Skip to main content

लद्दू सावकाराच्या वाड्यात आनंदी परी!(अभ्यासातून रंजन...)

 

लद्दू सावकाराच्या वाड्यात आनंदी परी!
(अभ्यासातून रंजन...)


गेला काही काळ सातवाहनांचा अभ्यास चालू होता, त्यामुळे माझा कायमचा मुक्काम "प्रतिष्ठान" मध्येच होता. अगदी नागघाटापासून ते सातवाहनांच्या राजवाड्यापर्यंत सर्वत्र वावर चालू होता माझा. नृपती हालच्या 'गाहासत्तसई' मधून तर सातवाहनांच्या राज्यात कान्याकोपऱ्यात बागडायला मिळाले. भरूच पासून मच्छलीपट्टनम् पर्यंत तत्कालीन प्रवास झाला. सर्व प्रकारच्या कलेचा उच्चांक याची देही याची डोळा अनुभवता आला! सम्राज्ञी नागनिकेसोबत हितगुज करता आले. महाराष्ट्राचे सुवर्णयुगच अनुभवता आले! अर्थातच याचे सगळे श्रेय सातवाहनांचे आद्य संशोधक आदरणीय डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनाच जाते! हा सगळा अनुभव आभासी पातळीवर असला तरी तो इतका चैतन्यमयी होता की, तो अनुभव एका क्षणाकरीताही आभासी असल्याचे भासलेच नाही! त्यामुळे प्रतिष्ठान सोडून, तिथून बाहेर पडावेसेच वाटेना...
विरोधाभास असा की तरीही मला आजच्या पैठणला भेट देऊन नृपती सातवाहन, नृपती हाल, सम्राज्ञी नागनिका, तसेच इतर नृप तथा सम्राज्ञी यांची गाठ घेऊन, तिथे प्रतिष्ठानचा अनुभव घ्यायची सुद्धा मनात तीव्र इच्छा होती. परंतु हा योग कधी येईल याची खात्री नव्हती. तथापि इच्छा इतकी तीव्र होती की हा योग लगेचच जुळून आला आणि गेल्या आठवड्यात मी पैठण मध्ये दाखल झाले! नाग घाटाच्या मार्गावर असतांना काही प्राचीन वाड्यांच्या भिंती आणि अवशेष दृष्टीस पडले म्हणून गाडीतून उतरून सरळ चालायलाच सुरुवात केली. चालताना या सगळ्या अवशेषांचे सौदर्य, तंत्र न्याहाळत, छायाचित्रं घेत, मनातल्या मनात अवलोकन, विश्लेषण करत चालले होते. दगड आणि विटा यांचे मिश्रित बांधकाम अतिशय सुंदर, मनोवेधक तितकेच  साऱ्याच आयामांनी अद्वितीय! तसेच काष्ठकाम आणि कलाकुसरही अतिशय सुबक, रेखीव, सुरेख! 
असेच पुढे जाताना दिसलेले हे सगळे वाडे, बऱ्याचशा बाबतीत एकमेकांसारखे. पण तसेच पुढे गेल्यावर मात्र एक अतिशय विदीर्ण अवस्थेतील वाडा दृष्टीस पडला, या वाड्याच्या अवशेषांनी मात्र माझे पाय खिळवून ठेवले. डोळ्यांना जे काही दिसले, त्यामुळे मनात, मेंदूत, हृदयात एकच कल्लोळ माजला. या वाड्याला दोन प्रवेश द्वारे आहेत, भिंतीचा काही भाग अतिशय व्यवस्थित तर काही भाग पूर्णपणे ढासळलेला. लाकडी दरवाजे, आजही अगदी भक्कमपणे त्या वास्तूचे रक्षण करीत होते. पण दोन्हीही प्रवेशद्वारे बंद. त्यामुळे आत जाता येणे शक्य दिसत नव्हते. म्हणून बाहेरूनच सारे सौंदर्य, शक्य तितके छायाचित्रं काढून आणि डोळ्या-डोक्यात साठवून घेण्याचा प्रयत्न केला. ही छायाचित्रं घेत असतांना आमच्या वाहन चालकांना वाड्याच्या आत कुणीतरी व्यक्ती वावरत असल्याचे दिसले आणि वाटले पलीकडच्या बाजूने प्रवेश करता येईल कदाचित. पण व्यर्थ, त्याबाजूने तर काटेरी बाभळीची झाडे होती, वाड्यात जायला मार्गच नव्हता. त्यामुळे पुढे सरळ नाग घाटावर जाण्याखेरीज पर्याय नव्हता...
दुपारी नाथ समाधी मंदिरातील महाप्रसादाचे भोजन झाल्यावर, थोडी फोनाफोनी केल्यावर कळले 'तो वाडा' आणि इतर काही ठिकाणं मला आत जाऊन बघता येईल. कोण आनंद झाला! जणू नाथांनीच आशीर्वाद आणि संकेत दिला! मग काय त्या पैठणकर इतिहास अभ्यासाकांसोबत जाऊन धडकलेच तिथे, समजले तो वाडा आहे 'लद्दू सावकार' यांचा! 'प्रतिष्ठान ते पैठण' मध्ये या वाड्याचा उल्लेख आल्याचेही स्मरले. 
या वाड्याचे आज फार थोडे अवशेष शिल्लक आहेत. पण त्यावरून सुद्धा वाड्याचे सौदर्य, भक्कमपणा, स्थापत्य तसेच श्रीमंती थाट लगेचच लक्षात येतो. आजही काही भागातील पस्तीस फुट उंच भिंती कुठल्याही आधाराशिवाय अगदी ताठपणे उभ्या आहेत. या भिंती अतिशय नाविन्यपूर्ण, अद्वितीय आणि सुरेख आहेत. जमिनीपासून साधारण पंधरा फुटाची भिंत दगडात बांधलेली आहे. त्यानंतरची वीस फुटाची भिंत लाल विटांत बांधलेली असून या भिंतीत दहा फुटांवर काळ्या विटेचा एक थर आहे. प्रवेशद्वारांच्या वर मात्र दहा फुट उंचीची संपूर्ण भिंत काळ्या विटांत बांधलेली आहे. या भिंती सपाट नसून त्यावर सुंदर अशी नक्षी आहे. मध्यभागी पूर्ण विकसित कमळ असून त्याभोवती फुले आणि वेलबुट्टीची नक्षी आहे. तर याच्या दोन्ही बाजूंना वर्तुळाकारात वेलबुट्टीची नक्षी आहे. ही काळ्या विटांची भिंत दहा फुटावर संपते त्या पातळीवर सुद्धा कमलकलिका आणि वेलबुट्टीच्या रेखीव नक्षीचे तोरण आहे. 
विटांत अशा प्रकारची नक्षी करायची म्हणजे त्याची एक खास पद्धत आहे. अतिशय वेळखाऊ, किचकट आणि कौशल्याची! यात प्रत्येक विटेला क्रमांकन करावे लागते. बांधकाम करतांना यातील प्रत्येक वीट क्रमांकन प्रणाली प्रमाणे रचून बांधकाम करावे लागते. एकही क्रमांकन चुकले तर सगळी नक्षी चुकते. अतिशय काळजीपूर्वक बांधकाम करावे लागते. तसेच या प्रकारच्या काळ्या विटांची भाजण्याची सुद्धा एक खास पद्धत आहे. तसेच या विटा वजनाला अतिशय हलक्या आहेत. नजरेलाच नाही तर स्पर्श करून बघितल्या तर त्यांचे पोत अतिशय मऊशार आहे. "दगडापेक्षा वीट मऊ" या म्हणीचा खऱ्या अर्थाने प्रत्यय येतो किंवा या विटांवरूनच ही म्हण प्रचलित झाली असावी असे वाटते. लाल विटा सुद्धा इतक्या परिपूर्ण, आखीव, रेखीव की जणू चाकूने कापून काढल्यासारख्या एकसमान दिसतात. 
काष्ठकामापैकी आता फक्त दोन मुख्य प्रवेशद्वार आणि गंगेवर(गोदावरीवर) जाण्यासाठीचे द्वार आणि त्यांच्या चौकटी एव्हढेच बघायला मिळते. बाकी सगळे लाकूड पळवून नेलेले आहे. कारण लद्दू सावकारांनंतर त्यांच्या कन्या पुण्यात होत्या. त्यानंतरची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे खूप काळापासून वाडा ओस पडून होता, त्यास संरक्षण नव्हते. परंतु आता मात्र ही वास्तू राष्ट्रीय संरक्षित वस्तू म्हणून जाहीर झाली आहे. त्यामुळे यापुढे उर्वरित अवशेष संरक्षित राहतील आणि त्या पुढे जाऊन या वाड्याचे जतन, संवर्धन करून तो वाडा पुन्हा जसाच्या तसा उभा केला जाईल अशी आशा करू या!
याच्या रचनेविषयी थोडे. डावीकडील प्रवेशद्वार मुख्य प्रवेश असावे, कारण यातून प्रवेश केल्यावर थोड्या अंतरावर दगडी बांधीव हौद आहे. यात कारंजे खेळविले जात असे. त्याच्या आजूबाजूचा भाग बैठकीचा असावा. या भागाच्या मागच्या बाजूस चुली आणि धुराड्याचे अवशेष मिळाले, त्यावरून तो भाग मुदपाकखान्याचा. पुढे एक चौक आहे, त्यातून गंगेवर जाण्यासाठी मार्ग. 
उजवीकडील प्रवेशद्वारातून आत गेल्यास एक चौक आहे. या चौकाच्या जोत्याच्या चार भिंतींना प्रत्येकी एक याप्रमाणे धातूच्या कड्या आहेत. घोडे बांधण्यासाठी. याच चौकाच्या जोत्याच्या भिंतीतून एक छोटीशी जागा आहे, ज्यातून खाली उतरून जाता येते. पण ही जागा अतिशय छोटी, ज्यातून अगदीच सडपातळ व्यक्ती जाऊ शकेल. एका फटीतून दिसले, तिथे एक विटांत बांधलेली कमान आहे. 
तर मुळात हा चार चौकी, दोन मजली वाडा होता. मला मात्र तीनच चौक दृष्टीस पडले, बाकी भागात वाड्याच्या अवशेषांचे ढिगारे आहेत. या प्रत्येक चौकात भिंतीत एक मोठा कोनाडा आहे आणि या प्रत्येक कोनाड्यात पाण्याचे वैशिष्टपूर्ण दोन रांजण आहेत. या रांजणाचे तोंड दगडातील घडीव असून बाकी भाग विटांत बांधकाम केलेला आहे. 
माधवराव पेशव्यांना पैठणी साडी, पागोटे, धोतरजोडे व रुमाल यांचे फारच आकर्षण होते. या विषयी माहिती देणारी अनेक पत्रे आढळली आहेत. एका पत्रात तर पेशव्यांनी आपणास काठावर जी नक्षी हवी होती, ती नक्षीच काढून दाखविली आहे. १७६३ च्या राक्षसभुवनच्या लढाईवरून परततांना माधवराव पेशव्यांचा पैठणला मुक्काम होता. साधारपणे राजे-महाराजे कुठल्याही गावात राहात नसत, कुणाच्याही घरी जेवण करीत नसत. गावाबाहेरच आपला शामियाना उभारून लव्याजम्यासह वास्तव्य करीत असतं. गावातील कुणाशीही काही काम असेल तर त्यांना तिथेच बोलावून त्यांची भेट घेत असतं. तथापि यावेळी त्यांना पैठणला आमंत्रित करण्यात आले होते, त्यात लद्दू सावकार प्रमुख होते. पेशव्यांनी ते मान्यही केले. तथापि त्यांच्या वैयक्तिक सहाय्यकांनी लद्दूंना विचारले, पेशवे कसे येणार पैठण मध्ये. तेव्हा त्यांनी सांगितले, हव्या तितक्या सोन्याच्या मोहरांच्या पिशव्या अंथरलेल्या नावेतून! पेशवे येणार म्हणून लद्दुंनी आपला वाडा खास सजविला होता, संपूर्ण वाड्याला कस्तुरीचा गिलावा केला होता. पेशवे आले होते किंवा नाही, नक्कीचे माहिती नाही. परंतु पुढे वंश नसल्याने हा वाडा ओस पडला आणि लोकांनी सारा कस्तुरीचा गिलावा सुद्धा खरवडून नेला. त्यामुळे भिंतीवरील चित्रे व इतर नक्षीकामही नष्ट झाले. आज मात्र वास्तुकलेचा, स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना असलेला हा वाडा अतिशय भग्न अवस्थेत उभा आहे... 
आता माझी व्यक्तिगत आभासी परीकथा! 
अशा संरक्षित वास्तूत सुरक्षा रक्षक असतात. त्यांना सगळी बरोबर माहिती असतेच असे नाही. या सुरक्षा रक्षकांनी सुद्धा त्यांच्या परीने काही माहिती सांगितली. त्यापैकी मला जी माहिती होती, ती मी त्यांना बरोबर करून सांगितली. उदाहरणच द्यायचे झाले तर , तिथे काही दगडातील घडीव अवशेष होते, ते त्यांनी तत्कालीन वजनं आहेत म्हणून सांगितले. तथापि ती वजनं नसून सातवाहन कालीन जात्याचे अवशेष आहेत.
पण दंत कथा, परीकथा कशा तयार होतात हे मी अगदी याची देही याची डोळा अनुभवले! किंबहुना मीच , तिथे एक सुंदर परीकथा जगले, तीच इथे शब्दांकित करते. वाड्याच्या मागच्या भागात एक अष्टकोनी मनोऱ्यासारखे काही बांधकाम दिसत होते. ती रचना म्हणजे एक मशाल असल्याचे त्यांनी सांगितले आणि माझ्या परीकथेची सुरुवात झाली. त्यावेळेपर्यंत सायंकाळ होऊन दिवेलागणीची वेळ झाली होती. मग ती मशाल पेटविली गेली. वाड्यातील झुंबरातून आणि हंडयांतून दिवे प्रज्वलित करण्यास सुरुवात झाली. थोड्याच वेळात संपूर्ण वाडा उजळून निघाला.आता वाड्यात 'आनंदी परी' आली आहे म्हटल्यावर खासच की! म्हणून वाड्यातील साऱ्या कारंज्यांतून रंगीत पाणी खेळविले गेले. त्या पाण्याचा आवाज आणि कस्तुरीचा सुगंध सर्वत्र पसरला. एखाद्या छान खास प्रसंगी असते तसे वातावरण तयार झाले. सारा वाडा आनंदी परीच्या उपस्थितीने पार आनंदून गेला! एव्हढेच नाही तर मुदपाकखान्यातून पंचपक्वान्नांचा दरवळ येऊ लागला. थोड्याच वेळात खाश्या पंगती झडणार होत्या... 
पण ... 
तेव्हढ्यात सोबत असलेल्यांनी निघण्याची वेळ झाल्याची आठवण करून दिली आणि मी एकदम माझ्या परी जगतातून वास्तव जगात आले. तेव्हाच, तिथेच "लद्दू सावकारांच्या वाड्यात आनंदी परी" हे शीर्षक सुचले! पण वाड्यातील पंगतीचा स्वाद घ्यायचे राहूनच गेले. पुढच्यावेळी मात्र वाड्यातील पंगतीचा मनसोक्त आनंद लुटणार हे नक्की! असो 
आता थोडा सत्याचा भाग. त्यांनी जो भाग मशाल म्हणून सांगितला तो भाग मशाल नाही. वाड्यात हौद आहेत. जेव्हा काही विशेष पाहुणे, सण, समारंभ, मंगल कार्य असत, त्यावेळी या हौदात पाण्याचे कारंजे खेळविले जात असे. यासाठी हा पाण्याचा हौद आहे, उंचावर बांधलेला. कारंजे नैसर्गिक गुरुत्वाकर्षण तंत्रावर खेळविले जात असे. त्यामुळे पाण्याचा हौद उंचावर. त्यांनी या हौदाबद्द्ल माहिती सांगितली पण जागा दुसरीच दाखविली होती. हा एक भाग.
दुसरा आणि महत्वाचा भाग म्हणजे अशा प्रकारच्या महत्वाच्या वास्तू सुरक्षेच्या कारणासाठी कायम गुपित ठेवल्या जात असतं. त्यामुळे या वास्तूवर अशा प्रकारची मोठी मशाल असण्याचे काही कारणच नाही. 
असा हा वाडा! लाद्दू सावकारांचा!! वास्तवातला आणि माझ्या व्यक्तिगत परीकथेचा उगम झालेला!!!
मात्र आजही पाऊस पडल्यावर गीलाव्यातील कस्तुरीच्या सुगंधाने कितीतरी भुंगे आणि मधमाशा तेथे घोंगावत असतात...!

©आनंदी पाऊस 
(अभ्यासातून रंजन...)
१९एप्रिल२०२३




































Comments

  1. लीलाधर कोल्हेApril 28, 2023 6:52 am

    परिकल्पना आणि सत्य वर्णन खूप छान लिहिले आहे.👍👍 कौतुक तुझे👌👌🌹🌹

    ReplyDelete
  2. वाह अप्रतिम झाली आहे ही सफर कथा 👌👌पेशव्यांच्या काळात घेऊन गेली थोडा वेळ. परी कथा छोटी पण सुरेख झाली. पण परी कथा थोडी out of place वाटते या इतिहास वर्णन कथेत. In my honest opinion. 😊

    ReplyDelete
  3. जनार्दन चौधरीApril 28, 2023 7:44 am

    एक आर्किटेक्ट व्यक्तिमत्त्व एवढ्या गहन आद्यात्मिक आणि परातत्वविद्नानात सखोल अभ्यासात रमु शकतो हेच कमिकरण पचपणनि पडत तर नाहिच पण अकानियच वाटते.

    ReplyDelete
  4. डॉ सुनील पुरीApril 28, 2023 8:04 am

    सफर अतिशय छान होती वास्तवतेचे दर्शन करणारी होती वाड्याचे हुबेहूब वर्णन वाचून एके काळी असणाऱ्या या वाड्याचे वैभव कसे असेल याची प्रचिती येती शब्द रचना सुरेख आहे सफर आनंद देणारी होती फक्त लद्दु सावकाराची माहिती आणखी दिली पाहिजे होती असे मला वाटते dr. मोरवनचीकर यांच्या पुस्तकात ती असावी
    आजच्या दिवसाची सुरुवात आनंदी सफर करून झाली . धन्यवाद🙏🙏

    ReplyDelete
  5. Chchan lihile aahes
    Photo pan chchan aahet
    🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. खूप आनंदी धन्यवाद 🙏 🪄

      Delete
  6. रघुदास गर्गेApril 28, 2023 8:26 am

    निर्जीवात सजीवता
    ओतण्याचा स्तुत्य प्रयत्न
    व रंजक भाषेत आनंद
    घेऊन वर्तमान जीवन
    आल्हाद दायक करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

    ReplyDelete
  7. उत्तम लेख आणि वर्णन. त्या दुनियेत फिरून आल्याचा आनंद मिळाला

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶

      Delete
  8. Very well depiction in brief

    ReplyDelete
  9. Laxmikant SonwatkarApril 28, 2023 11:40 am

    खूपच छान लिहिलं आहे.भूतकाळात रममाण होताना इतिहास,ऐतिहासिक साधने आणि तार्किक बुध्दी व कल्पना यांच्या साह्याने आपण तत्कालीन काळातील अनुभूती घेवू शकतो.आपल्या या लिखाणावरून मला पुन्हा त्या वाड्यात जायची इच्छा झाली. मी चार पाच वेळा तिथे गेलो.काहीतरी गूढ वातावरण मला नेहमी अनुभवयास मिळते.आपण पुन्हा तिथे जाणार असाल तर जरूर कळवावे.आपल्या सोबत पैठण अनुभवता येईल.मी संभाजीनगर येथे राहतो.

    ReplyDelete
  10. मी लक्ष्मीकांत सोनवटकर,
    आपला हा लेख खूप छान आहे. इतिहास व कल्पना यांच्या सुरेख संगम म्हणजे हे लिखाण होय. मी पैठणला या वाड्यात पाच सहा वेळा गेलो आहे.तिथे एक गूढ वातावरण आहे हे नक्की. आपण पुन्हा जेंव्हा पैठणला जल तेंव्हा आपल्या सोबत पैठण अनुभवयाची इच्छा आहे.जरूर कळवावे.मी संभाजीनगर ला राहतो.

    ReplyDelete
  11. जितेंद्र महाजनApril 29, 2023 7:39 am

    खूप छान ताई या निमित्ताने तत्कालीन इतिहासाची ही ओळख झाली

    ReplyDelete
  12. हा "सफरनामा" व प्र.चि. आवडले(caption is needed)...हूबेहूब सावकाराचा वाडा डोळ्यासमोर उभारला. ..माला तर‌"तुंबाड" सिनेमाची आठवण झाली...बरं सावकाराच वाडा म्हणजे खजिनाचं काय?सोन,चांदी,पाचू(Coral) शोधून ,पाहा नक्कीच मिळैल..बाकी "Building Elements मस्तच‌ चित्रित केलयं. आनंदीपरी मुळे हा सफरनामा अनुभवता येतोय...त्याबद्दल खूप खूप आभारी..

    ReplyDelete
  13. खूपच सुंदर रितीने मांडलय. परीकथा नाही, हे तर अभ्यासपूर्ण चित्रण. ऐतिहासिक काळात फेरफटका मारला. मी एकदाही पैठणला गेली नाही , त्यामुळे वाचल्यावर जाण्याची उत्सुकता निर्माण झाली.
    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे.

    ReplyDelete
  14. Sakali sakali ek chaan lekh vachayla milala....☺️🙏🏻

    ReplyDelete
  15. आनंदी परी लड्डू सावकारांच्या वाड्यात पोहोचली म्हणजे आम्हा वाचकांना एका उत्तम सफरीची मेजवानी मिळणार हे तर नक्की होतंच. आभासी आणी प्रत्यक्षात अशा दोन्ही सफरी गुंगवून ठेवणार्‍या लिहिल्या आहेस. सरांच्या लिखाणात लिहिल्या प्रमाणे पैठण चा इतिहास अगदी समरसून जगली आहेस, त्यात तुझी involvement किती deep आहे ते लक्ष्यात येतं. सावकारांच्या वाड्याच्या वर्णनाने आम्हीपण त्या युगात सफर करुन आलो. पैठणला सातवाहन कालीन वैभव अनुभवायला जाणे, त्यात तो वाडा सापडणे, तू तिथे जाऊन त्याचा काना कोपरा धुंडाळलणे आणी अप्रतिम शब्दात तो व्यक्त करणे, सगळे अद्भुतच. तुझा व्यासंग जसाजसा वाढत चालला आहे तसे तसे तुझे लिखाण जास्तच अभ्यासू आणी अनुभव संपन्न होत चालले आहे. तुझा हा हा लेख वाचता वाचता लड्डू सावकारांच्या बंगल्याचे तत्कालीन वैभव अगदी क्षणोक्षणी आम्ही अनुभवले. आनंदी परी चा उत्साह, आनंद आणी बेधुंद पणा लेखात नेमका दृग्गोचर झाला आहे. एक सुंदर लेख....

    ReplyDelete
  16. अमोल चाफळकरMay 05, 2023 10:10 pm

    छान. परी प्रयोग जमला आहे. फोटोही छान

    ReplyDelete
  17. छानच परिकथा👌
    लेख वाचताना एक छान सफर झाली
    लेखाचे शिर्षक छान,👌👍

    ReplyDelete
    Replies
    1. खूप आनंदी धन्यवाद 🙏 🪄

      Delete
  18. भारती फेगडेMay 12, 2023 4:41 pm

    खुपच छान आनंदी सफर!! किती छान अनुभव ना!!

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶

      Delete
  19. प्रविण बोरकरJuly 23, 2023 8:18 am

    वा अगदी सुंदर लिहिलात आपण, इतिहास तर आहेच पण त्याला साहित्याची जी जोड दिली आहे ती अप्रतिम झाली आहे. शब्द रचना, शब्द निवड व त्याची अभिव्यक्ती यांचा सुरेख संगम झालाय.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄

      Delete
  20. मिलिंद ढेरेJuly 29, 2023 6:32 pm

    फारच सुंदर झालंय हे हो...❤👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄

      Delete
  21. Pradeep DevarchettyNovember 26, 2024 10:21 am

    Very lively narrated.
    Keep it up...👍

    ReplyDelete
  22. नीता कुलकर्णीDecember 03, 2024 3:26 pm

    सुरेख वर्णन आणि सुंदर फोटो..
    👌👌👌👍👍🌹

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...