पायऱ्यांची विहीर, बदलापूर (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) मुंबई म्हटले की बहुतेक सगळ्यांनाच नको वाटते. सगळ्यांना आठवते, दिसते ती गर्दी, ती घाई, ती अस्वच्छता. माझे मात्र तसे नाही, मला मुंबई नितांत सुंदर वाटते. माझे मुंबईवर अतिशय मनापासून प्रेम! अनेक प्रकारच्या कारणांनी मुंबई भेट होतच असते माझी, अगदी वारंवार. मुंबई भेटीचे कारण काहीही असो, मी माझ्या मनात हेरुन ठेवलेल्या एका तरी ठीकाणाला भेट देतेच देते. यावेळी सुद्धा अशाच एका ऐतिहासिक देखण्या स्थळाला भेट दिली. बर्याच वर्षांपासून मनात असलेली इच्छा पूर्ती झाली, तीही अगदी योग्य आणि लाडक्या व्यक्तींच्या सोबतीने. आज तुम्हा सगळ्यांसाठी हीच आभासी सहल/भेट! पाण्याची मला जीतकी भिती आहे, तितकीच ओढ सुद्धा आहे. मग ते कुठल्याही स्वरुपात असो, समुद्रापासून पाण्याच्या टाकीपर्यंत. गेल्या बर्याच वर्षांपासून मला पायऱ्या पायऱ्या असलेल्या पाण्याच्या ठिकाणांची ओढ/वेड लागले आहे. जीथे जाणार असेल तिथे किंवा जीथे जाईल तिथे अशी ठिकाणं शोधून काढते. त्यापैकीच एक म्हणजे बदलापूर, ठाणे इथे असलेली ही पायर्यांची विहीर. मुंबई-कर्जत रेल्वे मार्गावर ...