राधा-लक्ष्मी
दालन
(featured)
राधा-लक्ष्मी दालन! (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, महाराष्ट्र)
याबद्दल बोलायचे झाले तर मला तीन मुद्दे महत्वाचे वाटतात. एक- हा ग्रंथ संग्रह कुणाचा? दोन– या
ग्रंथ संग्रहात काय काय आहे? तीन– या दालनाचे नाव राधा-लक्ष्मी दालन का?
तर हा
संग्रह आहे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहास आणि पुरातत्व
संशोधक, संस्कृती पुरुष, ऋषीतुल्य आदरणीय डॉ. प्रा.
रामचंद्र श्रीनिवास मोरवंचीकर सर यांचा! सरांचा परिपूर्ण परिचय करून द्यायचा
म्हटले तर, एक मोठा ग्रंथच तयार होईल! असा ग्रंथ असावा अशी
माझ्या मनात भावना आहेच, त्याकरिता मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करणार
आहेच. तथापि इथे त्यांची थोडक्यात ओळख करून देते. रा श्री मो म्हणजे एक प्रवास आहे, “इतिहासापासून
सुरु झालेला, जलाच्या माध्यमातून अध्यात्माकडे जाणारा!” “चालते
बोलते विद्यापीठ!” अशी त्यांची जनमानसात ओळख आहे! या पुढे जाऊन मी त्यांची ओळख “एक
समृद्ध, सर्वांगांनी बहरलेला, अनंत शाखा
असलेला, पाळमूळ अतिशय खोलवर रुतलेला ज्ञानरूपी वृक्ष!” या
शब्दात करून दिली आहे. जी आता माझी मलाच तोकडी वाटते.
काल-यंत्र!
टाईम-मशीन! आज सगळ्या जगालाच या यंत्राचे वेड, वेध लागले आहेत, ह्याची
आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. या यंत्रातून सगळ्यांनाच भूतकाळात आणि भविष्यकाळात
प्रवास करायची तीव्र इच्छा आहे. जगभरातून कितीतरी शास्त्रज्ञ या यंत्र निर्मिती
साठी काम करत आहे. तथापि माझ्या मते या यंत्राचा रा श्री मो यांनी केव्हाच शोध
लावला आहे. यातून कितीतरी संशोधकांनी, अभ्यासकांनी, एव्हढेच
नाही तर जनसामान्यांनी सुद्धा प्रवास केला आहे. रा श्री मो यांच्या या
वेळ-यंत्रातून स्वर्गीय सुंदर प्रवास केल्यावर मी आणि माझ्या सारख्या शेकडोंनी
त्यांना त्याबद्दल पावती सुद्धा दिली आहे, अगदी भरभरून!
या काल-यंत्राचे दुसरे नाव म्हणजे अतिशय सूक्ष्म आणि सर्वस्पर्शी अभ्यास/संशोधन! विषय
कुठलाही असो त्यावर त्यांनी अतिसूक्ष्म, सखोल आणि सर्वस्पर्शी
संशोधन/अभ्यास केलेला आहे. त्यावर अमाप लेखन केले आहे, अजूनही
करतच आहे. तसेच हजारो व्याख्यानं सुद्धा दिली आहेत. हे लिखाण वाचून आणि त्यांची
व्याख्यानं ऐकून प्रत्येक वाचकाने आणि श्रोत्याने या ‘वेळ-यंत्र’ प्रवासाचा
आनंदानुभव घेतला आहेत. याचे उदाहरणच द्यायचे झाले तर, त्यांनी
महाराजांवर व्याख्यान दिल्यानंतर श्रोते त्यांना विचारत, तुम्ही
महाराजांना भेटलात का? त्यांचे भीष्मांवरील लेखन वाचून, “तुमच्यासारख्या
सर्वार्थाने भीष्माबरोबर वावरलेल्या जेष्ठ संशोधका बरोबर काम करण्याची संधी मिळते
आहे याचाच मला आनंद आहे!” असे उद्गार डॉ मुक्ता गरसोळे यांनी काढले. तसेच त्यांचा
ज्ञानेश्वर-ज्ञानेश्वरी अभ्यास, संशोधन, लेखन यातून मी प्रवास
असतांना मी सुद्धा त्यांना म्हटले तुम्ही तर माउलीच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचे
साक्षीदार आहात. प्रत्येक क्षण तुम्ही त्यांच्या बरोबर व्यतीत केलेला आहे. एव्हढेच
नव्हे तर आम्हा अभ्यासकांना/वाचकांना सुद्धा माउलीच्या सहवासाची संधी प्राप्त करून
दिली आहे!
त्यांचा
अभ्यास इतका सखोल, सूक्ष्म, सर्वस्पर्शी आणि जडत्वा
पासून चैतन्या पर्यत आहे की तो अभ्यासात असतांना आपण सहजच त्याकाळात कधी जातो आणि
तो काळ प्रत्यक्षात कधी अनुभवायला लागतो ते कळतच नाही. मग तो काळ काही दशका
पूर्वीचा असो, शतकां पूर्वीचा असो, की काही सहस्त्रका पूर्वीचा
असो. वेळ-यंत्र यापेक्षा काय वेगळं असणार? त्यांनी आपल्याला सूत्रच
दिले आहे. सूक्ष्म, सखोल, सर्वस्पर्शी आणि जडत्वा
पासून चैतन्या पर्यंत अभ्यास/संशोधन म्हणजेच वेळ-यंत्र अर्थातच टाईम-मशीन!
रा श्री
मो यांच्या अभ्यासाबद्दल/संशोधनाबद्दल व्यक्त होण्यासाठी योग्य शब्द नाहीतच
माझ्याकडे. आणि इथे हे सगळे सांगण्याचा उद्देशही तो नाहीच, तर
संशोधन/अभ्यास कसा असावा, किती सूक्ष्म, सर्वस्पर्शी तसेच जडत्वा
पासून चैतन्या पर्यंत जाणारा असावा, हे सांगण्याचा माझा
प्रामाणिक प्रयत्न आहे. ही एकच गोष्ट आपण सगळे विद्यार्थी/संशोधक त्यांच्याकडून
शिकू शकलो तरी या ग्रंथ देणगीचे सार्थक झाल्यासारखे होईल. एक विद्यार्थी आणि
अभ्यासक म्हणून माझी सगळ्या अभ्यासक/विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना एक विनंती आहे.
रा श्री मो सरांची कुठल्याही पुस्तका साठी (त्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा इतर
कुणीही लिहिलेल्या पुस्तकाला) लिहिलेली किमान एक प्रस्तावना वाचा, समजून
घ्या. एव्हढेच केले तरी आपण करतो तो अभ्यास/संशोधन आणि खऱ्या अर्थाने
अभ्यास/संशोधन काय, यात किती तफावत आहे याची जाणीव होईल. परिपूर्ण आणि
सर्वस्पर्शी संशोधन काय असते याची नीट कल्पना येईल. आणि मग प्रत्येकाचेच संशोधन
त्या पद्धतीचा दर्जा गाठण्याचा प्रयत्न होईल याची मला पूर्ण खात्री आहे!
तर अशा या
थोर संशोधकाचा ग्रंथ संग्रह आपणास देणगी स्वरूपात मिळाला आहे. किती भाग्यशाली आहोत
आपण सर्वच! त्यांचे तत्वच आहे, आलेली वस्तू जतन करणे, अगदी
भौतिक रूपापासून ते तत्व रूपापर्यंत. आठवीत मिळालेले पेन, तत्व
अजूनही जपून ठेवलेलं आहे, त्याची नीब, जीब, गळा, बॉडी
बदलली पण पेन-तत्व मात्र अजूनही शिल्लक आहे, जपून ठेवलेले आहे. शिक्षक
म्हणून एक एक पायरी चढत जातांना, त्यांना कायमच वाटत गेले, आपल्याला
लागणारे प्रत्येक पुस्तक आपण स्वतः विकत घ्यावे. अगदी वेळ पडली तर एक वेळ जेवण
नाही केले तरी चालेल, पण पुस्तक खरेदी केले पाहीजे. अशी त्यांची भावना, त्यामुळे
ऐपत नसतानाही ग्रंथ विकत घेतले. तो काळ म्हणजे पेन, पुस्तक या वस्तू म्हणजे
चैनीच्या वस्तू! आजच्या सारखा त्या काळात पैसा तर मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हताच, तथापि
ग्रंथ-पुस्तकं सुद्धा मुलबक प्रमाणात उपलब्ध नव्हती. मग कुठून तरी अतिशय कष्टाने
तो ग्रंथ मिळवायचा आणि त्याची छायाचित्र-प्रत काढून घ्यावी लागे, अभ्यासण्यासाठी.
अशावेळी मूळ ग्रंथाची किंमत अगदीच नगण्य असे. पण त्याची छायाचित्र-प्रत तयार करून
घेण्यासाठी मूळ किमतीच्या कितीतरी पटीने अधिक खर्च करावा लागे. असे जवळ-जवळ हजार
तरी दुर्मिळ ग्रंथ या संग्रहात आहेत. तसेच शंभर वर्षांपेक्षा पुरातन असलेली एक
ज्ञानेश्वरीची प्रत सुद्धा या संग्रहात आहे. तिचे योग्य प्रकारे जतन-संवर्धन
व्हावे अशी माझी वैयक्तिक पातळीवर सुद्धा इच्छा आहे. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे
प्रस्थान त्रयी पैकी एक ग्रंथ आहे. तसेच हा ग्रंथ जतन करण्यासाठी कोणती योग्य
पद्धत अंगीकारावी हे सांगू शकणारा पुरातत्व विभाग आपल्या विद्यापीठात आहे! आणि
आनंदाचा भाग म्हणजे मी याच विभागाची विद्यार्थिनी आहे.
रा श्री
मो मूळ इतिहास अभ्यासक. इतिहास आणि पुरातत्व या विषया संबधित अनेक ग्रंथ या
संग्रहात आहेत. सातवाहन कालीन महाराष्ट्र, प्रतिष्ठान(पैठण) या सारख्या
विषयांवर संशोधन करून आपल्या सारख्या अभ्यासकांना हे सगळे विषय लेखन करून उपलब्ध
करून दिले आहेत. या अभ्यासाच्या सीमा फक्त प्रतिष्ठान, महाराष्ट्र, भारत
इतक्याच सीमित नसून भारताच्या सीमा ओलांडून अगदी जगभर पसरलेल्या आहेत. त्यांना
आजही हे सगळे अगदी तोंडपाठ आहे. हे सगळे ग्रंथ रुपात आपल्याला या संग्रहात लाभले
आहे. तसेच अजून एक विषय, स्त्रियांचा अगदी लाकडा, मना-हृदयात
एक खास जागा असलेला, महाराष्ट्राचे महावस्त्र पैठणी! पैठणीच्या
धाग्यापासून, विणण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीपर्यंत सगळा सखोल, सविस्तर
अभ्यास करून, शब्द रुपात विणून एक अतिशय देखणे महावस्त्र
आपल्याला भेट म्हणून दिलेले आहे.
पाणी! जल!
या विषयावर इतका सविस्तर, चैतन्यमयी अभ्यास करणारे भारतातीलच नव्हे तर
जगातील एकमेव संशोधक आहेत. रा श्री मो म्हणजे पाण्याचा पाया, पाण्याच्या
अभ्यासाचा पाया, जागतिक पाणी व्यासपीठाचा पाया! पाण्यातून जीवनाकडे
बघण्याचा संदेश यांनी संपूर्ण जगाला दिला, वारेमाप संशोधन, लेखन केले.
पाणी अभ्यासकांसाठी हा अतिशय अमुल्य ठेवा आपल्याला लाभलेला आहे. आज यातील बरेच
ग्रंथ मिळणे अगदी दुरापास्त आहे. पण हे सगळे ग्रंथ आपल्याला मिळाले आहेत. हे ग्रंथ
अभ्यासायला विद्यापीठात जायची माझी मनापसून इच्छा आहे!
रा श्री
मो यांनी वयाच्या आठव्या वर्षी ज्ञानेश्वरीचे एक हस्तलिखित वाचले. त्यांच्या
आजीने(राधा) त्यांच्याकडून वाचून घेतले. तेव्हापासून ते आजतागायत ज्ञानेश्वरी
पारायण आणि सानिध्य हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सोबतच त्यावर सतत
मनन-चिंतन. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी यावर अतिशय चैतन्यपूर्ण संशोधन करून
“येई परतुनी ज्ञानेश्वरा” “समाधीतील स्पंदने” असे ग्रंथ साकारले. प्रत्येक वाचकाला
या ग्रंथातून ज्ञानेश्वर सहवासाची प्रचीती येते(वेळ-यंत्र). सर्वार्थाने चैतन्यमयी
लेखन! या सगळ्या संशोधनासाठी जी काही ग्रंथ संपदा आवश्यक होती ती सगळीच्या सगळी
आपल्याकडे आली आहे!
त्यांच्या
अभ्यासाची व्याप्ती अफाट! त्यामुळे या सगळ्या व्यतिरिक्त संत एकनाथ, नामदेव, तुकाराम, गोरोबाकाका, भीष्म, कबीर, रुमी या
आणि अशा अनेक थोर व्यक्ती सुद्धा भेटतील. तसेच काष्ठ्शास्त्र, शिल्पशास्त्र, स्थापत्यशास्त्र
आणि काय नाही. या संग्रहाची एक झलक मिळावी म्हणून उदाहरणादाखल थोडी माहिती
देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.
आता राहता
राहिला तिसरा मुद्दा. “राधा-लक्ष्मी दालन” तर यातील लक्ष्मी म्हणजे रा श्री मो
यांच्या माता, अतिशय स्वाभिमानी, देखण्या, सुस्वभावी, अगदी
सगळ्या सुलक्षाणानी युक्त. पण आपल्या जन्मदात्या मातेचा चेहराही लक्षात राहू नये
इतक्या लहान वयात त्या, हे जग
कायमच्या सोडून गेलेल्या...
राधा!
त्यांच्या दोन्हीही आजी, वडिलांची आई आणि आईची आई. दोघी विहिणींचे नाव
राधा! पैकी वडिलांची आई राधा, आईच्या माघारी त्याच त्याच्या आई झाल्या. एव्हढेच
नाही तर त्यांच्या बाकी भावंडा पेक्षा त्यांच्या कडे आजीचे विशेष लक्ष. त्यांच्या
सगळ्या वैचारिक, शैक्षणिक गरजा अगदी लक्ष देऊन पुरविल्या. एकीने
जन्म दिला आणि दुसरीने जीवन कसे जगावे हे शिकविले. राधा-लक्ष्मी म्हणजे विरह आणि
प्रेम. किती विरोधाभास. वयाच्या विसाव्या वर्षांपर्यंत आजीची साथ लाभली. त्यानंतर
मग पुस्तक असो, विवाह असो, सोहोळा-समारंभ असो, त्याची
सुरुवात “राधा-लक्ष्मी प्रसन्न!”
शांताबाई
शेळके यांचा एक लेख सरांच्या वाचनात आला. त्यात शांताबाईनी आपला अनुभव सांगितला
होता. त्यांनी त्यांची ग्रंथ-संपदा देणगी स्वरुपात जिथे दिली होती तिथे तर सापडली
नाहीच, पण भेळेचा कागद म्हणून वापरलेली आढळली... रा श्री
मो यांना अनेक पर्याय उपलब्ध होते ही ग्रंथ संपदा देणगी देण्यासाठी. पण त्यांनी
नवोदित विद्यापीठाला प्राधन्य दिले. कारण अशा विद्यापीठात अशी संपन्न ग्रंथ संपदा
असणे आवश्यक असते, तसेच तिचा सांभाळ आणि जतनही योग्य प्रकारे होईल
याची त्यांना खात्री वाटली!
रा श्री
मो यांचा जन्म चिंचोली(काटी) म्हणजे आपल्या विद्यापीठाच्या बाजूचे एक शिवार सोडून
पलीकडे. जिथे राधा-लक्ष्मी यांचा वावर होता. कधीतरी, या गावातील कुणीतरी
विध्यार्थी/विद्यार्थिनी येऊन या संग्रहातील एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करेल आणि रा
मो श्री यांना राध-लक्ष्मी यांच्या ऋणातून कायमचे मुक्त होता येईल... हा त्यांचा
मानस....
“राधा-लक्ष्मी दालन”
©️आनंदी पाऊस
९३४२१०७६६९
Khup chan
ReplyDeleteआनंदी धन्यवाद ✨
Deleteखूप सुंदर यथार्थ वर्णन
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद 🙏
Deleteआपली ग्रंथसंपदा अशा प्रकारे देणे हे कालौचित आहे.त्यामुळे त्याचा लाभ अनेकांना होऊ शकतो.माझे मोठे बाबा व साहित्यिक प्रा.भानु चौधरी यांनी ही त्यांची मौलिक ग्रंथसंपदा दान केली आहे.मी नुकतेच माझे २०० ग्रंथ खिरोदा येथील बी.एड काॅलेजला दिले.मोरवंचीकर लेखक,संशोधक होते त्यामुळे त्यांच्याकडे वेगळी पुस्तके असतील,त्यांचा लाभ अभ्यासक व विद्यार्थी घेऊ शकतील.ग्रंथदान चळवळ उभारून ती पुस्तके ग्रामीण भागातील ग्रंथालये,शाळा यांना दिले पाहिजे.
ReplyDeleteI salute you ...
ReplyDeleteखूपच सुंदर ऐतिहासिक प्रवासाचे दर्शन लाभले
ReplyDeleteआपली ग्रंथ संपदा वाखाणण्याजोगी आहे.मस्तच लिहिलय...सोलापूर विद्यापीठातील राधा लक्ष्मी दालन उत्कृष्ट आहे.
ReplyDeleteमाला जास्तआवडलं ते पैठणी वस्त्राबद्दल लिहलेलं.
अजानुभव व्यक्तीमत्व हे फोटोवरूनपण दिसतय .
शतशः: अभिवादन.
खरतर सिनेमा,पुस्तके आणी कला संगीत यांचा सुरेख संगम असणंही तितकच महत्वाच आहे.
प्रत्येकाची ग्रंथ संपदा जशी वेगळी असते तशी
माझी काही निवडक पुस्तके जरा जास्त असलेल्या आकलनशक्ती असल्यामूळे ने शिकवायला class studio madhye mazyabarobar क्रमाने ठेवतोची आहेत जी अलिकडे कोव्हिड काळात वाचली आहे.
उदा.अनुनाद,आसावरी ताईंच वास्तू स्थापत्य असो ,बहिणाबाई चौधरी,देगुलकर सरांच मंदिर कसे पाहावे,कोरा कॅनव्हास, केरळच्या यक्षाची देणगी,रावीपार गुलजार,दूर्गा भागवतांच निसर्गोत्सव धडे,देशपांडे वेरूळ लेती asian रेसौर्ट,american चित्रकला इतकच.
नवीन एक घेत आहे.."चंद्रिके ग सारिके गं" गौरी देशपांडे...आपल्याdiscussionmadhye. .ohk
आपली ग्रंथ संपदा वाखाणण्याजोगी आहे.मस्तच लिहिलय...सोलापूर विद्यापीठातील राधा लक्ष्मी दालन उत्कृष्ट आहे.
ReplyDeleteमाला जास्तआवडलं ते पैठणी वस्त्राबद्दल लिहलेलं.
अजानुभव व्यक्तीमत्व हे फोटोवरूनपण दिसतय .
शतशः: अभिवादन.
खरतर सिनेमा,पुस्तके आणी कला संगीत यांचा सुरेख संगम असणंही तितकच महत्वाच आहे.
प्रत्येकाची ग्रंथ संपदा जशी वेगळी असते तशी
माझी काही निवडक पुस्तके जरा जास्त असलेल्या आकलनशक्ती असल्यामूळे ने शिकवायला class studio madhye mazyabarobar क्रमाने ठेवतोची आहेत जी अलिकडे कोव्हिड काळात वाचली आहे.
उदा.अनुनाद,आसावरी ताईंच वास्तू स्थापत्य असो ,बहिणाबाई चौधरी,देगुलकर सरांच मंदिर कसे पाहावे,कोरा कॅनव्हास, केरळच्या यक्षाची देणगी,रावीपार गुलजार,दूर्गा भागवतांच निसर्गोत्सव धडे,देशपांडे वेरूळ लेती asian रेसौर्ट,american चित्रकला इतकच.
नवीन एक घेत आहे.."चंद्रिके ग सारिके गं" गौरी देशपांडे...आपल्याdiscussionmadhye. .ohk -Sanjita
तुमचे रा श्री मो सर म्हणजे खरोखरच चालतेबोलते विद्यापीठच आहे. ज्ञानेश्वरांनी १६ व्या वर्षी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचे हस्तलिलिखित ८ व्या वर्षी सरांनी वाचले म्हणजे ते ही किती थोरच! खरोखरच आधुनिक काळातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणता येईल. दोन्ही आज्यांच्या ( राधा) आणि माता ( लक्ष्मी) यांच्या ऋणांचा आदर त्यांच्या राधा लक्ष्मी दालनाने व्यक्त झाला. ग्रंथदानासारखे पुण्य कोणतेच नसावे . त्यांची पुस्तके किती जणांनाच नाही तर पिढ्यांना ज्ञानी करुन सोडतील . अशा असाधारण व्यक्तिमत्वास शतशः नमन🙏🏻
ReplyDeleteप्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे
Very nice article, befitting the thoughts and philosophy of Raa Shri Mo himself..
ReplyDeleteThis means a lot to me!
DeleteThnk u so much 🙏✨💫😇
Can I please know who is this?