Skip to main content

काही व्यक्ती आणि खास कामं-५ (घरातील गमती-जमती)

 काही व्यक्ती आणि खास कामं-५

(घरातील गमती-जमती)



दाह्या, मुरमुरे, 
फुटाने,शेंगदाने,
लाह्या घ्या वो......

साधारण दुपारी ३-४ वाजेच्या सुमारास, आधी अगदी लांबून बारीक आवाजात आरोळी कानी पडत असे. मग हळूहळू जवळ येणारी आणि आवाज क्रमक्रमाने मोठा होत जाणारी. नंतर एकदम जिन्याच्या दरवाज्यावर लावलेली बेलच ऐकू येत असे. ठराविक वेळा सोडल्या तर एरवी कधीही दरवाजा उघडायला न जाणारी आम्ही मुलं खुश होऊन दरवाजा उघडायला जात असू. कारण आधीच पक्के माहिती असे कोणी बेल वाजविली आहे ते! वरील आरोळी वरून तुम्हा वाचकांना समजलेच असे ती कोणाची ते. तर त्या असतं आमच्या भोईण आजी म्हणजे फुटाणे वगैरे विकणाऱ्या.आम्ही दरवाजा उघडून, त्या भोईण आजी आत येईपर्यंत, घरातील कुणीतरी महिला तिथे पोहोचलेल्याच असत. सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे त्या आजी विक्री करत असलेले सगळे जिन्नस एका मोठ्या टोपलीतून आणि पोत्यात भरून आणत असत. ही टोपली आणि त्यावर ती पोती ठेऊन, ती टोपली त्या एकट्याच त्यांच्या डोक्यावर ठेऊन आणत असतं. मग ही टोपली त्यांच्या डोक्यावरून उतरवून खाली जमिनीवर ठेवायला त्या टोपलीला, कुणीतरी हात लावून मदत करण्याची गरज असे. ते आम्ही मुली करू शकत नसू. एकतर त्या टोपलीचे वजन आणि दुसरे म्हणजे इतक्या उंचीवर आमचा हात पोहोचणे शक्यच नसे. 
 जिन्याच्या दारातून आत येताक्षणी त्या, त्यांच्या वाहणा काढून ठेवत आणि मगच पुढे घराच्या दरवाज्यापाशी येत. कुणाच्या तरी मदतीने डोक्यावरची टोपली खाली जमिनीवर ठेऊन, त्या टोपलीपाशी बसत असतं. आणि आम्ही मुलं त्या टोपली भोवती कोंडाळं करून बसत असू. एकदा का ती टोपली जमिनीवर ठेवली की त्यावर ठेवलेली पोती उचलून खाली जमिनीवर ठेवत असतं. ती पोती उचलताच जे काही दृष्टीस पडे, त्याचे शब्दांत वर्णन करणे केवळ अशक्य! तरी प्रयत्न करते.😊 मी तर अगदी आतुरतेने वाट बघत असे, कधी एकदा ती टोपली जमिनीवर येते आणि त्यावरील पोती उचलून खाली ठेवली जातात. त्यात सगळा आवडता खाऊ असे तो भाग वेगळा. पण ती टोपली, त्यातील रचना, रंग, पोत, आकार सगळेच फार मनोवेधक, चित्तवेधक आणि रंजक वाटे मला! ते सारे बघणे ही माझ्यासाठी एक मोठी खास पर्वणीच असे!!
साधारण घरात वापरल्या जाणाऱ्या टोपल्या बारीक आणि पिवळसर रंगाच्या काड्यांनी विणलेल्या असतात. तसेच त्या टोपल्या बऱ्यापैकी खोल असतात, व्यासाच्या मानाने. तथापि या भोईण आजींची टोपली जाड आणि गडद चॉकलेटी रंगाच्या काड्यांनी बनवलेली असे. फार खोल नाही, बऱ्यापैकी उथळ, पण व्यास मात्र बराच मोठा. तसेच काड्या-काड्यांनी विणलेल्या वीणेच्या मध्ये हलक्या हाताने थोडी माती सुद्धा लिंपलेली असे. कुडाच्या भिंतीप्रमाणे भरपूर माती लिंपली तर टोपली खूप जड होवून जाईल. पण हलक्या हाताने लिंपली तर टोपलीला हवी तेव्हढी मजबुती पण येईल आणि त्या जाळीतून फुटाने-शेंगदाणे गळून सुद्धा जाणार नाही, म्हणून असावे असे मला आता वाटते. तेव्हा मी वयाने फारच लहान असल्याने, डोळ्यांनी बघितले, पण त्यावर विचार करण्या इतपत बुद्धी नसावी तेव्हा माझ्याकडे. त्यामुळे त्यावर विचार आता केला या लिखाणाच्या निमित्ताने.  
या टोपलीत एक भलेमोठे अगदी मऊ कापड २-३ घड्या घालून ठेवलेले असे, टोपलीच्या आकारापेक्षा बरेच मोठे. याच कापडाच्या सहाय्याने मध्ये-मध्ये उंचावट्याच्या हव्या तश्या वक्र रेषा करून घेतलेल्या असतं.(शेताला बांध घातलो त्याप्रमाणे) या उंचावट्याच्या वक्र रेषांमध्ये मग वेगवेगळ्या आकाराचे आणि मापाचे हवे तसे आणि खोलगट कप्पे तयार होत असतं. या कप्प्यांमध्ये, त्या आजी विक्रीसाठी असलेले जिन्नस ठेवत असतं. पैकी एक कप्पा सगळ्यात मोठा म्हणजे बाकी काप्प्यांच्या तुलनेत मोठा असे. यात नेहमीचे काळे फुटाणे ठेवलेले असतं. आता तेव्हा या फुटाण्यांची मागणी जास्त होती की, हे सगळ्यात स्वस्त म्हणून विक्री जास्त होती किंवा याचे उत्पादन मुबलक होते, याबद्दल मला फारशी माहिती नाही. जाणकारांनी माहिती द्यावी, स्वागत आहे. यापेक्षा थोडा लहान पण बाकी काप्प्यांपेक्षा थोडा मोठा एक कप्पा असे, यात डाळ्या(डाळं) ठेवलेलं असे. याव्यतिरिक्त अजून साधारण चार कप्पे असतं, छोट्या मापाचे. त्यात सुरती फुटाणे म्हणजे याची सालं साधारण लालसर तांबड्या रंगाची आणि आतील दाणा पिवळसर रंगाचा, काबुली फुटाणे म्हणजे छोल्या सारखेच पण अगदी लहान, हळद लावलेले त्यामुळे पिवळ्या धम्म रंगाचे. एका कप्प्यात डाळ्याच पण हळद मीठ लावलेल्या, त्यापण छान पिवळ्या धम्म रंगाच्या पण आकार अर्थातच एका बाजूने सपाट तर दुसरी बाजू अर्ध गोलाकार. आणि शेवटचा लाख मोलाचा कप्पा, खाऱ्या शेंगदाण्यांचा! तेव्हाचा अतिशय आवडीचा कप्पा. छान टप्पोरे गुलबट रंगाचे, त्यावर मीठ असल्याने एक छान ग्रे रंगाची छटा आलेली! 
आज-काल होम-डीलेवरीचे फार कौतुक वाटते, सगळ्यांना. पण आमच्या लहानपणी तर अख्खे दुकानच आमच्या घरी येत असे! तेही अगदी आरोग्यदायी आणि ताज्या खाऊचे!! जराही फसवा-फसवी नाही. आज पार्सल आल्यावर उघडून बघितले की मनस्ताप नक्कीच होतो, मनासारखे जिन्नस न आल्याने. एकतर सांगितले एक असते आणि येते भलतेच, नाही तर त्या जिन्नसाची प्रत/दर्जा अतिशय निकृष्ट थोडक्यात, विकतचा मनस्ताप! असो.
एक टोपली त्यात कापडाच्या सहाय्याने केलेले विविध आकारा-मापाचे कप्पे आणि त्यात ठेवलेले विविध आकाराचे, रंगाचे, मापाचे आणि पोताचे जिन्नस! फारच सुरेख दिसे हे डोळ्याला. मला तर त्याकडे पाहतच रहावेसे वाटे!
दुसरा एक महत्वाचा आणि माझ्या अत्यंत आवडीचा भाग म्हणजे, ही सगळी जिन्नस मोजण्यासाठी त्यांच्याकडे पितळी शेर असतं, अगदी सगळ्यात लहान पासून ते सगळ्यात मोठ्ठ्या पर्यंत. हे सगळे शेर एकात-एक मापाप्रमाणे ठेवलेले असतं. इतक गोड दिसे हे सगळे प्रकरण, की आपल्या घरात का नाही असे शेर, असे कायमच वाटत असे. सगळ्यात लहान शेर तर इतका गोड होता की हातात घेऊन बघावा तर वाटेच, पण कायमचा मला मिळावा अशीही माझ्या मनात तीव्र इच्छाअसे. अर्थातच आजतागायत ह्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीतच, हे सांगायलाच नको. पण खारे शेंगदाणे घेतांना मात्र हा सगळ्यात लहान शेर अजिबात आवडतं नसे. कारण त्यात फारच कमी शेंगदाणे मावत. साहजिकच प्रत्येकाच्या वाट्याला फारच कमी शेंगदाणे मिळत, तेही अगदी फार कधीतरी खरेदी केले जात. सगळ्यात मोठ्ठ शेर, आकाराने मोठ्ठा असल्याने तो आवडेच, पण ज्वारीच्या लाह्या किंवा मुरमुरे(चुरमुरे) खरेदी या सगळ्यात मोठ्ठ्या शेराने होत असे, अगदी भरभरून खरेदी केल्यासारखे, अगदी भरून आल्यासारखे, पावल्यासारखे वाटे, अगदी शेर🐅🐯 झाल्यासारखे वाटे तेव्हा!
आम्ही सगळी मुलं त्या टोपली भोवती कोंडाळं करून बसतच असू, ती टोपली जमिनीवर ठेवल्यापासून. ते बघायला आणि त्यातील काय-काय खायला मिळते याची वाट बघत. पण एक थोडी भीती सुद्धा असे मनाच्या कोपऱ्यात, त्या आजींची. त्यांच्या चेहऱ्यावरच नैसर्गिक करारी भाव होता. त्यात सगळे नुसते बघून समाधान होतच नसे, त्या सगळ्या जिन्नस खाव्याश्या तर वाटतच, पण त्याला हात सुद्धा लावून बघण्याची इच्छा असे. पण हिम्मतच होत नसे. त्यांना वाटे आम्हाला खायला हवे आहे, म्हणून त्या आम्हा मुलींच्या प्रत्येकीच्या हातात दोन-चार काळे फुटाणे ठेवत, मात्र भावाच्या हातात दोन-चार खारे शेंगदाणे! पुरुष-प्रधान संस्कृतीची झलक कुठे कुठे मिळते! असो. तेव्हा त्याचा हेवा वाटे, कारण आम्हालाही खारे शेंगदाणे मिळावे किंवा का मिळत नाही, असे वाटे. तेव्हा मला खारे शेंगदाणे फार आवडतं. पण ते अतिशय महाग असल्याने अगदी क्वचितच खरेदी केले जात असतं. 
तर त्या भोईण आजी! वर म्हटल्याप्रमाणे आम्हा मुलांना भीती वाटेल इतपत नैसर्गिक करारी भाव असे त्यांच्या चेहऱ्यावर. उंचीला फार नाही आणि फार कमीही नाही मध्यम उंचीच्या, अंगावर बऱ्यापैकी सुरकुत्या. नेहमीच काठ असलेले आणि मध्ये चौकडीची नक्षी असलेले कुठल्याही गडद रंगाचे नऊ वारी सुती पातळ नेसत, पण पदर उलटा आणि नेसण्याची पद्धतही बरीच वेगळी. कपाळावर भलेमोठे गोल कुंकू. तोंड सुद्धा कायम लाल, कायम पान खाणार या. कमरेला एक सुती कापडाचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या जुन्या पातळाचा शिवलेला बटवा कायमच खोचलेला असे. याचे दोन उपयोग, एक म्हणजे पैसे ठेवण्यासाठी आणि दुसरा म्हणजे पानाचे साहित्य ठेवण्यासाठी! हातात कायम भरगच्च हिरव्या, लाल काचेच्या घट्ट बांगड्या. दंडात आणि मनगटात प्रत्येकी एक जाडसर कड्यासारखा अलंकार. मुलांशी फार बोलत नसतच. महिलांशी मात्र त्यांचा मूड चांगला असेल तर मोकळेपणाने बोलत कधीतरी, पण बडबड्या प्रकारात न मोडणाऱ्या. 
मग घरातील मोठ्या महिला पुढे सरसावत, खरेदी साठी. दरम्यान त्या आजींना पाणी-चहा दिला जात असे. मग त्यांना भाव विचारणे, किती महाग आहे, थोडा भाव कमी करा वगैरे थोडीफार घासाघीस चाले. मग ठरलेले काळे फुटाणे घेतले जात, आम्हाला काबुली फुटाणे सुद्धा आवडतं, मग काहीवेळा ते सुद्धा घेतले जात. काहीवेळ आम्ही फारच हट्ट केला तर थोडे शेंगदाणे घेतले जात. आणि मग माझ्या सगळ्यात आवडती खरेदी म्हणजे ज्वारीच्या लाह्या किंवा मुरमुरे! अगदी मोठ्ठ्या शेराच्या मापाने!! माझी गाडी मग एकदम खुश!!! आजही मला ज्वारीच्या लाह्या आणि मुरमुरे तितकेच आवडतात. ज्वारीच्या लाह्या माझ्या गावात मिळत नाही, मग घरी जाते तेव्हा अगदी भरभरून घेऊन येते आणि अगदी प्रेमाने खाते! पण कधी त्या आजी सांगत आज लाह्या किंवा मुरमुरे संपत आलेय किंवा अजूनकाही कारण, म्हणून आज नका घेऊ. पुढच्यावेळी घ्या, वगैरे. त्यांचे ऐकून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे निर्णय घेतले जात असतं. फसवेगिरी तर सोडूनच द्या, किती हा प्रामाणिकपणा!
हल्ली मात्र हा सगळा आनंद पूर्णपणे लोप पावला आहे. मोठ्या शहरातच नाही तरी अगदी छोट्या शहरात सुद्धा. मोठ्या शहरात तर प्लास्टिक मध्ये बंद केलेले फुटाणे आणि मुरमुरे घ्यावे लागतात. एव्हढेच नाही तर माल कसाही असो, दुकानदार सांगतात छान आहे आणि घरी आल्यावर कळते किती छान आहे ते. छोट्या शहरातूनही लोटगाडीवर सगळे जिन्नस घेऊन येतात विकायला. जिन्नसांची संख्या खूप वाढली आहे पण त्याची गुणवत्ता, माणुसकी, आपलेपणा सारेच हरवले आहे. एव्हढेच नाही तर नवीन पिढीला या खाऊ बद्दल फारसा ओढा नाहीच. आणि शेराच्या मापा बद्दल तर बोलायलाच नको. पितळी मापं औषधालाही बघयला मिळत नाही हल्ली, पण मधूनच सगळ्या सोशिअल मिडीयावर अगदी पाउस पडतो या सगळ्या पितळी मापांचा, अगदी शिशारी येई पर्यंत.....
असो. सरते शेवटी हिशोब करून त्यांना पैसे दिले जात असतं. मग त्या त्यांची सगळी आवरा-आवरी करीत म्हणजे सोडलेल्या पोत्यांची तोंड बांधणे, ती पोती परत त्या टोपलीवर ठेवणे, चुंभळ परत नीट घट्ट करणे वगैरे त्यानंतर कुणालातरी म्हणत हात लाव ग जरा माझ्या टोपलीला म्हणत. कुणाच्यातरी मदतीने परत टोपली डोक्यावर ठेऊन, दाराजवळच्या वाहणा पायात घालून जिना उतरू लागत. थोडा वेळातच त्यांची खणखणीत आरोळी ऐकू येई,

दाह्या, मुरमुरे, 
फुटाने,शेंगदाने,
लाह्या घ्या वो......
आणि हळूहळू क्रमाने आवाज हळुवार होत होत, थोडाच वेळात ऐकू येईनासा होत असे...  

©आनंदी पाऊस 
(घरातील गमती-जमती)
५जनेवरि२०२३


भोईन आजींची टोपली 
साधारण अशी असे 
अर्थात त्यात अशा ताटल्या आणि वाट्या नसत 😂
तो कृष्ण-धवल काळ होता म्हणून 
हा एक कृष्ण-धवल 



भोईन आजींची टोपली 




काळे फुटाणे 



काबुली फुटाणे



सुरती फुटाणे 




मुरमुरे 



ज्वारीच्या लाह्या 



हल्ली लोट-गाडीवर विक्रीसाठी 
आणलेले फुटाणे 


खारे शेंगदाणे, डाळ्या वगैरे 



साळीच्या लाह्या 



आणि हल्ली हे सगळे काय काय सुद्धा 
असते 


तळलेले फरसाण वगैरे 


शेव वगैरे 


आणि हल्लीचे लोखंडी शेराची मापं 












Comments

  1. जितेंद्र महाजनMarch 03, 2023 8:21 am

    ताई खूपच छान हा अनुभव आम्ही सुद्धा घेतली आहे पण तुम्ही खूप सुरेख मांडणी केली आहे 👌👌👍

    ReplyDelete
  2. स्वाती प्रभूणेMarch 03, 2023 8:37 am

    इथे पण एक आजोबा यायचे .2019 पर्यंत येत होतें. माझ्या (आई (विजू)सासूबाई) मुलानं साठी साळी च्या व ज्वारी च्या लाह्या घ्यायच्या. 😋 आजकाल मॅगी व इतर गोष्टी मुळे. ते मागे पडले.
    त्यांची चवच काही मस्त असायची. भट्टी त भाजलेलं. मी अजूनही गावात गेले की दाणे व लाहया घेऊन येते. मला त्या साखर फुटाण्या बरोबर आवडतात

    ReplyDelete
  3. Prajakta DongareMarch 03, 2023 10:23 am

    👏👏👏 mast😋😋
    Mala jwarichya lahya, kabuli futane😅😅
    Khup varshe ulatali aata he sagale baghun ani khaun😇😇... aatachya packets la ti chav kithe🥹

    ReplyDelete
  4. लहानपण आठवले. आताही फैजपूरला गेली असतांना मी १-२ वेळा भोईणींकडून ज्वारीच्या लाह्या, फुटाणे, खारे शेंगदाणे घेतले होते. आणि सगळे पदार्थ गरम होते.आता तिच्याकडे पॅापकॅार्नपण असतात. गव्हाच्या लाह्यापण पाहिल्या.

    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे

    ReplyDelete
  5. वा वा छान वर्णन लहानपणी खरच तो खाऊ म्हणजे पर्वणीच
    योगा योग पाहा आजच मी मुरमुरे,जवरीचा लाहा , शेगदांने,फुटाणे घेतले ऊनालात खास आठवण येते या खाऊची

    ReplyDelete
  6. शीव राऊतMarch 03, 2023 3:17 pm

    अगदी लहानपणाची आठवण करुन दिली मॅडम 👏🏻👏🏻👌🏻👌🏻
    👌🏻👌🏻👌🏻 फोटो ही छान

    ReplyDelete
  7. विकास गायकवाडMarch 03, 2023 6:22 pm

    Vadilanche va bhoi Kaka che gharobyache sambanda hate te amhala danga tarbuz Free dhyayache. Pan. Dangar tarbuzchya. Biya tyana neun dyavya. Lagat hotya te divas athavale .😝😝😝😝👌👌👌👌

    ReplyDelete
  8. वाढ वा खुपच छान

    ReplyDelete
  9. भारती फेगडेMarch 06, 2023 7:14 am

    ताई मी फैजपूरला गेले की अजुनही अशी खरेदी होते. आता त्यात भर पडली आहे भट्टीत भाजलेले वेगवेगळे कुरकुर, मग काय नातवंडांना बघायलाच नको. एका नातवाला तर तिच्या कडच्याच सुर्यफुलाच्या टपो-या खारवलेल्या बिया आवडतात. ती घरी आली नाही तर तो तिच्या घरी जाऊन घेऊन येतो. त्यासाठी तिचा पत्ताही त्याने माहिती करून घेतला आहे. 1000/रु.ची विक्री झाल्याने ती ही खुष होऊन मुलांना मुठमुठभर शेंगदाणे देते. ती ही खुष, मुलेही खुष!!
    मसालेवालाही असाच येतो व मसाला घ्यायला लावतो.काही देऊन जातो. ताई तुम्ही भेटलात बरे वाटले असे म्हणतो. असतात असे ऋणानुबंध!!! कोण कुठले मामा, भाऊ, मावशी आजी बनतात. हो ना!!!

    ReplyDelete
  10. स्नेहलMarch 06, 2023 7:14 am

    तोंडाला पाणी सुटलं 😋

    ReplyDelete
  11. Khup chan khau v khauvaliche varan pan mast 👌👌.Aawdicha aahe sravancha chane, kurmure, lahya
    Photo pan zakas

    ReplyDelete
  12. सुरेखा महालपुरेMay 08, 2023 12:38 pm

    हे माझ्या कडे लोखंडी माप आहे . भोईन आजीकडचा खाऊ आजही नेहमी खातो. मुरमुरे , फुटाणे सुपाने घोळून घेतो. लाहया साठी लागणारी लाहीदाणी माहेरी शेेतात पिकते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...