Skip to main content

चित्रसंथे-एक चैतन्यमयी अनुभव-१!(काही अनुभवलेलं...)

 चित्रसंथे-एक चैतन्यमयी अनुभव-१!

(काही अनुभवलेलं...)



चित्रसंथे/चित्रसंते(Chitrasanthe)! कानडी शब्द. यात चित्र शब्दाचा अर्थ चित्रं/चित्रकला असा आहे तर संथे/संते या शब्दाचा अर्थ ग्राम बाजार/आठवडी बाजार/एक दिवसाची जत्रा. हा वार्षिक महोत्सव आहे. संथे/संते या शब्दाचा अर्थ ग्राम बाजार/आठवडी बाजार म्हणजे यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अशा बाजारांत शेतकरी स्वतः त्यांचा माल/पीक विक्रीसाठी घेऊन येतात. खरेदी करणाऱ्याला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येतो. त्यात कुठल्याही प्रकारचा मध्यस्त नसतो त्यामुळे शेतकऱ्याला, त्याच्या शेतमालासाठी योग्य दर मिळतोच मिळतो, त्याच बरोबर खरेदी करणाऱ्याला सुद्धा वाजवी दरात हवे ते जिन्नस खरेदी करता येते. इथे तसेच असते. कलाकार स्वतः त्यांच्या कलाकृती प्रदर्शन आणि विक्रीस ठेवतात आणि खरीददारांना त्या थेट कलाकारां कडूनच खरेदी करता येतात. त्यामुळे दोघांनाही योग्य/वाजवी दर मिळतो. चित्रसंथे/संते !  
वर्षातून एकदा भरणारा हा महोत्सव जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी असतो. मध्यंतरी काही वेळा डिसेंबर महिन्यातही झाल्याचे आठवते आहे. पण याची तारीख तब्बल एक वर्ष आधीच ठरलेली असते. पर्यटन मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या महोत्सवाचे हे विसावे वर्ष! हा महोत्सव बंगळूरू येथील कर्नाटक चित्रकला परिषद आणि त्याच्या समोर असलेल्या कुमार कृपा रस्त्यावर तसेच या रस्त्याला काटकोनात येऊन मिळणाऱ्या छोट्या रस्त्यांवर भरतो. 
हा दिवस वगळता उरलेले तीनशे चौसष्ट दिवस या रस्त्यावर अतिशय रहदारी असते, पण अगदी शिस्तपूर्ण. रस्ता कायमच आणि पूर्णपणे सुस्थितीत, अगदी स्वच्छ, नीटनेटका. रस्त्याला दुतर्फा व्यवस्थित बांधीव पदरस्ता/पदपथ(फुटपाथ) आहेत. त्यावरून अगदी आरामात आणि चिंतामुक्त चालता येते. पण यादिवशी मात्र या रस्त्यावरून चालता येते आणि रस्त्यावरूनच चालावे लागते. कारण एक म्हणजे, या दिवशी हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केलेला असतो. त्यामुळे अर्थातच या रस्त्याला काटकोनात येऊन मिळणारे रस्ते सुद्धा वाहतुकीसाठी आपोआपच बंद होतात. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावर कलाकारांना त्यांची कलाकृती पदर्शित करण्यासाठी प्रत्येकी साधारण सहा-सात फुट जागा दिलेली असते. मग सगळे कलाकार आपापल्या कलाकृती, मिळालेल्या जागेत जमिनीवर, मागे असलेल्या कुंपणाच्या भिंतीवर, पदपथाला असलेल्या लोखंडी कठड्यावर, झाडाच्या फांद्यांवर, मिळेल तश्या, शक्य त्या जागी, शक्य तितक्या आकर्षक पद्धतीने प्रदर्शित करतात. त्यामुळे भेट देणाऱ्यांना पदपथावर चालणे शक्यच नसते. उलटपक्षी या अति रहदारीच्या रस्त्यावर मोकळेपणे चालण्याची, हिंडण्याची संधी मिळते! 
या सगळ्या, सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलाकारांना आधीच अगदी वाजवी दरात नोंदणी करावी लागते. त्यात त्यांना फक्त ही जागा आणि दोन खुर्च्या मिळतात. बाकी सगळे त्यांना स्वतःच करावे लागते. मध्यंतरी काहीवेळा त्यांना दुपारचे जेवण दिल्याचे पण पाहिले होते. पण याबद्दल मला नक्कीची माहिती नाही. जवळ जवळ दीड ते पावणे दोन किलोमीटर लांबी आहे या रस्त्याची. हिवाळा असतो, तथापि ऊनही  बऱ्यापैकी असते. दिवसभर अखंड उन्हात बसणे शक्य नसते. पण या रस्त्यावर दुतर्फा छान मोठाली झाडं आहेत. त्यातील काही बुचाच्या फुलाची सुद्धा आहेत(त्या फुलांच्या मौसमात गेलात तर छान सुगंध दरवळत असतो). त्यामुळे संपूर्ण दिवसभर या रस्त्यावर अखंड नैसर्गिक सावली आणि प्रसन्न वाटेल असा गारवा असतो. कलाकारांना आणि भेट देणाऱ्यांना इथे अख्खा दिवस काढायचा असला तरी जराही त्रासदायक वाटत नाही. 
सुरुवातीला सहभागी होणाऱ्या कलाकारांची संख्या फार नसल्याने, तसेच भेट देणाऱ्यांची संख्या सुद्धा बेताची असल्याने, सगळ्या कलाकृती अगदी निवांतपणे बघता येत असतं. सुरुवातीला साधारण दक्षिणेतील चारच राज्यातील कलाकार जास्त संख्येने असतं. हळहळू सहभागी कलाकारांची संख्या वाढत गेली आणि भेट देणाऱ्यांचीही संख्या वाढत गेली. यावर्षीच्या म्हणजे विसाव्या महोत्सवात जवळ जवळ बाराशे ते पंधराशे कलाकार सहभागी झाले होते तर भेट देणाऱ्यांची संख्या दहा लाखाच्या वर गेली होती. सांगायला अतिशय आनंद वाटतो, वर्षागणिक मराठी कलाकार आणि भेट देणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.  
या दिवशी सकाळी नउ च्या आसपास या महोत्सवाचे उद्घाटन होते. तेव्हापासून अख्खा दिवस अगदी अंधार पडून गेल्यावरही बरीच वर्दळ असते. उद्घाटन सकाळी नउच्या सुमारास असले तरी सर्व सहभागी कलाकारांना आपापल्या कलाकृती घेऊन बराच वेळ आधी यावे लागत असणार. कारण त्यांना मिळालेली जागा शोधणे, तिथे कशा पद्धतीने मांडणी करता येईल याचा अंदाज घेणे आणि प्रत्यक्ष मांडणी करणे, यास बराच वेळ लागत असणार. 
भेट देणाऱ्यांनी सकाळ अगदी नउ वाजल्यापासून जाऊन पोहोचले आणि अख्खा दिवस तिथे घालवला तरी सगळ्या कलाकृती बघणे केवळ अशक्य होऊन बसते, हल्ली. सगळ्या माध्यमातील चित्रं म्हणजे अगदी साधा चित्र काढण्याचा कागदा पासून हाताने बनवलेला कागद, कॅनव्हास, लाकूड, काच, एम डी एफ, कापड, धातू, नैसर्गिक सुकलेली पानं, पक्षांची पिसं, नारळाच्या कवट्या वगैरे वगैरे अगदी न संपणारी आणि न लक्षात राहणारी यादी आहे. त्यावर पेन्सिल, चारकोल, तैलरंग, खडूचे रंग, पाण्याचे रंग, कॉफी, अजून एक-एक नवीन नवीन शोधून काढलेले तंत्र यांचा वापर करून केलेल्या कलाकृती. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या माध्यमातील गणपती, बुद्ध, आंबेडकर वगैरे वगैरे च्या मूर्ती, पुतळे.पाषाणातील कलाकृती, पाषाणावरील रंगकाम, मातीचे दिवे, वेगवेगळ्या आकाराची मातीची भांडी, फुलदाणी. विविध माध्यमातील बुकमार्क, किटली, ट्रे, कप, मग, शुभेच्छापत्र, दिनदर्शिका, रोजनिशी, हाताने रंगकाम केलेल्या ओढण्या, तऱ्हेतऱ्हेच्या आकाराच्या आणि उपयोगाच्या पिशव्या, एक नी अनेक किती सांगावे तेव्हढे थोडे...!
या सगळ्या खेरीज अजून काही कलाकार असतात, जे तिथल्या तिथे(live) व्यक्तिचित्रं काढून देतात, तुमच्या भ्रमणध्वनित काही छायाचित्रं असतील तर त्यावरून सुद्धा व्यक्तिचित्रं काढून देतात. ती सुद्धा वेगवेगळ्या माध्यमात. पेन्सिल पासून ते तैल रंगांपर्यंत सगळ्या माध्यमात. काही कलाकार तुमच्याकडून ऑर्डर घेतात आणि तयार व्यक्तीचित्रं तुम्हाला घरपोच मिळते.  अजून एक रंजक प्रकार म्हणजे व्यंगचित्रं! मी सुद्धा एक-दोनदा व्यक्तिचित्रं आणि व्यंगचित्रं बनवून घेतले आहे, या कला महोत्सवात! काही कलाकार काही मिनिटांतच तुमच्यासमोर तुमचे व्यंगचित्रं काढून देतात. हल्ली नवीन पिढीचा अतिशय आवडता प्रकार म्हणजे टाटू पेंटिंग. ही कलाकार मंडळी तुम्हाला हव्या त्या डिझाईन, रंगांच्या माध्यमातून चेहऱ्यावर, हातावर वगैरे टाटू काढून देतात. अलीकडे नव्याचेच प्रगत झालेली कला म्हणजे फुगे फुगवून त्यापासून निरनिराळे प्राणी, पक्षी,बाहुली वगैरे सारखे आकार बनवणे. हे सुद्धा तुमच्यासमोर बनवून देतात, हवे ते आकार. खरेदी करणाऱ्याला तर आनंद मिळतोच पण ते तयार करत असतांना, सगळ्या बघणाऱ्यां रसिकांच्या डोळ्यांना तर स्वर्गीय मेजवानीच मिळते! कारण ह्या सगळ्या विविध कला प्रकार आपल्या डोळ्यादेखत साकार होतांना बघणे हा अगदी जादुई अनुभव असतो! 



©️ आनंदी पाऊस 
(काही अनुभवलेलं...)
१० जाने २०२३      



















 






















Comments

  1. Nawin शब्द समजला chitrasanthe...thnx.......ब्लॉग खूप छान आहे चित्र pn मस्तच

    ReplyDelete
  2. Nice posters

    ReplyDelete
  3. ताई संग्रह अतिशय सुरेख आणि आनंदीदायक एक एक विचारपूर्वक संग्रहाचे दृश्य फोटो ग्राफी
    खूप सुंदर कलेक्शन खूप च सुंदर ,,👌👌🙋👍🖋️📓

    ReplyDelete
  4. नविन च शब्द आणि कल्पना समजली. पण जे काय आहे ते अवर्णनीय वाटते. हो एक छान सफर घडवून आणलीस. नक्की च काहीतरी खरेदी केले असशील. काय ते दाखव.

    ReplyDelete
  5. अनिता पाठकJanuary 13, 2023 9:36 am

    खूप सुंदर...नवीन माहिती मिळाली .👌👌🌷

    ReplyDelete
  6. गुलाबराव पाथरकरJanuary 13, 2023 9:47 am

    आनंद कसा घ्यावा याचे आपण अनेक मार्ग दाखवून देत आहात म्हणून आपणांस अनेकदा धन्यवाद मॕडम.

    ReplyDelete
  7. चित्रसंथे नवीन शब्द शब्दसग्रहात माझा समाविष्ट झाला . छान माहिती भेटली . चित्रे सुंदर

    ReplyDelete
  8. I visit whenever I am in Bangalore. It is a pleasure to see it, even though one doesn't buy.This year missed it.

    ReplyDelete
  9. सक्कतच!!खरोखरच हा लेखरूपी "चित्रसंथेचा" प्रवास माझ्यासारख्या रसिकांना मेजवानीच...सारेच चित्रसंग्रह व घडवलेल्या पारंपरीक कलाकुसरीच्या वस्तू भारी आहेत.
    माला "Street Art -fair " & "Street Shopping "ही जास्त आवडत...सारेच टिपलेले प्र. चि. सहीच.
    व्यंगचित्रे पाहायला‌ आवडतील...

    ReplyDelete
  10. चित्रसंथेबद्दल प्रथमच माहिती कळाले. वर्णनावरून कलाकारांना एकत्र आणून त्यांची कला जगासमोर आणण्यासाठी केलेले प्रदर्शन म्हणजे वार्षिक बाजार ( संथे शब्दाचा अर्थ म्हणून) . तुम्ही टाकलेल्या छायाचित्रांवरून उत्तम कलाकृती पहावयास मिळाल्या असतील. तुम्ही फेसबुकला टाकलेले फोटो पण पाहिले होते. मस्तच होते.
    प्रा. सौ. वैशाली चौधरी
    ठाणे.

    ReplyDelete
  11. चित्र संथेच्या च्या सफरी बदल धन्यवाद . खरं तर आपल्या देशात वेगवेगळ्या शहरांतून अशी प्रदर्शनं किंवा हाट होतच असतात. त्यात विविध ग्रामीण भागातल्या कारागिरांना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन माफक किमतीत करता येते आणी त्यांना एक मोठे आणि उत्सुक मार्केट आपसूकच मिळते. कर्नाटक हा सुसंस्कृत प्रांत असल्यामुळे त्यांचा रोख प्रामुख्याने कलात्मक पैलू जास्त प्रोजेक्ट करायचा दिसतोय. तुझ्या ह्या अश्या नवनवीन आणी वैविध्यपूर्ण सफारी अशाच चालू ठेव म्हणजे आम्हा आळशी वाचकाना घरबसल्या त्या वर्षा सहली अनुभवता येतील.नेहेमी प्रमाणे तू कुठल्याही प्रसंगाचे, स्थानाचे किंवा वास्तूचे इतके तपशीलवार वर्णन करतेस की सोबत जोडलेले फोटो बघितले की वाटते, किती हुबेहुब असं यांचं वर्णन आपण आत्ताच वाचलेय म्हणून. हा तुझ्या लेखन कौशल्याचा कौतुकास्पद व प्रमाणित दाखला आहे. अशाच नित्य नव्या भटकंती, आणी तद्नंतर च्या लेखमाला ह्यांसाठी तुझा उत्साह वरचेवर वृद्धिंगत होवो हाच तुला आशिर्वाद.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...