Skip to main content

चित्रसंथे-एक चैतन्यमयी अनुभव-२! (काही अनुभवलेलं...)

 चित्रसंथे-एक चैतन्यमयी अनुभव-२!

(काही अनुभवलेलं...)


एक आगळी वेगळी आणि आनंदायी सकारात्मक उर्जा अनुभवायला मिळते या दिवशी! देशाच्या विविध भागांतून रसिक आणी कलाकार सुद्धा फक्त हे बघायला आणि अनुभवायला येतात. काही पालक आपल्या मुलांना घेऊन येतात हे सगळं दाखवायला. तर काही आपल्या वृद्ध आई-वडिलांना सुद्धा घेऊन येतात, या कला जत्रेत. काही मंडळी ठरवून काही खरेदी साठी येतात, कारण थेट कलाकारांकडून, हव्या त्या कलाकृती वाजवी दरात खरेदी करता येतात. तसेच एकाच ठिकाणी अगदी हजारोंनी कलाकृती बघून त्यातून हवी ती कलाकृती निवडता येते. काही मंडळी स्वतः साठी खरेदी करतात, तर काही मंडळी कुणाकुणाला भेट देता यावी म्हणून खरेदी करून ठेवतात. काही मंडळींच्या नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी, शेजारी यांच्यापैकी कुणीतरी कला प्रदर्शित करण्यासाठी यात सहभागी झालेले असते, म्हणून त्यांच्या कौतुकासाठी येतात. या कार्यक्रमाचे फक्त दस्तावेजीकरण करता यावे म्हणूनही काही मंडळी भेट देतात. तर काही मंडळी छायाचित्रीकरण आणि चलचित्रीकरण करण्यासाठी छान संधी असते म्हणूनही येतात. 
अन्न हे पूर्ण ब्रह्म! मग त्याशिवाय कसा कुठलाही कार्यक्रम साजरा होणार? किंवा पूर्ण होणार? या सगळ्या कलेच्या मेजवानी सोबतच कर्नाटक चित्रकला परिषदेच्या आवारात स्थानिक खास पदार्थांची छोटी-छोटी दुकानं सुद्धा थाटलेली असतात. सगळ्या स्थानिक खासियत असलेल्या पदार्थांची, म्हणजे इडली, मिनी इडली, थत्ते इडली, रागी इडली, रवा डोसा, मैसुरू डोसा, सेट डोसा, रागी रोटी, अख्खी रोटी, पुलीओगरे, बिसिबीळी भात, रागी मुद्दे इ.इ.  येथेच्च चव चाखून तुमच्या रसनेला तृप्त करता येते. तसेच याच आवारात एका बाजूला अजून काही छोटी छोटी दुकानं थाटलेली असतात, ती म्हणजे चित्रकलेसाठी लागणारे सगळे साहित्य असलेली. निरनिराळ्या काळ्या शिश-पेन्सिल, रंगीत पेन्सिल, तैल रंग, पाण्याचे रंग, अक्रालिक रंग, स्केच पेन, चित्र काढण्यासाठी वेगवेगळे कागद, वह्या, कॅनवास, वेगवेगळे ब्रश, पेन, विविध अवजारं आणि काय काय! भयंकर गर्दी या दुकानांवर सुद्धा. खरेदी करणारांची झुंबडच उडालेली दिसते.  
यासोबतच, जिथे-जिथे कलाकारांनी त्यांच्या कलाकृती सादर केलेल्या असतात, त्या सगळ्या रस्त्यांवर अनेक खाद्य पदार्थ विकणारे फेरीवाले सारखे इकडून तिकडे फिरतच असतात. भेळ, उकडलेले शेंगदाणे चाट, वाफवलेले मक्याचे दाणे, उकडलेली मक्याची कणसं, फुटाणे, खारे दाणे, तोतापुरी कैऱ्या, पेरू, म्हातारीचे केस, फोडणीचे मुरमुरे असे अगदी सगळ्यांना आणि प्रत्येकाला अतिप्रिय असलेल्या पदार्थांची सुद्धा रेलचेल असते. शिवाय चहा-कॉफी विकणारे अगदी सतत इकडून तिकडे फिरत असतात. हल्ली काही वर्षांपासून तर या सगळ्या सोबतच मी पश्चिमी पदार्थांची विक्री करणारी अगदी खास पश्चिमी पद्धतीची व्हॅन सुद्धा बघत आहे. कुठे कुठे आणि किती खोलवर शिरकाव होतो आहे पाश्चीमात्यानंचा. चंगळ, दुसरे काय! पण अख्खा दिवस तिथे फिरायचे, उभे राहायचे, या सगळ्यात थकवा येतोच. अगदी शारीरिकच नाही तर मानसिक, बौद्धिक, भावनिक सगळ्याच प्रकारे. त्यामुळे सगळ्याची गरज भासतेच. मी फारसं बाहेरचं न खाणारी, पण मला सुद्धा गरज लागतेच. तसेच काही पालकांना बघायचे असते, पण मुलं कंटाळून गेलेली असतात अशावेळी त्यांना यातील काही दिले की ते सुद्धा खुश आणि पालक सुद्धा. खाद्यकला संस्कृती!
या सगळ्या सोबतच येतो अगदी नको वाटणारा विषय, तो म्हणजे कचरा. पण त्याबाबतीतही अगदी व्यवस्थित नियोजन असते. रस्त्यावर जागोजागी अगदी थोड्या थोड्या अंतरावर, मोठमोठ्या प्लास्टिकच्या स्वच्छ कचरा पेट्या ठेवलेल्या असतात. त्यात अशीच मोठी प्लास्टीकची पिशवी घालून ठेवलेली असते. ती भरली की लगेचच काढून दुसरी घालून ठेवतात, अगदी वेळच्या वेळी, थोडीही दिरंगाई नाही. एव्हढी सगळी सोय करूनही काही ठिकाणी कचरा दिसतोच, ही अतिशय लाजिरवाणी बाब. का असे व्हावे? इतर वेळी अस्वच्छते बाबत सरकारला दोष देऊन मोकळे होणारे लोक स्वतःच असे का वागतात?  का आपली जबाबदारी कळत नाही. इतक्या चोख सुविधा असूनही सगळीकडे शंभर टक्के स्वच्छता का राहू शकत नाही? विचार करण्यासारखा मुद्दा आहे.  
तर कला! चौसष्ट कला! मनाला खूप आनंद देणाऱ्या. आदरणीय पु.ल. देशपांडे यांनी तर म्हटलंय, "उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा. पण एव्हढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्रं, संगीत, नाट्य, शिल्पं, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जागवील, पण कलेशी जमवलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल." मलाही हे अगदी पुरेपूर पटते. पण अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने किंवा जहांगीर आर्ट गॅलरी सारख्या ठिकाणी भेट दिली की मग मात्र मनात भयंकर कल्लोळ माजतो. कलाकार आपापल्या अप्रतिम कलाकृती घेऊन अक्षरशः रस्त्यावर रसिकांच्या प्रतीक्षेत असतात. कुणीतरी आपली कलाकृती खरेदी करेल, या आशेवर. या कला उत्सवात सुद्धा कितीतरी भव्य कलाकृती बघ्यावयास मिळतात. अगदी वर्षानुवर्ष त्याच त्या कलाकृती. एक एक कलाकृती पूर्ण करण्यास किती दिवस आणि किती मेहेनत लागत असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. या कलाकृतींची विक्रीच होत नसावी का असा प्रश्न पडतो. की परत तशाच दुसऱ्या कलाकृती तयार केल्या जातात? काही कळायला मार्ग नाही. पुन्हा या कलाकृती जपून ठेवायच्या म्हणजे त्यासाठी तशी मोठी आणि सुरक्षित जागा सुद्धा हवी. माझ्या मते तरी त्या काल्कृतींची विक्रीच होत नसावी. किती क्लेशदायक बाब! आनंद देणाऱ्या कलेची दुसरी बाजू, किती विरोधाभास...
इतके वर्ष हा सगळा आनंद लुटतांना कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर घडत असतात, अनुभवायला मिळत असतात. अगदी निःशब्द करून टाकतात! त्यातले काही मोजके सांगते. यावेळी कुमार कृपा रस्त्यात शिरतो न शिरतो तेव्हढ्यात एक विक्रेता एका हातात मोरपिसांचा मोठ्ठा गुच्छ आणि दुसऱ्या हातात मोरपिसापासून बनविलेले हातपंखे घेऊन विकत होता. प्रथम दर्शनी इतके मोरपीस बघून एकदम आनंद वाटला. पण दुसऱ्या क्षणी वाईटही वाटले, ही सगळी मोरपिसं कशी मिळविली असतील नक्की? पुढे गेल्यावर तर थोड्या थोड्या पावलांवर असे किती तरी विक्रेते बघायाला मिळाले... किती क्लेशकारक... 
कलाकृती बघतांना आपण आपल्याच तंद्रीत असतो, कुठे फोटो काढ, कुठे त्याबद्दल काही चर्चा वगैरे. पण कलाकार मात्र आपल्याकडे आशेने बघत आहे ह्याचे बऱ्याचदा भानच राहात नाही. काही वेळा मात्र लक्षात येते, आणि खूपच अस्वथ सुद्धा वाटते. पण अशा वेळी मात्र मी नक्कीच त्यांच्याशी बोलते, त्याच्या कलाकृतीबद्दल त्यांचे अभिनंदन करते. काही कलाकृतीबद्दल काही माहिती विचारते. काही कलाकार अगदी सगळी सविस्तर माहिती सांगतात, काही मात्र नकार देतात. छायाचित्रं काढतांना तसेच, बहुतेक सगळे कलाकार त्यांच्या कलाकृतीची छायाचित्रं काढू देतात, काही मात्र स्पष्ट नाही म्हणून सांगतात.
असेच एकदा बराच उशीर होऊन गेला होता, अगदी अंधार पडून गेला होता, पण पूर्ण पाहिल्याशिवाय काही तेथून पाय निघत नव्हता. चित्रकला परिषदेच्या आवारात काय आहे ते बघायचे राहिले होते, म्हणून आत शिरलो. इकडे-तिकडे बघत असतांना एका कोपऱ्यात बरीच गर्दी दिसली. साहजिकच वाटले, बघावे आहे तरी काय तिकडे नक्की? गेलो आणि पाहिले तर एक अतिशय वृद्ध गृहस्थ पांढऱ्या कागदाचे काही चौकोनी तुकडे आणि कात्री घेऊन बसले होते. घोळक्यातील कुणीतरी एखाद्या पक्षाचे, प्राण्याचे, बाहुलीचे वगैरे नाव सांगे आणि ते आजोबा एक कागद हातात घेऊन, कात्रीच्या सहाय्याने कागद कापून त्यातून तो प्राणी, पक्षी साकारत होते. किती तरी वेळ बघत होतो आम्ही, वेळेचे भानच नव्हते. बघतच रहावेसे वाटत होते, अगदी अचूक आणि अत्यंत सफाईदार पणे त्यांचा हात चालत होता. आपण कागद पेन्सिल घेऊन काढायचे म्हटले तरी हजारवेळा खोडतो तरी इतके अचूक चित्र काढू शकत नाही. त्यांनी तर कात्री वापरली जिथे चूक करण्याची आणि ती सुधारण्याची मुभाच नसते. आणि वेळ किती म्हणाल, तर तुमची पापणी लवते न लवते, तितक्यात त्यांचा एक प्राणी तयार!
मातीची भांडी तयार करणारे काही कलाकार त्याचे चाक सुद्धा घेऊन येतात आणि भेट देणाऱ्या रसिकांना आपला हात आजमावण्याची संधी देतात. बरेचजण त्या चाकावर, त्या कलाकारांच्या मदतीने छोटी मातीची भांडी बनवतात आणि घरी घेऊन जातात. स्व निर्मितीचा एक आगळाच आनंद असतो या सगळ्यात, तो त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतांना दिसतोच. मला पण इच्छा आहे, पण अजून संधीच मिळाली नाही, हा आनंद अनुभवण्याची!
एक ना असंख्य किती तरी प्रसंग, कितीतरी अनुभव. किती सांगावे आणि किती नाही असे होऊन गेले. आता शेवटचा एक प्रसंग सांगते आणि थांबते. 
 कला अशी गोष्ट आहे की कलेकडे आकर्षित होणार नाही असा मानवी जीवच या विश्वात नसावा असे मला वाटते. कुमार कृपा रस्त्याच्या दुतर्फा अनेक मोठमोठी सार्वजनिक आवारं आहेत. जसे शाळा, कर्नाटका चित्रकला परिषद, कुमार कृपा आराम गृह, हॉटेल ललित, मुख्यमंत्र्यांचे निवासी कार्यालय, गोल्फ कोर्स वगैरे. पण या रस्त्याला काटकोनात येऊन मिळणाऱ्या रस्त्यांवर मात्र काही रहिवासी इमारती आहेत. इमारतींच्या कुंपणाच्या भिंतीचा भाग कलाकारांना जरी दिलेला असला तरी, फाटकासमोरील जागा मोकळी ठेवलेली असते, तेथील रहिवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून. अशाच एका रहिवासी इमारतीच्या फाटका समोर जमिनीवर काही वर्तमानपत्र पसरवून ठेवलेली दिसली. नीट पाहिले तेव्हा लक्षात आले त्या वर्तमान पत्रांवर दोन तीन कागदावर पडलेली रंगवलेली चित्र होती, सोबतच दोन-तीन मातीची छोटी भांडी रंगवून ठेवलेली होती. बाजूलाच एक महिला आणि तीन-चार छोटी छोटी मुलं उभी होती. आजूबाजूचे कलाकार आणि काही रसिक त्यांच्याकडे बघत होते. नक्की काय चालले आहे म्हणून बघायला गेले, तर त्या महिलेचे बोलणे कानावर पडले. इथे सगळ्या कलाकारांच्या कला प्रदर्शित केलेल्या पाहून या मुलांनाही त्यांच्या कलाकृती इथे प्रदर्शित करायच्या होत्या. म्हणून या मुलांनी या कलाकृती तयार केल्या आणि इथे प्रदर्शित केल्या, किमती सह विक्रीसाठी. यावर काय आणि कसे व्यक्त व्हावे कळेना! अजूनही नाही समजत कसे व्हावे व्यक्त. पण हा प्रसंग मात्र कायमचा घर करून आहे माझ्या मनात...

आनंदी पाऊस 
(काही अनुभवलेलं...)
११जाने२०२३



एकाच लाकडाच्या ओंडक्यातुन साकारलेला 
हा चार फुटाचा शंख











याला काय म्हणावे? 



हरिण तयार करतांना


हेच ते कलाकार आजोबा 




नारळाच्या कवट्यां पासून तयार केलेल्या कलाकृती 


वापरा अणि फेका ताटल्या वाट्या चमचे



वापरा अणि फेका ताटल्या वाट्या चमचे




तीन मितीय मासे 



एक उत्साही रसीक



हीच ती छोटी छोटी मूलं
















 

 














Comments

  1. लीलाधर कोल्हेJanuary 20, 2023 6:02 pm

    व्वा! छान .👌 अशा जत्रेत खरा‌ आनंद मिळतो ‌.

    ReplyDelete
  2. खूप छान हुबेहुब वर्णन, वेगवेगळे प्रसंग,अनुभव, कलाकृती, खाद्यपदार्थ त्याची नावे,आणि चित्रे खरच 👌

    ReplyDelete
  3. खूपच भारीय चित्र संथे..अगदी बारीक बारीक details ने सुरेख लिहिलय...म्हणुनच माला ही त्या संथेतून "Walkthrough" केल्यासारखं वाटतय...बंगलोरला मीही अश्या स्थळाना भेट दिलेली...Art +Food +Clay+Crafts ह्यांचा सुरेख संगम हया लेखातून पाहायला मिळाला.
    कसयना"तुमच्या blogcha 'sequence "खूप आवडतो... आता असे वाटतंय कि " बसवा एक्सप्रेस ने बंगळूरला यावे आणी पाहावे...

    ReplyDelete
  4. आपल्या देशाची वैशिष्ट्यपूर्ण विविधता अशी राज्यागणिक प्रतीत होत असते. तुला तिथे राहिल्यामुळे या गोष्टींचा अनुभव घेतां आला. एंजॅाय करत रहा….
    वर्णन वाचून आपल्या काळा घोडा ‘फेस्टीव्हल’ ची आठवण आली.
    छान लिहिले आहेस. 👌👌

    ReplyDelete
  5. 😊Chitra santhe bhag 2 che likhan hi khoop chan zale aahe
    Wachtana aapan hi kalpet ek pherphatka Jatret marun yeto
    😊weg wegle kalakruti khadpadarth Yacha anand ghenesathi lok ethe houseni yetat aani jatrecha anand ghetat kiti chan
    Ashi mala hi pahayla aawdel
    Tu swta hi ek uttam kalachi jaan aasleli Rasik personality aahes
    Aamhala hi lekhnatun anand detes so tnx
    Aasch aanandi paus chalu rahu de all the best😊👍

    ReplyDelete
  6. खूप छान... कधी असते ही जत्रा?

    ReplyDelete
  7. RIGORVENTURE@GMAIL.COMFebruary 04, 2023 2:39 pm

    चित्रसंथे हा एक मोठा आणी प्रचंड वैविध्यतेने भरलेला उत्सव असल्यामुळे त्याला एका लेखात सामावून घेणे अवघड होतेच , त्यामुळे चित्रसंथे 2.0 ची अपरिहार्यता होतीच. अपेक्षेप्रमाणे एकच उत्सव असल्यामुळे दोन्ही लेखात थोडीफार repeatation किंवा overlapping झाले आहेच. पण तुझी लेखनशैली आणी बारकावे टिपण्याचं कौशल्य, यांमुळे आपण जत्रेत पुढे पुढे सरकत आणी रंगत जातो. वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे stalls आणी फेरीवाल्यांचा अखंड ओघ, हे प्रेक्षक वर्गासाठी catalyst म्हणुन काम करतात. तू उल्लेख केलेल्या बर्‍याच पाककृती कधी खाल्ल्या गेल्या नाहीत, कारण बहुतेक ते स्थानिक प्रकार असल्यामुळे त्यांची ओळख मला झाली नसावी. शेवटी कचर्‍याचा मुद्दा तू अधिक सार्थपणे मांडला आहेस. आपले नागरिक ज्यादिवशी सामाजिक स्वच्छते बद्दल कटाक्षाने जागरूक आणि शिस्तप्रिय होतील तो खरा आपल्या देशाचा सुदिन. कलेशी मैत्री करणे हा प्रकार तुझ्यासारख्या कलाकाराला जमू शकेल पण आमच्यासारखे अरसिक कलात्मक गोष्टींपासून बिचकूनच असतात(😜😜). कलाकारांची अपेक्षापूर्ण नजर चुकवून काही न खरेदी करणे हा अश्या प्रदर्शनातला अवघड भाग असतो खरा पण जो जसं जमेल तसं त्याच्या आवडीनुसार खरेदी करत असतोच की. आजोबांच्या cutting आर्ट ला सलाम. आणी चित्रसंथेच्या पुन्रप्रत्यीय आनंद मांडणी बद्दल धन्यवाद.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...