रीज' होऊन जाणार...माझ्यासारखेच...
आनंदी पाऊस
१० जून २०२३
पुस्तकाचे मुखपृष्ठ
जगप्रसिद्ध कलाकार, लिओनार्दो दा' व्हिन्ची यांचे
सुप्रसिद्ध चित्र "मोनालिसा"
मोझेस
Ten Commandments
कलाकार : मायकेल अँजलो
वरील सर्व प्रकाशचित्रे सदर पुस्तकातील प्रकाश चित्रांची,
प्रकाशचित्रं आहेत
अतिसुंदर 👍👍👍
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteवाह एकदम सखोल दृष्टीने अभिप्राय दिला आहे तुम्ही. मला पण ते पुस्तक वाचावं असं वाटतं आहे 😊👌👌
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏
Deleteवा वा पश्चिमेकडील रंग सुद्धा छानच आहेत असे वाटते .धन्यवाद मॕडमजी.
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏 ✨
Deleteसुंदर लेख. नवीन विषय वाचताना कसा अभ्यासावा याचं उत्तम मार्गदर्शन.
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶
Delete😊mauli mauli👏khoop sunder mahiti ne paripurne lekh zala aahe
ReplyDeleteAanandi paus madhe aasech sunder lekh tuzekadun lihile jau de mauliche aani aamche hi tula ashirwad shubhecha👍
खुपच सुंदर लेख लिहीला आणि माहितीपूर्ण आहे.खरच नविन विषयाचा अभ्यास करायचा झाल्यास कसा करायचा याचे ज्ञान मिळाले.मस्तच. 👍🏻👍🏻
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶
Deleteखरं तर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं.पण त्या पुस्तकातील एक एक कलाकृती आता बोलायला लागली.ज्या कलाकृती फक्त ऐकून होतो, कुठे तरी पाहीली होती,त्यांचा प्रवास पंडितराव देशमुख सरांनी खूप प्रभावी मांडला आहे.वाचतांना काही तरी भारदस्त, मनाची भूक भागवणारे वाचत आहोत.याची जाणीव होते.सरांनी कलाकृतींचे डाॅक्युमेंटेशन करून कलेची आवड असणाऱ्यांना कायम स्वरुपी खजिना उपलब्ध करून दिला आहे.सर आपलं खूप खूप अभिनंदन. वि.सु.चव्हाण, संपादक , सेतू, साहित्य दीप.
ReplyDeleteग्रंथाचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 ✨
Deleteगुगलपेक्षाही प्रभावी असलेल्या तुमच्या मोरवंचीकर गुरुंबद्दलचा तुम्हाला वाटत असलेला आदर प्रत्येक अक्षरात जाणवतो. तुमचा ‘पश्चिमरंग’ चा अभिप्रायही मस्तच. खरच मोनालिसा समजून घेणे अवघड आहे. प्रत्येक जण आपल्या पध्दतीने तिला समजून घेतो. नेहमीप्रमाणे मस्त लिहिले आहे.
ReplyDeleteप्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे
Khup chan v barik nirikshan aahe tuze. 👌
ReplyDeleteMonalisa che portrait pahile aamhi pan yevhadi gardi ki lambun pahave lagale hote 2018 la Europe tour la pan sarv panting khuch sunder aahet
रंग पश्चिमेचेच मालाही फार आवडतात.मस्तच लिहिलय.starry starry night ही पेंटीग-कविता van gogh ची आवडते.खुप मस्तच लिहलाय... सारे काही डोळ्यासमोर visualise होतय. अमेरिकन चित्रकला, कोरा कँनव्हास ,रंगभास्कर इ.पुस्तकेही माला आवडतात चित्रकलेची. ...खूप सारे डेमोज् पाहयाचे आहेत़.गजगामिनी सिनेमातही चित्रकार अगदी कलरफुल पेंटींग्ज
ReplyDeleteदर्शवली आहे.आता knife painting buildingchi painting सुरू केलय.-#संजिता
एखादा विषय कसा समजुन घ्यायचा या विषयी वर्णन छानच 👌👍
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏
Deleteएखाद्या पुस्तकावर अभिप्राय देणे किंवा एखाद्या प्रस्तावनेवर अभिप्राय देणे एकवेळ तुमच्या व्यासंगानुरुप शक्य आहे, पण एका अभ्यासपूर्ण व सखोल संशोधनाअंती लिहिलेल्या अभिप्रायावर अभिप्राय देणे म्हणजे एका सुंदर शालूला ठिगळ लावल्यासारखे आहे. त्यात आमच्यासारख्या कलेशी वितुष्ट असणार्या अरसिक माणसांना तर हे अवघड धनुष्य पेलण्यासारखे आहे. लेखिकेचा हा अभिप्राय मोरवंचीकर सरां वरील अपरिमित श्रद्धा ठळकपणे निर्देशित करतो. चित्रकारीतेचा विषय हा त्यातला काहीही रस नसलेल्या माणसाला समजाऊन सांगायचा ही एवढी क्लिष्ट कामगिरी, लेखिकेने लीलया पेललेली आहे. अभिप्राय सुरुवातीला वाचताना विषय नीट कळेल तरी का असे वाटत होते, पण उत्कृष्ट अभ्यासू लिखाण आणी मुद्देसूद व वेधक शब्दरचना, त्यामूळे अभिप्राय एकदम वाचनीय झाला आहे आणी 'पश्चिमरंग' पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. हे लेखिकेचे नुसत यशच नाही,तर तिच्या विचार व्यक्त करण्याच्या शब्द मांडणीला मिळालेली दाद म्हणायला हरकत नाही. मी मूळ प्रस्तावना वाचलेली नाही, पण त्यावरील लेखिकेचा अभिप्राय साहित्य गुणांनी तोडीसतोड असणारच ह्याची खात्री आहे.
ReplyDelete