Skip to main content

एक प्रवास-इतिहासाकडून आध्यात्माकडे (featured)

 

एक प्रवास-इतिहासाकडून आध्यात्माकडे

(featured)


"इतिहास, 
जल-संस्कृती 
आणि 
अध्यात्म" 
नुकतेच या ग्रंथाचे प्रकाशन झालेय!  
माझ्या गुरूंच्या, आदरणीय ऋषीतुल्य, संस्कृती पुरुष, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहासकार अणि पुरातत्त्व संशोधक डॉ रा श्री मोरवंचीकर, यांच्या संशोधनात्मक लिखाणाचे, तसेच त्यांच्या इतिहास परिषदेच्या अध्यक्षीय व्याख्यानांचे शब्दांकित लेखन संकलन करून त्याचा एक सुरेख ग्रंथ साकार झाला!
या ग्रंथाच्या अतिथी संपादक पदाचा भार सांभाळण्याची जबाबदारी अणि या ग्रंथास प्रस्तावना लिहिण्याचे भाग्य मला लाभले!
बऱ्याच वाचकांची, ही प्रस्तावना वाचण्याची इच्छा आहे. या सगळ्या वाचकांच्या इच्छापूर्ती साठी, डॉ मोरवंचीकर यांची परवानगी काढून ही प्रस्तावना इथे प्रकाशित करत आहे.

 

"एक समृद्ध वृक्ष म्हणजे एक लहानसा जलसाठाच असतो!"

अतिशय छोटेसे वाक्य, माझे गुरु म्हणजेच लेखक आदरणीय ऋषीतुल्य, संस्कृतीपुरुष, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहास आणि पुरातत्त्व संशोधक डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांच्या "शुष्क नद्यांचे आक्रोश" या पुस्तकातील. अतिशय सखोल आणि गहन अर्थ आहे या वाक्याचा. वाचकाच्या कुवतीप्रमाणे/अभ्यासाप्रमाणे उमगत जाणारा. जितका खोलवर समजून घेतला तितका उलगडत जाणारा. स्वतः लेखकांचे म्हणजे आदरणीय डॉ रा. श्री. मोरवंचीकर यांचे सुद्धा नेमक्या शब्दांत वर्णन करायचे झाल्यास, "समृद्ध, सर्वांगांनी बहरलेला, अनंत शाखा असलेला, पाळंमुळं अतिशय खोलवर रुतलेला ज्ञानरूपी वृक्ष!" असेच करावे लागेल. आणि असा वृक्ष म्हणजे दैवी, स्वर्गीय, परमोच्च आनंदाचा ठेवाच असतो! हे सगळे त्यांची शिष्य म्हणून मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्यांना सहजच कुणी चालते बोलते विद्यापीठ म्हणून जाईल, जनमानसात त्यांची तशीच ओळख आहे. पण आजकालची विद्यापीठं म्हणजे चैत्तन्य हरवून बसलेली विद्यापीठं आणि या विद्यापीठांच्या शाखा तरी किती? सहजच बोटावर मोजण्याइतक्या. मी तर म्हणेन एक वेळ एखाद्या समृद्ध वृक्षाच्या शाखा मोजता येतील, पण या ज्ञानरूपी वृक्षाच्या शाखांची गणती करणे केवळ अशक्य! मूळ ते इतिहासाचे शिक्षक/अभ्यासक/संशोधक. पण त्यांच्या अभ्यासाच्या विषयांची यादी प्रागैतिहास(prehistory), प्राक्-इतिहास(proto-history), पुरातत्त्वशास्त्र, भूगोल, जलशास्त्र, जलव्यवस्थापन, जलसिंचन, जलसंधारण, जलसंस्कृती, काष्ठशास्त्र, वस्त्रशास्त्र, मराठी भाषा, इंग्रजी भाषा, संत, संत-चरित्र, संत-साहित्य, मूर्तिशास्त्र, स्थापत्य, मंदिर-स्थापत्य, अध्यात्म... अशी मारुतीच्या शेपटासारखी वाढतच जाणारी आहे. आणि त्यांचा, या सर्व विषयांचा सर्वस्पर्शी अभ्यास आहे. अगदी जडत्वापासून चैतन्यापर्यंत! ज्ञानेश्वरी, भागवत वगैरे सारखे कित्येक ग्रंथ ओवी, पृष्ठ-क्रमांकासहित पाठ आहे, इतकेच नाही तर त्यातील प्रत्येक ओवी नी ओवी त्यांनी अनुभवलेली आहे. एव्हढेच नाही तर माझ्यासारख्यानां सुद्धा अनुभवण्याची संधी दिली आहे! माझ्या बाबतीत उदाहरणच द्यायचे झाले तर "हृदया हृदय एक झालं l ये हृदयीचे ते हृदयी घातले ll" याची चिरंतन प्रचिती येतच असते! 

                              भीष्म, श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, या आणि या सारख्या अगणित थोर व्यक्तीमत्वांचा इतका सखोल आणि चैतन्यमयी अभ्यास आहे की वाचकाला/अभ्यासकाला त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही! सगळे द्वैत संपून जाते आणि अद्वैताचा साक्षात्कारच होतो. कबीर-गालिब-रुमी यांच्याबद्दल त्यांच्याच शब्दांत बोलायचे झाल्यास, "ते सर्व कायम त्यांच्या उशाशीच असतात. व्यक्त होण्यासाठी योग्य ठिकाणी, योग्य वेळेला ते कायमच धावून येतात!"

                               या एका ज्ञानरूपी समृद्ध वृक्षाच्या सर्व शाखांचा अभ्यास करायचा म्हटल्यास माझ्यासारखे कितीतरी आयुष्य खर्ची पडतील. कुणीही अभ्यासक/संशोधकाने यावे आपल्याला हव्या त्या शाखेला झोका बांधून खुशाल त्यावर बसून झोके घ्यायला सुरुवात करावी आणि मग हा समृद्ध वृक्षच अभ्यासकाला अगदी आकाशापर्यंत उंच झोके देऊन कधी झुलवू लागतो ते कळत सुद्धा नाही. आणि मग उरतो तो केवळ आनंद! परमोच्च आनंद!! आनंदाचे दोही आनंद तरंग!!!

                               सदर ग्रंथात या ज्ञानरूपी समृद्ध वृक्षाच्या अनंत शाखा पैकी तीन शाखांचा परिचय आहे.  तीनही विषय अतिशय भिन्न. वरवर पाहता त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही असे वाटते. तथापि डॉ मोरवंचीकर यांच्या सुक्ष्म आणि सर्व-स्पर्शी अभ्यासातून/संशोधनातून वाचकाला उलगडा होत जातो, हे विषय भिन्न असले तरी एकातून दूसरा विषय आणि दुसऱ्यातून तिसरा विषय उलगडत जातो. जाणवत जाते, हे विषय एकमेकांना किती पूरक आहेत, एकमेकांत किती गुंफले गेले आहेत. अद्वैताचा साक्षात्कार!

                              पहिली शाखा इतिहास. आज इतिहास शब्द आणि त्याचा अर्थ फारच संकुचित होऊन गेला आहे. इतिहास म्हणजे राज्यकर्ते, राजवटी, युद्ध इतकेच आयाम सर्व परिचित/ज्ञात आहेत. तथापि इतिहास हा खूप व्यापक आणि बहू-आयामी विषय आहे. खरंतर इतिहास म्हणजे जडणघडण. हे सरांनी आपल्या अभ्यासातून, संशोधांतुन, लिखाणातून आपल्यासमोर उलगडून दाखविले आहे. महाराष्ट्राची जडणघडण ह्या लेखातून वाचकाला महाराष्ट्र तर उलगडत जातोच, पण जडणघडण म्हणजे इतिहास, सर्वस्पर्शी सखोल इतिहास, हा सुद्धा उलगडा होतो. मग वाचक, संशोधक असो की सर्वसामान्य असो. आज इतिहास आणि इतिहासाचा अभ्यास म्हणजे काय हेच मुळात समजून घेण्याची आवश्यकता आहे. हे नेमके समजले की अभ्यास/संशोधनाला योग्य दिशा मिळून, ते खऱ्या अर्थाने सखोल आणि सर्वस्पर्शी होईल, याची मला पूर्ण खात्री वाटते. एव्हढेच नाही तर सर्वसामान्यां पासून ते शालेय विद्यार्थ्यांना इतिहास विषय अंगावर तोफा आणि तलवारी घेऊन येणारा, त्यांना गुदमरून टाकणारा तर वाटणार नाहीच, पण उलटपक्षी अतिशय मनोवेधक आणि वित्तवेधक वाटेल. समाजशास्त्र म्हणजे इ.भू.ना. का? याचा उलगडा होईल. (जसा मला झाला!)

                                इतिहास अभ्यासाची/संशोधनाची वाट अतिशय अंधाऱ्या घनदाट जंगलातील आणि काट्या-कुटयांनी भरलेली, योग्य दिशा सापडणे फारच कठीण. तथापि सरांनी इतिहास परिषदेच्या त्यांच्या अध्यक्षीय व्याख्यानातून ही वाट सर्वांसाठी अगदी स्पष्ट आणि स्वच्छ करून दिली आहे. आपल्याला फक्त योग्य वाटेवरून पुढे(मागे?) चालत राहायचे आहे. इतिहास वाटा आणि वळणे, काही प्रश्न काही उत्तरे, नवी दृष्टी नवे आव्हान, इतिहास क्षमा करणार नाही, ही सगळी व्याख्याने या ग्रंथात शब्दांकीत करून लेखाच्या स्वरूपात समावेशीत केलेली आहेत. 

                                इतिहास त्यातल्या त्यात सत्याच्या सगळ्यात जवळ जाणारे/नेणारे शास्त्र! प्रज्ञा विकसित करणारे शास्त्र. प्रज्ञा म्हणजे शहाणपण, सद्विवेक आणि प्रज्ञेने वेचलेले संचित म्हणजेच ज्ञान. किंवा ज्ञान म्हणजे काय तर सद्विवेकाचे/शहाणपणाचे गाठोडे. थोडक्यात इतिहास हा ज्ञान-प्रज्ञा/जिज्ञासा कायम ठेवणारे , वाढवत जाणारे शास्त्र. त्यामुळे अभ्यासकाचे ज्ञानाचे गाठोडे वाढतच जाते. ही जिज्ञासा, इतिहास, प्राक्-इतिहास, प्राग्-इतिहास असा प्रवास करत, मानव कुठून आला, कुठे घडला, कसा घडला वगैरे करत पुढे(मागे?) जात राहते. हेच सुप्त तत्व महाराष्ट्राची जडणघडण सारख्या लेखातून अनुभवास येते, लेखकांचा प्रवास उलगडत जातो, वाचकाला ते भेटत जातात. हाच जिज्ञासा-प्रवास संशोधकाला/अभ्यासकाला पाण्यापाशी घेऊन जातो. हाच या ग्रंथाचा दूसरा विषय पाणी/जल! या समृद्ध ज्ञानरूपी वृक्षाच्या या शाखेबद्दल काय काय बोलावे आणि किती बोलावे! 

                                                  पाण्याचा पाया! पाणी संस्कृतीचा पाया!
पाणी सहवासाचा पाया! पाणी भावनेचा पाया!
पाणी रंग-रूप-आकाराचा पाया! 
                                                       जागतिक पाणी व्यासपीठाचा पाया!

                               पाणी म्हणजे जीवन, जीवन म्हणजे पाणी ही वाक्य अगदी सर्रास वापरली जातात. तथापि ती सारखी वापरुन इतकी गुळगुळीत/बुळबुळीत झाली आहेत की त्यातील गहन अर्थ समजू शकत नाही, कुणीही समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. किंबहुना समजून घ्यायची इच्छा नाही. कारण तो अर्थ समजला तर त्यातील वास्तव लक्षात येईल, जे तो उघड्या डोळ्यांनी बघू शकणार नाही, पेलू शकणार नाही. त्याबद्दल योग्य पाऊल उचलून कृती तर करणार नाही. 

                               लेखकांनी आपल्या सुक्ष्म अभ्यासातून पाण्यातून जीवनाकडे बघण्याची दृष्टी दिली, आवाहन केले. मानवी संस्कृती पण्याशिवाय अस्तित्वात येउच शकत नाही. मानवाची मूळ संस्कृती म्हणजे जल-संस्कृती, water-culture! भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला या संस्कृतीची ओळख करून दिली. मराठी भाषेला जल-संस्कृती आणि जगाला, इंग्रजी भाषेला water-culture हे अमूल्य शब्द-धन दिले. पाण्याचे भौतिक/जड रूप सगळेच बघतात, अनुभवतात. तथापि लेखकांनी आपल्या अभ्यासातून, संशोधनातून लेखनातून त्यांनी पाहिलेले पाण्याचे चल/चैतन्य रूप आपल्या संगळ्यांनाही अनुभवण्याची संधी दिली. एखादी गोष्ट आपलीशी करणे म्हणजे नक्की काय? नदीला आपलेसे करणे म्हणजे नक्की काय? नदीला सगळेच भारतीय अगदी सहजपणे माता म्हणतात. पण  त्याचा व्यापक आणि नेमका अर्थ हे सारे सारे त्यांच्या संशोधनातून आणि लेखनातून आकळत जाते. 

                              डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी गोदा खोऱ्याच्या संशोधनाचे अतिशय स्तुत्य आणि मार्गदर्शक काम करून ते ग्रंथ रूपाने अभ्यासकांना उपलब्ध करून दिले आहे. या ग्रंथाला डॉ मोरवंचीकरांनी "सच्चं भण गोदावरी" ही प्रस्तावना दिलेली आहे. त्यात त्यांनी नदीचा अतिशय सुक्ष्म, चैतन्यमयी अभ्यास करून, नदीला अतिशय छान प्रकारे समजून घेतल्याचे स्पष्ट होते. त्यात नदी मानवाला सांगते , "माझे हे पात्र माझे घर आहे, माझा परिसर हे माझे गणगोत आहे. घराचे संरक्षण करणे आणि गणगोतांचे अस्तित्व अबाधित राखणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी मला अधून मधून गणगोतांची विचारपुस करण्याकरिता त्यांच्या पर्यन्त जावे लागते. मी जरी चल असले तरी ते अचल आहेत म्हणून त्यांना संजीवनी देण्यासाठी मीच त्यांच्या पर्यन्त जाते ही माझ्या वहनाची परिसीमा होय. त्याच्या बाहेर तू वसाहत केल्यास माझी कुठल्याही प्रकारची ना नाही." हे संगळ्यांनीच नीट समजून घेतले तर मुंबईत २६ जुलै सारखे प्रसंग घडण्याची वेळ आलीच नसती. मानव म्हणजे या चराचरातील अतिशय सुक्ष्म आणि नगण्य जीव. पण या प्रत्येकाला त्याची भौतिक आणि मानसिक स्वतंत्र स्पेस लागते, हवी असते. मग या जीवन-दायिनी मातांना त्यांची स्पेस द्यायला हवी इतकी साधी गोष्ट मानवाला कळू नये?! मानवाने या जीवन दायिनी मातांना गुदमरून टाकले तर, स्वतः मानवाचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही, हे मानवाला कळू नये, ही मानव-जातीसाठी अतिशय लज्जास्पद बाब आहे. त्यामुळे मानवाने या मातांना भौतिक आणि चैतन्य स्वरूपात अगदी सर्वार्थाने त्यांची स्पेस देणे अत्यंत गरजेचे आहे... 

                            इतिहास आणि संस्कृती, जलसंस्कृती भिन्न असले तरी ते एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. आणि इतिहास आणि संस्कृती यातील अद्वैत म्हणजेच अध्यात्म! मानव आणि पाणी यातील अद्वैत म्हणजे अध्यात्म! ज्ञान म्हणजे चराचरातील अद्वैत, म्हणजेच अध्यात्म! "अध्यात्म!" हाच या ग्रंथाचा तिसरा विषय. अध्यात्म, ही या समृद्ध ज्ञान-वृक्षाची तिसरी आणि अतिशय महत्वाची शाखा. अद्वैत, अध्यात्माकडे जाण्याचा, अध्यात्म समजण्याचा खरा आणि एकमेव मंत्र! ज्ञानेश्वरांनी हाच अद्वैतचा मंत्र आपल्या आचार-विचारातून लिखाणातून, भावार्थ दीपिकेतून, ज्ञानेश्वरीतून, समस्त विश्वाला दिला. शैव-वैष्णव द्वैत संपविण्यासाठी वारकरी पंथाची स्थापना केली, हे सर्व ज्ञात आहे. ज्ञानेश्वर आणि भावंडातील अद्वैत सुद्धा सर्व परिचित आहेच. 

                             आज मानव, पर्यायाने संपूर्ण समाज गोंधळलेल्या, उद्ध्वस्त मनस्थितीत आहे. दिशाहीन होऊन सतत धावत आहे. याचे कारण अगदी स्पष्ट आहे. स्वतःची स्पेस(भौतिक आणि मानसिक) मिळवण्याच्या अनाठायी इच्छे मुळे द्वैतचा एक भयावह उच्चांक गाठला आहे. या सगळ्यावर एकमेव उपाय म्हणजे अद्वैत! ही त्याची व्यक्तिगत स्पेस, व्यक्तिगत अंतराळ न राहता ती एक अतिशय भयावह पोकळी निर्माण झाली आहे. आणि या पोकळीलाच स्वतः ची स्पेस समजून स्वतःच त्यात भयक्रांत अवस्थेत पोहोचला आहे. हे द्वैत संपूर्ण जगासोबतच असते तरी थोडे दिलासा देणारे असते. पण हे द्वैत त्याचे स्वतः सोबत सुद्धा आहे, ही सगळ्यात भयावह बाब आहे. हे संपूर्ण द्वैत नष्ट झाल्याशिवाय मानव स्वस्थ अन शांत होऊच शकत नाही. हाच मंत्र ज्ञानेश्वरांनी त्यांच्या भावार्थ दीपिकेतून, ज्ञानेश्वरीतून दिलेला आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव मी स्वतः आयुष्याच्या, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर घेतलेला आहे. पण त्या-त्या टप्प्यांवर वेगवेगळ्या रूपातील ज्ञानेश्वरांनी, ज्ञानेश्वरीनेच मला आधार देऊन परत पूर्ववत म्हणण्यापेक्षा अधिक सकरात्मकतेने आणि आत्मविश्वासाने उभे केले. आता तर माझ्या गुरूंनी, ऋषीतुल्य डॉ मोरवंचीकर सरांनी मला अगदी बोट धरून समाधी-सोहळा बघावयास/अनुभवायास नेले नाही तर ज्ञानेश्वर-सहवासची, ज्ञानेश्वर-कृपादृष्टीची सुद्धा संधी दिली! अद्वैतचा दैवी साक्षात्कारच! अध्यात्माचा परमोच्च आनंद! योग्य गुरु शिवाय सारेच केवळ अशक्य! आजच्या जगात असे ऋषीतुल्य गुरु मिळणे, माझ्यासारख्या भाग्यवंताच्याच भाग्यत असते! 

 

म्हणोनी जाणतेने गुरु भाजिजे l तेणे कृतकार्या होईजे ll 

जैसे मूळ सिंचने सहिजे शाखा पल्लव संतोषिती ll                      

 

                                    प्रस्तुत ग्रंथाच्या जडण-घडणी बद्दल माझ्या दृष्टिकोनातून काही सांगावेसे वाटते. आदरणीय डॉ शरद मांडे यांनी या ग्रंथाची सुरवात केल्याचे मला कळले तेव्हाच मला अगदी मनस्वी आनंद झाला. कारण माझ्याही मनात अशा प्रकारच्या ग्रंथाची निर्मिती व्हावी अशी भावना बऱ्याच दिवसांपासून घोळत होती. डॉ शरद मांडे यांच्या प्रकृती अस्वस्था मुळे ते पुढील काम पूर्ण करू शकत नव्हते. त्यामुळे डॉ मोरवंचीकर सरांनी हे काम माझ्याकडे सोपविले योगायोग असा त्यांचे सहाय्यक श्री निलेश भुते यांनी सकाळी दूरध्वनी वरून माझ्याशी संपर्क साधला आणि ते सगळे बाड माझ्याकडे पाठवून दिले आणि त्याच दिवशी संध्याकाळी डॉ शरद मांडे यांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली… 

                                 साधारणपणे शिष्याच्या लेखनावर/अभ्यासवर गुरू प्रस्तावना लिहितात, भाष्य करतात. पण माझ्या बाबतीत मात्र याच्या संपूर्ण विरोधाभास. माझ्या गुरूंच्या, डॉ मोरवंचीकर यांच्या लिखणावर लेखन करण्याची ही दुसरी वेळ आहे. मी परत परत आणि नेहमीच म्हणत राहील माझ्या गुरूंच्या लिखणावर मी काही लिहावे इतकी थोर मी नक्कीच नाही. तथापि यानिमित्ताने माझे गुरु आणि त्यांचे संशोधनात्मक लिखाण याबद्दल व्यक्त होण्याची संधी मिळाली हे माझे परमभाग्यच! तरी , न्यून ते पुरते.. अधिक ते सरते करून घ्यावे अशी विनंती करून थांबते. 


आजचा हा भाग आदरणीय श्री शरद मांडे यांना अर्पण करते ....🌸🙏

©आनंदी पाऊस
©वर्षाली महेंद्र
(featured)


ग्रंथाचे मुखपृष्ठ 




ग्रंथाचे मलपृष्ठ 










Comments

  1. Very good. Even though my mother tongue is Marathi, I just cannot write like this.

    ReplyDelete
  2. 🙏 ताई खूपच सुंदर गुरु आणि विद्यार्थ्यांचे साहित्यिक प्रेम खूप छान लिखाण झालं आहे आणि तुम्ही ते छान शब्दाने मांडले 🙋‍♀️🌹

    ReplyDelete
  3. खूप छान लिखाण केले आहे

    ReplyDelete
  4. युवराज नळेApril 21, 2023 10:56 am

    खूपच छान लिहिलंय..शब्दसौष्ठव अप्रतिम आहे..ही एक दुर्मिळ गोष्ट आहे परंतु अत्यंत सहजपणे पेललीये.. अभिनंदन खूप खूप 👍🏻🌹

    ReplyDelete
  5. राधिका टीपरेApril 21, 2023 10:57 am

    फार सुंदर लिहले आहेस वर्षाली. सुंदर शब्दकळा... सुंदर भावार्थ... शब्द सामर्थ्य आहे तुझ्या लिखाणात. Thanks.

    ReplyDelete
  6. गुलाबराव पाथरकरApril 21, 2023 11:03 am

    अत्यंत प्रबोधक आणि वैचारिक वारसा आपण जगाच्या नजरेसमोर आणून देत आहात म्हणून खूप खूप धन्यवाद मॕडमजी.,,,.गुलाबराव पाथरकर

    ReplyDelete
  7. गुलाबराव पाथरकरApril 21, 2023 11:03 am

    अत्यंत प्रबोधक आणि वैचारिक वारसा आपण जगाच्या नजरेसमोर आणून देत आहात म्हणून खूप खूप धन्यवाद मॕडमजी.,,,.गुलाबराव पाथरकर

    ReplyDelete
  8. डॉ सुभाष ओरसकरApril 21, 2023 11:33 am

    वाः फारच सुंदर लिहिलयस. तु फरच उच्च दर्जा आणि काटेकोरपणे विश्लेषण केल आहेस. कमाल केलीस👌🙏

    ReplyDelete
  9. मानसी खातीApril 21, 2023 11:34 am

    खूप सुंदर लिहलंय तुम्ही आणि उत्तमरित्या कळतंय वाचकाला.. सुरेख अगदी सुरेख.. नदीसारखंच खळाळत असलेलं आणि तरीही गर्भीताचा ठेव घेणार मनोगत मांडलंय तुम्ही..

    ReplyDelete
  10. रेखा अत्तरदेApril 21, 2023 11:42 am

    खूप छान लिहिले आहेस वर्षा शब्द सामर्थ्य खूप आहे तूझ्याकडे 👌👌😘🙏🙏

    ReplyDelete
  11. वाह, सुंदरच लिहिला आहे हा लेख. वाचून तो ग्रंथ वाचावासा वाटला 😊👌

    ReplyDelete
  12. गुरू महानच आहे पण त्यांची शिष्यादेखील गुरुला साजेशीच आहे. गुरुला जर त्यांचे ज्ञान स्विकारणारा शिष्य नसेल तर त्यांची विद्या फुकटच जाणार. त्यामुळे धन्य तुमचे गुरु आणि धन्य त्यांची शिष्यापण. तुमच्या प्रस्तावनेवरुनच गुरुजींचे अगाध ज्ञान लक्ष्यात येते. इतिहासाकडे पाहण्याची नवीन दृष्टी मिळून पूर्ण ग्रंथ वाचावयाची उत्सुकता निर्माण झाली. तुमचे शब्दांकन तर उत्तमच👍
    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे.

    ReplyDelete
  13. Ar Shrikant BhateApril 21, 2023 3:40 pm

    You are very talented and doing great job. So my appreciation and blessings are always there. Let the masses and our country benefit by your new insights and different angle of view. Let the Anandi Paus continuously bring happiness to millions. God bless you dear. Very happy to see your progress. 🌷🙏

    ReplyDelete
  14. ह्या ग्रिष्मात हा लेख वाचताना...एक थंडावा देणारा आहे...इतिहास, संस्कृतीचं आणी जलमहती व अध्यात्मिक विचारांचे विवेचन खूपUniqueरित्या केलय. ह्यातील मार्मिकबंध प्रेरणात्मक ऊर्जा देणारं आहे...खरोखरच neutral पाणी जस रंगीत निसर्ग निर्माण करतो..तसच..ह्या लेख माझी‌आकलनशक्ती अजून वाढवून जातोय...खूप कौतुक -संजिता

    ReplyDelete
    Replies
    1. खुप छान लिहिल

      Delete
  15. खुप छान लिहिले आहे. नविन शब्दरचना व माहिती. ्

    ReplyDelete
  16. मनोरमा जोशीApril 22, 2023 4:11 pm

    वर्षाली छान लिहिले आहेस. विषय कळण्यास कठीण असला तरी तुझ्या प्रस्तावनामुळे उत्सुकता निर्माण होते. ग्रेट.

    ReplyDelete
  17. छान लिहिले , इतिहासाचीव्यापक माहिती त्या कडे बघण्याचा नविन दृष्टीकोन छान

    ReplyDelete
  18. काय भारी लिहिले आहेस गं! इतकं छान मराठी ..... पुन्हा सगळे स्वतः समजून उमजून दुसऱ्यांनाही तसेच समजावून सांगणे सोपे नाही. आपल्या गुरुच्या लिखाणाबद्दल इतके समतोल लिहिणे मुळीच सोपे नाही. तू ते काम उत्तमपणे सांभाळले आहेस. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच.
    जवळ असतीस तर नक्कीच पाठ थोपटली असती. तुझ्यातल्या सुप्त गुणांना इतका छान वाव मिळाला आहे व तू त्याचा सदुपयोग करुन घेतला आहेस, हे खूप महत्त्वाचेे.
    नेहमीप्रमाणेच शुभेच्छा!! लिहिती रहा.....

    ReplyDelete
  19. रघुदास गर्गेApril 24, 2023 1:29 pm

    इतिहासातून अध्यात्माकडे हे लिखान
    अतिशय सुरेख झाले आहे.मूळ हे जगच तीन तत्वावर आधारीत आहे. त्या प्रमाणे इतिहास पाणी अध्यात्म या तीन तत्त्वात आपण सुंदर व ओघवती भाषेत आपले हे लिखाण झाले आहे.समजण्यास ते सुलभ आहे.वाचकास
    ते अंतर्मुख करावयास लावणारे आहे.

    ReplyDelete
  20. प्रा ए पी पाटीलApril 26, 2023 12:27 pm

    सुप्रसिद्ध इतिहासकार आणि संशोधक डॉ. मोरवंचीकर यांच्या "इतिहास, जलसंस्कृती आणि अध्यात्म" या ग्रंथाची प्रस्तावना लिहिण्याचं भाग्य तुला लाभलं अशी तू म्हणतेस. खरंच एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संशोधकाच्या ग्रंथाबद्दल नुसतं लिखाण करणं म्हणजे किती दिव्य असेल याची मी कल्पना करू शकतो. तेवढा तुझा व्यासंग, विषयाबद्दलची ओढ, अभ्यास, गोडी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कष्ट घ्यायची तयारी पाहून मला राहून राहून आश्चर्य आणि आनंदही वाटतो.
    आज सर्वदूर होत असलेला अखंडित पाण्याचा अपव्यय होत असलेला पाहून, राहून राहून मनाला खंत वाटते. नद्यांमध्ये झालेले मानवी अतिक्रमण, बेसुमार बांधकामांसाठी त्यांच्यामधील होणारा वाळूचा उपसा, त्यांच्यात बिनदिक्कतपणे सोडलेले कारखान्यांचे आणि गटारींचे पाणी आणि विशेष म्हणजे पुढाऱ्यांनी या सर्वांकडे केलेले सोयीस्कर दुर्लक्ष या सर्वांचा विचार मनात आला, म्हणजे अशा "शुष्क नद्यांचा आक्रोश" ज्याला ऐकू आला आणि संपत्तीच्या मागे लागलेल्या या भौतिक जगतात जलसंस्कृतीचा संबंध अध्यात्माशी जोडणे किती आवश्यक आहे हे ज्यांनी जाणले अशा या संवेदनशील संशोधक डॉ. मोरवंचीकर यांना वंदन करावेसे वाटते.
    असो, तुझ्या 'आनंदी पाऊस' या मालिकेतील बरेच वेचे मी वाचले आहेत. त्यांच्याबद्दल मी थोडंफार तुझं कौतुकही केलेलं आहे. ते लिखाण म्हणजे फक्त तुझ्या गतकालीन आठवणी आहेत. तरीही त्यातील तुझे शब्दलालित्य, भाषाशैली, स्मरणशक्ती आणि लिखाणाबद्दल असलेली आतुरता दिसून येते. परंतु सदर लिहिलेल्या प्रस्तावनेत तू ज्या पद्धतीने लिखाण केले आहे, ते वाचून तुझं मराठी भाषेमधील विपुल शब्द भांडार, शब्दांवरील प्रभुत्व, संत वांग्मयाचा अभ्यास, इतिहासाबद्दलची जिज्ञासा, आपल्या गुरूंविषयी असलेला आदरभाव या सर्वांचे सम्यक् दर्शन होतं आणि गुरूंच्या आशीर्वादाने तुझ्या लेखनात पुढे आणखी प्रगती होत राहील असा दृढ विश्वास वाटतो. त्यासाठी तुला आमच्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा.(ए.पी.पाटील, जळगाव)

    ReplyDelete
  21. सर्व प्रथम तुझे मनःपूर्वक अभिनंदन. अतिथी संपादकत्व आणी प्रस्तावना लिहिण्याचा मान ही तुझ्या लेखन कौशल्याला मिळालेली खणखणीत पावती आहे. सरांनी तुझ्यावर ही जबाबदारी टाकली त्याला कारण
    तुझ्यातली मेहनती, अभ्यासू आणी उत्तम लेखिका त्यानी बरोबर हेरली आणी त्यांचा विश्वास तू सर्वार्थाने सार्थ ठरवला आहेस. मी आत्तापर्यंत वाचलेल्या तुझ्या लेखातील हा सर्वोत्तम म्हणता येईल इतका तो सुरेख झाला आहे. एखाद्या professional लेखका प्रमाणे तू पुस्तकाचा मुद्देसूद परामर्श एवढ्या संक्षिप्त लेखात मांडला आहेस त्या बद्दल नक्कीच कौतुकास पात्र आहेस.

    सरांचा उल्लेख ज्ञानरुपी वृक्ष असा अत्यंत समर्पक पणे केला आहेस. तुझ्या प्रत्येक वाक्या वाक्यात तुला सरांच्या कडून मिळालेल्या चैतन्याचा प्रत्यय येतो. त्यांच्या अफाट ज्ञाना विषयी आम्हाला छानच माहिती कळली.
    इतिहासाची त्यांची कल्पना म्हणजे सत्याच्या सगळ्यात जवळ नेणारे शास्त्र , हे मात्र तंतोतंत खरे आहे. सध्याच्या काळात अशा तटस्थ अभ्यासू लेखकांची समाजाला फार गरज आहे. जल संस्कृती आणी इतिहास ह्या खरच एकमेकांना संबंधित अशा शाखा आहेत. जलस्रोतांचे संवर्धन ही त्यांची तळमळ अतिशय नेमकी आहे. अध्यात्माविषयी मला काही गती नाही , पण एकदा सरांचं पुस्तक वाचायची मनीषा आहे, त्यामुळे माझ्या ज्ञानात नक्कीच भर पडेल आणी अध्यात्माची पण ओळख होईल .
    हे पुस्तक ज्यानी वाचलेले पण नाही, त्यांना पण पुस्तकाचा एकंदरीत गोषवारा पट्कन उद्भवेल अशी मांडणी तू केलेली आहेस. लेखनशैली तर उत्तम आहेच, पण विवेचन, अभ्यास आणी संदर्भ ह्यांनी तुझी प्रस्तावना अगदी श्रीमंत करून टाकली आहे.

    एकंदरीत सरांनी तुझ्यावर टाकलेला विश्वास किती सार्थ होता ह्याची प्रस्तावनेत ठायी ठायी प्रचिती येते. तुझ्या ह्या उत्तम साहित्य वाटचालीसाठी पुन्हा शुभेछा

    ReplyDelete
  22. लीलाधर कोल्हेApril 28, 2023 7:31 am

    गुरुंच्या पुस्तकाला शिष्याने प्रस्तावना लिहिली हे प्रथमच बघायला मिळाले ‌.गुरुगौरव योग्य रीतीने केलास ‌.इतिहास म्हणजे काय? माहिती छान!जलसंस्कृती‌‌ स्पष्ट झाली‌.गुरुंच्या या कार्याचे स्वरुप स्पष्ट झाले आहे.

    ReplyDelete
  23. सुरेखा महालपुरेMay 07, 2023 7:15 am

    विद्येची देवता सरस्वती. सरस्वतीचे पुत्र म्हणजेच पुस्तक.
    पुस्तकाचे लेखक बुद्धीमानच आहेत. त्याला साजेशी तुमची प्रस्तावना आहे.
    लेखकाचे ज्ञान अगाध आहे व त्यांची शिष्या देखील त्यांना साजेशी आहे.

    ReplyDelete
  24. उदय बोरगावेMay 03, 2025 12:57 pm

    वाह.. भारीच की.
    अभिनंदन 🎊✨💫🌈💐

    ReplyDelete
  25. व पु होलेMay 03, 2025 12:58 pm

    अरे वा!!! खूप खूप हार्दिक अभिनंदन💐💐

    ReplyDelete
  26. किसन वराडेMay 03, 2025 12:59 pm

    अभिनंदन, 💐

    ReplyDelete
  27. Dr Dinesh MahajanMay 03, 2025 1:01 pm

    Congratulations 💐💐

    ReplyDelete
  28. डॉ प्रशांत देशमुखMay 05, 2025 1:42 pm

    मनःपूर्वक अभिनंदन. कौतुकास्पद बाब.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...